Monday, February 23, 2015


न संपणाऱ्या शोधाची कहाणी
दवडलेल्या संधी 
किंबहुना घरात रहाणं असह्य झाल्यावर दिल्लीला जाण्याआधी अनेक वर्षं बाळ गायतोंडे बाळ छाबडांच्याच घरात राहत होते. चित्रकार होण्याला झालेला वडिलांचा विरोध, घरातलं ताणतणावाचं वातावरण, अवचित झालेला प्रेमभंग, स्वत:ची कला आणि कलेचं जग, या सार्‍याविषयी कदाचित गायतोंडे यांनी बाळ छाबडांकडे आपलं मन मोकळं केलं असणार. हे सारं माझ्या लक्षात आलं आणि मी भयंकर अस्वस्थ झालो. बाळ छाबडांशी संपर्क साधला पण तोपर्यंत ते वृद्धत्वामुळे न बोलण्याच्या अवस्थेला गेले होते.
प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचा काळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा चित्रकलेच्या क्षेत्रातला सर्वात चैतन्यपूर्ण काळ : त्याची नोंद अत्यंत सजगपणे केली जायला हवी होती असं माझं स्पष्ट मत आहे. पण दुर्दैवानं संबंधितांनी त्याकडे पुरेसं लक्ष न दिल्यानं ते होऊ शकलेलं नाही. मग त्याची कारणं आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, कोणतीही असोत. या संबंधितांत मीही आलोच. ऐन तरुणपणी मी जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा ही सर्वच मंडळी जवळजवळ सुस्थापित झाली होती. आणि मुखदुर्बळपणामुळे म्हणा किंवा न्यूनगंडामुळे म्हणा किंवा अनास्थेमुळे म्हणा अथवा पुरेशी माहिती नसल्यामुळे म्हणा, मी या सर्वांशी संपर्क साधू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. याचा दोष मी संपूर्ण कलाशिक्षण पद्धतीलाच देतो. मी कलाशिक्षणासाठी जेव्हा जेजेत प्रवेश घेतला होता तेव्हा नुकताच अभ्यासक्रम बदलला होता. (त्यालाही आता तब्बल 40 वर्षं होत आली आहेत, पण तो अभ्यासक्रम अद्यापही बदलला गेलेला नाही.) त्या अभ्यासक्रमात भारतीय चित्रकलेच्या इतिहासाला अतिशय गौण स्थान देण्यात आलं होतं.

वर्षभर जागतिक चित्रकलेचा इतिहास शिकवल्यानंतर वेळ शिल्लक राहिलाच तर तो भारतीय लघुचित्र आणि अजंठा, वेरूळ यांना दिला जात असे आणि यातनं वेळ उरलाच तर राजा रवि वर्मा, रवींद्रनाथ टागोर, अमृता शेरगील आणि फार फार तर हुसेन यांना विभागून दिला जात असे. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप आणि बॉम्बे स्कूलची नुसती नावं घेऊन त्यांचा इतिहास तिथंच संपवला जात असे. अशा परिस्थितीत आधुनिक चित्रकलेविषयीची माहिती मिळणार तरी कशी? संगणक, इंटरनेट हे शब्द तेव्हा दृष्टिक्षेपातदेखील नव्हते. त्यामुळे साहजिकच कुठलीही माहिती मिळवण्यावर प्रचंड मर्यादा होत्या. परिणामी अनेक संधी माझ्यासारख्यालाही गमवाव्या लागल्या. याचं एक उदाहरण दिल्याशिवाय राहवत नाही. त्यानं मला काय म्हणायचं आहे ते अधिक स्पष्ट होईल.



लहानपणी रेडिओच्या दिवसांत ऐकलेलं तलतचं एक गाणं मध्यंतरी वार्‍यावरून असंच ओझरतं ऐकू आलं. अनिलदांची चाल असावी; कारण गुणगुण्यासाठी ती पकडताही येईना आणि शब्ददेखील आठवेनात. खूप अस्वस्थपणा आला. कुणालाही विचारलं तर कुणाला सांगता येईना. आणि विचारावं तरी काय आणि कसं ? हा प्रश्नही होताच. शेवटी ठरवलं, युट्यूबला साकडं घालायचं. बरं युट्यूबला विचारणार तरी काय ? शेवटी ठरवलं, संपूर्ण तलत ऐकून घ्यायचा. एके दिवशी बैठक जमवली. तलतची सगळी गाणी शोधून काढली आणि ऐकू लागलो. विलक्षण क्षण होते ते... सारा भूतकाळ जिवंत करणारे.

