Monday, March 9, 2015


न संपणाऱ्या शोधाची कहाणी
गायतोंडेवजा ज्ञानेश्वर नाडकर्णी


नामवंत कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी हे गायतोंडे यांचे परममित्र. तसेच ते चिन्हचे संपादक सतीश नाईक यांचेदेखील जवळचेच मित्र. किंबहुना ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या नजरेतून नाईक यांनी गायतोंडे यांना पाहिलं. पण तरीदेखील चिन्हच्या एकाही गायतोंडे विशेषांकात नाडकर्णी यांचा गायतोंडे यांच्यावरचा एकही लेख प्रसिद्ध होऊ शकला नाही. क्यों ? क्यों की, वो एक लंबीss कहानी है । पढो


८० च्या दशकातले नितीन दादरावाला यांच्या प्रदर्शनातले नाडकर्णी

मूळ तिन्ही अंकांत नसलेल्या पण या ग्रंथात नव्यानं समाविष्ट केलेल्या लेखांसंदर्भात मात्र अधिक सांगायलाच हवं. विशेषत: लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या लेखाबद्दल. आपल्यापासून इतरांना सतत चार हात लांब ठेवणार्‍या गायतोंडे यांनी आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या कॉलेज तरुणाला आपल्या इतक्या जवळ कसं काय येऊ दिलं, हा गायतोंडे आणि लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या स्नेहसंबंधातला मला सतत पडणारा प्रश्न होता. पण या ग्रंथात समाविष्ट केलेल्या लक्ष्मण यांच्या प्रदीर्घ लेखानं या आणि अशाच असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळून गेली. गायतोंडे यांच्या या सार्‍या शोधात गायतोंडे यांना झालेल्या अपघाताचे उल्लेख वारंवार येत होते, पण त्याचा तपशील मात्र कुठही येत नव्हता; त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ होतो. पण लक्ष्मण यांचा लेख हाती आला आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळून गेली. तसं पाहिलं तर हे काही गायतोंडे यांचं अधिकृत चरित्र नव्हे, पण त्यांच्या चरित्रलेखनाला लागणारी बरीच संदर्भसामग्री या ग्रंथात अगदी पुरेपूर उपलब्ध झाली आहे, याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. या लेखाच्या शेवटी लक्ष्मण यांनी गायतोंडे यांच्या अंत्ययात्रेविषयी जे मत व्यक्त केलं आहे ते तर निश्चितपणानं वाचणार्‍याला एका नवी दृष्टी देऊन जाईल. लक्ष्मण यांचा हा लेख गायतोंडेंच्या शोधातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं मी मानतो. आजवरच्या तिन्ही पुरवण्यांत प्रसिद्ध न झालेला आणखी एक लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे, तो म्हणजे पंडोल आर्ट
९० च्या दशकातले सुधीर पटवर्धन यांच्या पुण्यातल्या प्रदर्शनातले नाडकर्णी
गॅलरीचे संचालक दादीबा पंडोल यांचा लेख. त्यांचे वडील काली पंडोल हे पहिल्यापासून गायतोंडे यांचे चाहते. साठच्या दशकात त्यांनी गायतोंडे यांचा ताज आर्ट गॅलरीमधला संपूर्ण शोच्या शो विकत घेतला होता. त्यानंतर उभयतांत जो स्नेह निर्माण झाला त्याचं रूपांतर 1970 सालापासून गायतोंडे हे पंडोलचे आर्टिस्ट बनण्यात झालं. 1970 सालानंतर शेवटपर्यंत गायतोंडे यांनी पंडोलखेरीज अन्य कुणाही गॅलरीला विक्रीसाठी चित्रं दिली नाहीत. ऐंशीच्या दशकात काली पंडोल याचं निधन झालं, पण गायतोंडे यांनी तोच व्यवहार दादीबांशीदेखील चालू ठेवला. या सार्‍याचीच नोंद या ग्रंथात व्हावी असं मला अगदी मनापासून वाटत होतं. पण दादीबा यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमामुळे ते साध्य होत नव्हतं. अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना फोन केला आणि त्यांनी ग्रंथाविषयी ऐकताच मुलाखतीची वेळ देऊन टाकली. या लेखासाठी थांबलो त्याचं चीज झालं. गायतोंडे यांच्याविषयी दादीबा जे बोलले आहेत त्यानं या ग्रंथाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे, याविषयी कुणाचंच दुमत होऊ नये.

