Saturday, October 26, 2013

' चिन्ह 'चा असाही वाचक…। 

'चिन्ह'च्या वाचकांचे फोन कधीही येतात . 
त्यामुळे माझे मोबाईल मी कधीच स्वीच ऑफ करीत नाही . 
'गायतोंडे'यांच्या वरचा अंक प्रसिद्ध झाला होता तेव्हाची गोष्ट . 
असाच रात्री २-३ च्या सुमारास फोन वाजला . 
धडपडत उठलो ,मनात म्हटलं काहीतरी वाईट बातमी असणार .
एका मित्राचाचा फोन होता ,
म्हटलं काय रे बाबा ?
तर म्हणला 'तसं काहीं नाही रे , सहजच फोन केला …'
सहजच ? एवढ्या मध्यरात्री ?
तर म्हणाला
' तुला सांगितल्या शिवाय राहावेना म्हणून इतक्या रात्री उठवल… '
म्हटलं , बोल, बोल आता…
'अरे तुझा अंक परवाच मिळाला …
म्हटलं हे सांगण्यासाठी का एवढ्या रात्री उठवलंस ?
' तसं नाहीरे , पोस्टानं अंक आल्या पासून तो मी खाली ठेवलेलाच नाही ,
बायकोलाही बघायला दिलेला नाही . दोन दिवस झाले , अंक वाचतोय ,
आता वाचून संपला , तुला सांगितल्यावाचून राहवेना , म्हणून फोन केला .'
म्हटलं बोल , तर म्हणाला …
हैराण झालो वाचून , आणि एव्हड्या मोठ्या कलावंताविषयी आपल्याला
काहीच कसं ठाऊक नव्हतं याची लाज वाटली ,
तुझा अंक लेका हातातून सोडवत नाही , दोन दिवस दुसरं काहीच काम केलं नाही ,
फक्त वाचलं ,
पुढे त्यानं जे काही सांगितलं त्यानं मी उडालोच , तसा तो काही माझा थेट मित्र
लागत नव्हता , त्याची बायको जेजेत माझ्या वर्गात होती ,
त्या मुळे तिला 'चिन्ह ' चा अंक नेमाने जात असे , तिचं वाचन चांगलं होतं ,
साहजिकच मुंबई पासून दूर राहत असूनही फोन वरून अंकाविषयी सतत चर्चा
चालत असत , त्या चर्चात त्यानं कधी भाग घेतल्याचं आठवत नव्हतं ,
का ? त्याचं कारण मला त्या रात्री कळलं .
तो म्हणाला 'तू नेहेमी अंक पाठवत असायचास , पण मी फक्त तो पाहायचो ,
चित्रकार असूनही तो कधी वाचवा असं कधी मला वाटलंच नाही , कारण
माझी जडण घडण तशी कधी झालीच नाही , आणि नंतरही वाचनाविषयी
कुणी काही सांगितलंच नाही , पण ' चिन्ह'चा ' गायतोंडे ' अंक हातात पडला आणि मी
अक्षरशः झपाटून गेलो , दोन दिवस दुसरं काही केलंच नाही ,
आता तुला हे सारं सांगितल्याशिवाय राहवेना म्हणून फोन केला ,
आणखी एक सांगू ? ' चिन्ह' चे सारे अंक घरात आहेत , आणि आता ते सारे मी वाचणार आहे ,
असाच तो पहाट होईपर्यंत ' गायतोंडे' आणि अंकाविषयी बोलत राहिला …


'गायतोंडेंच्या शोधात …'या 'चिन्ह' च्या आगामी महत्वाकांक्षी ग्रंथाचं काम आता शेवटच्या
टप्प्यावर येउन ठेपलं आहे , ते चालू असताना अनेक घटना आठवत राहतात ,त्या ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत
शेअर करावयाचा विचार आहे ,

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह '
१५ ऑगस्ट १९४७ आणि गायतोंडे............


देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात काढलेलं हे एक प्रकाशचित्र . त्यात उजवीकडे दिसतायत ‘ प्यून’ म्हणून’ टाईम्स’ ने ज्यांची संभावना केली होती ते प्रा. . विश्वास यंदे , चष्मा घातलेल्या व्यक्तीचं नाव उपलब्ध नाही , तर त्यांच्या शेजारी आहेत ते अलीकडेच निधन पावलेले नामवंत लेखक मुकुंद/फिरोज रानडे ‘ ज्यांनी काही वर्षापूर्वी लोकसत्ता मध्ये गायतोंडे यांच्या वर एक लेख लिहिला होता . आणि त्यांच्या शेजारी आहेत ते चित्रकार वासुदेव गायतोंडे . ‘ गायतोंडेंच्या शोधात … ‘या ग्रंथात आम्ही अशी असंख्य दुर्मिळ प्रकाशचित्र मिळवली आहेत . ज्यांच्या संग्रहात अशी प्रकाशचित्र असतील त्यांनी ती जरूर चिन्ह कडे पाठवावी , आणि हो या प्रकाशचित्रातला डावीकडून तिसरा कोण आहे ते जर तुम्हाला कळले तर ते ही कळवायला विसरू नका
 — withMukund Gokhale.‘चिन्ह’च्या रौप्यमहोत्त्सवी वर्षानिमित्तानं गतवर्षी ‘चिन्ह’नं ‘निवडक चिन्ह’च्या तीन खंडांची योजना मोठ्या उत्साहात जाहीर केली होती.

पण नव्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातच सतीश नाईक यांच्या वडिलांचं निधन झालं रौप्यमहोत्सवी वर्षं साजरं करण्याच्या संकल्पनांना काहीशी खीळ बसली.

‘निवडक’मधील पहिला खंड होता ‘गायतोंडे’यांचा. पण का कुणास ठाऊक खाजगी संग्राहकांकडून त्यांच्या चित्रांच्या प्रतिकृतींना प्रसिद्धी देण्यास नकार येऊ लागला. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडन आर्टसारख्या म्युझियम्सशी संपर्क साधला.
पण त्यांच्याकडून तब्बल 4 - 4 महिन्यांनी तीही मेलला उत्तरं येऊ लागली.
बरं त्या मेलला उत्तर दिल्यावर तरी पुन्हा त्या मेलचं उत्तर लगेच मिळावं
पण तेही होईना. असे वाट पाहण्यात 4-6 महिने गेले. मधल्या काळात
आधी जाहीर केलेल्या ‘कलाकीर्द’ आर्टिस्ट डिरेक्टरीच्या लॉंचिंगची वेळ जवळ आली होती. साहजिकच सारी टीम त्याकामात गुंतली
आणि नंतर तर यंदाच्या ‘यत्न-प्रयत्न अंक 14’ची तयारी सुरू झाली.
त्यातही वेळ बराच गेला.

आता डिरेक्टरीही मार्गी लागलीय आणि अंकही.
त्यामुळे ‘निवडक’च्या तिन्ही खंडांची अर्धवट राहिलेली कामं
यावर्षीच्या पूर्वार्धातंच संपवायचं ठरलंय.येत्या चार महिन्यात हे तिन्ही खंड
प्रसिद्ध होतील. मधल्या काळात ‘निवडक चिन्ह’च्या प्रकाशनपूर्व सवलत योजनेत ‘चिन्ह’चे चाहते वाचक सहभागी होतच होते.

आता खंड येणार याची चाहूल लागताच अनेक नवे वाचक या योजनेत सहभागी होऊ इच्छित आहेत. म्हणून प्रकाशनपूर्व सवलत योजनेतील दुसरी योजना जाहीर करीत आहोत. त्यात महाराष्ट्रातल्या चित्रकारांसाठीसुद्धा एक विशेष योजना आम्ही जाहीर केली आहे. या दोन्ही योजनांची माहिती मिळविण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा.
http://www.chinha.in/promo/Niwdak%20Khand.pdf

‘निवडक चिन्ह’प्रकल्प मार्गी लागला...

महाराष्ट्र आंधळा आहे ?

