Tuesday, March 3, 2015


न संपणाऱ्या शोधाची कहाणी
शोध असा सुरु झाला

गायतोंडे यांच्या शोधाला खर्‍या अर्थानं सुरुवात झाली ती 2003 साली. भास्कर कुळकर्णी अंक नुकताच प्रसिद्ध झाला होता. केवळ चित्रकलेच्याच क्षेत्रात नाही तर नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य आदी सर्वच सांस्कृतिक क्षेत्रांत, इतकंच काय पण सामाजिक क्षेत्रातही त्याची विशेष दखल घेतली गेली होती. दुसर्‍या पर्वातले पहिले तिन्ही अंक असेच वेगवेगळ्या कारणांनी गाजत होते, चर्चिले जात होते. त्यामुळे चौथा अंकदेखील असाच तुल्यबळ निघायला हवा होता. इतके दिवस मनाच्या तळाशी दडी मारून बसलेला गायतोंडेहा विषय अचानक उफाळून वर आला. त्याला कारणीभूत ठरलं ते भास्कर कुळकर्णी यांच्या डायरीतलं एक पान. त्यावर भास्कर कुळकर्णी यांनी गायतोंडे यांच्या संदर्भात काही निरीक्षणं नोंदवली होती. भास्कर कुळकर्णी जेव्हा मुंबईहून बदली होऊन दिल्लीला गेले, तेव्हाची बहुदा ती असणार. हे दोन्ही जिनियस कलावंत बहुदा त्या वेळी एकमेकांना भेटत असणार. त्या भेटींच्या संदर्भात नोंदवलेली ती निरीक्षणं अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक स्वरूपाची असल्यानं मी ती आता उघड करू इच्छित नाही. भास्कर कुळकर्णींच्या त्या अत्यंत खाजगी दस्तावेजाचं संपादन करताना करताना तेव्हा मी जे पथ्य पाळलं तेच आताही पाळतो आहे. (प्रभाकर बरवे यांच्या डायर्‍या सांभाळणारांनी याची जरूर दखल घ्यावी.) ते वाचलं आणि मग मी मनाशी निश्चित करून टाकलं की हा अंक गायतोंडेयांच्यावरचाच असायला हवा. असं मी म्हटलं खरं, पण ते खूपच अवघड होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं.

कारण गायतोंडे यांनी सत्तरच्या दशकात मुंबई सोडताना आपल्या पश्चात कुठलेच दुवे शिल्लक ठेवले नव्हते. साहजिक या कामाला कुठून सुरवात करायची, कशी सुरवात करायची, तेच उमगेना. मनोहर म्हात्रे म्हणाले, ‘गायतोंडे यांना तीन बहिणी होत्या.बस. ही एवढीच माहिती हाती लागली होती, पण पुढं काय? त्यांचा शोध कसा घ्यायचा? भास्कर कुळकर्णींचा शोध कुळकर्णी, मालाडएवढ्याच माहितीवरून टेलिफोन डिरेक्टरीच्या साहाय्यानं मी लावला होता, त्यासाठी मालाडमधल्या किती कुळकर्ण्यांशी मला बोलावं लागलं होतं ते माझं मला ठाऊक. इथं तर तेही शक्य नव्हतं, कारण लग्नानंतर बहिणींची नावं नक्कीच बदलली असणार. पण तरीदेखील इथंतिथं चौकश्या सुरू झाल्या, पण तितक्यातच म्हात्रे यांनीच माहिती आणली की त्यांतल्या दोघी आता हयात नाहीतम्हणून. मग आता तिसरीचा शोध सुरू झाला. म्हात्रे यांनीच एके दिवशी बातमी आणली की गायतोंडे यांचा एक भाचा आहे सतीश कंटक नावाचा. तो म्हणे गायतोंडे यांच्या संपर्कात शेवटपर्यंत होता. पण नंतर म्हात्रे यांनीच बातमी आणली की तोही अलीकडेच गेलाम्हणून. आता शोध अगदी नेमका झाला होता फक्त गायतोंडे यांच्या धाकट्या बहिणीचा. तिचं नाव किशोरी असल्याचं म्हात्रे यांनीच सांगितलं. पण एवढ्या मोठ्या मुंबापुरीत तिला शोधायचं तरी कुठं आणि कसं? या सगळ्या खटाटोपात जवळ जवळ वर्ष निघून गेलं होतं. गायतोंडे यांच्या या सार्‍या शोधाचा रागरंग पाहून शेवटी मी निर्णय घेतला होता की यंदाचा अंक हा गायतोंडे यांच्यावरचा नसेल. त्या वर्षीचा अंक होता तो आधारवडया विषयाला वाहिलेला. एक अख्खं वर्ष असंच उलटलं होतं. गायतोंडे यांच्या संदर्भात काहीच विशेष हाती लागलं नव्हतं.