गायतोंडे यांची बालमैत्रीण शकुंतला सामंत ऊर्फ सुनीता पाटील यांचा लेख तर अगदी अचानक हातात पडला. वृत्तपत्रात आलेलं गायतोंडे यांच्याविषयीचं निवेदन वाचून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मग एका दीर्घ बैठकीत त्यांनी पन्नासच्या दशकातल्या गिरगावच्या आणि बाळच्या आठवणी जाग्या केल्या. हाही लेख या निमित्तानं पहिल्यांदाच प्रसिद्ध होतो आहे. आता इतकं लिहिल्यावरचिन्हमध्ये आधी प्रसिद्ध न झालेल्या पण इतरत्र प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या या ग्रंथातल्या समावेशाविषयी लिहिलं नाही तर ते योग्य होणार नाही.

कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचं गायतोंडे यांच्या विषयीचं लेखन चिन्हच्या दुसर्‍या पर्वातल्या एकाही अंकात मी प्रसिद्ध करू शकलो नाही ही एक मोठी उणीव माझ्याकडून राहून गेली, हे मी प्रथमतः मान्य करतो. मलाही स्वतःला गायतोंडे यांच्याविषयीचं त्यांचं लेखन ग्रंथात प्रसिद्ध करायला खचितच आवडलं असतं. पण तसं घडू शकलं नाही याचं कारण अखेरी अखेरीस नाडकर्णी यांच्या स्वभावात व वागण्याबोलण्यात प्रचंड मोठा बदल होत गेला हेच होय. 90च्या दशकात मी जवळ जवळ रोजच त्यांच्या सोबत जहांगीर आर्ट गॅलरीमधल्या सॅमोवररेस्टोरंटमध्ये गप्पा मारत असे. रोज दीड-दोन तासांच्या त्या बैठकीत नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत, कला, पत्रकारिता आदी विषयांवर प्रचंड गप्पागोष्टी होत असत. स्वभावतःच ते मिष्किल असल्यानं आणि त्यांचं निरीक्षण खूप सुंदर असल्यानं, मुख्य म्हणजे त्यांच्याकडे ताज्या बातम्यांचा साठा असल्यानं, त्या बैठका खूप रंगत असत. नाडकर्णी यांचा कलाक्षेत्रात मुक्त संचार असल्यानं चिक्कार बातम्या हाती लागत. नाडकर्णी फॉर्मात असले म्हणजे जे धमाल किस्से सांगत ते ऐकून हसून हसून मुरकुंडी वळत असे. गॉसिप्स तर काही विचारू नका. पण या सार्‍या गप्पा नंतर मात्र वळून वळून त्यांच्या मित्राकडेच यायच्या. हा त्यांचा मित्र म्हणजे गायतोंडे. विलक्षण आदरानं नाडकर्णी गायतोंडे यांच्याविषयीचा प्रत्येक शब्द उच्चारीत. 1997-98 नंतर हळूहळू आजारपणामुळे आणि नंतर वार्धक्यामुळेदेखील नाडकर्णी चिडचिडे होत जाताना दिसू लागले. काही कौटुंबिक अडचणींमध्येदेखील ते सापडले असावेत. त्यामुळे भेटल्याबरोबर प्रसन्न हसणारे, चेष्टा-मस्करी करणारे नाडकर्णी, अनेकदा त्यांना काही विचारलं तर वसकन अंगावर येत. याच काळात माझं कार्यालय फोर्टमधून लालबाग परिसरात हलवलं गेल्यानं त्यांचा रोजचा संपर्कदेखील साहजिकच कमी कमी होत गेला. त्यांच्याशी फोनवर बोलणंदेखील नंतर नंतर दडपण आणणारं वाटू लागलं. त्यामुळेच की काय कुणास ङ्खाऊक, गायतोंडे यांच्यावरच्या पुरवण्यांसाठी मी त्यांच्याकडून लेख लिहून घेतला नसणार. पण 2001 सालची पहिली पुरवणी प्रसिद्ध होताच एके दिवशी सकाळीच नाडकर्णींचा फोन आला, ‘अहो काय अंक काढलायत? ग्रेट! ग्रेट!आणि मग अंकाविषयी ते खूप कौतुक करणारं बोलत राहिले. अचानक त्यांचा आवाज चढला. म्हणाले, ‘माझ्याकडून तुम्ही गायतोंडेवरचा लेख का नाही घेतला? माझा चांगला मित्र होता तो. मी काय तुमच्याकडून पैसे घेतले असते?’ एक ना दोन, बरंच काही बडबडले, पण उत्तर देण्यास संधी न देता फोन ठेवून मोकळे झाले.

