Sunday, January 3, 2016

गायतोंडे यांच्या पेंटिंगचा आणखीन एक विक्रम… आणि त्यांच्यावरील ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाची जाहीर घोषणा…

ख्रिस्तीजच्या काल रात्री मुंबईत झालेल्या तिसऱ्या जागतिक लिलावात गायतोंडे यांच्या चित्रानं पुन्हा एकदा विक्रमी बोली पटकवण्याचा मान मिळवला आहे . त्यांचं १९९५ सालातलं पेंटिंग तब्बल २९ कोटी ३० लाख २५ हजार इतक्या विक्रमी किंमतीला विकलं गेलं आहे . या विक्रमी बोलीनं भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रातले आजवरचे सारेच विक्रम मोडीत निघाले आहेत . या भारतीय चित्रकलेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या घटनेच्या निमित्ताने ' चिन्ह ' आणखीन बरोब्बर ४५ दिवसांनी होणाऱ्या त्यांच्यावरील कोणत्याही भाषेत पहिला ठरू शकेल अशा महत्वाकांक्षी ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाची घोषणा करू इच्छिते . त्यांच्यावरील ग्रंथाचा पहिला मान मराठी भाषेला मिळतोय याचा आम्हाला अभिमान आहे .


चित्रकार गायतोंडे यांना ज्यांचं गाणं विशेष प्रिय होतं त्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याच हस्ते दि ३० जानेवारी २०१६ रोजी मुंबईत ' चिन्ह ' चा महत्वाकांक्षी ग्रंथ ' गायतोंडे ' प्रसिद्ध होणार आहे . गायतोंडे यांच्या प्रती दिली जाणारी आदरांजली असं या कार्यक्रमाचं स्वरूप राहणार असून या ग्रंथाचे संपादक ' चिन्ह ' चे सतीश नाईक , गायतोंडे यांना गुरुस्थानी मानणारे प्रख्यात चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ , दिल्लीतल्या दहा वर्षाच्या वास्तव्यात ज्यांच्याशी गायतोंडे यांचे स्नेहबंध निर्माण झाले होते ते नामवंत आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे , गायतोंडे यांचे गोवेकर आप्त शांताराम वर्दे वालावलीकार आणि ज्यांची चित्रं गायतोंडे यांना विशेष आवडत व ज्यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे ते चित्रकार प्रभाकर कोलते तसेच हा ग्रंथ अत्यंत दिमाखदारपणे प्रसिद्ध होण्यास ज्यांनी विशेष सहकार्य दिलं ते ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत . याप्रसंगी डॉ प्रिया जामकर या ग्रंथातील निवडक वेच्यांचे अभिवाचन करणार आहेत तर प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत .


2 comments: