Saturday, May 21, 2016

फायनली…!
' चिन्ह 'चं ' गायतोंडे ' मिशन अखेर पूर्ण झालं .
प्रवास सहज सोपा नव्हता .
प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला , झगडावं लागलं , 
साहजिकच प्रत्येक बाबतीतच विलंब सहन करावा लागला .
पण ' चिन्ह ' वरच्या वाचकांच्या आत्यंतिक विश्वासामुळे
साऱ्यातूनच तरून गेलो .
उतलो नाही , मातलो नाही .
घेतला वसा टाकला नाही .
आता कुणीही काहीही करो
इतिहास कसाही का लिहो .
' चिन्ह ' आणि ' गायतोंडे ' हे समीकरण कुणालाच
कधीच बदलता येणार नाही हे निश्चित .
ग्रंथ हाती पडताच प्रत्येक वाचकाचं , कलारसिकाचं हेच मत होईल
याची आम्हाला खात्री आहे .
***
प्रती हाती पडताच ' गायतोंडे ' ग्रंथाच्या प्रतींचं वितरण सुरू झालंदेखील .
पहिली प्रत गेली ती थेट अमेरिकेलाच .
नोंदणी झालेल्या सर्वच प्रतींचं वितरण सुरू झालं आहे
.

Friday, February 5, 2016

' गायतोंडे ' ग्रंथ आहे तरी कसा ?' गायतोंडे ' ग्रंथ म्हणजे नक्की काय आहे ? चित्रकलेवरचं पुस्तक का चित्रकाराचं चरित्र ? असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो . मला वाटतं की या दोन्ही चष्म्यातून या ग्रंथाकडे पाहिलं जाऊ नये . कारण त्यात पानोपानी चित्र आहेत पण म्हणून तो चित्रकलेवरचा ग्रंथ आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यात चित्रकाराच्या म्हणजे इथं गायतोंडे यांच्या सत्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात घडलेले सारेच महत्त्वाचे प्रसंग नोंदले गेले आहेत, पण म्हणून त्याला काही चरित्र ग्रंथ म्हणता येणार नाही. 

हा एक अभिनव प्रयोग आहे . पण प्रयोग असा शब्द वापरला म्हणून कुणी दचकून जाण्याची गरज नाही . 

पेंटिंगखेरीज स्वतःचा कुठलाच आगापिछा न ठेवलेल्या अगदी आपल्या आसपासही कुणालाच कधी फिरकू न देणाऱ्या चित्रकार गायतोंडे यांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर ज्या काही मोजक्या व्यक्ती आल्या अन नंतर दूरही निघून गेल्या अशा साऱ्यांनी आपल्याला भावलेले गायतोंडे कसे होते हे  सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या खटाटोपातून 'गायतोंडे ' यांच्या ज्या कॅलिडोस्कोपिक प्रतिमा उभ्या राहिल्या त्याचं दर्शन म्हणजे हा ग्रंथ . हा ग्रंथ म्हणजे  रूढार्थानं चरित्र नव्हे असं जे मी म्हणतो ते म्हणूनच . 
त्यांच्या आयुष्यातल्या  सर्वच घटना या ग्रंथात गुंफण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण त्यात सर्वसाधारणपणे  चरित्र ग्रंथात असतो तसा बालपणापासून ते मोठे  होण्याचा काळ क्रमशः चित्रित करण्याचं मात्र टाळलं आहे . त्यामुळे चरित्रांचं वाचन करताना सर्वसाधारणपणे वाचक बालपणीच्या  तपशीलाची पानं  वगळत हटकून पुढे जातो तसं इथं होण्याची शक्यता नाही . 

' गायतोंडे ' यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या बहिणीच्या प्रदीर्घ लेखानं या ग्रंथाची सुरूवात होते . तो वाचत असतानाच वाचक गायतोंडे यांच्या लोकविलक्षण जगण्यानं आणि सर्वसाधारण माणसं ज्याला विक्षिप्त असं म्हणतात तशा काहीशा वागण्यानं अक्षरशः दबकून जातो .बापरे , एखादा कलावंत असा जगू शकतो? वागू शकतो? अशा प्रश्नांनी तो अस्वस्थ होतो . 

