सुनीलला फोन केला तेव्हा तो
नुकताच व्हेनिसहून परतला होता.पण तरीही त्यानं माझा फोन घेतलाच.म्हणाला ' तुलाच आता फोन करणार
होतो.पण तुझाच फोन आला.बोल ! ' म्हटलं ' तूच बोल,मी काय बोलणार ? ' कार्यक्रम कसा झाला ते
सांग आधी ! तर तो म्हणाला ' मस्त
' एकदम
छान.खूप चांगली व्यवस्था केली होती त्यांनी.आणि आयोजनदेखील सुरेख केलं होतं.म्हटलं
किती लोकं होती शोला ? तर
म्हणाला थिएटर भरलंच होतं.फिल्म साऱ्यांना आवडली ? तर म्हणाला ' असावी '. शो संपल्यावर खूप लोकं
भेटायला आली होती.अनेकांनी माझ्या नव्या प्रोजेक्टविषयी चौकशी केली.मी काय करतोय
किंवा काय करणार आहे ? याविषयीदेखील
आडून आडून विचारणा होत होती.अनेकांनी भेटीचं निमंत्रण दिलं.तर काहीजण मला भेटायला
पेरिसला येणार आहेत.आणखीन बरंच काही सुनील सांगत होता.पण ते सारं इथे कोट करणं
योग्य नव्हे.
सुनीलला मी जेजे स्कूल ऑफ
आर्टमध्ये असल्यापासून ओळखतो.त्या काळात तो गाडी घेऊन जेजेला यायचा.पण जेजेतल्या
शिक्षणाविषयी तो फारसा समाधानी नव्हता.त्यामुळे त्याने जेजेचं शिक्षण अर्ध्यावरच
सोडलं.आणि थेट पेरीसला गेला.तो कालखंड १९७८-१९८० चा असावा.यावरून त्याची धाडसी
वृत्ती लक्षात यावी.पेरिसमध्ये तो हेटरच्या स्टुडियोत ग्राफिक शिकायला गेला.तिथं
त्याला पिकासोची (बहुदा शेवटची) बायको जेकलीन भेटली.तिने त्याचं काम पाहून त्याला
अमेरिकेत येऊन तिच्या स्टुडियोमध्ये काम करण्याची ऑफर दिली.पण अमेरिकेने व्हिसा
नाकारल्याने त्याला तिथे जाता आले नाही.नंतर त्याने पेरिसच्या फिल्म
इन्स्टीटयूटमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स केला.तिथं तो काय शिकला असेल ते त्याची ' गायतोंडे ' यांच्यावरची २७
मिनिटांची फिल्म पाहिल्यावरच कळतं.
ती फिल्म बनवल्यालाही झाली आता
तब्बल २० वर्षे.मधल्या काळात त्याने जगण्यासाठी काय काय केलं ते सारंच्या सारं मला
ठाऊक आहे.या फिल्म नंतरच खरंतर त्याची माझी दोस्ती झाली.मुलुंडमध्ये जिथं मी वीस
वर्ष राहिलो.तिथून अगदी जवळच,पण ठाण्यात त्याचं घर होतं.सहाजिकच पेरिसवरून आल्यावर
पहिला यायचा तो माझ्याकडेच.आणि मग नंतर गप्पा टप्पा,खाणं पिणं,हास्यविनोद वगैरे
वगैरे.हा क्रम मी आता ठाण्यात त्याच्या घरापासून अगदी दूर राहायला आल्यावरदेखील
बदललेला नाही.
सुनीलची नजर तीक्ष्ण आहे.अत्यंत
बारकाईने तो आजूबाजूचं सारं टिपत असतो.तो घरी आला असताना टीव्हीवर एखादा चित्रपट
चालू असेल,तर
त्यावर तो जे काही बोलतो,केमेरा
कसा मुर्खासारखा लावलाय,लाईटींग
कशी गाढवासारखी केलीय वगैरेवर आपली जी अभ्यासपूर्ण मतं व्यक्त करतो ती खरोखरंच ऐकत
राहावी अशीच असतात.त्यावरून त्याची या माध्यमावरची ताकद कळते.जागतिक राजकारणावर
विशेषतः अर्थकारणावर त्यानं केलेलं भाष्य विलक्षण अर्थपूर्ण असतं.गेल्या १५ वर्षात
आर्थिक जगात ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या त्याविषयी त्यानं मला आधीच सांगितलं
होतं.आणि तसंच नंतरच्या काळात घडलं होतं.सहाजिकच आमच्या गप्पा प्रचंड रंगतात.
कालही तो भारतात लवकरच येणार आहे
असं म्हणाला.मी खरोखरंच त्याची वाट पाहतो आहे.कारण,त्याच्या ' गायतोंडे ' फिल्मचं न्यूयॉर्क आणि
व्हेनिसमध्ये कसं स्वागत झालं ते मला त्याच्याच तोंडून ऐकायचंय.अर्थात स्कायपीमुळे
मला ते इथं भारतात बसूनही ऐकण्याची सोय झाली आहे.पण प्रत्यक्ष ऐसपैस बसून,खातपित(विशेषतः पित)
सुनीलच्या जगण्याचे भन्नाट किस्से ऐकणे हा आनंद काही औरच आहे.आणि मुख्य म्हणजे
ज्या ' गायतोंडे
' यांच्यामुळे
आम्हा दोघांची विशेष मैत्री जमली त्या गायतोंडे यांच्यावरच्या ग्रंथाच्या प्रकाशन
समारंभात त्याला मला सहभागी करून घ्यायचंय.जमलंच तर त्या फिल्मचं स्क्रीनिंगदेखील
करायचं आहे.(पण आता ते कितपत शक्य आहे याविषयी मात्र मी साशंक आहे,पण एवढं मात्र नक्की की
तो प्रकाशन समारंभाला निश्चितपणे हजर राहणार आहे.परवा फोन ठेवताना त्यानं मला तसं
आश्वासनही दिलं आहे.
No comments:
Post a Comment