नंतरही नाडकर्णींना अंक जातच राहिले. तोपर्यंत नाडकर्णीनीं मुंबई सोडली होती आणि ते पुण्याला स्थायिक झाले होते. ते मुंबई सोडून कधी पुण्याला गेले हेदेखील नीटसं कळलं नाही. पण खूप वाईट अवस्थेत ते पुण्याला गेले एवढं मात्र कळलं. उदाहरणार्थ, सामानाच्या टेंपोसोबतच मुंबईपुणे प्रवास त्यांना करावा लागला वगैरे. हे ऐकल्यावर मन खिन्न झालं. पण ज्यानं हे घडवून आणलं त्याला मात्र त्याचं काहीच वाटलं नाही याचं विशेष दु:ख झालं. 2006 साली गायतोंडेंच्या शोधात...अंक प्रसिद्ध झाला तेव्हाची ही गोष्ट. तोपर्यंत नाडकर्णीच्या स्वभावात प्रचंडच बदल झाले होते. आता तर ते चित्रकारांचे फोन घेणंदेखील टाळू लागले होते... आणि अंक पोचताच एके दिवशी सकाळी त्यांचा फोन आला. पुन्हा तेच, प्रचंड कौतुक आणि मग नंतर प्रचंड संताप. पुन्हा तोच प्रश्न, ‘तुम्ही का नाही माझ्याकडून लेख लिहून घेतलात?’ आणि पुन्हा तेच - उत्तराची संधी न देता खाडकन फोन ठेवणं. फोन ठेवता ठेवता म्हटलेलं त्यांचं वाक्य माझ्या पक्कं लक्षात आहे, म्हणाले होते, ‘चित्रकारांशी आता याउप्पर मी पुन्हा कुठलेही संबंध ठेवू इच्छित नाही, मला फोन करू नका.आणि खडाक. फोन ठेवलादेखील.

अशा या परिस्थितीत त्यांच्याकडून लेख घेणं तरी कसं शक्य होतं? गायतोंडे यांच्यावरचे त्यांचे लेख मी तिन्ही अंकांत घेऊ शकलो नाही याचं वैषम्य त्यांच्यापेक्षा मला अधिक आहे. या ग्रंथाचं डिझायनिंग होऊन तो पूर्ण होताच नाडकर्णी यांचा लेख या ग्रंथात नसणं ही या ग्रंथातली सर्वात मोठी त्रुटी मला जाणवली... पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नाडकर्णी या जगात राहिले नव्हते. म्हणून मग एके दिवशी नाडकर्णी यांनी गायतोंडे यांच्यावर लिहिलेली सारी कात्रणं वाचून काढली आणि अखेरीस निवडक चिन्हच्या संकल्पनेत बसत नसतानाही त्यांच्याच अश्वत्थाची सळसळया पुस्तकातून गायतोंडे यांच्यावरचा लेख पुनर्प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

अशा प्रकारे नियम मोडल्यावर मग गायतोंडे यांच्यावरचा लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला फिरोझ रानडे यांचा लेख यात का नको, असा प्रश्न मला पडला आणि रानडे यांचा लेख या ग्रंथात दाखल झाला. त्यांच्या पत्नी नामवंत लेखिका प्रतिभा रानडे मला म्हणाल्या, ‘नाईक, थोडं जर आपण आधी भेटलो असतो तर यांनी तुम्हाला गायतोंडे यांच्याविषयी खूप नवी माहिती दिली असती. खूप आठवणी सांगायचे ते गायतोंडे यांच्याबद्दलच्या.तेव्हा मात्र मी खूपच हळहळलो. कारण ऐंशी-नव्वदच्या दशकात मी ज्या वृत्तपत्रात काम करत होतो त्याच्या कार्यालयात रानडे सहकुटुंब अनेकदा येत असत, ते त्यांच्या अनेक पत्रकार मित्र-मैत्रिणींशी भरपूर गप्पा मारीत असत. पण तेव्हा कधी गायतोंडे यांचा विषय निघाला नाही. त्यांनी लोकसत्तेत लेख लिहिला तो देखील 2005 साली. पण तोपर्यंत मी पत्रकारिता सोडली होती. खरं तर गायतोंडेंच्या शोधात...हा अंकदेखील 2006 साली दिवाळीत प्रसिद्ध झाला होता, मग माझ्याकडून ही चूक कशी राहून गेली याचं मला आजही राहून राहून नवल वाटत राहतं. आयुष्यात समोरून चालून आलेल्या संधी या अशा सोडायच्या नसतात हा धडा मी यातून शिकलो खरा, पण मला वाटतं, नव्यानं शिकून चुका सुधारण्याची वेळ आता कधीच निघून गेलेली आहे. आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या अशा अनेक गोष्टी मला आज अस्वस्थ करतात, कमीअधिक काळ औदासिन्य आणतात, पण यातच मानवी आयुष्याचं अपुरेपण सामावलेलं आहे अशी मी माझ्याच मनाची समजूत काढतो आणि अस्वस्थता झटकून नव्या उमेदीनं कामाला लागतो.

 वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.