Tuesday, May 6, 2014

" वह कौन थी ? "

दोन तीन दिवसांपूर्वी सुधा मदन यांचा फोन आला. म्हणाल्या तुम्ही गायतोंडे यांच्यावर पुस्तक काढताय हे मला समजलं. मला तुम्हाला काही फोटो पाठवायचे आहेत. म्हटलं कसले फोटो ? तर म्हणाल्या, जेजेत असताना आमची एक स्टडी टूर गेली होती राजस्थानात. उदेपूर वगॆरे ठिकाणी. त्यावेळचे फोटो आहेत. त्यात गायतोंडे आहेत, मोहन सामंत आहेत, भानू अथय्या आहेत. मला ते तुम्हाला द्यायचे आहेत. पुस्तकात छान उपयोगात येतील तुमच्या . कसे पाठवू सांगा, कुरियर करू का? त्यांनी जे वर्णन केलं ते फोटो कुठून कुठून फिरत फिरत मजजवळ आधीच आले होते. त्याना मी तसं सांगितलं देखील. तर त्या म्हणाल्या त्यातले सारेच फोटो तुमच्या पाशी आले नसतील. दोन नवे आहेत. आता मी तरी ते ठेवून काय करू ? मी माझं सारं आवरतेयआता यावर काही बोलणं मला तरी योग्य वाटेना. मग मी त्यांना माझा पत्ता दिला. काल ते फोटो अखेरीस माझ्याकडे आले. 

सुधा मदन म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुधा उपळेकर. त्याही आमच्या जेजेच्याच. पण त्या तब्बल ६२ वर्षापूर्वी डिप्लोमा झाल्या. ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथय्या पूर्वाश्रमीच्या भानू राजोपाध्ये या त्यांच्या आधीच्या जेजेत वर्षी शिकायला होत्या. भानू आणि सुधाताई दोघीही त्या काळात कोल्हापुरातून जेजेत शिकायला आल्या होत्या. याच काळात गायतोंडे देखील जेजेत शिकत होते. पण ते यांना सिनियर होतेआता सुधाताई ८६ वर्षाच्या आहेत. पण अजूनही त्यांना सारं काही आठवतं . सुधाताई नंतर स्थायिक झाल्या. तीन सुवर्ण पदकं मिळवलेल्या सुधाताईनी भारतात जवळ जवळ ११-१२ प्रदर्शनं भरवली आहेत. जी गांगल यांनी त्यांच्यावर एक छोटेखानी पुस्तक देखील प्रसिद्ध केलं आहे. खूप वर्षापूर्वी गांगल यांनीच त्यांची आणि माझी ओळख करून दिली होती. नंतर कधीतरी एकदा चिन्हचा भास्कर कुलकर्णी अंक पाहून भास्कर कुलकर्णी यांची दुर्मिळ प्रकाशचित्र पाठवली होती. आणि आता ही गायतोंडे यांची. 



मग मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. भानू अथॆय्या त्यांची मैत्रीण असल्यानं त्यांचाही विषय निघाला. म्हणाल्या, " भानू इथंच जवळपास राहते, पण आता मात्र आमची काही भेट होत नाही." गायतोंडे यांच्या विषयी त्या खूप आदरानं बोलत होत्या. त्यांचं काम तेव्हा खूपच चांगलं होतं. सतत चित्रांविषयीच बोलत असायचे ते . म्हटलं मी तुम्हाला भेटू काकाही आठवणी सांगाल का ? तर म्हणाल्या ते आम्हाला सिनियर होते. त्यामुळे तशा काही फार आठवणी नाहीत. पण तेव्हा देखील ते ग्रेट होते यात शंकाच नाही. 

फोटो तर मस्तच होते. मी अधिक खूष झालो कारण ते मूळ फोटो होते, आधी जे फोटो माझ्याजवळ आले होते ते कॉपी केलेले होते. त्यांचा रिझल्ट तितकासा चांगला आला नसता. त्यातला एक फोटो मी मुद्दाम इथं देतो आहे कारण त्या फोटोतली जिचं चित्र गायतोंडे पाहत आहेत ती तरुणी कोण ? असा प्रश्न पुस्तक वाचणारा प्रत्येकजण विचारणार आहे. तब्बल ६२ वर्षापूर्वी काढलेल्या या फोटोतल्या त्या तरुणीचे फीचर्स इतके विलक्षण सुंदर आहेत की, तो पाहणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न सतावणार आहे की ' ही आहे तरी कोण ?' सुधाताईना देखील ती आठवत नाहीये. खूप खोदून विचारलं तेव्हा म्हणाल्या." ती आम्हाला ज्युनियर होती , पण नंतर तिने चित्रकलेत फारसं काही केलं नाही . मला नाही हो तिचं नाव आठवत."


या उत्तराने मी अधिकच अस्वस्थ झालो. शेवटी मी ठरवलं की हा फोटो आपण फेसबुकवर टाकायचा. ती तरुणी आता साधारण ८० ८२ वर्षाची असणार आहे. ती फेसबुक पाहू शकणार नाही, पण तिच्या मुलांनी, नातवंडान, सुनांनी किंवा त्यांना ओळखणाऱ्या आणखी कुणीही हा फोटो पहिला आणि त्यांना ओळखलं तर ते आम्हाला कळवू शकतील काय ? कारण हा फोटो पाहिल्यावर पाहणाऱ्याच्या तोंडून हमखास प्रश्न विचारला जाणार आहे ". ती कोण ? "

या फोटोत मध्ये बसल्या आहेत त्या सुधाताई, आणि मागे उभे आहेत ते ' गोडसे '. आता हे गोडसे कोण ? जी मंडळी या पोस्ट्स वाचताहेत ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील का ?

No comments:

Post a Comment