Monday, February 9, 2015


'चिन्ह'चा महत्वाकांक्षी 'गायतोंडे' ग्रंथ अगदी लवकरच प्रसिध्द होत आहे. २००७ पासून या ग्रंथाचं काम चालू होतं. गेली तीन वर्ष तर या ग्रंथाची प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रिया सुरु होती. अनंत अडचणींवर मात करून आता हा ग्रंथ पूर्ण झाला आहे. बंगलोरमध्ये त्याची छपाई सुरु आहे. इमोटे + या अत्यंत महागड्या अशा कोरीअन कागदावर छापला जाणारा हा पहिलाच मराठी ग्रंथ ठरावा. गायतोंडे यांची ६६ चित्रं आणि ७५ पेक्षा अधिक दुर्मिळ प्रकाशचित्रं या ग्रंथात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ज्यात ते जेजेमध्ये शिकत असतांना केलेल्या दुर्मिळ चित्रांचादेखील समावेश आहे. ही चित्रं किंवा प्रकाशचित्रं मिळवतांना खूप अडचणी आल्या किंबहुना हा ग्रंथच प्रसिध्द करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. नको नको त्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले. हे सारे अनुभव या ग्रंथाचे संपादक सतीश नाईक यांनी या ग्रंथाच्या संपदकीयात लिहायचे ठरवले. त्या संपादकीयासाठी या ग्रंथाची पाने निश्चित करण्यात आली होती. पण हे लिखाण लिहिता लिहिता सुमारे ३० पाने इतके वाढत गेले. त्या लेखनाच्या रोख-ठोक स्वरूपामुळे सदर लेख ग्रंथाच्या नियोजनात बसेना. म्हणून मग त्याची वेगळी पुस्तिका काढायचा निर्णय झाला. आता २१६ पानांच्या मूळ 'गायतोंडे' ग्रंथासोबत २४+४ पानांची ही Making Of Gaitonde पुस्तिका देखील दिली जाणार आहे. हा मराठी ग्रंथांच्या क्षेत्रातला अगदी नवा प्रयोग आहे. आजपासून या पुस्तिकेतील बराचसा भाग हा ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत दररोज या ब्लॉगवर क्रमशः प्रसिध्द करणार आहोत.


न संपणार्‍या शोधाची कहाणी...

जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मी प्रवेश केला 1973-74 साली. तोपर्यंत चित्रकार वासुदेव संतू गायतोंडे यांनी मुंबई सोडली होती. साहजिकच त्यांचीमाझी भेट कधीच झाली नाही. त्यांच्याशी फोनवरूनदेखील मी कधी बोललो नाही. इतकंच काय, त्यांना साधं दुरूनदेखील कधी मी पाहिलं नाही. अंगभूत न्यूनगंडामुळे म्हणा किंवा माझ्यातील संवादशीलतेच्या अभावामुळे म्हणा अथवा फार तरुण वयात मराठी प्रायोगिक नाट्यसृष्टीत फारच मोठ्या कलावंतांत वावरायला मिळाल्यामुळे कलावंताच्या जास्त जवळ जाऊ नये, त्याला त्याच्या कलेतूनच पाहावं हे शिकण्याची संधी मिळाल्यामुळे म्हणा, पत्रकारितेमुळे अनेक मोठमोठ्या कलावंतांच्या सहवासाचा लाभ मिळूनदेखील मी कुणाच्याच फार जवळ जाऊ शकलो नाही. गायतोंडेदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत. जेजेच्या भिंतीवर त्यांचं एक पेंटिंग मी पाहिलं, आणि त्यांना फॉलो करू लागलो. त्या अनोख्या प्रवासाला आता तब्बल 40 वर्षं पूर्ण झाली आहेत. तो सुरू झाला तेव्हा मी एकटा होतो. आता सारं जगच त्यात सहभागी झालंय. या सार्‍या प्रवासाची नोंद या ग्रंथात असायला हवी होती असं मला मनापासून वाटलं, म्हणून मी जे सारं लिहीत गेलो, तेच हे प्रदीर्घ लेखन.
सतीश नाईक


ऑगस्ट 10, 2001. मुंबईत प्रचंड पाऊस कोसळतोय.
सारं वातावरण ओलं ओलं आणि उदासवाणं.
अशातच अचानक फोनची बेल कर्कश्श वाजते.
गायतोंडे गेले...
पलीकडून चित्रकार मनोहर म्हात्रे फोनवर सांगत असतात.
पावसाचा जोर आता अधिकच वाढलाय.
इतका की फोनवरचं काहीच ऐकू येईनासं झालं आहे.

