Friday, February 5, 2016

' गायतोंडे ' ग्रंथ आहे तरी कसा ?



' गायतोंडे ' ग्रंथ म्हणजे नक्की काय आहे ? चित्रकलेवरचं पुस्तक का चित्रकाराचं चरित्र ? असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो . मला वाटतं की या दोन्ही चष्म्यातून या ग्रंथाकडे पाहिलं जाऊ नये . कारण त्यात पानोपानी चित्र आहेत पण म्हणून तो चित्रकलेवरचा ग्रंथ आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यात चित्रकाराच्या म्हणजे इथं गायतोंडे यांच्या सत्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात घडलेले सारेच महत्त्वाचे प्रसंग नोंदले गेले आहेत, पण म्हणून त्याला काही चरित्र ग्रंथ म्हणता येणार नाही. 

हा एक अभिनव प्रयोग आहे . पण प्रयोग असा शब्द वापरला म्हणून कुणी दचकून जाण्याची गरज नाही . 

पेंटिंगखेरीज स्वतःचा कुठलाच आगापिछा न ठेवलेल्या अगदी आपल्या आसपासही कुणालाच कधी फिरकू न देणाऱ्या चित्रकार गायतोंडे यांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर ज्या काही मोजक्या व्यक्ती आल्या अन नंतर दूरही निघून गेल्या अशा साऱ्यांनी आपल्याला भावलेले गायतोंडे कसे होते हे  सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या खटाटोपातून 'गायतोंडे ' यांच्या ज्या कॅलिडोस्कोपिक प्रतिमा उभ्या राहिल्या त्याचं दर्शन म्हणजे हा ग्रंथ . हा ग्रंथ म्हणजे  रूढार्थानं चरित्र नव्हे असं जे मी म्हणतो ते म्हणूनच . 
त्यांच्या आयुष्यातल्या  सर्वच घटना या ग्रंथात गुंफण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण त्यात सर्वसाधारणपणे  चरित्र ग्रंथात असतो तसा बालपणापासून ते मोठे  होण्याचा काळ क्रमशः चित्रित करण्याचं मात्र टाळलं आहे . त्यामुळे चरित्रांचं वाचन करताना सर्वसाधारणपणे वाचक बालपणीच्या  तपशीलाची पानं  वगळत हटकून पुढे जातो तसं इथं होण्याची शक्यता नाही . 

' गायतोंडे ' यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या बहिणीच्या प्रदीर्घ लेखानं या ग्रंथाची सुरूवात होते . तो वाचत असतानाच वाचक गायतोंडे यांच्या लोकविलक्षण जगण्यानं आणि सर्वसाधारण माणसं ज्याला विक्षिप्त असं म्हणतात तशा काहीशा वागण्यानं अक्षरशः दबकून जातो .बापरे , एखादा कलावंत असा जगू शकतो? वागू शकतो? अशा प्रश्नांनी तो अस्वस्थ होतो . 

अन मग जसजसा वाचक या ग्रंथात पुढं पुढं जात राहतो तसतशा गायतोंडे यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीदेखील वाचकाला भेटत राहतात आणि  आपआपल्या जाणीव नेणीवेतून  आपल्याला स्वतःला भावलेले गायतोंडे शब्दबद्ध करीत राहतात . 

सर्वसाधारणपणे चरित्रात असतो तसा चरित्र लेखक नावाचा प्राणी या संपूर्ण ग्रंथात अनुपस्थित असल्याने आणि गायतोंडे यांचे आप्त , मित्र , स्नेही हे स्वतःच गायतोंडे यांच्याविषयी भरभरून व  अत्यंत प्रांजळपणानं सारं काही सांगत असल्याने त्या संवादात तो  अक्षरशः अडकून पडतो . सोबतीला प्रत्येक पानाआड गायतोंडे यांची पेंटिंग्ज ज्यांची किंमत जगाच्या बाजारात आज कोट्यवधी डॉलर्स मध्ये केली जाते ती पेंटिंग्ज पहावयास मिळत असल्याने तो अक्षरशः थिजून जातो . 

 ' गायतोंडे ' ग्रंथाचं जे काही अनोखंपण , वेगळंपण आहे ते यातच आहे . अर्थात हे आमचं मत आहे . हे सारं उभं करताना हेच नेमकं  आम्ही योजल  होतं आणि पुढं  असंच ते सारं घडत गेलं . ३० जानेवारी नंतर तुम्ही तुमचं मत इथं देखील नोंदवू शकता .  

No comments:

Post a Comment