Thursday, February 12, 2015

गायतोंडे :  
शोधाचा टर्निंग पॉईंट



एखादा ग्रंथ - कादंबरी, कथा, कविता किंवा एखादा लेखसुद्धा वाचणाऱ्याला खूप काही देऊन जातो किंवा प्रभाव टाकतो. ग्रंथालीच्या रुचीच्या अंकात आर्कीटेक्ट नरेंद्र डेंगळे यांनी लिहिलेला चित्रकार गायतोंडे यांच्यावरचा लेख हा असाचगायतोंडेंच्या शोधातअसलेले चिन्हचे संपादक सतीश नाईक यांच्या संदर्भात टर्निंग पॉईंट ठरून गेला. कोणालाही आपल्या जवळपास फिरकू न देणाऱ्या गायतोंडे यांच्यासोबत दिल्लीतल्या त्यांच्या स्टुडिओत एक नाही दोन नाही तब्बल दहा अकरा वर्ष रोज सायंकाळी मैफल जमवण्याचं भाग्य ज्या डेंगळे यांना लाभलं. त्यांनी लिहिलेला हा लेख मराठीतला महत्वाचं चित्रकला लेखन ठरलं आहे. त्या संदर्भात श्री. सतीश नाईक यांनी पुस्तिकेत विस्तारानं लिहिलं आहे तो भाग पुढे वाचा.

गायतोंडे यांच्या या सार्‍या शोधातला अत्यंत टर्निंग पॉइंट म्हणता येईल असा क्षण म्हणजे पुण्याचे आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे यांचा गायतोंडे यांच्यावरचा लेख. ग्रंथालीच्या रुचीच्या जानेवारी 1988च्या अंकात तो प्रसिद्ध झाला होता. चित्रकलेवर प्रसिद्ध झालेल्या मराठीतल्या आजवरच्या लेखांतला तो सर्वोत्कृष्ट लेख आहे असं माझं मत आहे. गायतोंडे यांचं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व आणि तितकीच गुंतागुंतीच्या पण पाहणार्‍यांच्या मनावर विलक्षण प्रभाव टाकणार्‍या त्यांच्या पेंटिंग्जवर डेंगळेंनी जे भाष्य केलं आहे ते मला खूपच प्रभावित करून गेलं. इतकं की इतरांनीदेखील ते वाचावं म्हणून त्याच्या किती तरी झेरॉक्स प्रती काढून मी तेव्हा विविध परिचितांना वाचायला दिल्या होत्या. आणि मी हे सारं जसजसं बोलून किंवा झेरॉक्स देऊन पसरवत गेलो तसतसे अनेक चित्रकार, लेखकदेखील निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, झेनचा शोध घेऊ लागले.

आपल्याला आवडलेले लेख इतर अन्य प्रकाशनांमध्ये आधी आलेले पाहिले की कुठल्याही संपादकाला सहसा ते आवडत नाही. तो लेख चिन्हमध्ये आला नाही याचं वैषम्य नंतर खूप काळ मलाही वाटत राहिलं होतं यात शंकाच नाही. खरं तर 1987 साली दिवाळीत चिन्हचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि त्यांनंतर तीनचार महिन्यांच्या कालावधीतच तो लेख रुचीमध्ये प्रसिद्ध झाला.


याचा अर्थ असा की जेव्हा चिन्हचं काम चालू होतं तेव्हा डेंगळे यांचा तो लेख त्यांच्यापाशी तयार तरी असणार किंवा चित्रकारावरचा लेख असल्यानं ग्रंथालीवाल्यांकडे पडून तरी असणार. आणि मी मात्र तेव्हा पुण्यातल्या एका इलस्ट्रेटरकडून एक वेगळाच लेख मिळवण्यासाठी प्रचंड खटपट करत होतो. त्या काळात मुंबई-पुणे प्रवास एवढा सोपा नव्हता. साताठ तास सहज लागायचे. फोन करायचा तर ट्रंक कॉल करावा लागायचा. आणि मी त्या लेखासाठी जागा तर ठेवून बसलो होतो. तो मिळवण्यासाठी मला काय काय आटापिटा करावा लागला होता! बापरे. अखेर तो नाही मिळाला तो नाहीच, पण तेव्हा मात्र जो काही मनस्ताप भोगावा लागला, त्याच्या एकेक भन्नाट थापांना बळी पडावं लागलं, तो सारा एका स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. कधी तरी त्याविषयी निवडकमालिकेत मी लिहिणारदेखील आहे.


