Sunday, January 3, 2016

'गायतोंडे' : आणखी एक विक्रमी लिलाव...




गेल्या आठवडयात कुरियरने एक जाडजूड पाकीट घरी आलं. पाकिटाच्या कागद आणि छपाईवरून ते भारतातून आलेलं नाही हे लक्षात आलं. उत्सुकतेनं मागे पाहिलं तर ते चक्क Gloucestershire इथून आलं होतं. वर नाव होतं जगप्रसिद्ध लिलाव कंपनी "Bonhams"चं. उत्सुकतेनं उघडून पाहिलं तर आत एक सुंदर कॅटलॉग होता. आणि त्या कॅटलॉगच्या मुख आणि मलपृष्ठावर चित्रं होती गायतोंडे यांची कधीही न पाहिलेली. क्षणभर काही कळेचना. मग लक्षात आलं काही दिवसापूर्वी फेसबुकवर गायतोंडेंच्याचं पेजवर एक मेसेज आला होता Edward Wilkinson यांचा. आणि त्यांनी माझा पत्ता मागितला होता. लागलीच त्यांना तो मी पाठवलादेखील. आणि आता तो कॅटलॉग त्यांनी मला पाठवला होता. गायतोंडे पेजवर लिहू लागल्यापासून जगभरातून अनेक म्युझियम्स, नियतकालिकं, गेलऱ्या आणि लिलाव कंपन्या सातत्याने 'चिन्ह'च्या संपर्कात आल्या आहेत.
हा कॅटलॉग अप्रतिम आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि आतसुद्धा गायतोंडे यांची कधी न पाहिलेली असंख्य ड्रोईंग्स आणि दोन कॅनव्हास असा भरगच्च ऐवज त्यात आहे. गायतोंडे यांचं १९६१ सालातलं हे सारं वर्क आहे. ते पाहून गायतोंडे यांच्या प्रतिभेनं अक्षरशः थक्क व्हायला होतं. Morris Graves यांच्या संग्रहातली ही सर्व चित्रं होती. १९६३ साली ते इंदिरा गांधी यांच्या निमंत्रणावरून भारतात आले होते. तेव्हा ते पंतप्रधान नेहरूंनादेखील भेटले आणि नंतर पुप्पूल जयकर यांच्यासोबत त्यांनी मुंबईत येऊन गायतोंडे यांच्या स्टुडिओला भेट दिली होती. त्याच भेटीत त्यांनी ही सर्व चित्रं दस्तुरखुद्द गायतोंडे यांच्याकडूनच खरेदी केली होती. त्यावेळी न्यूयॉर्कच्या Willard Gallery च्या Dan & Mariam Jhonson यांना एक Aerogram लिहिला होता. त्यात ते म्हणतात, 
"The second thing is this, today Mrs. Jayakar took me to the studio of a Bombay painter GAITONDE - age-39 & one of the finest painters I have ever seen. He is very little known. He's as fine - or superb - as Mark Rothko at his best. He paints in oil - average size 34" x 26" - 38" x 48" - 5ft. x 4ft. a fine person and will be a world - known painter one of these days. You should be the ones to show him first. I told Mrs. Jayakar so. She agreed. Said she'd help. He is 100 percent 1 superb oil & six super - super ink drawings. He is an abstract painter with something unspeakably beautiful & clean added. They are the most beautiful landscapes of the mind plus light and composed with great simplicity. You too will be very awed by him...
आणि आता तब्बल ५१ वर्षानंतर Morris Graves यांचे ते शब्द जसेच्या तसे खरे झालेले दिसतायत. ५१ वर्षानंतर "Bonhams"च्या परवाच्या लिलावात आलेल्या गायतोंडे यांच्या या साऱ्या चित्रांनां ७ लाख २७ हजार पाऊंड इतकी भरभक्कम किंमत आली आहे.
या कॅटलॉगचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे यातली सर्वच्या सर्व चित्रं अतिशय सुरेख पद्धतीने या कॅटलॉगमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या सोबत जो मजकूर लिहिला गेला आहे तो देखील अतिशय वाचनीय आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे गायतोंडे यांना प्रचंड मानत आणि गायतोंडे यांनादेखील ज्यांची चित्रं आवडत त्या चित्रकार प्रभाकर कोलते यांचे गायतोंडे यांच्याविषयीचे अवतरण या कॅटलॉगमध्ये अगदी ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आलं आहे. गायतोंडे यांच्या चाहत्यांनी हा कॅटलॉग पाहायलाच हवा एवढा तो अप्रतिम आहे. आता ७ लाख २७ हजार पाऊंड म्हणजे किती रुपये याचा हिशोब मात्र ज्याचा त्यानेच करायचा.
यातली निदान दोन चित्रं तरी गायतोंडे ग्रंथात जायला हवीत असं मनापासून वाटत होतं, पण आता ते शक्य नाही कारण मराठी ग्रंथाचं काम आता पूर्ण झालं आहे. इंग्रजी आवृत्ती प्रसिध्द झाली तर त्यात ती चित्रं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जर मराठी ग्रंथाची दुसरी आवृत्ती निघाली तर मात्र त्यात ही चित्रं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.


No comments:

Post a Comment