Monday, January 4, 2016


काही गोष्टी अव्यक्तच राहाव्यात…   
गायतोंडे , त्यांची तथाकथित प्रेयसी आणि मी … 


गायतोंडे यांचा आणि माझा थेट असा परिचय कधी झालाच नाही . कारण मी जेव्हा जेजेत प्रवेश केला तेव्हा ते मुंबई सोडून कायमचे दिल्लीला गेले होते . त्यामुळे त्यांच्याशी भेटणं , बोलणं राहू द्या त्यांना कधी दुरून पाहायची संधीदेखील मला लाभली नाही . जिनं त्यांना शेवटपर्यंत साथ दिली त्या त्यांच्या दिल्लीतल्या मैत्रिणीनं एकदा मला नंतर गायतोंडे यांना भेटण्यासाठी दिल्लीत येण्याचं निमंत्रणही दिलं होतं , पण माझ्या इतर व्यापांमुळे मला ते जमलं नाही . तो योग जमून आला नाही याचं नंतर मला खूप वाईट वाटलं . कारण नंतरच्या एक दोन वर्षातच गायतोंडे गेले . त्यांच्यावरच्या फिल्मच्या मुंबईतल्या शोच्या निमित्तानं त्यांनी मुंबईत यावं , यासाठीही मी खूप प्रयत्न केले पण तोही योग जुळून आला नाही . त्यामुळेच त्यांची माझी भेट होता होता अखेरीस राहिली ती राहिलीच . 

***
पण आमच्या मर्यादित चित्रकला वर्तुळात ज्यांच्या नावाविषयी अधनमधन चर्चा चालत त्या गायतोंडे यांच्या तथाकथित प्रेयसीला मात्र मी भेटलो होतो . इतकंच नाहीतर त्यांच्याशी माझी खूप छान मैत्रीदेखील झाली होती . तीही थोडी थोडकी नाहीतर तब्बल  दोन - तीन  तपाची . गायतोंडे यांच्या परिचयातल्या अनेकांना त्या विषयी कुजबुजताना मी ऐकलं होतं . पण अशा प्रकरणात शक्यतो जाहीरपणे काही बोलायचं नाही , कुणी दुखावलं जाईल असं विधान करायचं नाही हे शहाणपण मी अनुभवातून शिकलो होतो . साहजिकच ' गायतोंडेच्या शोधात…' विशेषांकात अनेकांच्या शब्दांकनात वेगवेगळ्या अंगानं त्याविषयी झालेलं उल्लेख , मी अत्यंत संयमीतपणे संपादीत केले होते . त्यामुळेच की काय कुणास ठाऊक प्रत्यक्ष अंक प्रसिद्ध झाल्यावर मला काही फारसं टीकेला तोंड द्यावं लागलं नाही .

***

त्यांच्या आणि माझ्या वयात २५ - ३० वर्षाचं अंतर . पण त्यांच्यासोबतच्या मैत्रीमध्ये ते कधी फारसं जाणवलंच नाही . त्या मला जवळचा मित्र मानायच्या . कलाक्षेत्रात किंवा सांस्कृतिक क्षेत्रात वावरताना त्या माझी ओळख मित्र म्हणूनच करून द्यायच्या . नात्यातली मंडळी भेटली म्हणजे माझा उल्लेख चक्क भाऊ म्हणून देखील करायच्या . सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान त्यांचा फोन आला नाही असं क्वचितच व्हायचं . तेही थोडा थोडका काळ नाही तर तब्बल दहा - पंधरा वर्ष . कधी त्यांचा फोन आला नाही तर न राहावून मीच त्यांना फोन करायचो . फोनवर प्रचंड गप्पा , गप्पा आणि गप्पा . या गप्पा  चित्रकलेबद्दल थोड्या तर चित्रकला क्षेत्रातल्या राजकारणाबद्दलच अधिक असायच्या , तर कधी संगीत , कधी नाटक , तर कधी सांस्कृतिक क्षेत्रांबद्दलसुद्धा . अर्धा - अर्धा , एक - एक तास आमचं फोनवरचं संभाषण चालायचं . आमच्या फोनवर एन्गेज टोन वाजू लागला का मित्रमंडळी समजायची की त्यांचं आणि माझं संभाषण चालू आहे , आता निदान तासभर तरी या दोघांना पुन्हा फोन करू नये . 