कवी, लेखक, चित्रकार, समीक्षक, चित्रपट दिग्दर्शक अशा विविध रुपांनी ओळखल्या जाणार्‍या दिलीप चित्रे यांनी २००१ सालच्या ‘चिन्ह’च्या अंकाला एक छोटीशी मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणतात...
‘‘ महाराष्ट्रातला सर्वोच्च चित्रकार गायतोंडे, त्याची दखल न घेणारा महाराष्ट्र आंधळा आहे. आठ कोटी मराठी भाषिकांना या कलावंताची माहिती नसणं, हा महाराष्ट्र संस्कृतीच्या आंधळेपणाचा पुरावा आहे. जगातल्या सर्व हयात श्रेष्ठ चित्रकारांत गायतोंडे मोडतात. असं म्हणायची साधी हिंमत कुणातही नाही. महाराष्ट्रात तर अजिबात नाही. (मुलाखतीच्यावेळी गायतोंडे हयात होते.) ज्या कलाकृती समजायला कठीण असतात अशा कृती समजायला, परंपरा समजण्याची ताकद लागते, ती महाराष्ट्रीयन लोकांच्यात नाही. मी १९५४ साली गायतोंडेंचं काम प्रथम पाहिलं, तेव्हापासून जागतिक कलेमधे भारतीय स्पिरीट असलेला एकमेव चित्रकार म्हणून गायतोंडे मला महत्त्वाचे वाटत आलेले आहेत. गायतोंडेंचा गूढवाद, आध्यात्मिक वाद हा संपूर्ण भारतीय, संपूर्ण मराठी वळणाचा आहे. (प्रसिद्धी पासून दूर) आपण जन्मभर अज्ञातवासात रहाणं, हे प्रसिद्धीच्या झोतात येण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं माझं स्वत:चं मत आहे. टर्नर आणि आबालाल यांची तुलना करण्याचा उद्धटपणा महाराष्ट्रीयन का करीत नाहीत?
गायतोंडे निष्ठूर का झाले?गायतोंडेंना चित्रकार व्हायचं होतं 
आणि वडिलांना त्यांना डॉक्टर करायचं होतं.
गायतोंडे आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि वडिलही त्यांच्या.
त्यातून गायतोंडेंच्या घरात भलामोठा संघर्ष उभा राहिला.
महिनोनमहिने बापलेकात संवाद होत नसे.
वडिल शिस्तीला एवढे कडक करडे की प्रसंगी
वयात आलेल्या मुलाला गुरासारखं मारायलाही कमी करत नसत.
इथून गायतोंडे घरापासून हळू हळू तुटत गेले.
1970 साली त्यांनी मुंबई सोडली आणि थेट दिल्ली गाठली.
घर त्याआधीच सुटलं होतं.
त्यानंतर त्या घरात त्यांनी पायही ठेवला नाही.
नाही म्हणायला वडिलांच्या मृत्यूच्या वेळी विधी करण्यासाठी
ते घरात जे काही आले असतील तेव्हढेच.

पण आईच्या निधनानंतर तर अंत्यविधीसाठी ते दिल्लीहून आलेही नाहीत.
एका प्रदर्शनाच्या वेळी धाकटी बहिण त्यांना भेटायला गेली
तर त्यांनी विचारलं का आलीस? येऊ नकोस?
"मला पुन्हा भेटायचा प्रयत्न केलात तर अमेरिकेला निघून जाईन...".
चित्रकार गायतोंडे यांचं हे लोकविलक्षण जगणं जसं जाणवलं, जसं भावलं, जसं हाती आलं तसं या ग्रंथात मांडलंय...

या खंडाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.in/promo/gaitondebig.jpg

या ग्रंथातले काही लेख आमच्या chinha.in या संकेतस्थळावरही आहेत ते जरूर वाचा त्यासाठी http://www.chinha.in/marathi/archive2006.htmlया लिंकवर क्लिक करा.


हे ‘गायतोंडे’ प्रेमी की ‘चिन्ह’ द्वेषी?

‘गायतोंडेंच्या शोधात...’ या महत्वाकांक्षी ग्रंथाच्या निर्मितीत सध्या संपूर्ण ‘चिन्ह टीम’ मग्न आहे. या ग्रंथाविषयी जास्तीत जास्त माहिती द्यावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी आम्ही फेसबुकवर ‘चिन्ह मित्रां’साठी सतत पोस्ट टाकतो.

