Sunday, January 3, 2016

' गायतोंडे ', ' सुनील काळदाते ' आणि बरेच काही…


गेल्याच आठवड्यात सुनीलशी माझं बोलणं झालं.सुनील म्हणजे सुनील काळदाते.ज्यानं गायतोंडे यांच्यावरची एकमेव बहुचर्चीत फिल्म दिग्दर्शित केली तोच हा महाभाग.तो पेरीसला असतो.जेजेत तो मला एक वर्ष ज्युनियर होता.जेजेत शिकत असतानाच त्याची एक दिवस काय सटकली कुणास ठाऊक ! तो उठला आणि जेजेचा अभ्यासक्रम सोडून थेट पेरीसला गेला.तेव्हापासून तो पेरीसलाच आहे.या गोष्टीलाही आता तब्बल ३५ वर्षे झाली आहेत.या ३५ वर्षात पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं आहे.
या ३५ वर्षात पेरीसमध्ये त्यानं नेमकं काय केलं ते सारंच्या सारं अगदी त्यानं सांगितलं तसं आत्मकथनाच्या स्वरुपात आम्ही ' चिन्ह ' च्याच खूप गाजलेल्या ' गायतोंडेच्या शोधात…' विशेषांकात प्रसिद्ध केलं.' गायतोंडेच्या शोधात…' विशेषांकाचं ते एक आणखी विशेष आकर्षण ठरलं.जे तो जगला,जसा तो घडला ते ते सारंच्या सारं त्यानं अतिशय प्रांजळ शब्दात मांडलं होतं.साहजिकच कलाक्षेत्रात (आणि त्यांचा घरातही) एकच खळबळ उडाली.ते वाचून त्याला भेटायची उत्सुकता भारतातल्या अनेक जणांच्या मनात निर्माण झाली.कितीतरी जण (आणि जणीसुद्धा) त्याला थेट पेरीसमध्ये जाऊन भेटले.हे सारं मला कसं ठाऊक,तर त्यातला अनेक जणांनी माझ्याकडूनच त्याचे फोन आणि ईमेल आयडी घेतले होते.
हे इतकं सारं वाचल्यानंतर साहजिकच आहे तुमच्याही मनात सुनीलविषयी प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं असणार.पण ज्या अंकात सुनीलचं आत्मकथन प्रसिद्ध झालं होतं,त्या अंकाची एकही प्रत आता माझ्यापाशी शिल्लक नाही.एकमेव ऑफिस कॉपी होती तीसुद्धा कुणीतरी झेरॉक्स मारून आणून देतो असे सांगून लांबवली.त्यामुळे कृपा करून कुणीही त्या अंकाची मागणी करणारे फोन मला करू नयेत ही नम्र विनंती.
सुनीलचं ते गाजलेलं आत्मकथन ' निवडक चिन्ह ' च्या पाचव्या खंडात,म्हणजे 
'
चिन्ह' मधून गाजलेल्या आत्मकथनाच्या खंडात नक्की प्रसिद्ध होणार आहे.हा खंड दुसऱ्या टप्प्यात पुढीलवर्षी म्हणजे २०१६ च्या पूर्वार्धात प्रसिद्ध होईल.(जाता जाता): या आत्मकथनाच्या खंडानंतर ' निवडक चिन्ह ' मालिकेतला शेवटचा ' भास्कर कुलकर्णी' यांच्यावरचा खंड प्रकाशित होईल.आणि हे सगळे उरस्फोड करणारे जीवघेणे ग्रंथ प्रकाशित करून मी जिवंत राहिलोच तर माझ्या सर्वात आवडीचा विषयावर म्हणजेच ' राजा रवि वर्मा ' वर ' निवडक खंड ' चा शेवटचा खंड प्रकाशित करून मी माझी प्रकाशकीय कारकीर्द थांबवेन.असो
आणखी एक सांगायचं राहून गेलं ज्या कुणाला हे सारं वाचून सुनीलवरचा तो गाजलेला लेख वाचायची अतीव इच्छा झालीच तर ' चिन्ह ' च्या संकेतस्थळावरhttp://www.chinha.co.in/images/archives/…/Artical%2021th.pdf या लिंकवर क्लिक करा आणि आधी सुनीलवर लिहिलेला नितीन दादरावालाचा लेख वाचा आणि नंतर सुनीलचं आत्मकथन अवश्य वाचा.
खरंतर सुनीलवर आणखी खूप लिहायचं होतं पण हे लिहित असतानाच स्काईपवर सुनीलचा फोन वाजतोय.आज बहुदा लवकर उठलेला दिसतोय.त्याचा फोन आलाय म्हणजे माझा अर्धा एक तास गेलाच म्हणून समजायचं त्यामुळे आता मी थांबतो आणि उद्या बाकीचं सारं लिहितो.त्याने केलेल्या ' गायतोंडे 'च्या वरच्या फिल्मनं अक्षरशः युरोपात धमालच उडवून दिली आहे.ते सारं उद्या सांगतो.तोपर्यंत वरच्या लिंकवरचा त्याचा लेख वाचायला विसरू नका.
' गायतोंडे ' ग्रंथाचा प्रोमो-ट्रेलर पाहण्यासाठी आणि ग्रंथाच्या निर्मितीची चित्तचक्षु चमत्कारिक कथा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.co.in/marathi/index.html 

No comments:

Post a Comment