Tuesday, May 6, 2014

चांगलं पेंटिंग म्हणजे काय ? ते कसं असतं ?

छपाईला जाण्यापूर्वी शेवटचा पुन्हा एकदा वाचावा म्हणून " गायतोंडे " ग्रंथ कितव्यांदा वाचला कुणास ठाऊक पण तरी जाताजाता चारदोन चुका मिळाल्याच शुद्ध लेखनाच्या. आता मात्र त्यात तशा चुका मिळणार नाहीत हेमी खात्रीने सांगू शकतो. माझ्या दृष्टीने सांगायचे तर या ग्रंथात सारेच्या सारे काही जमून आले आहे. जरी तो एका चित्रकारावरचा ग्रंथ असला तरी ' गायतोंडे ' यांच्या उतुंग व्यक्तिमत्वामुळे त्या ग्रंथाला वेगळंच चौफेर परिमाण लाभलं आहे. 

आता उदाहरणार्थच पहा, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या साऱ्याच घटना या ग्रंथात संकलीत झाल्या आहेत पण त्या करताना गायतोंडे यांची चित्रकलेची भूमिका, त्या मागचं त्याचं तत्वज्ञान, जगण्यातलं तत्वज्ञान, त्यांचा वैचारिक प्रवास, त्यांच्यावर असलेला इतरांचा प्रभाव, त्यांचं आयुष्याविषयीचं तत्वज्ञान, त्यांचे नानाविध अनुभव या सार्यांचच संकलन या ग्रंथात होणं अपेक्षित होतं, जे ' गायतोंडे ' समजावून घेण्यासाठी वाचकांना, त्यांच्या चाहत्यांना, चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना आणि कलेच्या अभ्यासकांना उपयोगी ठरावं . सांगावयास आनंद वाटतो की ते सारे जमवून आणण्यात आम्ही बरेचसे यशस्वी देखील ठरलो आहोत. तसं नसतं तर मला देखील हा ग्रंथ कामाचा भाग असला तरी इतक्यांदा वाचवला नसता, हे मोकळेपणाने कबूल करावयास मला संकोच वाटत नाही. अर्थात याचे सारे श्रेय अर्थातच गायतोंडे यांनाच आहे. तसेच जे या ग्रंथाच्या लेखन प्रकियेत सहभागी झाले त्या साऱ्याच गायतोंडे यांच्या स्नेही, चाहते आणि आप्तजनांना तसेच हे सारे अत्यंत संवेदनशीलपणे लिखित स्वरुपात नोंदवून घेणाऱ्या शर्मिला फडके, माणिक वालावलकर आणि विशेषतः कमलेश देवरुखकर या लेखक मंडळीनाच आहे. मी फक्त हे सारे जमवून आणावयाचे काम केले इतकाच त्यातला माझा सहभाग आहे. 


एअर इंडियाचे माजी कला संचालक सच्चिदानंद दाभोळकर हे गायतोंडे जेव्हा जेजे मध्ये वर्षभर शिकवत होते तेव्हा गायतोंडे यांच्या वर्गात शिकत होते. मग नंतर त्यांची मैत्री देखील झाली. प्रफुल्ला डहाणूकर, शरद पाळंदे आणि मनोहर म्हात्रे हेदेखील त्यांचेच विध्र्यार्थी. हे दाभोळकर नंतर एअर इंडियाचे आर्ट डिरेक्टर झाले . त्यांच्याच काळात एअर इंडियाचा कला संग्रह खूप बहरला. त्यांनी ' गायतोंडेंच्या शोधात … ' अंकासाठी एक दीर्घ मुलाखत दिली होती. जिचा समावेश " गायतोंडे" ग्रंथात झाला आहे. त्यातील एक परिच्छेद वाचला आणि हे मला तुमच्याशी शेअर केल्याशिवाय रहावेना. ते म्हणतात " फिगरेटिव्ह कडून हा अमूर्त कलेकडे वळला . पण याचंच अमूर्त चित्र का भाव खाऊन गेलं ? कारण याचं ग्रामर पक्क होतं ना. संगीतात कसा रियाझ लागतो सततचा, तसंच. चांगल्या पेंटिगचे निकष काय ? तर त्यात स्पेस पाहिजे, प्रपोर्शन पाहिजे, बेलन्स पाहिजे, ट्रीटमेंट चांगली पाहिजे, टेक्सचर पाहिजे, फ्रेशनेस पाहिजे. चित्र कितीही दिवसांनी, वर्षांनी पाहिलं तर ते फ्रेश वाटलं पाहिजे. बरपरत ते काम खूप लेबर्ड म्हणजे मोलमजुरीचे नाही वाटले पाहिजे. खूप मेहेनत, कष्ट करून ते काढलंय असं वाटलं तर चित्र फ्लॉप, त्यात सहजता पाहिजे , ती सहजता येण्यासाठी , तो फॉर्म गवसण्यासाठी रेम्ब्रा वगॆरे मंडळी चित्र काढता दोन दोन तास नुसती चित्राकडे पाहत बसायची, ती काय उगीच ? गायतोंडे पण त्यातलाच .……………………. " पुढला भाग आता तुम्ही थेट ग्रंथातच वाचावा हे बरं.


या अत्यंत मुलभूत अशा प्रचंड गोष्टी या ग्रंथाच्या पानापानावर ठासून भरल्या आहेत. हे हेतूपुरस्सर जमवून आणलेले नाही, पण डोळ्यासमोर धूसर धुसर असे काही तरी होते, ते तेव्हा सांगता येत नव्हते पण आता मात्र शब्दात मांडता येते आहे. कदाचित या साऱ्या गोष्टींमुळेच गायतोंडे यांच्या वरच्या अंकाला सतत मागणी येत राहिली असावी, जी आम्ही पुरी करू शकलो नाही. चित्रकलेचे विद्यार्थी तर या अंकाच्या झेरॉक्स प्रतीसाठी देखील अक्षरशः जीव टाकत असतात. बहुदा त्यांना त्यात आयुष्यात पुढे काहीतरी उपयोगी ठरू शकेल असे काहीतरी असावे. ज्यांनी आयुष्यात कधी पुस्तकाला स्पर्श देखील केला नाही ती चित्रकार मंडळी जेव्हा भारावून जावून, गदगदून जेव्हा ' गायतोंडेंच्या शोधातवाचलं बर का, लय भारीय ' असं सांगतात तेव्हा केल्या श्रमाचं सार्थक झाल्याचा असतो. 

लिलावाच्या २३ कोटी ७० लाखाच्या बातमीप्रमाणे गायतोंडे यांच्या वरच्या या ग्रंथांनं देखील काही चकरावून टाकणारी बातमी दिली तर मला तरी काही त्याचे आश्चर्य वाटणार नाही, कारण तशी लक्षणं या ग्रंथाचा निर्माता म्हणून मला दिसू लागली आहेत हे नक्कीच . बाय वे या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती नक्की प्रसिद्ध होते आहे हेही सांगून टाकतो ….

No comments:

Post a Comment