Sunday, January 3, 2016

" गायतोंडे पेंटिंग " आणखी एक नवा वाद…


गायतोंडे त्यांच्या हयातीतच अनेक आख्यायिका आणि दंतकथांचे नायक झाले होते.असं भाग्य कुणाच भारतीय चित्रकाराला अद्यापि लाभलेलं नाही.तोच सिलसिला गायतोंडेच्या पश्चातदेखील तसाच चालू राहिला आहे.त्यांचं प्रत्येक पेंटिंग हे नव्या नव्या आख्यायिकांना,दंतकथांना आणि वादांनादेखील जन्मला घालू लागलं आहे.आता आजच्याच मुंबई मिररमधली स्टोरी पाहा ना.http://www.mumbaimirror.com/…/The-…/articleshow/50114565.cms
दुर्गादेखील आमच्या जेजेचीच.मला काही वर्ष ज्युनिअर होती.ती मुळची ठाण्याचीच.लग्न झाल्यावर दिल्लीला गेली.चित्र काढण्याखेरीज चित्रकलेसंबंधीचे अनेक चांगले उपद्याप ती करीत असते.तिचं स्वतःचं छानसं कलेक्शन आहे.मुख्य म्हणजे त्यात गायतोंडे यांची चित्रं आहेत.यावरून तिच्या संग्रहाचा दर्जा लक्षात यावा.
मुंबई मिररच्या स्टोरीमध्ये दुर्गाच्या संग्रहात असलेल्या गायतोंडे यांच्या पेंटिंगवरची जी स्टोरी प्रसिद्ध झाली आहे.तिचा पूर्वार्ध तिनं मला दीड दोन वर्षापूर्वी सांगितला होता.आणि तेव्हा तिनं त्या चित्रांविषयी काही भीती माझ्यासमोर व्यक्त केली होती.ती बहुदा खरी ठरली असावी असे मुंबई मिररची स्टोरी वाचून वाटते.आता नक्की काय होणार,ख्रिस्तीजवाले काय करणार,दुर्गाचं पुढलं पाऊल काय असेल,याविषयी मला निश्चितपणे कुतूहल वाटतं.
मी " गायतोंडे " यांच्यावरचं पुस्तक करतोय हे ऐकून ती दिल्लीहून खास मला भेटायला आली होती.ती गायतोंडे यांना प्रत्यक्ष भेटलेली.त्यामुळे तिला भेटायलादेखील मी खूप उत्सुक होतो.चांगले तीन चार तास आम्ही गप्पा मारीत होतो.त्या गप्पांमधून तिने सांगितलेल्या अनेक गोष्टी अचंबित करून गेल्या होत्या.दुर्गा अस्सल पंजाबन आहे.त्यात दिल्लीत राहिलेली त्यामुळे सगळा हिशेब रोखठोक.तिनं जे काही सांगितलं ते मी आता इतक्यात उघड करू इच्छित नाही.प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते.पण तिच्या संग्रहातलं गायतोंडे यांचं पेंटिंग मात्र गायतोंडे ग्रंथात मी आवर्जून घेतलंय.आणि तिने सांगितलेल्या काही भन्नाट गोष्टीसुद्धा " गायतोंडे : न संपणाऱ्या शोधाच्या कहाणी…" मध्ये मी घेतल्या आहेत.हवं तर ' चिन्ह ' च्या वेबसाईटवर ठेवलेल्या PDF फाईलमधून तुम्ही त्या वाचू शकता.
आठ पंधरा दिवसापूर्वीच दुर्गाचा मला फोन आला होता.प्रकाशनाची तारीख नक्की झाली की कळवायला विसरू नकोस म्हणून.आता तारीख नक्की झाली आहे ३० जानेवारी २०१६.बहुदा उद्या किंवा परवा मी तिला फोन करेन आणि या बातमीवर तिनं जर काही भाष्य केलं तर पुन्हा नक्की लिहेनच.


No comments:

Post a Comment