अन मग जसजसा वाचक या ग्रंथात पुढं पुढं जात राहतो तसतशा गायतोंडे यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीदेखील वाचकाला भेटत राहतात आणि  आपआपल्या जाणीव नेणीवेतून  आपल्याला स्वतःला भावलेले गायतोंडे शब्दबद्ध करीत राहतात . 

सर्वसाधारणपणे चरित्रात असतो तसा चरित्र लेखक नावाचा प्राणी या संपूर्ण ग्रंथात अनुपस्थित असल्याने आणि गायतोंडे यांचे आप्त , मित्र , स्नेही हे स्वतःच गायतोंडे यांच्याविषयी भरभरून व  अत्यंत प्रांजळपणानं सारं काही सांगत असल्याने त्या संवादात तो  अक्षरशः अडकून पडतो . सोबतीला प्रत्येक पानाआड गायतोंडे यांची पेंटिंग्ज ज्यांची किंमत जगाच्या बाजारात आज कोट्यवधी डॉलर्स मध्ये केली जाते ती पेंटिंग्ज पहावयास मिळत असल्याने तो अक्षरशः थिजून जातो . 

 ' गायतोंडे ' ग्रंथाचं जे काही अनोखंपण , वेगळंपण आहे ते यातच आहे . अर्थात हे आमचं मत आहे . हे सारं उभं करताना हेच नेमकं  आम्ही योजल  होतं आणि पुढं  असंच ते सारं घडत गेलं . ३० जानेवारी नंतर तुम्ही तुमचं मत इथं देखील नोंदवू शकता .  

जिद्दी गायतोंडे …

चित्रकारांना खरी प्रसिद्धी मिळू लागते ती उतारवयातच . 
म्हणजे जवळ जवळ साठीच्या आसपास .
( हुसेनसारखे चित्रकार त्याला अपवाद असू शकतात . कारण ते आपल्या 

कामापेक्षा अन्य गोष्टीनीच लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधू शकतात .)
गायतोंडे यांचंदेखील तसंच झालं . 
साठीच्या उंबरठ्यावर असताना गायतोंडे यांचा एक भीषण अपघात झाला . 
या अपघातात ते वाचले खरे 
पण नंतरच्या आयुष्यात त्यांना कायमचंच पंगुत्व आलं .कल्पना करा अपघातामुळे धडपणानं उभं राहता येत नसेल 
खाल्लेलं अन्न गिळता येत नसेल 
खाता खाता , बोलता बोलता जीभ लोंबून बाहेर येत असेल 
अशावेळी ज्याच्यावर हे बेतलं आहे त्याची काय अवस्था झाली असेल ? 
पण गायतोंडे मात्र खचले नाहीत ….


त्या अपघातानंतर तब्बल आठ - नऊ वर्षाचा काळ 
ते आपल्या स्टुडिओतल्या खुर्चीवर कोऱ्या कॅनव्हाससमोर बसून राहिले
फक्त विचार करीत , मनन करत , चिंतन करत .


आणि आठ - नऊ वर्षानं एके दिवशी उठून कामाला देखील लागले .
पेंटिंग करू लागले . त्यातलीच निवडक पेंटिंग या पोस्टमध्ये वापरली आहे . 
याच काळात सुनील काळदातेनं त्यांच्यावरची फिल्म पूर्ण केली .
याच काळात प्रीतीश नंदी यांनी त्यांची ती गाजलेली मुलाखत घेतली .
त्यांचा हा साराच उफराटा प्रवास त्यांच्यावरच्या या ग्रंथात 
अतिशय मनोज्ञपणे चित्रित झाला आहे . 
जो भविष्यातील अनेक पिढ्यांना
स्फूर्तीदायक , प्रेरणादायक ठरू शकेल .