बातमी कधी तरी येणारच ते ठाऊकचं होतं, पण ही अशी अवचित येईल असं मात्र कधी वाटलं नव्हतं. एक प्रकारची सुन्नता सार्‍या मनभर पसरत जाते. सारं घर व्यापते. आजुबाजूच्या सार्‍याच वातावरणात पसरत जाते. रात्रभर त्यांची चित्रं आठवत राहतात. त्यांच्या मुलाखतींतली चक्रावून टाकणारी विधानं, अवतरणं आठवत राहतात. सुनील काळदातेच्या फिल्ममधली दृश्यं आठवत राहतात. ज्ञानेश्वर नाडकर्णी, मनोहर म्हात्रे यांच्यासारख्या स्नेह्यांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी एकापाठोपाठ एक उलगडत जातात...

सकाळी उठून गायतोंडे यांच्या बातमीसाठी मुंबईतून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रं वाचावी म्हटलं, तर टाइम्समध्ये फक्त चार ओळींची बातमी, अन्य वृत्तपत्रांत तर तेही नाही. अपवाद फक्त मटाचा. भारतीय अमूर्त चित्रकलेचा पायाच ज्यांनी रचला त्या गायतोंडे यांच्यासारख्या जिनियस कलावंताची मृत्यूनंतरदेखील माध्यमांनी केलेली उपेक्षा पाहून मन व्यथित तर झालंच, पण अगदी सकाळी सकाळी देखील राग भयंकर अनावर झाला.

नंतर त्या एका क्षणी नक्की काय झालं कुणास ठाऊक, अगदी

आज इतक्या दिवसांनंतरदेखील मला ते नीटसं उमगलेलं नाहीये...मी थेट निर्णय घेतला की, बस! आता काहीही होवो, आपण चिन्हपुन्हा सुरू करायचंच. ठरलं. एकदम पक्कं. लगेचच ते सारं पत्नीच्या कानावर घातलं. तिनं अनुमती दिली. मग बँकेत जाऊन खात्यावर पुरेसे पैसे आहेत ना याची खात्री करून घेतली. नोकरी सोडल्यानंतर मिळणारे कसले कसले पैसे खात्यावर जमा झालेले होते. अंक काढता येईल एवढे ते निश्चित होते. मागचापुढचा विचार न करता मी थेट त्याच दिवशीचिन्हच्या पुनर्प्रकाशनाची व त्यातल्या गायतोंडे पुरवणीची घोषणा देखील करून टाकली. गायतोंडे यांच्याविषयी आतापर्यंत विविध नियतकालिकांत जे काही थोडंबहुत प्रसिद्ध झालं होतं, ते सारंच्या सारं माझ्या संग्रहात होतं. त्यांची प्रकाशचित्रं, त्यांची रेखाचित्रं, कुणी कुणी कधी काळी घेतलेल्या त्यांच्या मुलाखती, कॅटलॉग्ज, त्यांच्याविषयीचे लेख, असं बरंच बरंच काही त्यात होतं. त्यातलं मला हवं होतं ते सारं मी संदर्भासाठी निवडलं आणि कामाला सुरुवातदेखील केली.

+++

तब्बल एक तप म्हणजे उणीपुरी 12 वर्षं चिन्हचं प्रकाशन बंद होतं, त्यातच पूर्ण वेळ पत्रकारितादेखील वर्षभरापूर्वी सोडलेली. पण पत्रकारिता किंवा संपादन हे जणू रक्तातच भिनलं असल्यानं मी डगमगलो मात्र नाही, कारण 1989 ते 2000 सालापर्यंत जरी चिन्हचा अंक बंद होता, तरी माझ्या मनातल्या मनात मात्र तो तयार होत असे, इतकंच नाही तर तो छपाईलाही जात असे, त्यानंतर तो प्रचंड खपलाही जात असे... चिन्हच्या न खपलेल्या जुन्या अंकांच्या गठ्ठ्यांवर गाद्या टाकून केलेल्या बेडवर झोपून किंवा रेलून मी ही सारी दिवास्वप्नं पाहत असे. त्या दिवास्वप्नांचा उत्तरार्ध जरी तेव्हा खरा होत नसला तरी पूर्वार्ध म्हणजे अंकाचं नियोजन वगैरे मात्र मी माझ्या डायरीत अगदी खरंखुरं नोंदवून ठेवत असे. साहजिकच अंकाचे विषय नक्की करताना मला काहीच अडचण आली नाही, अगदी सराईतपणे मी ते करीत गेलो. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक, बर्‍याच उशिरा म्हणजे 10 ऑगस्टनंतर काम सुरू होऊनही ऐन दिवाळीत तो अंक प्रसिद्ध झालाच.

