Saturday, October 26, 2013


गायतोंडेंच्या स्टुडियोतला पंखा !


कालच्या पोस्ट्मध्ये जे प्रकाशचित्र लावलं होतं ते होतं चित्रकार गायतोंडे यांच्या स्टुडियोतल्या पंख्याचं. गायतोंडे यांच्यावर ज्यांनी फिल्म बनवली त्याच सुनील काळदाते यांनी त्या फिल्मच्या शूटींगच्या दरम्यान टिपलेलं. ‘गायतोंडेंच्या शोधात...’ मध्ये अशी अनेक प्रकाशचित्रं असणार आहेत.

सुनील काळदाते यांनी ‘गायतोंडे’ यांच्यावर जी अप्रतिम फिल्म केली होती त्यात या पंख्याच्या फिरणार्‍या पात्याचं विलक्षण सुंदर चित्रण करण्यात आलं होतं. गायतोंडे यांचं व्यक्तिमत्व त्या स्टुडियोत कसं विरघळून गेलं होतं त्याचं अप्रतिम चित्रण त्या फिल्ममध्ये पहायला मिळालं होतं. भिरभिरणार्‍या पंख्याचा तो शॉट आजही आठवत रहातो.

त्या पंख्याचा उल्लेख नंतर वाचावयास मिळाला तो आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे यांच्या लेखात. स्टुडियोतला तोच पंखा नंतर गायतोंडे यांच्या एका चित्रात कसा अनोख्या पद्धतीनं उतरला त्याचं डेंगळे यांनी केलेलं वर्णन अतिशय वाचनीय आहे. आमचं तर असं मत आहे की ‘‘एखाद्या चित्रकारावर मराठीत इतकं सुरेख लेखन आजवर झालेलंच नाही.’’ तो लेख सर्वप्रथम ‘चिन्ह’मध्ये नव्हे तर ‘रुची’ या ग्रंथालीच्या मासिकात प्रसिद्ध झाला होता तरी... नंतर मग ‘गायतोंडें’वरच्या अंकात आम्ही तो समाविष्ट करून घेतला. घेताना त्याचा उत्तरार्धही डेंगळे यांनी लिहावा असा आमचा अग्रह होता आणि डेंगळे यांनी तो मानला हे दोन्ही लेख लवकरच येणार्‍या ‘गायतोंडेंच्या शोधात...’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्यांना अधिक उत्सुकता आहे त्यांनी ते ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावरही वाचता येतील.

‘गायतोंडेंच्या शोधात...’ हा १/४ आकाराच्या २०० पानी संपूर्ण रंगीत खंड येत्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. त्याची किंमत आहे रु. २०००. निवडकच्या तीन खंडाची किंमत आहे रु. ६००० तर एका खंडाचं प्रकाशनपूर्व सवलतमूल्य आहे रु. १४५० किंवा तीन खंडाचं मिळून रु. ३७५०. (त्यात ‘चिन्ह’चा आगामी अंक भेटीदाखल दिला जाणार आहे.) मागणी नोंदवण्यासाठी कृपया स्वत:चं नाव-पत्ता आणि इमेल आयडी ‘NKG' (फक्त ‘गायतोंडे’ खंड), किंवा 'NK3' (गायतोंडे + निवडक २ + निवडक ३) या लघुसंदेशासह ‘चिन्ह’च्या 90040 34903 या नंबरवर sms करा.

No comments:

Post a Comment