Monday, January 4, 2016


काही गोष्टी अव्यक्तच राहाव्यात…   
गायतोंडे , त्यांची तथाकथित प्रेयसी आणि मी … 


गायतोंडे यांचा आणि माझा थेट असा परिचय कधी झालाच नाही . कारण मी जेव्हा जेजेत प्रवेश केला तेव्हा ते मुंबई सोडून कायमचे दिल्लीला गेले होते . त्यामुळे त्यांच्याशी भेटणं , बोलणं राहू द्या त्यांना कधी दुरून पाहायची संधीदेखील मला लाभली नाही . जिनं त्यांना शेवटपर्यंत साथ दिली त्या त्यांच्या दिल्लीतल्या मैत्रिणीनं एकदा मला नंतर गायतोंडे यांना भेटण्यासाठी दिल्लीत येण्याचं निमंत्रणही दिलं होतं , पण माझ्या इतर व्यापांमुळे मला ते जमलं नाही . तो योग जमून आला नाही याचं नंतर मला खूप वाईट वाटलं . कारण नंतरच्या एक दोन वर्षातच गायतोंडे गेले . त्यांच्यावरच्या फिल्मच्या मुंबईतल्या शोच्या निमित्तानं त्यांनी मुंबईत यावं , यासाठीही मी खूप प्रयत्न केले पण तोही योग जुळून आला नाही . त्यामुळेच त्यांची माझी भेट होता होता अखेरीस राहिली ती राहिलीच . 

***
पण आमच्या मर्यादित चित्रकला वर्तुळात ज्यांच्या नावाविषयी अधनमधन चर्चा चालत त्या गायतोंडे यांच्या तथाकथित प्रेयसीला मात्र मी भेटलो होतो . इतकंच नाहीतर त्यांच्याशी माझी खूप छान मैत्रीदेखील झाली होती . तीही थोडी थोडकी नाहीतर तब्बल  दोन - तीन  तपाची . गायतोंडे यांच्या परिचयातल्या अनेकांना त्या विषयी कुजबुजताना मी ऐकलं होतं . पण अशा प्रकरणात शक्यतो जाहीरपणे काही बोलायचं नाही , कुणी दुखावलं जाईल असं विधान करायचं नाही हे शहाणपण मी अनुभवातून शिकलो होतो . साहजिकच ' गायतोंडेच्या शोधात…' विशेषांकात अनेकांच्या शब्दांकनात वेगवेगळ्या अंगानं त्याविषयी झालेलं उल्लेख , मी अत्यंत संयमीतपणे संपादीत केले होते . त्यामुळेच की काय कुणास ठाऊक प्रत्यक्ष अंक प्रसिद्ध झाल्यावर मला काही फारसं टीकेला तोंड द्यावं लागलं नाही .

***

त्यांच्या आणि माझ्या वयात २५ - ३० वर्षाचं अंतर . पण त्यांच्यासोबतच्या मैत्रीमध्ये ते कधी फारसं जाणवलंच नाही . त्या मला जवळचा मित्र मानायच्या . कलाक्षेत्रात किंवा सांस्कृतिक क्षेत्रात वावरताना त्या माझी ओळख मित्र म्हणूनच करून द्यायच्या . नात्यातली मंडळी भेटली म्हणजे माझा उल्लेख चक्क भाऊ म्हणून देखील करायच्या . सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान त्यांचा फोन आला नाही असं क्वचितच व्हायचं . तेही थोडा थोडका काळ नाही तर तब्बल दहा - पंधरा वर्ष . कधी त्यांचा फोन आला नाही तर न राहावून मीच त्यांना फोन करायचो . फोनवर प्रचंड गप्पा , गप्पा आणि गप्पा . या गप्पा  चित्रकलेबद्दल थोड्या तर चित्रकला क्षेत्रातल्या राजकारणाबद्दलच अधिक असायच्या , तर कधी संगीत , कधी नाटक , तर कधी सांस्कृतिक क्षेत्रांबद्दलसुद्धा . अर्धा - अर्धा , एक - एक तास आमचं फोनवरचं संभाषण चालायचं . आमच्या फोनवर एन्गेज टोन वाजू लागला का मित्रमंडळी समजायची की त्यांचं आणि माझं संभाषण चालू आहे , आता निदान तासभर तरी या दोघांना पुन्हा फोन करू नये . 