गायतोंडे यांच्यावरची 23 पानांची छोटीशी पुरवणी त्यात होती. नितीन दादरावालांचा एक आणि अन्य दोन लेख, प्रीतीश नंदी, प्रमोद गणपत्ये यांनी घेतलेल्या गायतोंडे यांच्या मुलाखती, निसर्गदत्त महाराज आणि गायतोंडे यांचा संवाद, असं साहित्य त्यात होतं. तो संपूर्ण अंकच इतका छान जमून आला होता की मला ओळखणारे अनेक वाचकदेखील आधीच्या दहा वर्षांचे अंक असतील तर द्या ना म्हणून मागे लागले. जणू काही चिन्हकधी बंद पडलं नव्हतंच. हा हा म्हणता म्हणता अगदी दहापंधरा दिवसांतच तो अंक संपलासुद्धा. पण जाहिरातींचं काही खरं नसल्यानं तो अंकदेखील अर्थातच आतबट्ट्याचाच ठरला हे वेगळं सांगायला नकोच.

गायतोंडे ऑगस्ट महिन्यात गेले होते, साहजिकच पहिल्या अंकातल्या त्या पुरवणीच्या तयारीला वेळ कमीच पडला होता. ती कसर मग त्यांच्या चित्रांनी लिलावात कोट्यवधींची उड्डाणे केल्यावर 2006 साली शंभर एक पानांचा गायतोंडेंच्या शोधात...विशेषांक काढून मी भरून काढली. हे कमी पडलं म्हणून की काय, मग 2007 साली आणखी एक 25-30 पानांची पुरवणी असलेला अंक काढला. त्यांच्यावरचे सुटे सुटे लेख अधेमधे तर छापतच होतो. या सर्वच लेखांनी मराठी वाचकांतच नाही तर अमराठी कला व्यावसायिक तसेच कलारसिकांमध्येही गायतोंडे यांच्याविषयीचं औत्सुक्य कमालीचं वाढवलं. अनेकांनी त्यातले लेख इंग्रजीत अनुवाद करून घेऊन वाचल्याचं नंतर कुणी कुणी सांगितल्याचं आता आठवतंय.

गायतोंडेंच्या शोधात...च्या प्रास्ताविकात मी लिहिलं होतं : आणिबाणीचे दिवस असावेत बहुधा. नुकताच जेजेमध्ये प्रवेश घेतलेला. जेजेच्या त्या विशाल, भव्य वास्तूत प्रवेश केल्यावर उजव्या जिन्यानं वर जाताना रोजच हमखास पाय थबकायचे, आणि समोरच्या भिंतीवरल्या एका सुंदर पोर्ट्रेटटवर नजर खिळून रहायची. सांगोवांगीतून पुढं असं कळलं की पोर्ट्रेटमधील ती व्यक्ती म्हणजे जेजेचे ब्रिटिशकालीन सर्वेसर्वा संचालक कॅ. ग्लॅडस्टन सॉलोमन, आणि ते चितारणारा कलावंत म्हणजे आपल्याच जेजेचे एक शिक्षक भोंसुले मास्तर. पुढं धुरंधरांचं कलामंदिरातील 41 वर्षेआणि प्रल्हाद अनंत धोंडांचं रापणवाचलं आणि आधी मनातल्या मनात आणि कालांतरानं तर प्रत्यक्षातही त्या चित्रासमोरून जाताना आपोआप हात जोडले जाऊ लागले. याच सुंदर पोर्ट्रेटच्या शेजारी एक अमूर्त शैलीतलं, काहीशा ऑलिव्ह ग्रीन रंगातलं पेंटिंग लागलेलं असायचं. जातायेता सतत तेही लक्ष वेधून घ्यायचं. एकदा खूपच कुतूहल जागृत झालं म्हणून चित्राच्या अगदी जवळ जाऊन निरखून पाहिलं, तर चित्रावरची सही चक्क देवनागरीत होती. गा य तों डे’... हीच गायतोंडे यांची पहिली ओळख.’ (तेच चित्र प्रारंभी प्रसिध्द केलं आहे.)