हे सारं लिहिताना तेव्हा घडलेलं सारंच्या सारं आज आठवलं आणि तेव्हाचा सारा कालानुक्रम लक्षात येताच अस्वस्थ व्हायला झालं. आणि मनात उगाचच काही निरर्थक विचार डोकावले की उदाहरणार्थ पुण्याहून त्या इलस्ट्रेटरचा तो लेख मिळवण्यासाठी मी जो अथक प्रयत्न केला, त्याऐवजी कदाचित मी जर डेंगळे यांच्या लेखासाठी प्रयत्न केला असता तर ? तर कुणी सांगावं, गायतोंडे यांच्याशी माझा कधीच परिचय होऊ शकला असता, आणि मग 2001 साली जो गायतोंडेंच्या शोधात...हा अंक मला काढावा लागला त्याऐवजी तेव्हाच म्हणजे 1987-88 किंवा 89 सालीच गायतोंडे विशेषांकप्रसिद्ध करता आला असता, नाही का? आणि तसं जर झालं असतं तर गायतोंडे यांच्या सहवासात आलेल्या अनेक कलावंत मंडळींकडून गायतोंडे यांच्याविषयीचे अनेक लेख मला घेता आले असते. डी. जी. कुलकर्णी, बाबुराव सडवेलकर, हरकिशन लाल, बद्रीनारायण, बाळ छाबडा, वसंत पळशीकर, मोहन सामंत, भोंसुले मास्तर, आदी दवियरवाला, लक्ष्मण पै, माधव सातवळेकर, अशी भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रातली किती तरी मोठी नावं ऐन उमेदीच्या काळात गायतोंडे यांच्या सोबत जोडली गेली होती. त्यांनी उभी केलेली गायतोंडे यांची शब्दचित्रं गायतोंडे यांच्या समग्र शोधाला एक वेगळंच परिमाण देऊन गेली असती हे निश्चित. अर्थातच या सार्‍या जरतरच्या गोष्टी आहेत, तेव्हा ते घडलं नाही हेच त्यातलं अंतिम सत्य आहे.

पण आज जेव्हा जेव्हा वळून मी या सार्‍याकडे पाहतो तेव्हा मात्र हे असं खूप काही तरी करून घ्यायचं आपल्याकडून राहून गेलं याची जाणीव मात्र मला सतत अस्वस्थ करत राहते.

खरं तर नरेंद्र डेंगळे यांचा तो लेख रुचीमध्ये प्रसिद्ध झाल्याचंच मुळी मला खूप उशिरा कळलं. उशिरा म्हणजे तब्बल दीडदोन वर्षांनीदेखील कदाचित असेल. रद्दीच्या दुकानात मला तो अंक दिसला. रद्दीवाल्यानं मागितले तेवढे पैसे देऊन मी तो हस्तगत केला आणि तो वाचत वाचतच मी तरंगत घरी आलो. ते वर्ष बहुदा 1989 असावं. तोपर्यंत चिन्हच्या पहिल्या अंकानंतरच्या आर्थिक घडामोडींनी मी पुरता जेरीला आलो होतो, आणिचिन्हबंद करायची भाषा करू लागलो होतो. त्यामुळेच की काय, कदाचित 1988 आणि 1989 च्या अंकांसाठी मी गायतोंडे यांचा विचार करू धजावलो नसणार. कारण गायतोंडे यांच्यावर स्टोरी करायची तर मला वारंवार दिल्ली गाठावी लागणार होती, आणि तेव्हा तरी मला ते आर्थिक दृष्ट्या परवडणारं नव्हतं. पण समजा, तेव्हा मी जर गायतोंडे विशेषांक काढू शकलो असतो, तर नंतर काय झालं असतं? असा एक प्रश्न मला तेव्हापास्नं सतत उगाचच सतावत राहिला आहे. आता अलीकडेदेखील अनेक वेळा हा प्रश्न अधूनमधून उचल खात असतोच. तर काय झालं असतं?’ खरं तर अशा जरतरच्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो, पण म्हणून ते पडायचे काही थांबत नाहीत हेच खरं.