आणि एका क्षणी मला ते गाणं सापडलं! मोहब्बत तर्क की मैनेहे गाणं होतं दो राहाया चित्रपटातलं. ते लिहिलं होतं साहीरनं आणि संगीत दिलं होतं अनिल बिश्वास यांनी. 1952 सालातला हा चित्रपट होता. आणि निर्मात्याचं नाव ऐकल्यावर मी तर चमकलोच. निर्माता होता बाळ छाबडा आणि तो निर्माण करणार्‍या संस्थेचं नाव होतं प्रोग्रेसिव्ह पिक्चर्स ! ही माहिती मिळाल्यावर मात्र मी अक्षरशः थक्क झालो. पण त्या गाण्याच्या शोधानं मिळालेला आनंद या नव्या माहितीनं क्षणार्धात धुळीला मिळाला. कारण हा बाळ छाबडा म्हणजे कोण, तर ज्यानं हुसेनची छत्री घरंगळत जाणारी फिल्म केली होती तो आणि जो गायतोंडे यांचा अगदी जीवश्च कंठश्च मित्र होता तो. गाणं मिळाल्याचा आनंद धुळीस मिळण्याचं दुसरं कारण हे होतं की ऐेंशीच्या दशकात आठवड्यातून जवळजवळ तीनचार वेळा तरी हे बाळ छाबडा नावाचे गृहस्थ जहांगीर आर्ट गॅलरीच्या परिसरात दिसत असत. त्यांचा तय्यब मेहता, अकबर पदमसी, होमी पटेल असा ग्रुप होता. अनेकदा त्यात हुसेनही सहभागी होत असत... आणि आमचा तरुण चित्रकारांचा ग्रुप होता.

या दोन्ही ग्रुपना जोडणारा जो दुवा होता तो चित्रकार मनोहर म्हात्रे यांचा. पण आमच्या मुखदुर्बळपणामुळे म्हणा, ‘हा आलाय का? तो आलाय का?’ याच्या पुढं आमचं संभाषण कधी गेलंच नाही. कदाचित ही मंडळी एवढी मोठी, यांच्याशी बोलायचं कसं?’ या भावनेतूनही संभाषण झालं नसावं. पण ते संभाषण झालं नाही त्याचं आता या क्षणी मात्र प्रचंड दु:ख होतंय. कारण गायतोंडे आणि बाळ छाबडा यांची घट्ट मैत्री होती. किंबहुना घरात रहाणं असह्य झाल्यावर दिल्लीला जाण्याआधी अनेक वर्षं बाळ गायतोंडे बाळ छाबडांच्याच घरात राहत होते. चित्रकार होण्याला झालेला वडिलांचा विरोध, घरातलं ताणतणावाचं वातावरण, अवचित झालेला प्रेमभंग, स्वत:ची कला आणि कलेचं जग, या सार्‍याविषयी कदाचित गायतोंडे यांनी बाळ छाबडांकडे आपलं मन मोकळं केलं असणार. हे सारं माझ्या लक्षात आलं आणि मी भयंकर अस्वस्थ झालो. बाळ छाबडांशी संपर्क साधला पण तोपर्यंत ते वृद्धत्वामुळे न बोलण्याच्या अवस्थेला गेले होते. डॉक्युमेंटेशनची भयंकर मोठी संधी आपण गमावली या भावनेनं मी अतिशय व्यथित झालो. हा सारा शोध गेल्या 7-8 वर्षांतला. तो जर आधी 80च्या दशकात लागला असता तर गायतोंडे यांच्या या शोधाला निश्चितपणे वेगळं परिमाण लाभलं असतं; नाही का

गायतोंडे यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व शतकातून एखादंच निर्माण होतं. दुर्दैवानं त्यांचं मोठेपण, त्यांचं द्रष्टेपण, त्यांची थोरवी जाणून घ्यायला आपल्याला अद्याप परकीयांची मदत घ्यावी लागतेय. तितकं सांस्कृतिक शहाणपण अद्याप आपण आपल्यात रुजवू शकलेलो नाही. हे कटू सत्य आहे. भास्कर कुळकर्णी, प्रभाकर बरवे, अरुण कोलटकर आणि गायतोंडे ही खूप मोठी माणसं आपल्याकडे होऊन गेली. ही सारीच्या सारी जे जे स्कूल ऑफ आर्टची, त्यामुळे मला त्यांच्याविषयी रास्त अभिमान. पण त्यांचं कर्तृत्व मात्र आपल्या मराठी समाजापर्यंतदेखील पुरेसं कधी पोहोचलंच नाही. ते पोचावं म्हणून मी हे सारं काम अंगीकारलं आणि ते उभं करत गेलो. मजजवळ कुठलंही आर्थिक बळ नव्हतं किंवा संस्थात्मक बळदेखील. खरं तर ललित कलासारख्या संस्थांचं किंवा कलाविषयक नियतकालिकांचं हे सारं काम आहे. पण दौलतजादे, भ्रष्टाचाराचे इमले आणि रमणे उभारण्यापलीकडे या संस्थांनी दुसरं केलंय तरी काय ? तीच गोष्ट कलाविषयक नियतकालिकांची. दर चार अंकांनंतर आलटूनपालटून त्याच त्याच कलावंतांवर काही ना काही मजकूरवजा फोटो प्रसिद्ध करून त्या कलावंतांची सेलिब्रिटी व्हॅल्यू वाढवण्यापलीकडे कोणतं सांस्कृतिक पुण्यकर्म या तथाकथित कलाविषयक नियतकालिकांनी पार पाडलंय असं म्हणता येईल ?
वि. सू.  ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.



No comments:

Post a Comment