त्यामुळे गायतोंडे यांच्या अक्षरश: जगभरातल्या चाहत्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत, याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमानही. गेली अनेक वर्ष या ग्रंथाचं काम चालू आहे. मजकूर, लेखन, प्रकाशचित्रं, चित्रं इत्यादी मिळवण्यासाठी प्रचंड मेहेनत करावी लागते आहे. कष्ट करावे लागताहेत. पैसाही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आहे पण हे सारं करण्यात ‘चिन्ह’ला विलक्षण आनंद वाटतो आहे. हाच आनंद आम्ही या वेगवेगळ्या पोस्ट टाकून चिन्ह मित्रांसोबत शेअर करतो. पण आनंदाची भावना नष्ट करणारे अनेक प्रसंग घडताहेत.

उदाहरणार्थ ‘चिन्ह’ने पोस्ट टाकली की काही मिनिटातच त्यातली प्रकाशचित्रं किंवा चित्रं मजकूरापासून वेगळी काढून ती अनेक मंडळी शेअर करतात. हा काय प्रकार आहे? हे सारं कशासाठी? मजकूरापासून प्रकाशचित्रं वेगळी काढायचा वाह्यातपणा का? यांना हा अधिकार कोणी दिला? यातून त्यांना काय मिळतं? म्हणजे जे कोणी हे सारं करतात त्यांना गायतोंडेंविषयी आम्ही जो मजकूर लिहितो त्याविषयी अ‍ॅलर्जी आहे का? की आम्ही जे लिहितोय, ज्या पोस्ट टाकतोय त्या अत्यंत टाकाऊ आहेत म्हणून हे सारं केलं जातं? हे सारं करण्यासाठी वर्षानुवर्ष आम्ही जे कष्ट करतो आहोत. सर्व माहिती, प्रकाशचित्रं एकत्र करण्यासाठी जे करतो आहोत त्याचं काहीच मोल नाही का? खर्चलेल्या पैशाला काहीच मोल नाही असं केवळ आपण म्हणू पण यातली अनेक चित्रं तर वेळप्रसंगी मानहानीचे क्षण अनुभवून ‘चिन्ह’नं मिळवली आहेत ती केवळ ‘गायतोंडे’ यांच्याच प्रेमापोटी, त्याचीही काहीच किंमत नाही का?

अशा कृती जेव्हा आपण करतो तेव्हा यातून समोरच्या माणसाची, संस्थेची कळत नकळत मानहानीही होऊ शकते. याची जाणीवसुद्धा या मंडळींना का होऊ नये? आणि एवढं जर करायचंच असेल तर चित्रांसह मजकूर शेअर केल्यामुळे या मंडळींवर असं कोणतं मोठं आभाळ कोसळणार आहे. म्हणजे आता एकतर आम्हाला या पोस्ट टाकणं थांबवलं पाहिजे किंवा अशा मंडळींना त्वरित ब्लॉक तरी केलं पाहिजे. एवढेच दोन उपाय उरले आहेत...ते करायची वेळ आता हे वाचल्यावर तरी ही मंडळी आणणार नाहीत अशी किमान अपेक्षा तरी करावी का?

या खंडाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.in/promo/gaitondebig.jpg"आमचा बाप आणि आम्ही अर्थात गायतोंडे"

 

‘चिन्ह’नं 2001 सालापासून आजपर्यंत गायतोंडे यांच्यावर एकूण तीन वेळा विशेष लेखन प्रसिद्ध केलं. तिन्ही वेळा लेखाचं संपादन करताना जाणवत गेलं ते गायतोंडे यांच्या वडिलांचं करडं अस्तित्व. गायतोंडे यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकानंच त्यांच्या वडिलांच्या कठोर व्यक्तिमत्वाविषयी काहीना काही संगितलं होतं. आता चौथ्यांदाही ‘गायतोंडेच्या शोधात’ चं संपादन करताना पुन्हा तोच अनुभव आला. हे संपादन संपवताना हातात लेख आला तो गायतोंडेंना गुरू मानणार्‍या ‘लक्ष्मण श्रेष्ठ’ यांचा. त्यांच्या लेखात गायतोंडे आणि त्यांच्यातल्या (पक्षी: श्रेष्ठ) गुरूशिष्याच्या मनोज्ञ नात्याचं सुरेख दर्शन घडतं. याही लेखात पुन्हा गायतोंडेंच्या वडिलांचा उल्लेख तोही अत्यंत सुस्पष्ट. थेट गायतोंडे यांनीच सांगितलेला "गिरगावच्या एका वाडीसमोर नेऊन गायतोंडे यांनी लक्ष्मण यांना सांगितलं. इथं या चाळीत मी रहात होतो. इथं मला वडील पट्ट्याने वगैरे मारत, डोकं आपाटत... 