2005
सालच्या अंकाचं काम सुरू झालं. गेल्या वर्षी नाही जमलं, यंदा नक्की जमवू, अशा निग्रहानं कामाला लागलो. पण आता एक महत्त्वाची घटना घडली होती. पत्रकारितेत आणि लेखनात करियर करू पाहणारा एक तरुण चिन्हमध्ये आला होता. कमलेश देवरूखकर हे त्याचं नाव. भास्कर कुळकर्णी विशेषांक वाचून तो झपाटला गेला होता आणि त्यालाचिन्हच्या एकूण निर्मिति-प्रक्रियेत शिकण्यासाठी सहभागी व्हायचं होतं. नंतर कधी तरी त्यानं 2001 सालच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेली गायतोंडे यांच्यावरची पुरवणी वाचली आणि मग तो माझ्या मागेच लागला की गायतोंडे यांच्यावरचा अंक लगेचच काढू या म्हणून. मीही त्याला होकार दिला आणि कामाला लागलो. पण गायतोंडे यांच्या बहिणीचा थांगपत्ता मात्र काही लागत नव्हता.

कमलेश हा अस्सल गिरगावकर. म्हणून आम्ही ठरवलं की आता थेट गिरगावातूनच आपण कामाला सुरवात करायची. तोपर्यंत म्हात्रे यांच्याकडून गायतोंडे जुन्या मॅजेस्टिक सिनेमासमोरच्या कुडाळदेशकर वाडीत राहत होते एवढी माहिती मिळाली होती. आम्ही ठरवलं की आपण तिथूनच सुरुवात करायची. गायतोंडे यांच्या बहिणीचा पत्ता आपल्याला तिथंच नक्की मिळेल. आणि घडलंही तसंच. कमलेश तिथं गेला असताना त्याला एक बाई भेटल्या. त्या म्हणाल्या हो, मी देईन की तुम्हाला त्यांचा पत्ता मिळवून. एक महिन्यानं या.त्यांच्या या उत्तरानं मला कोण आनंद झाला! तो आनंद मी त्याच दिवशी गायतोंडे यांच्यावरच्या अंकाची संपूर्ण रूपरेषा तयार करून साजरा केला. या कामी मला चित्रकार मनोहर म्हात्रे यांची मोठी मदत झाली. म्हात्रे यांनीच मला गायतोंडे यांच्या सहवासात आलेल्या कलावंतांची नावं दिली. पण आमचा तो आनंद हळूहळू मावळतच गेला; कारण नंतर जवळ जवळ वर्षभर खेटे घालूनदेखील त्या बाईनं आम्हाला गायतोंडे यांच्या बहिणीचा पत्ता नाही दिला तो नाहीच दिला. काही ना काही कारणं सांगून ती कमलेशला झुलवतच राहिली. तिच्या मते गायतोंडे यांची बहीण अमेरिकेत होती, आणि ती लवकरच येणार आहे वगैरे. ती आम्हाला झुलवते आहे हे तिनं मारलेल्या एका थापेनंच उघडकीला आलं. ती म्हणाली, ‘लवकरच जहांगीर आर्ट गॅलरीत गायतोंडे यांचा पुतळा बसवला जाणार आहे, त्याचे पैसे देण्यासाठी ती लवकरच मुंबईत येणार आहे.कमलेशनं हे मला सांगितलं आणि मी लगेचच त्याला म्हणालो की ही बाई बंडल आहे, आपल्याला थापा मारतेय ती. जहांगीरमध्ये जहांगीरखेरीज कुणाचाच पुतळा लागू शकत नाही. एक वेळ हुसेनसारख्या कलावंताचा लागेल, पण गायतोंडे यांचा तर कधीच लागू शकणार नाही. सबब गायतोंडे यांच्या अंकाची कल्पना रद्द.त्या वर्षीचा अंक अरुण कोलटकर आणि नागेशकर यांच्यावर निघाला. या सव्यापसव्यात आणखी एक-दीड वर्ष वाया गेलं. तेव्हापासून वारंवार मनात येतं की, हे सारं करून त्या बाईनं नक्की काय मिळवलं असेल? कुणास ठाऊक.