डेंगळे यांचा लेख मला इतका आवडला होता की तो चिन्हशी निगडित असायलाच हवा असं मला सारखं वाटत राहिलं होतं. 2001 साली जेव्हा चिन्हपुन्हा सुरू केलं तेव्हा गायतोंडे यांच्यावरच्या पहिल्या पुरवणीत, तो मराठीतच आधी इतरत्र प्रसिद्ध झाला असल्यामुळं पुन्हा प्रसिद्ध करणं मला अप्रशस्त वाटलं. नंतर 2006 सालच्यागायतोंडेंच्या शोधात...विशेषांकातदेखील, त्याची मुद्रणप्रत तयार असूनही, तो पुन्हा प्रसिद्ध करणं मला योग्य वाटलं नाही. 2007 साली मात्र गायतोंडे यांच्यावर एक वेगळीच पुरवणी प्रसिद्ध करण्याचा निर्णय मी घेतला आणि त्या पुरवणीत गायतोंडे यांच्यावर आधी इतरत्र प्रसिद्ध झालेले लेख आणि त्यांच्या मुलाखती संकलित करून मी प्रसिद्ध केल्या. डेंगळे यांचा लेख मी त्या पुरवणीत प्रसिद्ध केला. पण तो लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करणं मला अयोग्य वाटलं, म्हणून मी डेंगळे यांच्याकडून त्या लेखाचा उत्तरार्ध लिहून घेतला.

डेंगळे यांचा मूळ लेख 1988 साली - म्हणजे गायतोंडे यांच्या मृत्यूच्या 13 वर्षं आधी - प्रसिद्ध झाला होता. म्हणून मग मी त्यांना उत्तरार्धात 1988 ते 2001 हा कालखंड लिहिण्याची विनंती केली. डेंगळे यांनी ती विनंती मान्य करून अगदी मनापासून लेख लिहून दिला. तोही गाजला. त्याच अंकात गायतोंडे यांच्याइलस्ट्रेटेड विकली’, ‘फ्री प्रेस जर्नलआणि बुलेटीनयांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतींचे अनुवाद मी प्रसिद्ध केले होते. पण या सर्वांवर कळस चढवला तो स्वतः गायतोंडे यांनी लिहिलेल्या एका लेखानंच. माझे चित्रकार स्नेही रंजन जोशी यांनी गायतोंडे यांचा तो लेख मला मिळवून दिला. त्यांचे सासरे वासुदेव सडेकर यांच्या संग्रहात त्यांना तो सापडला. 1961 साली गायतोंडे यांनी चित्रकार रघुवीर मुळगावकर संपादित रत्नदीपच्या दिवाळी अंकात तो लिहिला होता; त्यात त्यांनी नवकलेच्या संदर्भात आपली मतं व्यक्त केली होती. आज इंग्रजीमधून गायतोंडे यांच्यावर खूप लेखन होत आहे आणि हे प्रमाण ग्युगेनहाईमच्या प्रदर्शनापर्यंत सतत वाढतच जाणार आहे. लिहिणार्‍या या सार्‍याच मंडळींना गायतोंडे यांच्या त्या लेखाचा इंग्रजी अनुवाद हवा असतो. आणि मीही तो आनंदानं देत असतो.

नरेंद्र डेंगळे यांच्या त्या लेखामुळे गायतोंडे यांच्या संदर्भातली सारी कोंडी खरं तर फुटली होती, पण चिन्हबंद करण्याचा निर्णय घेऊन बसल्यानं हात चोळत बसण्याखेरीज मला दुसरं काही एक करता येत नव्हतं. चिन्हपासून दूर राहण्याचा चिक्कार प्रयत्न मी करत होतो. पण का कुणास ठाऊक, काही ना काही असं काही तरी घडून जायचं आणि मग मी त्यात आपसूक ओढला जायचो. एकच आठवण सांगतो. चित्रकलेच्या क्षेत्रातल्या ज्या दोघांना मी अधिक मानतो त्यांतल्या प्रभाकर बरवे यांचं निधन 1995 साली झालं. त्यांचा अकाली मृत्यू मला अतिशय अस्वस्थ करून गेला... इतका की त्यांच्या अंत्यसंस्कारांहून परतल्यावर रात्री अभावितपणे मीचिन्हच्या बरवे विशेषांकाचा आराखडादेखील माझ्या नोंदवहीत उतरवून टाकला, आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की, अरे! चिन्हतर आता बंद आहे

घरापायी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांमुळे चिन्हपुन्हा सुरू करणं आता सोपं निश्चितच राहिलेलं नव्हतं. त्यामुळे शांत बसणं एवढाच पर्याय आता माझ्यापाशी उपलब्ध होता. या काळात लेखन, वाचन, मनन, चिंतन अव्याहत चालूच होतं आणि पूर्ण वेळ पत्रकारितेत असल्यानं स्वतःला संपूर्णत: अपडेट ठेवणं हा माझ्या जगण्याचाच एक भाग झाला होता.

सतीश नाईक
संपादक, चिन्ह



वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.




No comments:

Post a Comment