Monday, November 26, 2018

वाचता वाचता

झेनच्या सहजस्फूर्त निर्मितीचा
सहज सुंदर आदर्श  : ‘गायतोंडे’ग्रंथ !

-  प्रदीप  सं नेरुरकर
भाग १

एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात चाळीत राहणारा माणूस स्वतःच्या कल्पनेतलं अदभूत विश्व साकारण्याचा कल्पनेनं झपाटलेला, अगदी लहानपणापासून चित्रकला विषयात अतीव रस असलेला, या चित्रांपुढे बाकी सर्व संसारावर तिलांजली देऊन कलेच्या एकाच ध्यासाने पछाडलेला. जेव्हा साऱ्या भौतिक सुखांकडे पाठ फिरवून चित्रकलेचं एक अत्युच्च शिखर गाठतो आणि आपण आपलं ध्येय पूर्णतः गाठलंय हे मग कळून न कळूनही त्यापलीकडच्या एका योग्याच्या व ऋषीच्या जीवनाच्याही पल्याड पोचतो त्या प्रवासाची एक अदभूत झलक आपल्याला ‘ गायतोंडे’ नावाच्या ‘चिन्ह’ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या देखण्या अप्रतिम ग्रंथात वाचायला मिळते.
प्रथमदर्शनीच अत्यंत सरळ सोपं साधं काळ्या पांढऱ्या रंगातलं ‘गायतोंडे’च्या चित्राच्या पार्श्वभूमीवर विचारात बसलेले गायतोंडे त्यांच्या चित्रांतल्या अक्षराकारातच सामावून गेलेले दिसतात. फक्त ‘गायतोंडे’ शीर्षकाची अक्षरे केवळ आपल्याला दिसतात. चांगला, सुंदर, देखणा कागद नि त्यावरची नेमकीच नजरेला सुखावणारी छपाई त्यांतली चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांची अदभूत चैतन्यमय चित्रे, रेखाचित्रे आणि त्यांची दुर्मिळ छायाचित्रे यामुळे हा ग्रंथ सहज सुस्वरूप झालाय. जसं संपादक सतीश नाईक यांनीच म्हटल्याप्रमाणे “कुठलीच गोष्ट ओढून ताणून करायची नाही. ग्रंथ निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यात जे जे घडत गेलं, ते ते तसं तसं घडून देत गेलो.” हे असं काहीसं झेन तत्वच संभाळून त्यांनी जरी या ग्रंथासाठी काही काळ गेला तरी झेनच्याच सहजस्फूर्त निर्मितीचा एक सहज सुंदर आदर्शच आपल्यासमोर ठेवलाय यात शंकाच नाही. यासाठी त्यांनी घेतलेले अपरंपार कष्ट, मनःस्ताप, संकटं नि अरिष्ट यावर न खचता केलेली मात, तसेच या कामातल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक गुंतवणूक यावरही आपली पत्नी नीता नाईक हिच्या खंबीर पाठबळामुळे केलेली मात ही नक्कीच अतिशय कौतुकास्पद आहे. 

‘चिन्ह’ प्रकाशनने दुसऱ्या पर्वात २००१ पासूनच ‘गायतोंडे’ विशेषांक (२००१, २००६ व २००७) ‘भास्कर कुलकर्णी’ विशेषांक (२००३) ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ ‘यत्न-प्रयत्न’ विशेषांक असे नवनवे नि नव्या जुन्या मराठी चित्रकारांवरचे अंक एखाद्या कला चळवळीच्या उत्साहाने काढले आहेत नि त्याला उत्तम प्रतिसादही मिळालेला आहे. चित्रकारितेबरोबरच उत्तमी पत्रकारिता नि खास नजर असलेल्या सतीश नाईक यांच्या ‘चिन्ह’ कला चळवळीचा ‘गायतोंडे’ हा ग्रंथ ‘कळसाध्याय’ म्हटला तर अतिशयोक्ति होणार नाही.

