Tuesday, May 6, 2014

काय ब्र करावं ?


" तू चित्र का काढतोस ? "पंडोल आर्ट गेलरीचे संचालक काली पंडोल यांनी एकदा ' गायतोंडे ' यांना प्रश्न विचारला . प्रश्न संपतो संपतो तोच ' गायतोंडे ' यांचं उत्तर देखील हजर " तू विकतोस म्हणून मी चित्र काढतो. " आणि मग दोघंही खो खो हसत सुटले
' दादिबानं याच किश्शाने मुलाखतीची सुरवात केली रे, आणि मग तो गायतोंडे यांच्यावर बोलतच गेला. आमच्या प्रश्नांची काही गरजच भासली नाही इतकं छान बोलला तो… ' कोलते सर सांगत होते. 

" गायतोंडे " ग्रंथाच्या सुरवातीच्या आराखड्या पासून दादिबा पंडोल यांचं नाव यादीत होतं. कारण गायतोंडे यांनी ' पंडोल ' सोडून कधीच कुठल्याही गेलरीत आपली चित्र प्रदर्शित केली नाही. वर्षातून फक्त सहा किंवा सात केनव्हास ते रंगवत. ते सारे मुंबईत पंडोलला देत आणि ते देतील ते पैसे खिशात ठेवून ते पुन्हा दिल्लीला निघून जात. अतिशय छान संबंध होते त्यांचे काली पंडोल यांच्या सोबत . त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलानं दादिबानं देखील ते तसेच ठेवले होते. त्यामुळे त्यांचा लेख गायतोंडे ग्रंथासाठी कसंही करून मिळवायचाच असा मी चंग बांधला होता. 

पण दोन वर्षे उलटली तरी ते काही जमून येईनाच. दादिबा सतत प्रवासात, त्यात त्यांनी दुबईत नवी गेलरी उघडलेली, हुसेन यांची प्रकृती बिघडलेली. दादिबांच्या मुंबई -दुबई - लंडन अशा चकरा वाढलेल्या, त्यात हुसेन यांचं निधन झालेलं. नंतर दादिबांनी देखील लिलावाच्या उद्योगात प्रवेश केलेला . एक ना दोन . त्यांची भेट काही होईनाच. कोलते सर म्हणाले ' काळजी करू नकोस. मी पाहतो ' पण तेही स्वतः इतके बिझी कि त्यानाही ते शक्य होईना. त्याचा लेख तर हवाच होता. कारण दादिबानी गायतोंडे यांना अगदी लहानपणापास्नच पाहिलेलं, दादिबांचं एक अप्रतिम स्केच देखील गायतोंडे यांनी केलेलं. इतकंच नाही तर ज्या दोघांना गायतोंडे यांचं काम चालू असताना स्टुडीओत प्रवेश होता त्यातले एक दादिबा असल्यानं त्यांचा लेख महत्वाचा होता. पण ते काही जमून येईना. मधल्या काळात कोलते सरही प्रचंड बिझी. शेवटी ठरवलं की आता हा ग्रंथ दादिबा यांच्या लेखाशिवायच प्रसिद्ध करावयाचा. मिळालाच तर तो इंग्रजी आवृत्तीत टाकू. 

काम पूर्ण देखील झाले . एप्रिल शेवट किंवा मे पूर्वार्ध या काळात प्रकाशन करायचे. तयारीला सुरवात झाली. पण काही तरी चुकल्यासारखे वाटतच होते. एव्हडी मेहेनत करून हे सारे उभे केलेय आणि त्यात दादिबांचाच लेख नाही ? हे मनाला बरे वाटेना. त्यामुळे सतत अस्वस्थता येवू लागली , शेवटी ठरवले आणि मुंबई गाठली. त्यांच्या गेलरीचा पत्ता बदलला असल्यानं दादिबांची भेट नाही झाली पण नवा फोन तर मिळाला. आणि अचानक कोंडी फुटली. 

दादिबा म्हणाले, " अरे, हे काही मला माहीतच नव्हतं, आपण कधीही भेटू, पण मी आता परत परदेशी जातो आहे, त्या आधी जमेल ? कोलतेना त्यांची वेळ द्यायला सांगा, त्यावेळी मी उपलब्ध राहीन. कोलते सर म्हणाले. डन, करून टाकूतातडीनं ३५ -३६ प्रश्नांची प्रदीर्घ प्रश्नावली सरांना


मेल केलीशर्मिला फडके शब्दांकन करणार म्हणून तिलाही मेल केली. मागल्या शनिवारी मुलाखत ठरली .शर्मिला चर्चगेटला पोहोचली, मी दादरला पोहोचलो, प्रकाश वाघमारे फोटो काढणार होता तो दादर पर्यंत पोहोचला आणि कोलते सरांचा फोन आला, अरे, दादिबांच्या जवळच्याच कुणाचा तरी मृत्यू झालाय, त्यामुळे दादिबा आता आज नको म्हणतोय. झालं …. 

मुंबईच्या त्या प्रचंड उन्हात घामाघूम झालेले आम्ही परत आपापल्या घरी. माझ्यापाशी तीन फोन आहेत प्रकाशपाशी दोन, शर्मिलापाशी एक पण आम्ही सारे त्यावेळी ट्रेन मध्ये असल्याने बहुदा कोलते सरांचे फोन लागले नसावेत. शेवटी मंगळवारी ती मुलाखत झाली . त्यानंतर सरांचा जो फोन आला त्यातलं संभाषण या मजकुराच्या आरंभी दिलं आहे. फोन ठेवता ठेवता सर म्हणाले , दादिबाचा हा लेख इंग्रजी आवृत्तीत जाईल ते मला ठाऊक आहे, पण मराठीत देखील तो घे बरं का . आता माझ्यावर हे धर्मसंकट कोसळलंय तो लेख ग्रंथात घ्यावा तर १० -१५ पाने तर वाढणारच पण प्रकाशनाची तारीख देखील १५-२० दिवसानं पुढे ढकलावी लागणार. दादिबाचा लेख या ग्रंथाला एक वेगळंच परिमाण मिळवून देणार यात शंकाच नाही. पण मग करावं तरी काय ? इकडे विहीर तिकडे आड. काय ब्र करावं ?

1 comment:

  1. अजून सहा महिने उशीर झला तरी चालेल आम्हाला माहित आहे येणारा ग्रंथ अप्रतिमच असेल त्यामुळे आम्ही किती हि काळ वाट पहिला तयार आहोत हवतर किमत वाढवा ग्रंथाची :)

    ReplyDelete