Wednesday, April 1, 2015

न संपणाऱ्या शोधाची कहाणी 
चित्रशोधाच्या कहाण्या...
या ग्रंथासाठी गायतोंडे यांची चित्रं जमवणं हे सर्वात आव्हानात्मक काम होतं. ती जमवताना आलेले अनुभव लिहायचे म्हटलं तर एक छोटं पुस्तकच तयार होऊ शकेल, इतके ते नक्कीच आहेत. ती जमवताना ‘नाकी नऊ येणं‘ म्हणजे काय ते साक्षात अनुभवायला मिळालं. गायतोंडे यांची चित्रं ज्यांच्या ज्यांच्या संग्रहात आहेत असं कळलं त्या संग्राहकांशी सर्वप्रथम मेलनं संपर्क साधला. पण त्या मेलला साधी पोच द्यायची तसदीदेखील कुणी घेतली नाही. हा ग्रंथ केवळ मराठीतच नाही तर इंग्रजीमधूनदेखील प्रसिद्ध होणार आहे याची कल्पना देऊनदेखील काहीच फरक पडला नाही. अनेक संग्रहालयांकडून आलेले अनुभव तर अत्यंत कडवट होते. एका मोठया संग्रहालयानं तर पहिल्या मेलला तब्बल चार महिन्यांनी उत्तर दिलं. यावरून हा प्रवास किती खडतर झाला असेल त्याची कल्पना येईल. बरं, मेलला उत्तर देत नाही म्हणून फोन करावा, तर फोनवर त्या व्यक्ती उपलब्धच होत नसत. असल्या तरी उडवाउडवीची उत्तरं मिळत असत.


ज्या इमेजेस हाती येत त्या ताडून पाहतानादेखील प्रचंड दमछाक होत असे. कधी कधी नुसत्या इमेजेसवरून ही चित्रं अस्सल की नक्कल ते ठरवणं कठीण जात असे. त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागत असे. बरं, ते चित्र फेकअसेल तर ज्याच्या मालकीचं ते आहे, त्याला ते चित्र फेकआहे असं स्पष्ट न सांगता नकाराची नाना कारणं देताना अक्षरशः तारांबळ उडत असे. ज्याचं ते चित्र आहे तोही बिचारा (?) फसलेला असायचा आणि नकार दिल्यानंतर फोनवरच्या संभाषणात जी एक भयाण शांतता पसरत असे तिनं ते सारं नकोसं वाटायला लागत असे. 

या चित्रं मिळवण्याच्या मोहिमेच्या तर खूपच कहाण्या सांगता येतील; पण विस्तारभयास्तव त्यांतल्या तीनच नमुने म्हणून सांगतो. माझ्या परिचयातल्या एका कलासंग्राहक बाईंकडे गायतोंडे यांचं चित्र असल्याचं मला ठाऊक होतं. त्यांचा-माझा परिचय जवळ जवळ 1985-86 सालापासूनचा. बहुदा माझं एक चित्रही त्यांच्या संग्रहात असावं. एके दिवशी मी त्यांना थेट फोन लावला. असं असं पुस्तक काढतोय, तर तुमच्या संग्रहातलं चित्र मला हवंय. त्या म्हणाल्या, विचार करून सांगते. आठ दिवसांनी काय ठरलं म्हणून विचारायला फोन केला तर म्हणाल्या, ‘नाही रे जमणार. असं आहे,’ म्हणाल्या, ‘गायची चित्रं ही आमच्यासाठी एक ठेवा आहेत. ती मी खास माझ्या संग्रहासाठीच घेतली आहेत. पण तू जर ती छापलीस तर ती जगजाहीर होतील आणि मग सारेच माझ्या मागे लागतील, विकता का? कितीला देता? एवढे देतो, तेवढे देतो, लिलावात टाकतो, अरे एक ना दोन. सतत फोन येत राहतील, सतत भेटायला येतील, नको जीव करतील रे. घरातली सारी शांतताच ढळून जाईल. तेव्हा सॉरी, मी नाही देऊ शकत तुला त्याची इमेज छापायला.हे असं अगदी थेट स्पष्ट उत्तर आल्यावर काय बोलणार? त्या म्हणत होत्या त्यात तथ्य तर होतंच. शेवटी मोठया अनिच्छेनं त्यांचा नाद सोडला. अनिच्छेनं अशासाठी की ते चित्र गायतोंडे यांचं महत्त्वाचं चित्र मानलं जातं. ते या ग्रंथात प्रसिद्ध झालं असतं तर या ग्रंथाचं संदर्भमूल्य नक्कीच अधिक वाढलं असतं. पण मला त्यांचं म्हणणंही पटलं. गायतोंडेंच्या एकेका चित्रासाठी तथाकथित नवश्रीमंतांत सध्या जी काही चढाओढ चालली आहे, ती सारी मला ठाऊक आहे. म्हणून मी पुन्हा काही त्यांना त्याविषयी कधी विचारलं नाही. 