फोनवर नुसता सुखसंवादच नाही चालायचा , तर बऱ्याचदा कचाकचा भांडणंदेखील व्हायची , त्या अतिशय फटकळ होत्या आणि संतापीदेखील . आणि मीदेखील त्यांच्या दुप्पट फटकळ आणि महासंतापी . ( गायतोंडे देखील असेच होते . असं त्यांचे स्नेही सांगायचे . ) साहजिकच आमची जाम हमरी तुमरी व्हायची . फोनवर आदळा आपट व्हायची , फोन हमखास आपटून बंद केला जायचा . पण असं काही झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धातास आधीच त्यांच्या फोन यायचा किंवा मीच त्यांना फोन करायचो . पण मग नंतर होणाऱ्या संभाषणात आदल्या दिवसाच्या भांडणाचा मागमूसदेखील नसायचा . 

***

एके दिवशी मात्र आमचं भयंकरच मोठं कडाक्याच भांडण झालं . चूक त्यांचीच होती . माझ्या बाबतीत कायच्या काय समज करून घेऊन , कायच्या काय करायचं त्यांनी मनात आणलं होतं . साहजिकच मी प्रचंड संतापलो . आपल्या आई वडिलांच्या वयाच्या व्यक्तीवर इतकं संतापू नये हे चांगलं ठाऊक असूनही मी संतापलो . इतका की मी त्यांना म्हणालो " तुम्ही लवकर मरत का नाही ? म्हणजे तुमच्या कचाट्यातून मुंबईच्या चित्रकला वर्तुळाची सुटका तरी होईल ." हे मी बोललो आणि पलीकडून फोन टाकून दिल्याचा आवाज आला आणि मग सारं शांत झालं . मीही संतापलेलो होतो , मी पण फोन आदळून ठेऊन दिला . तो दिवस खूपच अस्वस्थ अवस्थेत गेला . म्हटलं " झालं ! हा अध्याय संपला आता . आपल्या आयुष्यातून आणखी एक व्यक्ती आपल्या फटकळ स्वभावामुळे वजा झाली ." 

दुसऱ्या दिवशी उठलो तो फोनच्या आवाजानंच . पाहतो तर काय त्यांचाच फोन . फोनवरच्या संभाषणात कालच्या भांडणाचा मागमूसदेखील नव्हता . मी हळूच विचारलं " काल रिसिव्हर फेकून दिलात की हातून गळून पडला ? " तर हसून म्हणाल्या " अरे तुझा तो प्रश्न ऐकून मला एकदम रडूच फुटलं . आणि रिसिव्हर माझ्या हातून कधी गळून पडला मला कळलंदेखील नाही . मी नंतर कितीतरी वेळ तशीच रडत बसले ." त्यांचं हे इतकं प्रांजळ बोलणं ऐकल्यावर मी काय त्यांच्यावर राग धरणार , कप्पाळ ? ज्यांच्याशी आपलं जमतं किंवा कधी काळी अतिशय छान जमत होतं अशा व्यक्तींशी कितीही जरी मोठे मतभेद झाले तरीही आपला संवाद हा असा तटकन तोडून द्यायचा नसतो हा धडा त्यांनी काहीही न बोलता आपल्या वागण्यातून मला चांगलाच शिकवला होता . साहजिकच आमचं हे फोनवरचं संभाषण वर्षानुवर्ष तसंच चालू राहिलं . 

***
जगण्याचे संदर्भ बदलू लागले की आपण आयुष्यातील अनेक गोष्टी हळू हळू वजा करू  लागतो . जुने संपर्क हटकून हळू हळू कमी करू लागतो . तसंच काहीसं त्यांच्या माझ्या मैत्रीमध्ये होत गेलं . नेहमी येणाऱ्या फोनमध्ये हळू हळू खूप मोठं परिवर्तन होत होत त्यांचं रुपांतर सटीसहमशी येणाऱ्या फोनमध्ये होऊन  कसं गेलं ते माझं मलाही कधी कळलंच नाही .  

