Monday, May 19, 2014

गायतोंडे आणि ' फेक ' फेकाडे

गायतोंडे आयुष्यभर पेंटिग्ज हाच एकमेव ध्यास घेवून जगले. 
त्यासाठी जो काही त्याग करायला हवा होता तो त्यांनी केला, अगदी आयुष्यभर केला. सर्व नातीगोती पाश त्यांनी तोडून टाकले आणि दिल्लीतल्या साध्याशा बरसातीत आयुष्यभर कलासाधना करीत राहिले. ललित कलावाल्यांनी त्यांना कमिटीत घेतलं, हे एकाही मिटींगला गेले नाही. सरकारनं त्यांना सिनेमाच्या सेन्सार बोर्डावर घेतलं हे एक देखील सिनेमा पाहायला गेले नाहीत. पेंटिग खेरीज अन्य काही करावयाचंच नाही हे त्यांनी ठरवून टाकलं आणि शेवटपर्यंत ते त्यालाच चिकटून राहिले. बरं पेंटिग्ज तरी किती वर्षाला फक्त सहा ती देखील कॅनव्हासवर आणि ते कॅनव्हास देखील मोठे, बारीकसारीक काम नाहीच. फार तर सातवं पेंटिग त्यांनी कधी केलं तर, नाहीतर सहाच, कारण मुंबईला पाठवताना ते समोर समोर ठेवून तीन जोड्या पाठवायला देखील सोपे जावे म्हणूनही असेल कदाचित. बस. रेखाटनं काही केली तर ती, बाकी काही नाही. हे सारं मला आधीपासून ठाऊक होतं, त्यांचा सहवास लाभलेल्या अनेकांनी ते सांगितलं होतं. 



पण परवा दादिबा यांचा लेख आला आणि ते सारे कन्फर्म झालं. पण मग आता दीड- दोन किंवा दोन - तीन फुटांची जी किडूक मिडूक पेंटिग्ज गायतोंडे यांची म्हणून मार्केट मध्ये फिरताहेत ती गायतोंडे यांनी केली तरी कधी ? अर्थ उघड आहे ती सारी पेंटिग्ज ही फेक पेंटिग्जच आहेत . हे सारे भयंकर आहे . गायतोंडे यांच्या सारख्या जिनियस चित्रकाराचा तो केला गेलेला भयंकर अपमान आहे. जे आणि जसं आयुष्य गायतोंडे जगले त्याचं यथार्थ चित्रण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकानंच या " गायतोंडे " ग्रंथात केलं आहे. ते वाचल्यावर तर ज्यांनी कुणी हे गायतोंडे यांच्या चित्रांचे कारखाने काढले आहेत त्यांच्या विषयीचा संताप अनावर होतो. पैशाच्या लालसेपोटी ज्या चित्रकारांनी ही अत्यंत नीच, घृणास्पद आणि शरमेनं मान खाली घालावयासलावणारी कृत्ये केली आहेत.



त्यांना एक सूचना आहे, किंवा त्याला ईशारा देखील म्हणावयास हरकत नाही "गायतोंडे" ग्रंथात आम्ही त्यांची ६० - ६५ पेंटिग्ज प्रसिद्ध करतो आहोत, अन्य तीन प्रकाशक जी तीन पुस्तके प्रकाशित करीत आहेत त्यात आणि गुगेनहेम म्युझियम जो कॅटलॉग प्रसिद्ध करीत आहे त्यात गायतोंडे यांची बहुत्येक सर्वच पेंटिग्ज प्रसिद्ध होतील यात शंकाच नाही , तेव्हा तुम्ही तुमचे हे लघुउद्योग आता आवरा नाही तर एक ना एक दिवस तुरुंगात जाऊन पडाल हे नक्की . जे भारतीय कलेच्या इतिहासात कधी घडले नाही असे बरेच काही गायतोंडे यांच्या बाबतीत अलीकडे घडले आहे . त्याची अगदी नावनिशीवार अचूक माहिती ' चिन्ह ' पाशी उपलब्ध आहे , पण तूर्त तरी आम्ही ती जाहीर करू शकत नाही कारण त्या बाबी न्यायप्रविष्ट आहेत . काही प्रकरणं पोलिसांपर्यंत पोहोचली आहेत. वेळ येईल तेव्हा हे सारे आम्हीच 'चिन्ह ' मधून जाहीर करू हे निश्चित समजा. ' गायतोंडे ' ग्रंथ प्रसिद्ध होई पर्यंत अशा अनेक उचापतखोर मंडळींचे उद्योग इथून वेगळ्या पद्धतीनं जाहीर करावयाचा विचार आहे, पाहूया कितपत जमते ते. 

बाय वे "
गायतोंडे" ग्रंथ आपण बुक केला का ? नसेल तर आज नाही आत्ता करा. फक्त एक एसेमेस पाठवा तुमच्या नाव पत्ता आणि इमेलसह , आणि संदेश लिहा 'NKG' बस ……

ही सर्व गायतोंडे यांची मूळ (Original) चित्रे आहेत.

No comments:

Post a Comment