Wednesday, December 24, 2014

गायतोंडे उवाच…

भाग - ४

: तुम्ही तुमचं चित्र सर्वसामान्य माणसाला कसं स्पष्ट करून सांगाल ? कारण की ती चित्रं मानवी आकृतींची वा प्रातिनिधिक स्वरुपाची नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस नक्कीच चित्रं पाहतांना कोड्यात पडत असावा.

: जशी एखाद्या शास्त्रज्ञाची व गणितज्ञाची एखादी थिअरी ही सर्वसामान्य माणसाला कळू शकत नाही, तसंच मला हे वाटतं. खरं तर त्यानं स्वतः गंभीरपणे प्रयत्न केल्याशिवाय तो चित्र समजू शकणार नाही. कलेला संगीतालासुद्धा अत्यंत विशिष्ट पद्धतीची शिस्त लागते. म्हणूनच शेवटी कलारसिक आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनीच कलेचं रसग्रहण करून स्वतःच कला समजू शकतो, समजून घेऊ शकतो. मला असं वाटतं की, समीक्षक कदाचित काही काही विवेचन (interpretation) करून त्याचा उलगडा करू शकतो.

Tuesday, December 23, 2014

कपडे काढून काम करतो…

गायतोंडे उवाच
भाग


मुलाखतीच्या वेळी समोरून आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गायतोंडे अतिशय मोजक्याच शब्दात देतात. त्या तुम्ही कधीही वाचा, त्यात तुम्हाला नक्कीच काहीना काही गवसून जाईल. अतिशय गांभीर्यानं उत्तर देणारे गायतोंडे काही प्रश्नांना जी मिश्किल उत्तरं देतात ती वाचल्यावर तुम्ही नक्कीच हसत सुटता. उदा. पुढील प्रश्नोत्तरात दिलेलं चौथं प्रश्नोत्तर पहा. गायतोंडे यांचं दिल्लीतलं सर्वच आयुष्य बरसातीत गेलं. बरसाती म्हणजे छोट्या इमारतींमधली नोकराचाकरांसाठी बांधलेली छोटीशी खोली. गायतोंडे यांनी दिल्लीच्या संपूर्ण वास्तव्यात अशाच दोन खोल्यांचा स्टुडिओ म्हणून वापर केला. काळदाते यांनी चित्रित केलेल्या फिल्ममधल्या त्यांच्या स्टुडीओचं दर्शन होताच पाहणारा हादरून जातो. अशा गच्चीतल्या जागेत उन्हाळ्यात दिल्लीचं तापमान ४०-४५च्या वर गेल्यावर काम करणं केवळ अशक्य असे. त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता गायतोंडे मात्र मिश्किलपणे उत्तर देतात 'कपडे काढून काम करतो.'
'गायतोंडे' ग्रंथातील पुढील प्रश्नोत्तरे पहा...

: तुमचे काही अनुभव, आठवणी, आयुष्यातल्या महत्वाच्या घटना यांवर सांगाल ?
: नाही, त्या काहीच शिल्लक राहिल्या नाहीत. आता खरं तर काहीच आठवत नाही. खरं सांगायचं तर महत्वाकांक्षा अशी मी कधी बाळगलीच नाही. आयुष्य जसं जसं समोर येत गेलं तसा तसा मी जगत गेलो.
 
 : आयुष्यात काही मिळवलंय असं समजता ?
: मी मीआहे. हे मीपण मी मिळवलं.
: स्वतःचं व्यक्तिचित्रणं कधी केलंय ?
: चित्रकार जे काही करतो ते त्याचं स्वचित्रणच (सेल्फ पोट्रेटच) असतं.

: उन्हळ्यात इथं तापत असेल; तेव्हा कसं काम करता?
: कपडे काढून काम करतो.

: भविष्याबद्दल काही विचार केलाय ?
: काही नाही. जे आहे ते आहे. दिवस आहे तो दिवस आहे.
 
गायतोंडे ग्रंथाचा प्रोमो पहायचा असेल किंवा निर्मितीची कथा सांगणारा २८ पानी विशेष लेख वाचायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा http://www.chinha.co.in/promo/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf आणि ग्रंथ हवा असेल तर ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचे नावं, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा.