***
त्यांच्या बरोबरच्या तब्बल दोन तपाच्या प्रदीर्घ मैत्रीत गायतोंडे हा विषय आमच्या संभाषणात कधी आलाच नाही . कलावर्तुळातदेखील खूप गॉसीप्स चालतात . मी ती ऐकूनही होतो पण त्याविषयी विचारावं असं मात्र मला कधी वाटलंही नाही . पण एकदा मात्र त्यांचा बोलायचा मूड पाहून मी तो विषय काढलाच . व्यावसायिक पत्रकारितेत असल्यामुळे पत्रकारांमध्ये असलेला जातीवंत भोचकपणा माझ्याही अंगात थोडा बहुत भिनलेला होता . तो सारा एकवटून मी त्यांना टोकलं , तर त्या म्हणाला " हो ! हो ! मीही असं ऐकलंय . ' गाय ' ला माझ्यात इन्ट्रेस्ट होता . त्याला माझं आकर्षण होतं . पण मला मात्र तो फक्त मित्र म्हणूनच आवडायचा . तो हा असा ठेंगू आणि मी त्याच्यापेक्षा उंच . त्या दृष्टीनं त्याच्याकडे मी कधी पाहिलंच नाही . अरे चल माझी गाडी आली बघ . ही मी चालले . पुन्हा भेटू . बाय बाय ! वाघ पाठीशी लागल्याप्रमाणं त्या भरकन निघूनदेखील गेल्या . त्यानंतर मात्र मी हा विषय त्यांच्याकडे कधी काढलाच नाही .

*** 

गायतोंडे यांची पेंटिंग कोट्यवधींचा प्रवास करू लागली आणि नंतर ती २३ कोटी ७० लाखाची बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा मात्र त्यांना मनापासून विचारावसं वाटलं की ' तेव्हा निर्णय घेण्यात तुम्ही चुकलात असं तुम्हाला आज वाटतं का ? ' पण ते धाडस अर्थातच माझ्याच्यानं काही झालं नाही . कारण तोपर्यंत पत्रकारिता सोडून मलाही खूप वर्ष झाली होती आणि वयोमानपरत्वे  त्याही खूप थकल्या होत्या , नानाविध आजारांना तोंड देत होत्या . साहजिकच मी तो प्रश्न काही त्यांना विचारू शकलो नाही . 

परवा गायतोंडे यांचं पेंटिंग २९ कोटीला गेल्याची बातमी आली तेव्हा मात्र त्यांची प्रकर्षानं आठवण झाली . पण माझ्या भोचक प्रश्नाचं उत्तर द्यायला आता त्या या जगात राहिल्या नव्हत्या … 

***
कधी कधी या साऱ्यावर मी जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की समजा जर तेव्हा वासुदेव गायतोंडे यांना त्यांनी होकार दिला असता , तर आता केवळ आपणच नाही तर सारं जगच ज्यांना चित्रकार गायतोंडे म्हणून ओळखतं ते गायतोंडे आपल्याला दिसले असते का ? 

***

कुणास ठाऊक ? अशा जर तरच्या प्रश्नांना खरं तर काही अर्थ नसतो , पण ते पडत राहतात , सारखे सारखे छळत राहतात .


सतीश नाईक 
संपादक ' चिन्ह ' 

वि . सू .: मला ठाऊक आहे आज मी जे लिहिलं आहे त्यानं तुमचं औत्सुक्य भलतंच वाढलेलं असणार . गायतोंडे यांची ' ती ' प्रेयसी म्हणजे कोण ? असा प्रश्न तुम्हाला सतत सतावत राहणार . पण मला याविषयावर आणखी काहीही सांगायचं नाही किंवा त्यांचं नाव तर कधीच उघड करायचं नाही . हे सारं वाचल्यावर फेसबुकवर ' म्हणजे त्या ' त्या ' का ? ' ' त्यांचं नाव अमुक का ? ' ' तमक्याविषयी तुम्ही लिहिलंय का ? ' असल्या भोचक कमेंटस करून आपल्याला सारं ठाऊकेय असंही कृपया कुणी सूचित करण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती . तसं पाहिलं तर आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी कुठं आपल्याला कळत असतात ? ही पण आणखीन एक न कळणारी गोष्ट समजायचं अन कामाला लागायचं . आयुष्यातल्या काही गोष्टी या अव्यक्तच राहायला हव्यात . नाही का ? 


