Monday, May 5, 2014

गायतोंडे आणि फिरोज रानडे

एके दिवशी प्रख्यात लेखिका प्रतिभा रानडे यांचा फोन आला. गायतोंडे यांच्यावरचा ग्रंथ लवकरच प्रसिद्ध होतो आहे ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्या संदर्भात त्यांनी फोन केला होता. नेमका मी तेव्हा घरी नव्हतो. पणपत्नीजवळ त्यांनी सविस्तर निरोप ठेवला होता. त्यांना त्या ग्रंथाची एक प्रत हवी होती. मग बोलता बोलता त्यांनी त्यांचे पती मुकुंद अर्थात फिरोझ रानडे यांनी दै. लोकसत्तासाठी लिहिलेल्या गायतोंडे यांच्यावरच्या लेखाचं स्मरण करून दिलं. म्हणाल्या तो तुम्ही वाचला असणारचं, शक्य झालं तर तर तो लेख या ग्रंथात समाविष्ट करा. . मग त्यांच्याकडे गायतोंडे आणि रानडे यांचे काही जुने फोटो आहेत का अशी विचारणा केली असता त्या म्हणाल्या की एक फोटो कोणीतरी मला पाठवलाय. तो बहुधा १५ ऑगस्ट १९४७ रोजी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये काढलेला आहे ज्यात गायतोंडे, यंदे यांच्यासोबत फिरोझ रानडे सुद्धा आहेत. तो फोटो तुम्हाला पाठवू का अशी विचारणा त्यांनी केली. पण तो 'चिन्ह'नंच प्रकाशित केलाय असं त्यांना सांगितल्यावर त्यांना त्याचं नवल वाटलं. घरी आल्यावर हा सगळा वृत्तांत पत्नीनं मला कथनं केला. पण हा निवडक 'चिन्ह'चाच दुसरा खंड असल्यानं इतरत्र प्रसिद्ध झालेल्या मजकुराचा यात समावेश करता येणार नाही. म्हणून मी त्या सूचनेचा विचार करण्याचंच टाळलं. 


काही दिवसानं मुखपृष्ठात खूप मोठा बदल झाला. मुखपृष्ठाच्या शिरोभागी असलेला निवडक चिन्हचा लोगो मुखपृष्ठाच्या पायथ्याशी गेला आणि 'गायतोंडे' हे शीर्षक मुखपृष्ठाच्या शिरोभागी आले. आता सारे परिमाण बदलले होते. ग्रंथाचं संपादन चालू असतांना त्यातील मजकुराचं असंख्य वेळा वाचन होत असतं. अशाच एका वाचनाच्या वेळी ग्रंथात गायतोंडे यांचे (माझेही) मित्र ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा लेख समाविष्ट करणं जरुरीचं भासू लागलं. आणि 'अश्वथाची सळसळ' मधला नाडकर्णी यांचा लेख 'गायतोंडे' ग्रंथात समाविष्ट झाला. असंच पुन्हा एकदा वाचन करतांना मनात विचार आला "फिरोझ रानडे यांचा लेख का नको ?" असा मग तो ही लेख या ग्रंथात समविष्ट झाला. हा झालेला निर्णय प्रतिभा रानडे यांना कळवला. तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला म्हणाल्या "थोडं आधी आपण भेटलो असतो, तर बरं झालं असतं, रानड्यांनी खूप आठवणी तुम्हाला सांगितल्या असत्या. रानडे
गायतोंडे विषयी खूप भरभरून बोलायचे. जेजेतल्या त्या दिवसंविषयी त्यांच्याकडे सांगण्यासारखंही भरपूर काही होतं. खरं सांगायचं तर लोकसत्तेमध्ये रानडेंचा लेख प्रसिद्ध झाला तेव्हाच रानडे यांना भेटायचं मी ठरवलं होत पण मुंबईतल्याच एका व्यक्तींनं गायतोंडे ग्रंथाच्या बाबतीत अशी काही पाचंर मारून ठेवली की तो ग्रंथ काढण्याविषयीचा माझा उत्साहच मावळला गेला.म्हणूनच रानडे यांच्याशी त्यावेळी इच्छा असूनही संपर्क होऊ शकला नाही. प्रतिभा रानडे यांच्याशी बोलता बोलता १५ ऑगस्टमधल्या त्या गाजलेल्या फोटोमधली ती चौथी व्यक्ती कोणं असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, नाही, तो आता आठवत नाही. पण यांच्या बोलण्यात सतत प्रभावळकर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख येत असे. या चौघांचा ग्रुप होता. हे प्रभावळकर आर्किटेक्ट झाले आणि नंतर लंडनला गेले. बहुधा तेच असावेत. हे सारं मोकळेपणानं लिहितो आहे खरं पण रानडे यांच्याशी संपर्क साधल्यानं एक चांगली संधी गमावल्याचे दुखः मला आजही होत असतं.

No comments:

Post a Comment