गायतोंडेही त्यांची सहीदेखील मला तेव्हा भयंकर आवडून गेली होती. इंग्रजांचा आपल्यावर इतका प्रभाव असताना हा माणूस किती आत्मविश्वासानं देवनागरीत सही करतोय, असा विचार माझ्यात थेट रुजूनच गेला. तेव्हापासून मग मीसुद्धा मराठी किंवा देवनागरीमधून सही करू लागलो. आता कळत-नकळत मी त्यांना फॉलो करू लागलो होतो. वाचन तेव्हा तरी खूपच होतं, त्याला आता दिशा मिळाली होती. गायतोंडे यांच्याविषयी जे काही प्रसिद्ध होईल ते ते मिळवून वाचायचं आणि आपल्या संग्रहात ठेवायचं, हा सिलसिला तेव्हाच सुरू झाला असावा.

मराठी वृत्तपत्रांत तेव्हा चित्रकलेविषयी तसं फार काही प्रसिद्ध होत नव्हतं. (आजही त्या परिस्थितीत फारसा बदल झाला आहे असं म्हणता येणार नाही.) साहजिकच मी माझा मोर्चा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागाकडे वळवला.मौजआणि सत्यकथेच्या जुन्या अंकांत मला त्यांच्याविषयी थोडंबहुत वाचायला मिळालं. जेजेच्या लायब्ररीत ललित कला कंन्टेम्परीच्या अंकात त्यांच्याविषयीचा एक लेख वाचायला मिळाला. पु शि रेगे संपादित छंदच्या अंकात गायतोंडे यांचं एक रेखाटन घरातल्या माझ्या ग्रंथसंग्रहातच मला मिळालं. ते पाहिल्यावर मला तेव्हा कोण आनंद झाला होता! हे सारं इतक्या तपशिलानं सांगतो आहे, कारण तेव्हा प्रत्येक गोष्ट खूप कष्टानं मिळवावी लागत असे. आज संगणकाचं बटन दाबल्यावर सारं कसं भसाभस बाहेर येतं, तसं तेव्हा काही एक नव्हतं. खरं तर तोपर्यंत संगणकच आपल्या इकडे आले नव्हते. साहजिकच सतत जागरूक राहून सारं ज्ञान मिळवावं लागायचं. पण तेव्हा जो गायतोंडे यांचा ट्रेक ठेवायचा सिलसिला सुरू झाला तो थेट आजतागायत तसाच सुरू आहे. आज माझ्या संग्रहात गायतोंडे यांच्या संदर्भातली तब्बल दीड-दोनशे कात्रणं कदाचित जास्त देखील असतील सहज जमली असतील.

गायतोंडे यांच्यामुळेच कधी तरी पॉल क्लीची ओळख झाली. मग पॉल क्ली पहायचा-वाचायचा नाद लागला. मग जॉन मिरोपर्यंत पोहोचलो. गायतोंडे यांची मिळतील ती प्रदर्शनं न चुकता पाहिली. त्यांच्याविषयीच्या ज्ञानेश्वर नाडकर्णी, एस व्ही वासुदेव, आय एस क्लर्क यांसारख्या समीक्षकांनी लिहिलेल्या लेखांची किंवा मुलाखतींची अक्षरश: पारायणं झाली. पुढं नाडकर्णी यांच्यासोबत झालेल्या मैत्रीमुळे तर गायतोंडे यांच्याविषयी बर्‍यापैकी फर्स्ट हॅण्ड माहितीही मला मिळू लागली होती. तोपर्यंत चित्रकार मनोहर म्हात्रे मुंबईत येऊन दाखल झाले होते. त्यांना गायतोंडे जेजेत वर्षभर शिकवायला होते हे मला त्यांच्याकडून कळल्यावर त्यांचं-माझं तर जमूनच गेलं. तेव्हापासून आम्ही जे जहांगीरवर नेमानं भेटतोय त्याला आता तब्बल 30-35 वर्षं उलटलीयेत. नाडकर्णी आणि म्हात्रे यांच्याकडून गायतोंडे यांचे आख्यायिकांत रूपांतरित झालेले एकेक किस्से ऐकताना वेळ कसा निघून जायचा ते कळायचंदेखील नाही.

(
क्रमशः)

३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.
 





No comments:

Post a Comment