‘गायतोंडे’ या ग्रंथाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात एकूण चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांच्या घरातला, शहरातला जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा नि त्या नंतरच्या आयुष्याचा केवळ चित्रकलेचा प्रदीर्घ प्रवास विलक्षण ताकदीने या सर्व लेखकांनी सादर केला आहे. त्यात गायतोंडेंचा स्वभाव, त्यांची स्फूर्ती व श्रद्धास्थाने, तसंच त्यांचं विचारविश्व आणि कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रदर्शने व स्वतःची कला यावरची वेळोवेळी केलेली भाष्ये नि मते अत्यंत वेधकपणे मंडळी आहेत. त्यातून गायतोंडेंचं विलक्षण व्यक्तिमत्व साकार झालंय.

गायतोंडेंच्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगायचं तर गिरगावातल्या कुडाळदेशकर वाडीतलं चाळीतलं अडीच खोल्यांचं असलेलं त्यांचं घर. चौकोनी कुटुंबात ते स्वतः, प्रेमळ आई, दोन बहिणी व कडक स्वभावाचे गायतोंडेंना लहानपणी चित्रकलेला विरोध करणारे वडील. घरातल्या विचित्र वातावरणामुळे लहानपणी जे जे स्कुलमध्ये शिकतांना झालेली चित्रकाराची घुसमट. वडिलांची त्या काळी असलेली दहशत, तिला तोंड देऊन सतत चित्रे काढणारा बाळ गायतोंडे. हा त्यांची बहीण किशोरी दास यांनी लिहिलेल्या लेखातच “बाळ हा चित्रकार म्हणून जन्माला आला होता.” ही असलेली जाणीव नि पुढे जिच्याशी झालेला दुरावा नि बाळचा पुढील आयुष्याचा कलाप्रवास विस्ताराने त्यांनी कौटुंबिक पद्धतीने मांडला आहे. 

‘गायतोंडे’ या ग्रंथात A4 साईझच्या मोठ्या आकाराची २१६ पृष्ठे असून एकूण सोळा लेख असून कौटुंबिक विभागात किशोरी दास (बहीण), शांताराम वर्दे वालावलीकर (आतेभाऊ), सुनीता पाटील (शेजारीण) यांचे तर जे जे स्कूल्सही संबंधित विश्वास यंदे, फिरोझ रानडे, प्रफुल्ला डहाणूकर, मनोहर म्हात्रे व सच्चिदानंद दाभोळकर या सहकारी शिष्य मित्रांचे, तसेच लेखक पत्रकार ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि शरद पाळंदे, लक्ष्मण श्रेष्ठ, दादीबा पंडोल, नरेंद्र डेंगळे यांचे गायतोंडेंच्या कलासमीक्षासंबंधीचे लेख व शेवटी सुनील काळदाते व नितीन दादरवाला यांचे गायतोंडेंवर केलेल्या फिल्मसंबंधी लेख, याबरोबरच गायतोंडेंनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतीतील निवडक मुलाखती, श्री निसर्गदत्त महाराजांशी झालेला संवाद आणि ‘नवकला आणि मी’ हा खुद्द गायतोंडेंचा लेख. त्याबरोबरच रंगीत नि श्वेतधवल २९ प्रकाशचित्रे तसंच ५५ रंगीत चित्रे शिवाय कृष्णधवल प्रकाशचित्रे यांचा या पुस्तकात समावेश आहे. याबरोबरच या प्रकल्पाचे नि ‘चिन्ह’ प्रकाशनाचे संपादक सतीश नाईक यांचं या पुस्तक निर्मिती करतानाचे काही काळाचे खडतर अनुभव सांगणारी २४ पृष्ठांची ‘गायतोंडे - एक न संपणाऱ्या शोधाची कहाणी’ विशेष पुरवणी म्हणून या ग्रंथाबरोबरच देण्यात आली आहे. तीही खचितच वाचनीय आहे. या ग्रंथासाठी सतीश नाईकांनी किती अपार मेहनत नि कष्ट घेऊन प्रांजळपणे सांगितलेल्या या हकीकतीमुळे कळते की त्यांनी घेतलेले श्रम खरोखरच सार्थकी लागलेत.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रभाकर कोलते यांनी मांडलेल्या ‘बाकी इतिहासा’तूनही त्यांनी या ग्रंथाला केलेलं अमोल सहाय्य, अप्रतिम साठा नि भरघोस पाठिंबा यामुळे आज हा ग्रंथ अत्यंत दिमाखात प्रसिद्ध झालाय. त्यात गायतोंडेंची चित्रं पाहतानाचा जो अनुभव व्यक्त करतात, तो अत्यंत हृदयस्पर्शी आहे. ते म्हणतात “केवळ त्यांचं चित्र, कुठल्याही उत्प्रेक्षा-उपमेशिवायचं फक्त चित्र. मला दिग्मूढ करणारं. त्या वेळी प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावणारी माझी साक्षर बुद्धिमत्ता चक्क मला सोडून गेली. माझ्या शरीरातली एकूण-एक इंद्रिये, हाडामांसासकट मला न सांगता पसार झाली आणि मी मग एक संवेदनशील हवेनं लठ्ठ फुगलेला फुगा होऊन उरलो….”