***  

या ग्रंथाची ३००० रु किंमतीची कलेक्टर्स एडिशन प्रकाशनाआधीच बुक झाली आहे .
म्हणूनच ' जनआवृत्तीची ' तुमची प्रत आज नाही आत्ताच बुक करा .
सवलत योजना संपायला आता फक्त सहाच दिवस शिल्लक राहिलेत . 
९००४० ३४९०३ या नंबरवर ' Gai - Jan ' या संदेशासह 
तुमचा नाव , पत्ता आणि ई मेल आयडी पाठवा 
आणि ५०० ची जनआवृत्ती प्रकाशनपूर्व सवलत योजनेमध्ये फक्त ३५० मध्ये घरपोच मिळवा .

Sunday, January 3, 2016

गायतोंडे यांच्या पेंटिंगचा आणखीन एक विक्रम… आणि त्यांच्यावरील ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाची जाहीर घोषणा…

ख्रिस्तीजच्या काल रात्री मुंबईत झालेल्या तिसऱ्या जागतिक लिलावात गायतोंडे यांच्या चित्रानं पुन्हा एकदा विक्रमी बोली पटकवण्याचा मान मिळवला आहे . त्यांचं १९९५ सालातलं पेंटिंग तब्बल २९ कोटी ३० लाख २५ हजार इतक्या विक्रमी किंमतीला विकलं गेलं आहे . या विक्रमी बोलीनं भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रातले आजवरचे सारेच विक्रम मोडीत निघाले आहेत . या भारतीय चित्रकलेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या घटनेच्या निमित्ताने ' चिन्ह ' आणखीन बरोब्बर ४५ दिवसांनी होणाऱ्या त्यांच्यावरील कोणत्याही भाषेत पहिला ठरू शकेल अशा महत्वाकांक्षी ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाची घोषणा करू इच्छिते . त्यांच्यावरील ग्रंथाचा पहिला मान मराठी भाषेला मिळतोय याचा आम्हाला अभिमान आहे .


चित्रकार गायतोंडे यांना ज्यांचं गाणं विशेष प्रिय होतं त्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याच हस्ते दि ३० जानेवारी २०१६ रोजी मुंबईत ' चिन्ह ' चा महत्वाकांक्षी ग्रंथ ' गायतोंडे ' प्रसिद्ध होणार आहे . गायतोंडे यांच्या प्रती दिली जाणारी आदरांजली असं या कार्यक्रमाचं स्वरूप राहणार असून या ग्रंथाचे संपादक ' चिन्ह ' चे सतीश नाईक , गायतोंडे यांना गुरुस्थानी मानणारे प्रख्यात चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ , दिल्लीतल्या दहा वर्षाच्या वास्तव्यात ज्यांच्याशी गायतोंडे यांचे स्नेहबंध निर्माण झाले होते ते नामवंत आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे , गायतोंडे यांचे गोवेकर आप्त शांताराम वर्दे वालावलीकार आणि ज्यांची चित्रं गायतोंडे यांना विशेष आवडत व ज्यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे ते चित्रकार प्रभाकर कोलते तसेच हा ग्रंथ अत्यंत दिमाखदारपणे प्रसिद्ध होण्यास ज्यांनी विशेष सहकार्य दिलं ते ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत . याप्रसंगी डॉ प्रिया जामकर या ग्रंथातील निवडक वेच्यांचे अभिवाचन करणार आहेत तर प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत .


" गायतोंडे पेंटिंग " आणखी एक नवा वाद…


गायतोंडे त्यांच्या हयातीतच अनेक आख्यायिका आणि दंतकथांचे नायक झाले होते.असं भाग्य कुणाच भारतीय चित्रकाराला अद्यापि लाभलेलं नाही.तोच सिलसिला गायतोंडेच्या पश्चातदेखील तसाच चालू राहिला आहे.त्यांचं प्रत्येक पेंटिंग हे नव्या नव्या आख्यायिकांना,दंतकथांना आणि वादांनादेखील जन्मला घालू लागलं आहे.आता आजच्याच मुंबई मिररमधली स्टोरी पाहा ना.http://www.mumbaimirror.com/…/The-…/articleshow/50114565.cms
दुर्गादेखील आमच्या जेजेचीच.मला काही वर्ष ज्युनिअर होती.ती मुळची ठाण्याचीच.लग्न झाल्यावर दिल्लीला गेली.चित्र काढण्याखेरीज चित्रकलेसंबंधीचे अनेक चांगले उपद्याप ती करीत असते.तिचं स्वतःचं छानसं कलेक्शन आहे.मुख्य म्हणजे त्यात गायतोंडे यांची चित्रं आहेत.यावरून तिच्या संग्रहाचा दर्जा लक्षात यावा.
मुंबई मिररच्या स्टोरीमध्ये दुर्गाच्या संग्रहात असलेल्या गायतोंडे यांच्या पेंटिंगवरची जी स्टोरी प्रसिद्ध झाली आहे.तिचा पूर्वार्ध तिनं मला दीड दोन वर्षापूर्वी सांगितला होता.आणि तेव्हा तिनं त्या चित्रांविषयी काही भीती माझ्यासमोर व्यक्त केली होती.ती बहुदा खरी ठरली असावी असे मुंबई मिररची स्टोरी वाचून वाटते.आता नक्की काय होणार,ख्रिस्तीजवाले काय करणार,दुर्गाचं पुढलं पाऊल काय असेल,याविषयी मला निश्चितपणे कुतूहल वाटतं.
मी " गायतोंडे " यांच्यावरचं पुस्तक करतोय हे ऐकून ती दिल्लीहून खास मला भेटायला आली होती.ती गायतोंडे यांना प्रत्यक्ष भेटलेली.त्यामुळे तिला भेटायलादेखील मी खूप उत्सुक होतो.चांगले तीन चार तास आम्ही गप्पा मारीत होतो.त्या गप्पांमधून तिने सांगितलेल्या अनेक गोष्टी अचंबित करून गेल्या होत्या.दुर्गा अस्सल पंजाबन आहे.त्यात दिल्लीत राहिलेली त्यामुळे सगळा हिशेब रोखठोक.तिनं जे काही सांगितलं ते मी आता इतक्यात उघड करू इच्छित नाही.प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते.पण तिच्या संग्रहातलं गायतोंडे यांचं पेंटिंग मात्र गायतोंडे ग्रंथात मी आवर्जून घेतलंय.आणि तिने सांगितलेल्या काही भन्नाट गोष्टीसुद्धा " गायतोंडे : न संपणाऱ्या शोधाच्या कहाणी…" मध्ये मी घेतल्या आहेत.हवं तर ' चिन्ह ' च्या वेबसाईटवर ठेवलेल्या PDF फाईलमधून तुम्ही त्या वाचू शकता.
आठ पंधरा दिवसापूर्वीच दुर्गाचा मला फोन आला होता.प्रकाशनाची तारीख नक्की झाली की कळवायला विसरू नकोस म्हणून.आता तारीख नक्की झाली आहे ३० जानेवारी २०१६.बहुदा उद्या किंवा परवा मी तिला फोन करेन आणि या बातमीवर तिनं जर काही भाष्य केलं तर पुन्हा नक्की लिहेनच.


अत्यंत अत्यंत दुर्मिळ गायतोंडे…


गायतोंडें यांच्या व्हेनिसमधल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पेरिसहून सुनील काळदातेंचा फोन जेव्हा आला तेव्हा तो बोलता बोलता मला म्हणाला " गायतोंडें यांच्या ग्युगेंनहेम शोविषयी वृत्तपत्रात वाचून एक नव्वदीचा म्हातारा एके दिवशी म्युझियममध्ये आला आणि काही निगेटिव्ह दाखवून म्हणाला " १९६५ साली रॉकफेलर शिष्यवृत्ती घेऊन गायतोंडे नावाचा एक तरुण चित्रकार न्यूयॉर्कमध्ये आला होता.त्यावेळी त्याचे फोटो काढायची संधी मला मिळाली होती.फोटो अर्थातच ब्लक अण्ड वाईट होते.पण का कुणास ठाऊक त्या निगेटिव्ह मी जपून ठेवल्या होत्या.तुमच्या शोविषयी वृत्तपत्रात वाचलं आणि त्या निगेटिव्ह मी शोधून काढल्या.६५ साली