या लेखाचं संपादन पूर्ण झालं आणि या ग्रंथाला लिहिलेली चित्रकार प्रभाकर कोलते यांची प्रस्तावना हाती आली. त्यातही पुन्हा तसाच उल्लेख पण तो त्याचे वर्गमित्र चित्रकार शंकर पळशीकरांकडून झालेला, "गायतोंडे असा नव्हता, विलक्षण मनमोकळा होता पण अचानक त्याच्यात बदल झाला. तो खूपच कमी बोलू लागला वगैरे..." ते वाचलं आणि मग ‘गायतोंडे’ यांच्या स्वभावाचे असंख्य कांगोरे उलगडू लागले...
हा ग्रंथ सलगपणे वाचणार्‍या प्रत्येकालाच हा अनुभव येईल. कळत नकळत कदाचित हे सारं शिकवूनही जाईल की ‘मुलांशी कसं वागावं? त्यांना मारावं की न मारावं? आणि मारलं तर किती मारावं वगैरे वगैरे...
चांगले ग्रंथ, चांगलं साहित्य, कळत नकळत अशी शिकवण देऊन जात असतात...म्हणून तर आम्ही म्हणतो ‘गायतोंडेच्या शोधात...’ हे एका चित्रकाराचं केवळ चरित्र नव्हे.
आणखी खूप काहीतरी यात आहे जे या पुढल्या पोस्टमधून आम्ही मांडणार आहोत...
या खंडाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.in/promo/gaitondebig.jpg

‘गायतोंडेंच्या शोधात...’ हा १/४ आकाराच्या २०० पानी संपूर्ण रंगीत खंड येत्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. त्याची किंमत आहे रु. २०००. निवडकच्या तीन खंडाची किंमत आहे रु. ६००० तर एका खंडाचं प्रकाशनपूर्व सवलतमूल्य आहे रु. १४५० किंवा तीन खंडाचं मिळून रु. ३७५०. (त्यात ‘चिन्ह’चा आगामी अंक भेटीदाखल दिला जाणार आहे.) मागणी नोंदवण्यासाठी कृपया स्वत:चं नाव-पत्ता आणि इमेल आयडी ‘NKG' (फक्त ‘गायतोंडे’ खंड), किंवा 'NK3' (गायतोंडे + निवडक २ + निवडक ३) या लघुसंदेशासह ‘चिन्ह’च्या 90040 34903 या नंबरवर sms करा.

गायतोंडेंच्या स्टुडियोतला पंखा !


कालच्या पोस्ट्मध्ये जे प्रकाशचित्र लावलं होतं ते होतं चित्रकार गायतोंडे यांच्या स्टुडियोतल्या पंख्याचं. गायतोंडे यांच्यावर ज्यांनी फिल्म बनवली त्याच सुनील काळदाते यांनी त्या फिल्मच्या शूटींगच्या दरम्यान टिपलेलं. ‘गायतोंडेंच्या शोधात...’ मध्ये अशी अनेक प्रकाशचित्रं असणार आहेत.

सुनील काळदाते यांनी ‘गायतोंडे’ यांच्यावर जी अप्रतिम फिल्म केली होती त्यात या पंख्याच्या फिरणार्‍या पात्याचं विलक्षण सुंदर चित्रण करण्यात आलं होतं. गायतोंडे यांचं व्यक्तिमत्व त्या स्टुडियोत कसं विरघळून गेलं होतं त्याचं अप्रतिम चित्रण त्या फिल्ममध्ये पहायला मिळालं होतं. भिरभिरणार्‍या पंख्याचा तो शॉट आजही आठवत रहातो.

