Saturday, October 26, 2013


"आमचा बाप आणि आम्ही अर्थात गायतोंडे"

 

‘चिन्ह’नं 2001 सालापासून आजपर्यंत गायतोंडे यांच्यावर एकूण तीन वेळा विशेष लेखन प्रसिद्ध केलं. तिन्ही वेळा लेखाचं संपादन करताना जाणवत गेलं ते गायतोंडे यांच्या वडिलांचं करडं अस्तित्व. गायतोंडे यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकानंच त्यांच्या वडिलांच्या कठोर व्यक्तिमत्वाविषयी काहीना काही संगितलं होतं. आता चौथ्यांदाही ‘गायतोंडेच्या शोधात’ चं संपादन करताना पुन्हा तोच अनुभव आला. हे संपादन संपवताना हातात लेख आला तो गायतोंडेंना गुरू मानणार्‍या ‘लक्ष्मण श्रेष्ठ’ यांचा. त्यांच्या लेखात गायतोंडे आणि त्यांच्यातल्या (पक्षी: श्रेष्ठ) गुरूशिष्याच्या मनोज्ञ नात्याचं सुरेख दर्शन घडतं. याही लेखात पुन्हा गायतोंडेंच्या वडिलांचा उल्लेख तोही अत्यंत सुस्पष्ट. थेट गायतोंडे यांनीच सांगितलेला "गिरगावच्या एका वाडीसमोर नेऊन गायतोंडे यांनी लक्ष्मण यांना सांगितलं. इथं या चाळीत मी रहात होतो. इथं मला वडील पट्ट्याने वगैरे मारत, डोकं आपाटत... 

या लेखाचं संपादन पूर्ण झालं आणि या ग्रंथाला लिहिलेली चित्रकार प्रभाकर कोलते यांची प्रस्तावना हाती आली. त्यातही पुन्हा तसाच उल्लेख पण तो त्याचे वर्गमित्र चित्रकार शंकर पळशीकरांकडून झालेला, "गायतोंडे असा नव्हता, विलक्षण मनमोकळा होता पण अचानक त्याच्यात बदल झाला. तो खूपच कमी बोलू लागला वगैरे..." ते वाचलं आणि मग ‘गायतोंडे’ यांच्या स्वभावाचे असंख्य कांगोरे उलगडू लागले...
हा ग्रंथ सलगपणे वाचणार्‍या प्रत्येकालाच हा अनुभव येईल. कळत नकळत कदाचित हे सारं शिकवूनही जाईल की ‘मुलांशी कसं वागावं? त्यांना मारावं की न मारावं? आणि मारलं तर किती मारावं वगैरे वगैरे...
चांगले ग्रंथ, चांगलं साहित्य, कळत नकळत अशी शिकवण देऊन जात असतात...म्हणून तर आम्ही म्हणतो ‘गायतोंडेच्या शोधात...’ हे एका चित्रकाराचं केवळ चरित्र नव्हे.
आणखी खूप काहीतरी यात आहे जे या पुढल्या पोस्टमधून आम्ही मांडणार आहोत...
या खंडाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.in/promo/gaitondebig.jpg

‘गायतोंडेंच्या शोधात...’ हा १/४ आकाराच्या २०० पानी संपूर्ण रंगीत खंड येत्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. त्याची किंमत आहे रु. २०००. निवडकच्या तीन खंडाची किंमत आहे रु. ६००० तर एका खंडाचं प्रकाशनपूर्व सवलतमूल्य आहे रु. १४५० किंवा तीन खंडाचं मिळून रु. ३७५०. (त्यात ‘चिन्ह’चा आगामी अंक भेटीदाखल दिला जाणार आहे.) मागणी नोंदवण्यासाठी कृपया स्वत:चं नाव-पत्ता आणि इमेल आयडी ‘NKG' (फक्त ‘गायतोंडे’ खंड), किंवा 'NK3' (गायतोंडे + निवडक २ + निवडक ३) या लघुसंदेशासह ‘चिन्ह’च्या 90040 34903 या नंबरवर sms करा.

No comments:

Post a Comment