ज्याचं शूट मी केलं होतं तोच हा चित्रकार तर नव्हे ? असेल तर त्या निगेटिव्हज आता तुम्ही घेऊन ठेवा कदाचित त्या तुमच्या उपयोगात येतील,असं म्हणून ५० वर्षापूर्वीच्या निगेटिव्हस त्यांच्या हाती सोपवून तो नव्वदीचा म्हातारा निघून गेला.
या साऱ्या प्रकारानं या शोची क्युरेटर सांधिनी पोतदारला किती आनंद झाला असेल हे मी समजू शकतो.कारण या शोच्या निमित्तानं सांधिनी मलासुद्धा भेटून गेली होती.तेव्हा माझ्याकडचा गायतोंडेंचा खजिना पाहून तिला किती आनंद झाला होता हे मी स्वतः अनुभवलं आहे.त्यामुळेच गायतोंडे यांचे अत्यंत दुर्मिळ फोटोग्राफ अचानक हे असे हाती आल्यावर त्यांचं काय झालं असेल याची मी चांगलीच कल्पना करू शकतो.
गायतोंडे ग्रंथासाठी त्यांचे एक एक फोटोग्राफ मिळवताना मी किती खस्ता खाल्ल्या आहेत,किती कष्ट उपसले,किती मानहानीचे प्रसंग अनुभवले ते माझं मलाच ठाऊक.माझ्या संग्रहात असलेल्या गायतोंडे यांच्याविषयीच्या शे सव्वाशे कात्रणातून ज्या ज्या फोटोग्राफरचे संदर्भ मला मिळाले त्या त्या साऱ्यांशीच मी संपर्क साधला.पण प्रत्येक ठिकाणाहून नकारघंटाच ऐकावयास मिळाल्या.कुणी कामाच्या नाहीत म्हणून निगेटिव्ह नष्ट केल्याचं सांगितलं,तर कुणी सापडत नाहीत म्हणून कांगावे केले.तर अनेकांनी त्या नोकरी सोडताना ऑफिसमधेच टाकून दिल्याचं सांगितलं.आणि इथे तर एक नव्वदीतला म्हातारा चालवत नसताना थरथरत येतो आणि स्वतःच्या हातानी निगेटिव्हस देऊन टाकतो.दोन संस्कृतींमधला केवढा हा फरक.यावर काही बोलणं किंवा लिहिणं हा आपणच आपल्याला त्रास करून घेणं आहे म्हणूनच ते टाळतो.
सुनीलनं काढलेल्या गायतोंडेंच्या फोटो संदर्भातला किस्साही असाच भयंकर आहे.पण त्याविषयी मी इतक्यात काही सांगू इच्छित नाही.सुनील सांगत होता ग्युगेंनहेमने एका दालनामध्ये या सर्व फोटोंच्या प्रिंट्स मारून त्या प्रदर्शित केल्या आहेत.त्यातलेच दोन फोटो परवा सुनीलनं माझ्यासाठी पाठवले.बहुदा गायतोंडे यांच्या शोच्या प्रसिद्धीसाठी ग्युगेनहेमने ते प्रसारित केले असावेत.फोटो खरोखरच अप्रतिम आहेत.गायतोंडे त्या काळातदेखील किती आधुनिक विचारांचे होते.त्याचंच दर्शन त्या फोटोतून घडतं.काळ्या रंगाविषयीची त्यांना असोशी पाहून मला गायतोंडे ग्रंथातला आणखीन एक दुर्मिळ फोटो मला आठवतो.१९४८ साली जेजेची टूर उदयपूरला गेली होती.त्या टूरमध्ये कोणीतरी गायतोंडेना पोझ द्यायला सांगितलं.काळा गोल गळ्याचा मॉड टी शर्ट घातलेले गायतोंडे आजच्या काळातदेखील फिट वाटतील असे दिसतात.सुनीलने पाठवलेले ब्रूस फ़्रिश यांचे ते दोन्ही फोटोग्राफ मी इथं शेअर करतोय.आणि त्याच फोटोसोबत रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवून गायतोंडे अमेरिकेत गेले तेव्हा झालेल्या सत्कार समारंभाचे फोटोदेखील सोबत देतोय.कसे वाटले जरूर कळवा.