त्या पंख्याचा उल्लेख नंतर वाचावयास मिळाला तो आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे यांच्या लेखात. स्टुडियोतला तोच पंखा नंतर गायतोंडे यांच्या एका चित्रात कसा अनोख्या पद्धतीनं उतरला त्याचं डेंगळे यांनी केलेलं वर्णन अतिशय वाचनीय आहे. आमचं तर असं मत आहे की ‘‘एखाद्या चित्रकारावर मराठीत इतकं सुरेख लेखन आजवर झालेलंच नाही.’’ तो लेख सर्वप्रथम ‘चिन्ह’मध्ये नव्हे तर ‘रुची’ या ग्रंथालीच्या मासिकात प्रसिद्ध झाला होता तरी... नंतर मग ‘गायतोंडें’वरच्या अंकात आम्ही तो समाविष्ट करून घेतला. घेताना त्याचा उत्तरार्धही डेंगळे यांनी लिहावा असा आमचा अग्रह होता आणि डेंगळे यांनी तो मानला हे दोन्ही लेख लवकरच येणार्‍या ‘गायतोंडेंच्या शोधात...’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्यांना अधिक उत्सुकता आहे त्यांनी ते ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावरही वाचता येतील.

‘गायतोंडेंच्या शोधात...’ हा १/४ आकाराच्या २०० पानी संपूर्ण रंगीत खंड येत्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. त्याची किंमत आहे रु. २०००. निवडकच्या तीन खंडाची किंमत आहे रु. ६००० तर एका खंडाचं प्रकाशनपूर्व सवलतमूल्य आहे रु. १४५० किंवा तीन खंडाचं मिळून रु. ३७५०. (त्यात ‘चिन्ह’चा आगामी अंक भेटीदाखल दिला जाणार आहे.) मागणी नोंदवण्यासाठी कृपया स्वत:चं नाव-पत्ता आणि इमेल आयडी ‘NKG' (फक्त ‘गायतोंडे’ खंड), किंवा 'NK3' (गायतोंडे + निवडक २ + निवडक ३) या लघुसंदेशासह ‘चिन्ह’च्या 90040 34903 या नंबरवर sms करा.
गायतोंडेंच्या स्टुडियोच्या दारावर हुसेन यांचं चित्र !

गायतोंडे मनाविरुद्ध कधी कुठलीही गोष्ट करीत नसत. त्यांच्या परवानगीवाचून त्यांच्या स्टुडियोत पाय ठेवायलाही भल्याभल्यांनाही बंदी होती. पण त्यांचे मित्रही भलतेच ग्रेट होते. उदाहरणार्थ हुसेन यांचंच घ्या.

ते हक्कानं गायतोंडेंच्या स्टुडियोत येत. येण्याआधी पूर्वसूचना दिलेलीच असेल असं नसायचं. किंबहुना ती दिली जात नसेच मग गायतोंडेही मनात नसलं तर दारही उघडत नसत. ठोठावून ठोठावून दार ठोकणारा बिचारा निघून जाई. हुसेन यांच्यावरही ती वेळ अनेकदा येत असे. पण हुसेनही काही कमी नव्हते, जाताना त्यांच्या स्टुडियोच्या दरवाजावर चित्र रेखाटून जात. ‘जणू काही मी येऊन गेलो’ हे सुचवण्यासाठी...

गायतोंडेंनी ती स्टुडियोची जागा सोडली तेव्हा त्या दरवाजाचं काय झालं असेल? कुणी सांगावं ही मंदी वगैरे जाईल तेव्हा तो दरवाजा एखाद्या लिलावातसुद्धा येईल आणि कोट्यावधी रुपयांना विकला जाईल.

‘गायतोंडेंच्या शोधात...’ या ‘चिन्ह’च्या आगामी ग्रंथात यासारखे असंख्य प्रसंग, भन्नाट घटना अर्थातच सत्यकथा अक्षरश: ठासून भरल्या आहेत. ग्रंथाविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तरhttp://www.chinha.in/promo/gaitondebig.jpg या लिंकवर क्लिक करा. आणि ग्रंथाची मागणी नोंदवायची असेल तर ‘NKG' हा संदेश स्वत:च्या इमेल आयडी, नाव आणि पत्त्यासह 90040 34903 या ‘चिन्ह’च्या मोबाईलवर sms करा.