गायतोंडें यांच्या व्हेनिसमधल्या
प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पेरिसहून सुनील काळदातेंचा फोन जेव्हा आला तेव्हा तो
बोलता बोलता मला म्हणाला " गायतोंडें यांच्या ग्युगेंनहेम शोविषयी
वृत्तपत्रात वाचून एक नव्वदीचा म्हातारा एके दिवशी म्युझियममध्ये आला आणि काही
निगेटिव्ह दाखवून म्हणाला " १९६५ साली रॉकफेलर शिष्यवृत्ती घेऊन गायतोंडे
नावाचा एक तरुण चित्रकार न्यूयॉर्कमध्ये आला होता.त्यावेळी त्याचे फोटो काढायची
संधी मला मिळाली होती.फोटो अर्थातच ब्लक अण्ड वाईट होते.पण का कुणास ठाऊक त्या
निगेटिव्ह मी जपून ठेवल्या होत्या.तुमच्या शोविषयी वृत्तपत्रात वाचलं आणि त्या
निगेटिव्ह मी शोधून काढल्या.६५ साली

ज्याचं शूट मी केलं होतं तोच हा चित्रकार तर
नव्हे
?
असेल तर
त्या निगेटिव्हज आता तुम्ही घेऊन ठेवा कदाचित त्या तुमच्या उपयोगात येतील,असं म्हणून ५० वर्षापूर्वीच्या निगेटिव्हस
त्यांच्या हाती सोपवून तो नव्वदीचा म्हातारा निघून गेला.
या साऱ्या प्रकारानं या शोची क्युरेटर
सांधिनी पोतदारला किती आनंद झाला असेल हे मी समजू शकतो.कारण या शोच्या निमित्तानं
सांधिनी मलासुद्धा भेटून गेली होती.तेव्हा माझ्याकडचा गायतोंडेंचा खजिना पाहून
तिला किती आनंद झाला होता हे मी स्वतः अनुभवलं आहे.त्यामुळेच गायतोंडे यांचे
अत्यंत दुर्मिळ फोटोग्राफ अचानक हे असे हाती आल्यावर त्यांचं काय झालं असेल याची
मी चांगलीच कल्पना करू शकतो.
गायतोंडे ग्रंथासाठी त्यांचे एक एक फोटोग्राफ
मिळवताना मी किती खस्ता खाल्ल्या आहेत,किती कष्ट उपसले,किती मानहानीचे प्रसंग अनुभवले ते माझं मलाच
ठाऊक.माझ्या संग्रहात असलेल्या गायतोंडे यांच्याविषयीच्या शे सव्वाशे कात्रणातून
ज्या ज्या फोटोग्राफरचे संदर्भ मला मिळाले त्या त्या साऱ्यांशीच मी संपर्क
साधला.पण प्रत्येक ठिकाणाहून नकारघंटाच ऐकावयास मिळाल्या.कुणी कामाच्या नाहीत
म्हणून निगेटिव्ह नष्ट केल्याचं सांगितलं,तर कुणी सापडत नाहीत म्हणून कांगावे केले.तर अनेकांनी त्या नोकरी सोडताना
ऑफिसमधेच टाकून दिल्याचं सांगितलं.आणि इथे तर एक नव्वदीतला म्हातारा चालवत नसताना
थरथरत येतो आणि स्वतःच्या हातानी निगेटिव्हस देऊन टाकतो.दोन संस्कृतींमधला केवढा
हा फरक.यावर काही बोलणं किंवा लिहिणं हा आपणच आपल्याला त्रास करून घेणं आहे
म्हणूनच ते टाळतो.
सुनीलनं काढलेल्या
गायतोंडेंच्या फोटो संदर्भातला किस्साही असाच भयंकर आहे.पण त्याविषयी मी इतक्यात
काही सांगू इच्छित नाही.सुनील सांगत होता ग्युगेंनहेमने एका दालनामध्ये या सर्व
फोटोंच्या प्रिंट्स मारून त्या प्रदर्शित केल्या आहेत.त्यातलेच दोन फोटो परवा
सुनीलनं माझ्यासाठी पाठवले.बहुदा गायतोंडे यांच्या शोच्या प्रसिद्धीसाठी
ग्युगेनहेमने ते प्रसारित केले असावेत.फोटो खरोखरच अप्रतिम आहेत.गायतोंडे त्या काळातदेखील
किती आधुनिक विचारांचे होते.त्याचंच दर्शन त्या फोटोतून घडतं.काळ्या रंगाविषयीची
त्यांना असोशी पाहून मला गायतोंडे ग्रंथातला आणखीन एक दुर्मिळ फोटो मला आठवतो.१९४८
साली जेजेची टूर उदयपूरला गेली होती.त्या टूरमध्ये कोणीतरी गायतोंडेना पोझ द्यायला
सांगितलं.काळा गोल गळ्याचा मॉड टी शर्ट घातलेले गायतोंडे आजच्या काळातदेखील फिट
वाटतील असे दिसतात.सुनीलने पाठवलेले ब्रूस फ़्रिश यांचे ते दोन्ही फोटोग्राफ मी इथं
शेअर करतोय.आणि त्याच फोटोसोबत रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवून गायतोंडे अमेरिकेत गेले
तेव्हा झालेल्या सत्कार समारंभाचे फोटोदेखील सोबत देतोय.कसे वाटले जरूर कळवा.
No comments:
Post a Comment