Saturday, October 26, 2013



हे ‘गायतोंडे’ प्रेमी की ‘चिन्ह’ द्वेषी?

‘गायतोंडेंच्या शोधात...’ या महत्वाकांक्षी ग्रंथाच्या निर्मितीत सध्या संपूर्ण ‘चिन्ह टीम’ मग्न आहे. या ग्रंथाविषयी जास्तीत जास्त माहिती द्यावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी आम्ही फेसबुकवर ‘चिन्ह मित्रां’साठी सतत पोस्ट टाकतो.

त्यामुळे गायतोंडे यांच्या अक्षरश: जगभरातल्या चाहत्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत, याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमानही. गेली अनेक वर्ष या ग्रंथाचं काम चालू आहे. मजकूर, लेखन, प्रकाशचित्रं, चित्रं इत्यादी मिळवण्यासाठी प्रचंड मेहेनत करावी लागते आहे. कष्ट करावे लागताहेत. पैसाही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आहे पण हे सारं करण्यात ‘चिन्ह’ला विलक्षण आनंद वाटतो आहे. हाच आनंद आम्ही या वेगवेगळ्या पोस्ट टाकून चिन्ह मित्रांसोबत शेअर करतो. पण आनंदाची भावना नष्ट करणारे अनेक प्रसंग घडताहेत.

उदाहरणार्थ ‘चिन्ह’ने पोस्ट टाकली की काही मिनिटातच त्यातली प्रकाशचित्रं किंवा चित्रं मजकूरापासून वेगळी काढून ती अनेक मंडळी शेअर करतात. हा काय प्रकार आहे? हे सारं कशासाठी? मजकूरापासून प्रकाशचित्रं वेगळी काढायचा वाह्यातपणा का? यांना हा अधिकार कोणी दिला? यातून त्यांना काय मिळतं? म्हणजे जे कोणी हे सारं करतात त्यांना गायतोंडेंविषयी आम्ही जो मजकूर लिहितो त्याविषयी अ‍ॅलर्जी आहे का? की आम्ही जे लिहितोय, ज्या पोस्ट टाकतोय त्या अत्यंत टाकाऊ आहेत म्हणून हे सारं केलं जातं? हे सारं करण्यासाठी वर्षानुवर्ष आम्ही जे कष्ट करतो आहोत. सर्व माहिती, प्रकाशचित्रं एकत्र करण्यासाठी जे करतो आहोत त्याचं काहीच मोल नाही का? खर्चलेल्या पैशाला काहीच मोल नाही असं केवळ आपण म्हणू पण यातली अनेक चित्रं तर वेळप्रसंगी मानहानीचे क्षण अनुभवून ‘चिन्ह’नं मिळवली आहेत ती केवळ ‘गायतोंडे’ यांच्याच प्रेमापोटी, त्याचीही काहीच किंमत नाही का?

अशा कृती जेव्हा आपण करतो तेव्हा यातून समोरच्या माणसाची, संस्थेची कळत नकळत मानहानीही होऊ शकते. याची जाणीवसुद्धा या मंडळींना का होऊ नये? आणि एवढं जर करायचंच असेल तर चित्रांसह मजकूर शेअर केल्यामुळे या मंडळींवर असं कोणतं मोठं आभाळ कोसळणार आहे. म्हणजे आता एकतर आम्हाला या पोस्ट टाकणं थांबवलं पाहिजे किंवा अशा मंडळींना त्वरित ब्लॉक तरी केलं पाहिजे. एवढेच दोन उपाय उरले आहेत...ते करायची वेळ आता हे वाचल्यावर तरी ही मंडळी आणणार नाहीत अशी किमान अपेक्षा तरी करावी का?

या खंडाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.in/promo/gaitondebig.jpg


No comments:

Post a Comment