Wednesday, February 18, 2015

नात्यापलीकडलं नातं
एक धागा चित्रकार मनोहर म्हात्रे यांच्याकडे जातो (जे गायतोंडे यांचे आधी विद्यार्थी आणि मग मित्र झाले, जे नंतर माझेही घनिष्ठ स्नेही झाले), एक धागा त्यांच्याविषयीच्या आख्यायिकांकडे जातो (ज्या मला प्रचंड भावल्या), तर उरलेले अन्य सारेच्या सारे धागे त्यांच्या चित्रांकडे जातात, जे मला गायतोंडे या नावाशी कायमचंच जखडून ठेवायला भाग पाडतात, नात्यापलीकडल्या या असल्या उफराट्या नात्यात अडकवून टाकतात आणि नको नको ती जीवघेणी धाडसं करायला भाग पाडतात !गायतोंडे : न संपणाऱ्या शोधाची कहाणीया पुस्तिकेतल्या सतीश नाईक यांच्या प्रदीर्घ लेखातील निवडक तिसरा भाग.


१९९६ साल उजाडलं होतं. सुनीलची फिल्म तयार झाली होती. महत्त्वाच्या परदेशी फिल्म फेस्टिवल्समध्ये ती गाजली होती. पण भारतात मात्र ती अद्याप कोणी पहिली नव्हती. आणि तिचा एक तरी शो मुंबईत व्हावा असं मला मनापासून वाटत होतं. मी ठरवलं, या कामी आपणच पुढाकार घ्यायचा. त्या निमित्तानं गायतोंडे यांना मुंबईत बोलावता आलं तर? त्यांची भेटदेखील होऊ शकेल, आणि एक चांगला कार्यक्रमदेखील होऊ शकेल. पण आता इतक्या दिवसांनी त्यांना मुंबईत बोलावलं तर येतील का ते ? मग मी ठरवलं की प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. भले ते होईल न होईल. तिथूनच मग मी सुरवात करायचं ठरवलं. एनसीपीएत तेव्हा नुकतंच मोहिलेपारिख सेंटर सुरू झालं होतं. त्याच्या संस्थापक शैला पारीख यांचामाझा चांगला परिचय होता. त्यांच्या कानावर मी या फिल्मविषयी घातलं. तर त्या म्हणाल्या, कल्पना चांगली आहे, पण तू शुभदा पटवर्धनशी बोल. ती हे सारं काम पाहते. शुभदाशी माझी चांगली मैत्री असल्यानं लगेचच मी तिच्या कानांवर हे सारं घातलं, तर तिलाही ती कल्पना इतकी आवडली की तिनं तिच्या पद्धतीनं भराभर सूत्रं हलवून साराच्या सारा कार्यक्रम निश्चित करूनदेखील टाकला.

एके दिवशी मग त्या स्क्रीनिंगला गायतोंडे यांनाच बोलवायची कल्पना मी मांडली. सुनीलला ती कल्पना आवडली. शुभदानं तर ती उचलूनच धरली आणि मग तिनंच सारा पुढाकार घेऊन अगदी जंगी कार्यक्रम आखला. सर्व प्राथमिक तयारी तिनं तिच्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित केली. ते कसे येणार? विमानाची तिकिटं? विमानतळावरून नरिमन पॉइंटपर्यंत कसं आणि कुठल्या वाहनांनी यायचं? कुठं उतरायचं? कुठं रहायचं? त्यांना चालायचा त्रास झाला तर व्हील चेअरची व्यवस्था कुठून करायची? जर काही अडचण आलीच तर डॉक्टरला कुठून बोलवायचं? प्रत्यक्ष स्क्रीनिंगच्या वेळी काय काय कसं कसं होईल वगैरे... सर्वच तिनं व्यवस्थितपणे ठरवून ठेवलं. बहुदा स्क्रीनिंगच्या अगदी आदल्या दिवशी तिनं जेव्हा दिल्लीला सारी तयारी झाली आहे, तुम्ही आता निघू शकता,’ असं कळवण्यासाठी फोन केला, तेव्हा तिला कळलं की गायतोंडे यांची तब्येत बिघडली आहे, ते येऊ शकत नाहीत.तेव्हा नक्की काय घडलं होतं ते नंतर कधीच कळलं नाही, कळून घेण्यातही तसा काही अर्थ नव्हताच, कारण त्यामुळे अनाठायी मनस्ताप मात्र नक्कीच वाढला असता. पण त्या फिल्मचं ते स्क्रीनिंग मात्र भारतातलं पहिलं जाहीर स्क्रीनिंग ठरलं. त्यानंतर तब्बल 18 वर्षं त्या फिल्मचं भारतात कुठंच स्क्रीनिंग झालं नाही. परवा 18 वर्षांनी मीच त्या फिल्मचं स्क्रीनिंग ठाण्यात आयोजित केलं होतं. मात्र आज मागे वळून पाहतो तेव्हा वाटत राहतं की, तेव्हा शुभदानं जर त्यात रस घेतला नसता तर ते स्क्रीनिंगदेखील झालं असतं की नाही कुणास ठाऊक.

