Monday, May 19, 2014

माझ्याकडे एक ' गायतोंडे ' याचं पेंटिग आहे ….

' गायतोंडे ' यांच्या वरच्या ग्रंथाची बातमी कर्णोपकर्णी झाल्यापासून एक नवाच त्रास सुरु झाला आहे. असा त्रास सुरु होईल हे मनातही कधी आलं नव्हतं. हा त्रास म्हणजे वेळी अवेळी येणारे फोन. तसे दिवसभरात किती तरी फोन माझ्या तीनही फोनवर मला येत असतात. त्यातले बव्हंशी चांगल्या वाचकांचेच असतात, त्यांना हा ग्रंथ बुक करावयाचा असतो किंवा जुन्या अंकाविषयी चौकशी करावयाची असते. हे प्रत्येक फोन मी अटेंड करतो. अनेक वाचक रात्री अपरात्री देखील फोन करतात. आधीचा अंक आवडला, अमुक लेख आवडला. तमुक लेख ग्रेट आहे वगॆरे. हे फोन तर कधीही किंवा दिवसाच्या कोणत्याही प्रहराला येत असतात. हे देखील सारेच्या सारे फोन मी अटेंड करतो. हे असे फोन येणं ही आपल्या कामाला मिळालेली एक प्रकारची दाद आहे असेच मी समजतो.

खरं तर तर अशा फोन संदर्भात कधी तरी विस्तारानं लिहावयास हवे असे मला वाटते कारण फोन करणाऱ्यांना अंक किंवा लेख कुठेतरी भिडलेले असतात आणि मग ते जे बोलत सुटतात ते भलतंच ग्रेट असतं. कितीतरी वेळा भावनेच्या भरात बोलता बोलता अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागणारी, , हुंदके देवून बोलणारी वाचक मंडळीही मी अनुभवली आहेत. पण ' गायतोंडे 'ग्रंथाची घोषणा झाल्यापासून जे काही फोन आले ते आले नसते तर फार बरं झालं असतं असं कधी कधी वाटून जातं.

उदाहरणार्थ परवा रात्री दहा साडेदहाच्या सुमारास आलेला हा फोन. मी डोळे चोळत फोन उचलतो. 
' काय झोपलायत का ? " 
खरं तर माझा दिवस पहाटे चार वाजता सुरु होतो. साहजिकच साडेनवाच्या ठोक्याला मी झोपायला गेलेलो असतो. मग असा अवचित फोन वाजला का चरफडायला होतं. पण प्रत्येक फोन अटेंड करावयाची शिस्त लावून घेतली असल्यानं नाईलाज असतो. ही संवय मला पत्रकारितेनं लावली. 
' हो , या वेळी मी झोपतो.' मी तुटक उत्तर देतो, बोला, काय काम काढलं ?
काही नाही. मी अमुक तमुक बोलतोय, आपण इतक्या वर्षापूर्वी जहांगीर मध्ये भेटलो होतो, आठवतं का ?
मला काहीच आठवत नसतं. पण संभाषण वाढवू नये म्हणून पुन्हा कामाचं विचारतो. 
मग समोरचा माणूस म्हणतो ' मी तुमच्या कडे आल्यावर मला ओळखाल ' 
' अहो, कशासाठी येताय ते तर सांगाल ? '
' माझ्याकडे एक गायतोंडे याचं पेंटिग आहे आणि मला ते तुम्हाला दाखवायचं आहे. '
' अहो पण कशाला ? मी पेंटिग सर्टिफाय करत नाही हो. ' विकून बिकून देखील देत नाही '
' नाही, पण मला ते तुम्हाला दाखवायचं आहे' 



माझ्या लक्षात आलं की या गृहस्थाना ते चित्र पुस्तकात छापून यायला हवं असावं म्हणून ते मला भेटू इच्छित असावेत. गेल्या दोन तीन वर्षात असे अनेकजण मला भेटून गेले आहेत. त्यांनी पहावयास आणलेली सर्वच चित्र ही चक्क फेक होती. त्या सर्वाना ती चित्र या ग्रंथात छापून आलेली हवी होती. पण ती चित्र पाहताक्षणी लक्षात यायचं कि ही कुठल्या तरी पोटार्थी चित्रकारानं काढली असणार. घेणाऱ्यांना यातलं काही ठाऊक नसणार, त्यांना फक्त ती छापून आलेली हवी असत, त्यांना हे कुठं ठाऊक होतं की यातलं एक जरी फेक चित्र ग्रंथात गेलं तर त्या ग्रंथाची विश्वासार्हतां रसातळाला गेली असती ते. पण आतापर्र्यंत माझ्या भिडस्त स्वभावामुळे मी जो वेळ यात वाया घालवला होता तो आता मला घालवायचा नव्हता. मी त्यांना म्हटलं. 
"काय आकाराचं चित्र आहे ?'
तर म्हणाले अमुक अमुक ,लहान आहे. 
कशावर आहे ? तर म्हणाले कागदावर 
किती सालातलं आहे ? उत्तर आलं अमुक तमुक 
माझ्या लक्षात आलं कि हे चित्र फेक आहे. 
एक तर गायतोंडे वर्षाला फक्त सहा पेंटिग्ज रंगवायचे, फार तर कधी सातवं. आणि ती चित्रही भव्य असावयाची, केनव्हास वरची. कागदावर त्यांनी तैल रंगानं चित्र रंगवली असतीलच तर ती जेजेत असताना, आणि इथं तर हे गृहस्थ जो काळ सांगताहेत त्या काळात तर गायतोंडे ऐन उमेदीत होते. 
मी त्यांना सांगितलं ' तुम्ही एक काम करा हे चित्र तुम्ही ममताला दाखवा ' 
तर म्हणाले ' ममताचा फोन नाही '
मी म्हटलं ' नसेल तर मिळवा, 'नाहीच मिळाला तर दादिबा पंडोल यांना ते दाखवा, कारण त्यांनीच गायतोंडे यांची सर्वं चित्र विकली आहेत, तेच तुम्हाला खरे काय ते सांगतील. आणि मग माझ्याकडे या, मी छापतो ते पुस्तकात. . उगाच इतक्या दूरवर येवून तुमचा आणि माझा वेळ का घालवता ? आणि मी फोन ओंफ केला. 

आलेल्या फोनना सहसा मी इतकी तुटक उत्तर कधी देत नाही, पण " गायतोंडे " यांच्या फेकचित्रांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय साऱ्या भारतात आणि त्या तसल्या चित्राचं प्रचंड दडपण आता माझ्यावर देखील येवू लागलंय, या संदर्भात घडलेले किस्से भयंकर आहेत, हा त्या मानानं खूप सौम्य आहेत, त्यामुळे मला तसं वागणं आता क्रमप्राप्त आहे, नाही का ?

No comments:

Post a Comment