तिसर्‍या वर्षी मात्र ही कोंडी पटकन फुटली. एके दिवशी जहांगीरच्या पायरीवर प्रफुल्ला डहाणूकर भेटल्या. गायतोंडे यांच्याविषयीच्या अंकाचं त्यांच्या कानांवर घालताच त्यांनी त्या अंकासाठी मुलाखत देण्याचं तर कबूल केलंच, पण गायतोंडे यांच्या बहिणीचा फोन नंबर मिळवून देण्याचं आश्वासनदेखील दिलं. तिचं नाव आता किशोरी दास असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतरच्या चारपाचच दिवसांत त्यांनी त्यांचा फोन नंबरदेखील कळवला. आता कोंडी फुटली होती. मग आम्ही भराभर प्रश्नावल्या तयार केल्या आणि कमलेशनं मुलाखतींना सुरवातदेखील करून टाकली. पहिली मुलाखत झाली ती किशोरी दास यांची, मग प्रफुल्लाबाईंची, नंतर मनोहर म्हात्रे, सच्चिदानंद दाभोळकर, शरद पाळंदे, शांतू आमोणकर, शांताराम वर्दे वालावलीकार आणि विश्वास यंदे या क्रमानं सार्‍या मुलाखती होत गेल्या आणिगायतोंडेंच्या शोधात...ला मूर्त स्वरूप येत गेलं. नितीन दादरावालांकडून याही अंकासाठी खास लेख लिहून घेतला.

पुढं जो घडला तो इतिहास आहे; तो आता मी पुन्हा सांगत बसत नाही. पण हे सारं घडलं त्याचं सारं श्रेय कमलेशनं दाखवलेल्या चिकाटीला आणि अंगीकारलेलं काम मनापासून पार पाडण्याच्या त्याच्या वृत्तीला आहे यात शंकाच नाही. कुणास ठाऊक, कदाचित गायतोंडे आणि कमलेश यांच्यामधला हा गिरगावचाच चिवट दुवा अत्यंत प्रबळ ठरला असावा. त्यानं गायतोंडे यांच्या या शोधात स्वतःला झोकून दिलं नसतं तर हा शोध निश्चितपणे अपुरा राहिला असता, याविषयी माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. कमलेशनं ज्या जिद्दीनं आणि मोठया धडाडीनं हे काम स्वीकारलं आणि तडीलाही नेलं त्याला तोड नाही. एकेक खर्ड्याचं मी त्याला किती तरी वेळा पुनर्लेखन करायला लावलं. पण कुठलीही सबब न सांगता, कुरकूर न करता, गायतोंडे यांच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात शिरून त्यानं जे अतिशय मनापासून शब्दांकन केलं, त्यामुळेच गायतोंडे खर्‍या अर्थानं वाचणार्‍यांच्या आत कुठं तरी भिडले गेले असावेत. किशोरी दास यांच्या आत्मकथनाचा पहिला ड्राफ्ट जेव्हा त्यांना वाचून दाखवला तेव्हा तो ऐकता ऐकता त्यांना भावनावेग आवरला नाही आणि त्या हुंदके देऊ लागल्या, या कमलेशनं सांगितलेल्या एका आठवणीची इथं नोंद करावीशी वाटते. तो सांगत होता, गायतोंडे यांच्या संबंधात ज्यांनीचिन्हला मुलाखती दिल्या ते सारेच त्यांच्या मुलाखतीचं शब्दांकन ऐकल्यावर काही क्षण मूक होत असत.

वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.









No comments:

Post a Comment