दुसरा किस्सादेखील असाच हातून सुटलेल्या चित्रांचा आणि एका अफलातून स्टोरीचा. एके दिवशी सामोअरमध्ये प्रफुल्ला डहाणूकरांनी एका परदेशी बाईंची ओळख करून दिली. म्हणाल्या, ‘ही अमकी तमकी. हिची स्टोरी ऐक. भयंकर आहे. पण हिच्याकडे गायची एक नाही दोन नाही सात-आठ पेंटिंग्ज आहेत. बोल तिच्याशी,’ असं म्हणून त्या नेहमीसारख्या धावपळीत निघून गेल्या. तब्बल दीड-दोन तास आम्ही बोलत होतो. त्यांची स्टोरी खरोखरच भयंकर होती. पण ती काय होती हे मात्र मी आता सांगणार नाहीये, जर त्यांची माझी पुन्हा गाठ पडलीच तर ती मी चिन्हमधून नक्कीच सांगेन. 

ऐंशीच्या घरातल्या त्या बाई काही वर्षांपर्यंत भारतातच राहत होत्या. केवळ गायतोंडे यांनाच नाही तर सार्‍याच प्रोग्रेसिव्हच्या चित्रकारांना त्या चांगल्याच ओळखत होत्या. त्यांचा नवरा हा पहिला भारतीय कलासंग्राहक समजला जातो. सांगत होत्या, ‘इथून जवळच माझं घर होतं, त्यामुळे प्रोग्रेसिव्हच्या सार्‍या बैठका माझ्याच घरी होत असत. सार्‍याच चित्रकारांना माझं घर केव्हाही खुलं होतं.सांगता सांगता त्या इतक्या जुन्या आठवणांत शिरल्या की चित्रसंग्रहाच्या बाबतीत आपण एका मोठया माणसाकडून कसे फसवले गेलो हे सांगताना त्या भावनाविवश झाल्या आणि ओक्साबोक्शी रडू लागल्या. भरगच्च भरलेलं सामोअर आणि ऐंशी वर्षांची एक परदेशी स्त्री माझ्यासमोर बसून रडतेय. माझी काय अवस्था झाली असेल? कल्पना करा. पण मी ते सारं भान हरपून ऐकत होतो निश्चित. शेवटी उठताना त्यांच्या भेटीचा दिवस, वेळ नक्की केली आणि उठलो. त्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची हे मी नक्की केलं होतं. फक्त घरून निघण्याआधी फोन करम्हणाल्या. 

ठरल्या दिवशी फोन केला तर म्हणाल्या, ‘आता नको येऊस, माझी तब्येत जर बिघडली आहे. मी कळवते तुला.पण त्यांचा फोन काही आला नाही. आणि दोनचार दिवसांनी तर त्या मायदेशी परत जाणार होत्या. प्रफुल्लाबाई नंतर म्हणाल्या, ‘अरे, ती गेलीदेखील.नाहीच मिळाली त्यांची मुलाखत नंतर. गायतोंडे यांचे फोटो आणि पेंटिंग्जच्या इमेजेस त्यांच्याकडून मिळणार होत्या त्यादेखील नाहीच मिळाल्या, कारण त्यांनी जो इमेल दिला होता त्यावर मेल टाकल्यावर काहीच उत्तर आलं नाही. नंतर ग्युगेनहाईम प्रदर्शनाची संयोजक सांधिनी एकदा बोलता बोलता म्हणाली की त्यांचा इमेल आयडी बदलला आहे म्हणून; पण गप्पांच्या ओघात तिच्याकडून तो घ्यायचा राहिलाच. त्यांच्या संग्रहातली गायतोंडे यांची सारी चित्रं आणि त्या वेळचे फोटो या ग्रंथात समाविष्ट झाले असते तर या ग्रंथाचं संदर्भमूल्य निश्चितपणे वाढलं असतं यात शंकाच नाही. पण आता हळहळण्याखेरीज माझ्या हातात दुसरं काहीच नाही हेच खरं. आता त्या बाई परत भारतात येतील का? आणि आल्याच तर मला भेटतील का? कुणास ठाऊक. आणि समजा आल्याच त्या इथं, तर मला कळणार तरी कसं? कारण त्यांना आणि मला जोडणारा जो दुवा होता प्रफुल्लाबाई, त्याच आता नाहीयेत. 

