Monday, May 5, 2014

गायतोंडे, उस्कई आणि देऊळ….

गोव्यात अमूर्त काम करणारे अगदी मोजके कलावंत आहेत. सुहास शिळकर हे त्यातलं एक नाव त्याची माझी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. एके दिवशी त्याने फेसबुकवर तिखट कॉमेंट केलेली मी वाचली, आणि त्याला मी सणसणीत उत्तर दिलं. ते सारं तिथंच संपलं. मग चिन्ह च्या ' गायतोंडे ' ग्रंथाची घोषणा झाली. त्याला एक प्रत हवी असल्याचा त्याचा sms आला. मग एके दिवशी आम्ही पहिल्यांदाच फोनवर बोललो, बोललो कसले वादचं घातला. तेव्हा तो गोव्यात आणि मी ठाण्यातून एवढ्या मोठ्यानं बोलत होतो की, आम्ही दोघांनी फोन बाजूला ठेवला असता तरी आम्हा दोघांना ते सहज ऐकू गेलं असतं. त्या वादातली माझी बाजू बहुधा त्याला पटली असावी कारण त्यानंतर आम्ही वरचेवर गप्पा मारू लागलो. 

गायतोंडेंना भेटण्याचं भाग्य त्याला लाभलं होतं. त्यामुळं गायतोंडे विषयी काहीना काही माहिती त्याच्याकडून मिळेल असं मला वाटत होतं, आणि घडलंही तसंच, उपयोगी ठरेल अशी बरीच माहिती त्यानं मला दिली. गायतोंडे यांच्या अनेक संग्राहकांची नावं त्यानं मला दिली. तसंच गायतोंडे यांची माझ्याकडे नसलेली, पण त्याच्या संग्रहात असलेली एक सुंदर मुलाखतही त्यानं मला दिली. मुख्य म्हणजे गायतोंडे यांच्या गोव्यात असलेल्या दोन चित्रांच्या इमेजेस त्यानं स्वतः शूट करून पाठवल्या. 

मी त्याला म्हणालो तू या ग्रंथाचे १६५० हे जे सवलत शुल्क भरलं आहेस ते मी परत पाठवतो. तू एवढी मदत आम्हाला केली आहेस की ते घेणं बरोबर वाटतं नाहीये. तर तो तिकडूनच ओरडून म्हणाला ' तू जे काम करतोयस ते माझापेक्षा खूप मोठं आहे. असलं काम कोणी कोणासाठी करतं नाही. तेव्हा तूं पैसे वगैरे परत पाठवू नकोस मी ते घेणार नाही '. असे प्रसंग चिन्हचं काम करतांना वेळोवेळी, पदोपदी येत असतात. त्यावेळी काय करायचं हे मला अनुभवाने ठावूक झालं आहे आणि ते मी करणारच आहे.

मुद्दा हा नव्हता. खर सांगायचं तर मला सांगायचं वेगळंच होतं. परवा सुहास फोनवर बोलता बोलता म्हणाला, गायतोंडे यांच्या उस्कई गावात कर्नाटकामधला एक कलावंत राहतो देवीप्रसाद त्याच नाव आहे. मागच्याचं महिन्यातली गोष्ट. तो भाजी आणण्यासाठी म्हणून गावात गेला. भाजी घेतली तर भाजीवालीनं त्याला विचारलं, ' तू काय करतोस ? ' तो म्हणाला, ' मी चित्रकार आहे चित्र काढतो, पण भिंती रंगवणारा पेंटर नाही मी '. तर ती भाजीवाली म्हणाली, ' मला माहीती आहे, मला चांगलं समजतं. माझा एक नातेवाईक चित्रकार होता, मोठा चित्रकार '. आत याचं कुतूहल जागृत झालं. ही भाजी विकणारी काहीशी अपंग बाई गोवा सरकारनं दिलेल्या भाजीच्या गाडीवर गुजराण करतेय, आणि आपला नातेवाईक मोठा चित्रकार असल्याच सांगतेय, याचं त्याला मोठं कुतूहल वाटलं आणि त्यानं तिला विचारलं, ' नाव काय त्याचं ? ' तर ती भाजीवाली बाई म्हणाली, गायतोंडे, 'वासुदेव गायतोंडे'. ते नाव ऐकलं मात्र आणि हा वेडा झाला. ती बाई भाजी विकायची सोडून गायतोंडे यांचा समग्र इतिहास याला सांगत राहिली. परवाच्या लिलावात २३ कोटी ७० लाखाला गायतोंडे यांचं पेंटिंग गेलं हे सुद्धा तिला ठावूक होतं. ते सारं ऐकून, पाहून तो आर्टिस्ट चक्रावून गेला आणि मग पणजीत आल्यावर त्यानं तो सारा किस्सा सुहासला कथन केला. सुहासनं तो मला सांगितला. मी आता तो तुम्हांला सांगतोय. अशा पद्धतीनं गायतोंडे यांच्याविषयी प्रचलित असलेल्या दंतकथांमध्ये आणखी एका कथेची भर पडली. ' 

सुहासला म्हटलं त्या बाईचा पत्ता पाठव. मी येतो तिला भेटायला तर सुहास म्हणाला, तो देवीप्रसाद आता जर्मनीला गेला. तो आला की त्याच्याकडून पत्ता घेतो. सुहासला म्हटलं नक्की घे आणि मला दे. कारण ' गायतोंडे ' ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी गायतोंडे यांच्याशी संबंधीत सगळ्याचं गायतोंड्यांना आमंत्रण द्यायचं आम्ही ठरवलंय. पत्ता मिळाला तर त्या भाजीवालीला देखील आम्ही बोलावणार आहोत. 

ता. . 
या पोस्टमध्ये जे प्रकाशचित्र वापरलं आहे ते गायतोंडे यांच्या घराजवळच्या देवळाचं आहे. याच देवळाच्या भिंती रंगवणाऱ्या चित्रकाराला पाहून गायतोंडे यांना चित्रकार होण्याची प्रेरणा मिळाली. चिन्हला हे प्रकाशचित्र शांताराम वर्दे वालावलीकार यांनी मिळवून दिलं आहे. दुसरं प्रकाशचित्र गायतोंडे याचं, तर तिसरे चित्रकार सुहास शिळकर.

No comments:

Post a Comment