नंतर मात्र गायतोंडे कधीच मुंबईत येऊच शकले नाहीत. आणि नंतरच्या दोनतीन वर्षांत तर ते गेलेच. राहून राहून एक मनात येतं की गायतोंडे त्या भयंकर अपघातानंतर जवळ जवळ तब्बल 10-11 वर्षं मुंबईत येऊ शकले नव्हते. ते आले असते तर त्यांच्या आवडत्या मुंबईचं शेवटचं दर्शन नक्कीच घेऊ शकले असते. अर्थात असं मला वाटतं, पण गायतोंडे आपल्या भोवतालचे पाश अत्यंत निर्दयपणे कापून काढत काढत जे आयुष्य जगले ते पहाता त्यांच्या मनात असे विचार कधी आलेही नसतील कदाचित. पण त्यामुळे गायतोंडे यांना भेटायची माझी इच्छाही तशीच अर्धवट राहिली हे मात्र खरं. हे सारं इतक्या विस्तारानं सांगायचं अशासाठी की गायतोंडे यांच्याशी बोलणं राहू द्या, त्यांना मी दुरूनदेखील मी कधी पाहू शकलेलो नाही. त्यांना मी पाहिलं ते त्यांच्या चित्रांमधूनच, किंवा त्यांच्यावरच्या लेखांमधून किंवा त्यांच्या मोजक्याच पण अत्यंत सकस अशा मुलाखतींमधून किंवा अगदी झालंच मनोहर म्हात्रे आणि ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या नजरेमधून किंवा झालंच तर सुनीलच्या फिल्ममधून. पण मग आजूबाजूच्या माणसांना होताहोइस्तो टाळू पाहणार्‍या माझ्यात आणि त्यांच्यात हे असं नातं, तेही नात्यापलीकडलं नातं, कसं काय निर्माण झालं असावं? हा प्रश्न कधी कधी मला उगीचच सतावत राहतो.

त्या प्रश्नांच्या उत्तरालाही अनेक पदर असावेत. त्या पदराचा एक धागा जे जे स्कूल ऑफ आर्टकडे जातो (जिथं ते शिकले आणि नंतर मीही), एक धागा गोव्याकडे जातो (जे त्यांचं मूळ गाव होतं आणि त्याच्यापासून काही अंतरावर माझं गाव होतं किंवा आहे), एक धागा गिरगावात जातो (जिथं त्यांनी आयुष्यातील तब्बल 40 वर्षं काढली, तिथूनच काही अंतरावर माझं आजोळ होतं, जिथं माझी सांस्कृतिक जडणघडण झाली), एक धागा चित्रकार पॉल क्लीकडे जातो (जो त्यांचा आवडता चित्रकार होता, जो माझाही आवडता चित्रकार आहे), एक धागा प्रार्थना समाजसमोरच्या कुलकर्ण्याच्या बटाटा भजी आणि मिसळीकडे जातो (जी त्यांनाही भयंकर आवडायची आणि नंतर मलाही), एक धागा लेखक-कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्याकडे जातो (जे गायतोंडे यांचे आधी आणि नंतर माझेही स्नेही होते), एक धागा आर्टिस्ट सेन्टर या चित्रकारांच्या (शापित) संस्थेकडे जातो, जिथं ते प्रारंभीच्या काळात कार्यरत होते (आणि चित्रकार आरांच्या निधनानंतर बराच काळ मी त्या संस्थेचा सहसचिव होतो), एक धागा चित्रकार मनोहर म्हात्रे यांच्याकडे जातो (जे गायतोंडे यांचे आधी विद्यार्थी आणि मग मित्र झाले, जे नंतर माझेही घनिष्ठ स्नेही झाले), एक धागा त्यांच्याविषयीच्या आख्यायिकांकडे जातो (ज्या मला प्रचंड भावल्या), तर उरलेले अन्य सारेच्या सारे धागे त्यांच्या चित्रांकडे जातात, जे मला गायतोंडे या नावाशी कायमचंच जखडून ठेवायला भाग पाडतात, नात्यापलीकडल्या या असल्या उफराट्या नात्यात अडकवून टाकतात आणि नको नको ती जीवघेणी धाडसं करायला भाग पाडतात !

कधी कधी मलाच असा एक प्रश्न वारंवार सतावत रहातो की, या माणसानं असं काय चेटूक आपल्यावर केलं की ज्याच्यामुळे आपण ही अशी 20 वर्षांच्या नोकरीतून मिळालेली शिलकीची पुंजी खर्च करून, त्याच्यावरची पुरवणी प्रसिद्ध करण्यासाठी, ‘चिन्हचं पुनरुज्जीवन करायला प्रवृत्त झालो ? माझ्यासारख्या एका अत्यंत छोट्या माणसाला वीस वर्षांच्या नोकरीतून मिळालेल्या (नोकरीही कसली ? तर पत्रकारितेतली, त्यातही ती मराठी पत्रकारितेतली... म्हणजे आणखीच अवघड !) अल्प-स्वल्प गंगाजळीतून त्यांच्यावरची विशेष पुरवणी, तीही कृष्णधवल आणि वर्तमानपत्रांच्या कागदांवर, काढण्याची वेळ यावी याला माझी दूरदृष्टी म्हणावी की या क्षेत्रातल्या उरलेल्या समस्त बड्या बड्या मंडळींचा कर्मदरिद्रीपणा? हे विधान वर वर पाहता कुणालाही आत्मप्रौढीचं वाटेल, पण या मुलखावेगळ्या (आणि मीच ओढवून घेतलेल्या) धाडसापायी मला आणि माझ्या कुटुंबियांना कुठल्या कुठल्या प्रसंगांतून जावं लागलं हे ज्यांना ज्यांना ठाऊक आहे त्यांना तसं वाटणार नाही याची मला पक्की खात्री आहे.


सतीश नाईक
संपादक, चिन्ह 


वि. सू.  ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.






No comments:

Post a Comment