गायतोंडेंना जे. जे. चे ग्रंथपाल विश्वास यंदे यांनी पॉल ब्रॅंटनचं ‘ए सर्च इन सिक्रेट इंडिया’ हे बहुधा त्याच्या भारतातल्या आध्यात्मिक जीवन प्रवासाविषयीचं पुस्तक प्रथम वाचायला दिलं. पुढे रमण महर्षीचंही पुस्तक त्यांनीच देऊन गायतोंडेंना अध्यात्माची गोडी लावली आणि अशी पुस्तके नि त्यांचं वाचन त्यांना चिंतनाकडे घेऊन गेलं असावं. पण बहुधा त्यांची वृत्ती तशी असावी म्हणूनच संत सोहिरोबानाथ आंबिये अभंगांचं पुस्तक वाचून त्याना - “जब सोहिरा सोहं तख्तपर बैठे” या ओळी वाचून सोहिरोबांचं तख्त कुठचं याची उत्सुकता निर्माण झाली. “मी काही करीतच नाही. पेंटिंग आपोआप घडतं.” किंवा “जे मुळात आहे, तेच मी साकारलं.” , “मी मौनात गेलो.” अशी वक्तव्ये - त्यांचा दाखला विश्वास यंदे देतात. त्याच्या मते गायतोंडेंना अखेरच्या काळात झालेला अपघात नि त्यामुळे आलेलं अपंगत्व ही नियतीचीच जणू परीक्षा होती. नि त्यातूनच ते पुढे सिद्ध झाले असेही ते म्हणतात. त्यांच्या चित्रांमागची तपश्चर्या व चित्र पूर्ण झाल्यानंतरची विरक्तीही ते जाणतात. 
तर प्रफुल्ल डहाणूकरांच्या लेखात जे. जे चे नि भुलाभाई संस्थेचे ‘फुलपंखी दिवस’ आठवतात आणि हुसेन बी. प्रभा, बी. विठ्ठल, नसरीन मोहंमदी, मनोहर म्हात्रे या ग्रुपबरोबर केलेल्या भटकंती चित्र प्रदर्शने चर्चा नि वादविवाद - त्यातलं स्मरणरंजन, चिंतनमग्न ‘गाय’ सांगतांना, ते “माय पेंटिग्ज आर झेन” असं म्हणत, त्यांच्या घरात उठलेली भावनांची वादळे शमवण्यासाठीच तो अध्यात्माकडे वळला असं मत त्या व्यक्त करतात.

