Monday, May 5, 2014

गोवा आणि गायतोंडे

हे 'गायतोंडे' यांचं गोव्यातल्या उसकई गावातलं घर . खरं तर 'गायतोंडे' यांचा जन्म नागपूरचा. गायतोंडे यांचे वडील तिथं एका मोठ्या पदावर काम करीत होते. पण त्यांचा स्वभाव अत्यंत शीघ्र कोपी असल्यानं नाही पटलं की थेट ते ती नोकरी सोडून देत . गायतोंडे यांचा जन्म नागपुरात झाला पण नंतर लगेचच वडिलांनी नोकरी सोडली आणि सारं गायतोंडे कुटुंब गोव्यात या घरात येवून राहिलं, चार पाच वर्षं तरी ते इथे राहत होते. याच काळात या घराच्या जवळ असलेल्या देवळाच्या भिंतीवर चित्र काढणारा चितारी गायतोंडे यांना आकृष्ट करून गेला. गायतोंडे यांनी आपल्या मुलाखतीत त्याचा अनेकदा उल्लेख केला आहे. 

सुनील काळदाते यानं देखील त्या फिल्ममध्ये त्याचं खूप छान चित्रण केलं आहे. हा फोटो मला शांताराम वर्दे वालावलीकार यांनी मिळवून दिला. ते गायतोंडे यांच्या नात्यातले. त्यांनी एक सुंदर लेखही या ग्रंथासाठी दिला आहे. ज्यातलं एक वाक्य मला खूप आवडतं. ते वाचल्यावर मी अगदी मनापासून हसतो. ते वाक्य असं आहे 

"आता मागे वळून पाहतांना आठवतं की, एका बाजूला त्याची आई स्वैपाक करायची आणि दुसऱ्या बाजूला दोन चार फुटांच्या अंतरावर बाळची आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्र तयार व्हायची. गायतोंडेच्या अशा कितीतरी प्रसिद्ध चित्रांच्या नाकात तळलेल्या माशांचा स्वादिष्ट वास अजूनही दरवळत असावा." 

याच वालावलीकरांमुळे मला गायतोंडे यांची दोन दुर्मिळ पेंटिग्ज देखील ग्रंथात घेता आली. ही अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात म्हणून तर ही असली प्रचंड दमछाक करणारी काम सहजगत्त्या आपल्या हातून होऊन जातात. वालावलीकाराना मी अद्याप पाहिलेलं देखील नाही पण फोनवरून आम्ही सतत संपर्कात असतो, मेलनं आदान प्रदान करतो. आता मी ठरवलं आहे की हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर गोव्याला नक्की जायचं. तिथं आणखी एक मित्र माझी वाट पाहतो आहे, त्याच नाव सुहास शिळकर. तो चित्रकार आहे, त्यालाही मी अद्याप भेटलेलो नाही पण गायतोंडे प्रेमानं आम्हाला एकत्र आणलं आहे. त्यानंही मला खूप मदत केली आहे.

No comments:

Post a Comment