भारत सरकारनं चित्रकलेच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या ललित कला अकादमीया संस्थेचा किस्सा तर इस्से भी और आहे. त्यांच्या संग्रहात गायतोंडे यांची काही चित्रं आहेत. ती या ग्रंथासाङ्गी मिळाली तर बरं, असं म्हणून या संस्थेशी पत्रापत्री सुरू केली, पण काहीही उत्तरं आली नाहीत. सचिव, अध्यक्ष, सार्‍यांना मेल पावले, काहीच उत्तर नाही. शेवटी महाराष्ट्रातून अकादमीवर निवडून गेलेल्या दोघांना गाङ्गण्याचा प्रयत्न केला, तर एक हाताला लागला पण दुसर्‍यानं शेवटपर्यंत फोनच नाही उचलला. जो हाती लागला, तो काही दिवस नाचला, इकडे बोललोय, तिकडे सांगितलंय, याच्याशी बोल, त्याच्याशी बोल म्हणाला, पण ज्यांच्याशी बोललो त्यांनी हिंग लावूनदेखील विचारलं नाही. नुसत्या फोनची बिलं वाढली, बाकी काही नाही. 

ललित कला अकादमीच्या बहुसंख्य सभासदांची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली होणारी चौकशी बहुदा तेव्हाच सुरू असल्यामुळे असेल, गायतोंडे यांच्या एकाही चित्राची इमेज ललित कलावाल्यांकडून मिळाली नाही ती नाहीच. याच ललित कलावाल्यांनी चारपाच वर्षांपूर्वी चिन्हच्या आतापर्यंतच्या अंकातला सुमारे दीडशे पानांचा मजकूर कुठलीही लेखी परवानगी न घेता हिंदीमध्ये अनुवादित करून घेऊन दोन जाडजूड ग्रंथांत बिनधास्तपणे छापला होता. त्यात गायतोंडे यांच्यावरच्या एक नाही दोन नाही 12 लेखांचा समावेश होता. त्यांचं मानधन तर सोडाच, त्या ग्रंथांची प्रतदेखील मिळवण्यासाठी मला अनंत विनवण्या कराव्या लागल्या. 

महाराष्ट्रातून ललित कलावर निवडून गेलेल्या प्रतिनिधीच्या कानांवर हे सारं घातलं, तर त्याला मी सांगितलेलं सारं कळलं असेल किंवा नाही अशी मला शंका यावी असं त्याचं वर्तन होतं. जे संसदेत महाराष्ट्राचं तेच इथंही, त्यामुळे दोष तरी कुणा कुणाला द्यायचा? आपलं सारं समाजजीवनच हळूहळू किडत चाललं आहे, दुसरं काय? असं मनाशी म्हटलं आणि कामाला लागलो. कोट्यवधी रुपये जी अकादमी केवळ भारतभरातून निवडून आलेल्या आपल्या या अशा नररत्नांच्या विमान प्रवासासाठी वर्षभरात खर्च करत असते, त्या अकादमीनं असं वागावं याची चीड आली. पण इत:पर आपण काय करू शकतो? अनेकांनी सल्ले दिले, कॉपी राईट कायद्याखाली त्यांना कोर्टात खेच. सरकारी संस्था आहे, भरपूर मोठा दावा लाव, सहज जिंकशील. खरंच आहे ते. पण हे असले धंदे करण्यासाठी का आपण हे सारं केलं? असे विचार मनात बळावले, आणि तो विचार मनातून काढून टाकला. 

*

वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे.त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.