फोनवर नुसता सुखसंवादच नाही चालायचा , तर बऱ्याचदा कचाकचा भांडणंदेखील व्हायची , त्या अतिशय फटकळ होत्या आणि संतापीदेखील . आणि मीदेखील त्यांच्या दुप्पट फटकळ आणि महासंतापी . ( गायतोंडे देखील असेच होते . असं त्यांचे स्नेही सांगायचे . ) साहजिकच आमची जाम हमरी तुमरी व्हायची . फोनवर आदळा आपट व्हायची , फोन हमखास आपटून बंद केला जायचा . पण असं काही झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धातास आधीच त्यांच्या फोन यायचा किंवा मीच त्यांना फोन करायचो . पण मग नंतर होणाऱ्या संभाषणात आदल्या दिवसाच्या भांडणाचा मागमूसदेखील नसायचा . 

***

एके दिवशी मात्र आमचं भयंकरच मोठं कडाक्याच भांडण झालं . चूक त्यांचीच होती . माझ्या बाबतीत कायच्या काय समज करून घेऊन , कायच्या काय करायचं त्यांनी मनात आणलं होतं . साहजिकच मी प्रचंड संतापलो . आपल्या आई वडिलांच्या वयाच्या व्यक्तीवर इतकं संतापू नये हे चांगलं ठाऊक असूनही मी संतापलो . इतका की मी त्यांना म्हणालो " तुम्ही लवकर मरत का नाही ? म्हणजे तुमच्या कचाट्यातून मुंबईच्या चित्रकला वर्तुळाची सुटका तरी होईल ." हे मी बोललो आणि पलीकडून फोन टाकून दिल्याचा आवाज आला आणि मग सारं शांत झालं . मीही संतापलेलो होतो , मी पण फोन आदळून ठेऊन दिला . तो दिवस खूपच अस्वस्थ अवस्थेत गेला . म्हटलं " झालं ! हा अध्याय संपला आता . आपल्या आयुष्यातून आणखी एक व्यक्ती आपल्या फटकळ स्वभावामुळे वजा झाली ." 

दुसऱ्या दिवशी उठलो तो फोनच्या आवाजानंच . पाहतो तर काय त्यांचाच फोन . फोनवरच्या संभाषणात कालच्या भांडणाचा मागमूसदेखील नव्हता . मी हळूच विचारलं " काल रिसिव्हर फेकून दिलात की हातून गळून पडला ? " तर हसून म्हणाल्या " अरे तुझा तो प्रश्न ऐकून मला एकदम रडूच फुटलं . आणि रिसिव्हर माझ्या हातून कधी गळून पडला मला कळलंदेखील नाही . मी नंतर कितीतरी वेळ तशीच रडत बसले ." त्यांचं हे इतकं प्रांजळ बोलणं ऐकल्यावर मी काय त्यांच्यावर राग धरणार , कप्पाळ ? ज्यांच्याशी आपलं जमतं किंवा कधी काळी अतिशय छान जमत होतं अशा व्यक्तींशी कितीही जरी मोठे मतभेद झाले तरीही आपला संवाद हा असा तटकन तोडून द्यायचा नसतो हा धडा त्यांनी काहीही न बोलता आपल्या वागण्यातून मला चांगलाच शिकवला होता . साहजिकच आमचं हे फोनवरचं संभाषण वर्षानुवर्ष तसंच चालू राहिलं . 

***
जगण्याचे संदर्भ बदलू लागले की आपण आयुष्यातील अनेक गोष्टी हळू हळू वजा करू  लागतो . जुने संपर्क हटकून हळू हळू कमी करू लागतो . तसंच काहीसं त्यांच्या माझ्या मैत्रीमध्ये होत गेलं . नेहमी येणाऱ्या फोनमध्ये हळू हळू खूप मोठं परिवर्तन होत होत त्यांचं रुपांतर सटीसहमशी येणाऱ्या फोनमध्ये होऊन  कसं गेलं ते माझं मलाही कधी कळलंच नाही .  

