Thursday, June 18, 2015


"गायतोंडे" : Recap 1
'प्रत्यक्षात असा असेल ग्रंथ…'

सर्वात आधी या तयार झालेल्या ग्रंथाविषयी सांगतो, कारण त्याविषयी सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि ही जी उत्सुकता निर्माण झाली आहे, तीत फेसबुकचा वाटा मोठा प्रचंड आहे. म्हणूनच गायतोंडे यांच्यावरच्या ग्रंथाचं प्रकाशन होण्यापूर्वी जे काही लिहायचं ते फेसबुकवरच असं मनाशी निश्चित केलं होतं. इथून पुढं ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत गेल्या तीन चार वर्षातल्या साऱ्याच महत्वाच्या पोस्टचा धांडोळा तर आपण घेणारच आहोत पण मधल्या काळात मिळालेली खूप नवी माहितीदेखील शेअर करणार आहोत.
गायतोंडे यांच्या सहीचा वापर करून खास डिझाईन केलेल्या कोरोगेटेड बॉक्समधूनच हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येणार आहे. हा ग्रंथ पुस्तक विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याने आणि स्पीड पोस्ट किंवा कुरियर मार्फतच पाठवला जाणार असल्याने तो वाचकांच्या हाती अत्यंत सुरक्षितपणे पडावा यासाठी विशेष जाडीचा कोरोगेटेड पेपर निवडण्यात आला आहे. हेतू हा की पोस्टाच्या किंवा कुरियरच्या हजार एक किलोमीटरच्या प्रवासातदेखील त्याला ओरखडा देखील न पडता तो वाचकांच्या हातात अत्यंत सुरक्षितपणे पडावा. हा निर्णय ग्रंथाचा आकार आणि वजन पाहूनच घेण्यात आला आहे. कारण गायतोंडे मूळ ग्रंथ आणि त्यासोबत दिली जाणारी गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीची कथा सांगणारी २८ पानी पुस्तिका यांचे वजन तब्बल २ किलो भरले हेच होय. छपाईच्या पाश्चात्य जगात लोकप्रिय असलेला "इमोटे +" नामक जो कोरियन कागद या ग्रंथाला आम्ही वापरला आहे त्याच वजनचं मुळी १३० gsm आहे. आसपासचा कागददेखील १६० gsmचा वापरलाय. केस बाईंडिंगसाठी वापरलेला बोर्डदेखील विशेष जाडीचा आणि बनावटीचा वापरला आहे. जेणेकरून ग्रंथ कसाही आणि कोठेही ठेवला तरी तो उभा राहावा. मूळ ग्रंथ आणि पुस्तिका पावसातदेखील वाचकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहचावी यासाठी खास Shrink Wrapping पद्धत वापरण्यात आली आहे. डिझायनर बॉक्समध्येही तो आतल्या आत हलून त्याचे कोपरे दुमडले जाऊ नयेत म्हणून बबल्स पेपर्सचा देखील वापर करण्यात येणार आहे.

डिझाईनप्रमाणेच कागद, छपाई, बांधणी, मांडणी इत्यादी ग्रंथाशी संबंधित साऱ्याच विभागात आम्ही काहीच करायचे शिल्लक ठेवलेले नाही. गायतोंडे यांच्या चरित्राचा समग्र आढावा घेणारा एकही ग्रंथ अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. तो मराठी भाषेतच पहिल्या प्रथम प्रसिद्ध होत आहे. म्हणूनच जो प्रसिद्ध होणार आहे तो ग्रंथ चित्रकलाविषयक जागतिक दर्जाच्याच ग्रंथांच्या तोडीचा व्हावा असे जे स्वप्न सुरुवातीपासून पहिले होते ते आता इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर का होईना पूर्ण होतांना दिसते आहे याचा आनंद विशेष आहे.

'गायतोंडे' ग्रंथाचा प्रोमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
http://www.chinha.co.in/promo/Webdesign.pdf
'गायतोंडे' ग्रंथाच्या निर्मितीची कथा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
http://www.chinha.co.in/p…/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf

आणि रु. ३००० चा 'गायतोंडे' ग्रंथ रु. २००० मध्ये मिळवण्यासाठी 90040 34903 इथे YES GAI एवढाच मेसेज पाठवा.


गायतोंडे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकताना केलेलं क्लासवर्क. या चित्रांमागेदेखील एक अफलातून कहाणी दडलीय. पोलिसातच नाहीतर कोर्टातदेखील केस गेली आहे, पण तिच्याविषयी पुढे कधीतरी.

Wednesday, June 17, 2015


"गायतोंडे" : Recap
२०१२ सालच्या जानेवारी महिन्यात 'चिन्ह'चं गायतोंडे पेज सुरु झालं. त्याच्या दोन-तीन महिनेच आधी आम्ही 'गायतोंडे' ग्रंथाच्या प्रकाशनाची घोषणा केली होती. आता हे २०१५ साल तब्बल चार वर्ष लोटली या ग्रंथाच्या निर्मितीत. निर्मितीचा हा सगळाच अनुभव मोठा विलक्षण होता. अनेक ताण-तणाव, उतार-चढाव या काळात अनुभवायला आले. पण हा साराच कालखंड मोठा रोमांचकदेखील होता. गेल्या चार वर्षात या पेजवरून आलेले सारेच अनुभव 'चिन्ह'च्या वाचकांशी आणि 'गायतोंडे' यांच्या चाहत्यांशी वेळोवेळी शेअर केले. ते शेअर केल्यानंतरदेखील बरेच काही घडले, घडतेदेखील आहे. आता हा ग्रंथ प्रकाशनाच्या अंतिम टप्प्यावर आलेला असतांना शेअर केलेले सारेच अनुभव पुन्हा नव्याने लिहून पुन्हा शेअर करावे असे मनापासून वाटले. पण ते करीत असतांना आधीचे काहीच वाचायचे नाही असे पथ्य पाळले जाणार आहे. त्यातून कदाचित चांगले काहीतरी वाचावयास जरूर मिळेल असे मनापासून वाटते. लिहिलेले सारेच ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत याच पानांवरून शेअर केले जाणार आहेत. कसे वाटले ते जरूर कळवा. तोपर्यंत 'गायतोंडे' ग्रंथाचा प्रोमोदेखीलhttp://www.chinha.co.in/marathi/index.html या लिंकवर पाहू शकता.