या पुस्तकातला एक महत्वाचा लेख आहे. मनोहर म्हात्रे यांचा. त्यांच्या मते “आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नचिन्हाला त्यांनी आपल्या चित्रांचा विषय बनवला.” असं म्हणतांना वास्तवाचं त्याच्या चित्रातलं रूपच जणू ते शोधतात. म्हात्रे त्यांचे शिष्य व नंतर मित्रही गायतोंडेंचं प्रभावी व्यक्तिमत्व त्यांनी सोबतीनं पाहिलेले ‘लास्ट फॉर लाईफ मूला रुजू, बा ‘गॉन विथ द विंड’ हे चित्रपट “आजूबाजूच्या माणसातला आनंद शोधा”, व “चित्र हे स्वानंदासाठीच मी रंगवतो.”

“प्रत्येक चित्र स्वयंभू असून आपल्या आवडीचा चित्रकार निवडून त्याद्वारे भूतलावर उतरतं.” अशी भाषा चित्रकार वापरतो, तेव्हा तर त्यांची अध्यात्मवृत्तीच प्रगट होते म्हटलं तर चूक ठरू नये. गंमत म्हणजे मनोहर म्हात्रे हे ज्योतिष पाहणारे असूनसुद्धा यांनी कधी आपलं व कुणाचं भविष्य पाहण्याची उत्सुकतासुद्धा दाखवली नाही. आणखी एक म्हात्रे सांगतात - स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या चित्रांची त्यांनी कधीच किंमत केली नाही. “माझ्या जगण्यावर कोणाचा अधिकार नाही.” असं स्वाभिमानानं सांगणाऱ्या गायतोंडेंना जीवनातल्या परम-पदापर्यंत पोहोचलेली माणसं सतत खुणावत राहिली. असा निष्कर्ष म्हात्रेच काढू शकतात.

सच्चिदानंद दाभोळकरही त्यांच्या लेखात “पेंटिंग सहज झालं पाहिजे.” आणि “आर्टिस्ट जसजसा मोठा होत जातो. तसतसा तो सोपेपणाकडे वळतो.” हे निरीक्षण नोंदवतात.

शरद पाळंदे, लक्ष्मण श्रेष्ठ व नरेंद्र डेंगळे यांचे तीन लेख विविध भूमिकांतून गायतोंडेंच्या चित्रांविषयीच बोलतात. त्याचं कला विश्लेषण, आस्वाद नि स्वरूप यावरच त्यांचा सारा भर असतो. त्यांच्या चित्रांविषयी तिघानाही जबरदस्त कुतूहल आहे नि जे त्यांच्या चर्चेतून नि पाहण्यातून पुरेपूर वसूल करतात. आपल्या स्नेहाची नि आनंदाची पावती स्वखुशीने देतात. गायतोंडेही ज्यांच्याशी त्यांची नाळ जुळते त्यांच्याशी एकरूप होऊन संवाद करीत असत. कुणालाही दुखावणं त्यांना जमत नसे.

शरद पाळंदे म्हणतात की गायतोंडे हे जीवनाचा आनंद घेणारे व घ्यायला लावणारे होते. स्वतःच्या आखलेल्या चौकटीच्या बाहेरच्या लोकांपासून ते अलिप्त रहायचे. स्वतःचा थांग दुसऱ्याला जाणीवपूर्वक लागू न देणारं हे अजब रसायन होतं. ते समुद्राकडे एकटक पहात तासनतास बसत. लाट कशी येते, नि कशी जाते ? त्यांच्या मते जाताना ती लाट तुमच्यातलं काही तरी नेत असते ? ते काय तर ती एनर्जी नेते - अफाट वाचन नि मनस्वी चिंतन हेच त्यांचं जीवन. ते कृष्णमूर्तीच्या तत्वज्ञानावर बोलत माणसाच्या जगण्याचं प्रयोजन काय ? जीवनाच्या प्रवासात तो काय शोधतो ? हे त्यांचे गहन प्रश्न असायचे. त्यांनी कलेचं कधी अवडंबर केलं नाही. मेंदू, हात, ब्रश, रंग नि कागद या सगळ्यांचा संबंध ज्या प्रेरणेनं साधला जातो, तो त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा होता.
अपूर्ण...

No comments:

Post a Comment