Tuesday, December 16, 2014

म्हणून मी लग्न केलं नाही…


गायतोंडे उवाच
भाग २


गायतोंडे मुळातच कमी बोलत. दिवसन दिवस ते काहीही न बोलता राहू शकत असतं. पण जेव्हा केव्हा बोलत तेव्हा मात्र असं बोलत की ते टिपून घ्यावं. त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्या त्यापूर्वीच्या मौनातील चिंतनामधून उतरलेला असायचा, अर्थगर्भ-अर्थपूर्ण-कमीतकमी शब्दात खूप काही सांगून जाणारा. अनेकदा मिश्किलतेचं आवरण त्यांनी घेतलेलं असायचं पण त्यातूनही ते बरंच काही सांगून जायचे. अशाच एक मुलाखतीतून आलेली ही प्रश्नोत्तर पहा.

: तुम्ही लग्न नाही केलं ? लग्नसंस्थेवर विश्वास नव्हता म्हणून ?
: तसं नाही. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे; पण मी संसारी माणूस नाही. लग्न म्हणजे सहजीवन. आणि मी कुणाही बरोबर सहजीवन व्यतीत करू शकत नाही. मी माझ्या मार्गानं जगू इच्छितो. जसं आहे तसं. आणि ते मी एकाकी राहूनच साध्य करू शकतो. म्हणून मी लग्न केलं नाही.

: लग्नाचा विचार तरी कधी केला होता ?
: जवळ जवळ लग्न झालंच होतं, पण सुदैवानं ते फिसकटलं. 
 
: ते कसं ?
: ते सर्व मी इथं उघड करू शकत नाही. शिवाय त्याच वेळी मला जाणवलं की मी कोणाहीबरोबर सहजीवन व्यतीत करू शकत नाही. जर आम्ही विवाहबद्ध झालो असतो तर कदाचित आम्ही उभयतांनीही एकमेकाप्रतीचा तो आदर गमावला असता. सहजीवन जगण्यासाठी तुमच्याजवळ एक प्रकारचा समजूतदारपणा हवा. पण तो समजूतदारपणा तिच्याजवळ नव्हता आणि माझ्याकडेही !

: त्यानंतर पुन्हा कधी लग्नाचा विचार मनात आला ?
: नाही. पण प्रेम खूप केलं. अनेक स्त्रिया आयुष्यात आल्या आणि गेल्या. पण लग्नाचा विचार मग कधीच केला नाही. मला जाणवलं की लग्न, संसार या गोष्टी माझ्यासाठी नाहीत.

गायतोंडे यांच्या दुर्मिळ मुलाखतीमधून घेतलेली ही काही प्रश्नोत्तरं. गायतोंडे यांनी ज्या मोजक्याच मुलाखती दिल्या त्यातल्या सहा मोजक्याच मुलाखती आम्ही गायतोंडे ग्रंथात प्रसिध्द केल्या आहेत. गायतोंडे यांच्या विलक्षण व्यक्तिमत्वाचं दर्शनच या प्रश्नोत्तरातून घडतं.

या ग्रंथाचा प्रोमो पहायचा असेल किंवा निर्मितीची कथा सांगणारा २८ पानी विशेष लेख वाचायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.chinha.co.in/promo/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf आणि ग्रंथ हवा असेल तर ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचे नावं, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा.
गायतोंडे उवाच …
भाग १


: आजकालच्या चित्रकारांबद्दल, कलेबद्दल काय मत आहे ?
: मी गेल्या २० वर्षात कुठंही गेलो नाही. मला काहीच माहित नाही. माझा संबंध कलेशी नाही, माझ्या पेंटिंगशी आहे. 

:
दिवसाकाठी किती काम करता ?
:
मी काम नाही करत. आराम करतो, प्रतीक्षा करतो, वाट पाहतो नि मग रंग सोडतो. बळजबरीनं काम करण्याला मी पलायन समजतो.


: पलायन ?
:
हो ! तुम्ही वाचता, पलायन करता. पेंटिंग करता, पलायन करता. स्वकेंद्रित व्हाल तर काही घडेल. जे काही होईल ते घडणं नसेल, होणं असेल.


( ‘गायतोंडेग्रंथातील गायतोंडे यांच्या दुर्मिळ मुलाखतीतून )