Sunday, January 3, 2016

'गायतोंडे' ग्रंथाच्या संपादकीयाची गोष्ट… भाग १


'गायतोंडे' ग्रंथाचं काम आवरत आलं होतं. सुमारे ७-८ महिन्यापूर्वीची ही गोष्ट. संपादकीय सर्वात शेवटी लिहायचं असं मनाशी आधीच निश्चित केलं होतं. साहजिकच गायतोंडे यांची दुर्मिळ प्रकाशचित्रं आणि त्यांच्या त्याहूनही दुर्मिळ पेंटिंग्जची प्रकाशचित्रं मिळवतांना निर्माण झालेल्या ताणतणावातून सुटका झाल्यावरच मी संगणकाच्या कि-बोर्डला हात लावला. आधी पाच पानं संपादकीय लिहायचं असं ठरलं होतं. मग पाचाची सहा, सहाची सात पाने झाली आणि सरतेशेवटी ग्रंथाची आठ पानं संपादकीयासाठी सोडली.
लिहून झालेलं संपादकीय आमचे मित्र पद्माकर कुलकर्णी यांना दाखवलं. या ग्रंथाच्या स्वरूपाविषयी सुरुवातीपासूनच त्यांच्याशी वरचेवर चर्चा होत होत्या. साहजिकच लिहिलेलं त्यांना दाखवणं क्रमप्राप्तचं होतं. त्यांनी ते वाचलं आणि काही सूचना केल्या. हे हवं ते नको, असं हवं तसं नको वगैरे. त्या मलाही पटल्या आणि मग पुन्हा नव्याने लिखाण सुरु केलं जे कसं वाढत गेलं ते माझं मला नेमकं कधी कळलंच नाही. त्यांनी आणखीन एक सूचना केली म्हणाले हे सारं सुनील कर्णिकांना दाखवा.
अशा रितीने सुनील कर्णिक या सगळ्या प्रक्रियेत आले. खरं तर त्या आधी ग्रंथाच्या भाषेसंदर्भात मुद्रितांसंदर्भात त्यांचा सल्ला मी घेतच होतो. पण संपादकीयासंदर्भात त्यांचा सल्ला घेण्याची कल्पना मला आवडून गेली. लिहिलेलं संपादकीय वाचलं आणि त्यांनी भली थोरली यादीच माझ्या हातात ठेवली आणि म्हणाले या यादीत सुचवलेल्या गोष्टी जर संपादकीयात आल्या तर आणखीन मझा
येईल.
आणि मग मी लिहीतच सुटलो. ते वाचणाऱ्याला वाचतांना मझा येईल की नाही याची मला कल्पना नाही. पण लिहितांना मात्र मी तो मझा लुटत गेलो. कर्णिकांनी इतक्या वर्षाच्या त्यांच्या अनुभवातून केलेल्या त्या सूचना अत्यंत महत्वाच्याच ठरल्या. तोपर्यंत गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीच्या ताण्याबाण्यातून मी पुरेसा तावून सुलाखून निघालो होतो. साहजिकच घडलेलं सारं आठवून लिहितांना मी एक प्रकारे पुनःप्रत्ययाचा आनंदच घेतला.
हे सारं लिहितांना कर्णिकांसोबत सात आठ वेळा तरी बैठका झाल्या. त्या प्रत्येक बैठकीमधून काहीना काही चांगलं उलगडत गेलं आणि माझं लिखाण पुढं पुढं सरकत गेलं. आता काही लिहिण्यासारखं उरलं नाही असं जेव्हा मला वाटल तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं की संपादकीय लिखाणाचं हे सारं प्रकरण सुमारे २० हजार शब्दांच्याही बाहेर गेलंय. बापरे ! आता हे सारं ग्रंथात घालायचं तरी कसं या विचारानं मला अक्षरशः दरदरून घाम फुटला. पण त्याविषयी अधिक वाचा पुढील भागात.
'गायतोंडे' ग्रंथाच्या निर्मितीची कथा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.http://www.chinha.co.in/p…/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf

'गायतोंडे' ग्रंथाचा प्रोमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.http://www.chinha.co.in/promo/Webdesign.pdf

No comments:

Post a Comment