***
त्यांच्या बरोबरच्या तब्बल दोन तपाच्या प्रदीर्घ मैत्रीत गायतोंडे हा विषय आमच्या संभाषणात कधी आलाच नाही . कलावर्तुळातदेखील खूप गॉसीप्स चालतात . मी ती ऐकूनही होतो पण त्याविषयी विचारावं असं मात्र मला कधी वाटलंही नाही . पण एकदा मात्र त्यांचा बोलायचा मूड पाहून मी तो विषय काढलाच . व्यावसायिक पत्रकारितेत असल्यामुळे पत्रकारांमध्ये असलेला जातीवंत भोचकपणा माझ्याही अंगात थोडा बहुत भिनलेला होता . तो सारा एकवटून मी त्यांना टोकलं , तर त्या म्हणाला " हो ! हो ! मीही असं ऐकलंय . ' गाय ' ला माझ्यात इन्ट्रेस्ट होता . त्याला माझं आकर्षण होतं . पण मला मात्र तो फक्त मित्र म्हणूनच आवडायचा . तो हा असा ठेंगू आणि मी त्याच्यापेक्षा उंच . त्या दृष्टीनं त्याच्याकडे मी कधी पाहिलंच नाही . अरे चल माझी गाडी आली बघ . ही मी चालले . पुन्हा भेटू . बाय बाय ! वाघ पाठीशी लागल्याप्रमाणं त्या भरकन निघूनदेखील गेल्या . त्यानंतर मात्र मी हा विषय त्यांच्याकडे कधी काढलाच नाही .

*** 

गायतोंडे यांची पेंटिंग कोट्यवधींचा प्रवास करू लागली आणि नंतर ती २३ कोटी ७० लाखाची बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा मात्र त्यांना मनापासून विचारावसं वाटलं की ' तेव्हा निर्णय घेण्यात तुम्ही चुकलात असं तुम्हाला आज वाटतं का ? ' पण ते धाडस अर्थातच माझ्याच्यानं काही झालं नाही . कारण तोपर्यंत पत्रकारिता सोडून मलाही खूप वर्ष झाली होती आणि वयोमानपरत्वे  त्याही खूप थकल्या होत्या , नानाविध आजारांना तोंड देत होत्या . साहजिकच मी तो प्रश्न काही त्यांना विचारू शकलो नाही . 

परवा गायतोंडे यांचं पेंटिंग २९ कोटीला गेल्याची बातमी आली तेव्हा मात्र त्यांची प्रकर्षानं आठवण झाली . पण माझ्या भोचक प्रश्नाचं उत्तर द्यायला आता त्या या जगात राहिल्या नव्हत्या … 

***
कधी कधी या साऱ्यावर मी जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की समजा जर तेव्हा वासुदेव गायतोंडे यांना त्यांनी होकार दिला असता , तर आता केवळ आपणच नाही तर सारं जगच ज्यांना चित्रकार गायतोंडे म्हणून ओळखतं ते गायतोंडे आपल्याला दिसले असते का ? 

***

कुणास ठाऊक ? अशा जर तरच्या प्रश्नांना खरं तर काही अर्थ नसतो , पण ते पडत राहतात , सारखे सारखे छळत राहतात .


सतीश नाईक 
संपादक ' चिन्ह ' 

वि . सू .: मला ठाऊक आहे आज मी जे लिहिलं आहे त्यानं तुमचं औत्सुक्य भलतंच वाढलेलं असणार . गायतोंडे यांची ' ती ' प्रेयसी म्हणजे कोण ? असा प्रश्न तुम्हाला सतत सतावत राहणार . पण मला याविषयावर आणखी काहीही सांगायचं नाही किंवा त्यांचं नाव तर कधीच उघड करायचं नाही . हे सारं वाचल्यावर फेसबुकवर ' म्हणजे त्या ' त्या ' का ? ' ' त्यांचं नाव अमुक का ? ' ' तमक्याविषयी तुम्ही लिहिलंय का ? ' असल्या भोचक कमेंटस करून आपल्याला सारं ठाऊकेय असंही कृपया कुणी सूचित करण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती . तसं पाहिलं तर आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी कुठं आपल्याला कळत असतात ? ही पण आणखीन एक न कळणारी गोष्ट समजायचं अन कामाला लागायचं . आयुष्यातल्या काही गोष्टी या अव्यक्तच राहायला हव्यात . नाही का ? 


***  

या ग्रंथाची ३००० रु किंमतीची कलेक्टर्स एडिशन प्रकाशनाआधीच बुक झाली आहे .
म्हणूनच ' जनआवृत्तीची ' तुमची प्रत आज नाही आत्ताच बुक करा .
सवलत योजना संपायला आता फक्त सहाच दिवस शिल्लक राहिलेत . 
९००४० ३४९०३ या नंबरवर ' Gai - Jan ' या संदेशासह 
तुमचा नाव , पत्ता आणि ई मेल आयडी पाठवा 
आणि ५०० ची जनआवृत्ती प्रकाशनपूर्व सवलत योजनेमध्ये फक्त ३५० मध्ये घरपोच मिळवा .

No comments:

Post a Comment