Thursday, June 5, 2014

होय, ही गायतोंडे यांचीच सारी चित्र आहेत …


ही सर्वच्या सर्व चित्र गायतोंडे यांची आहेत. आश्चर्याचा धक्का बसला ना हे वाचून ? पण खरोखरच ही सारीच्या सारी चित्र गायतोंडे यांचीच आहेत. जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ते शिकत होते तेव्हा काढलेली. म्हणजे साधारणपणे १९४७ ते १९५० -५१ सालातली. गायतोंडे ही सारी चित्र फेकून द्यायला निघाले होते. नंतर काय झालं ? 



" गायतोंडे " ग्रंथात तो साराच किस्सा विश्वास यंदे यांनी सांगितला आहे. आता हे विश्वास यंदे कोण ? असा प्रश्न तुम्ही साहजिकच विचाराल. तर तेच आधी सांगतो. फार पूर्वी म्हणजे १९०० च्या पूर्वार्धात मुंबईतून ' इंदुप्रकाश ' नावाचं एक दैनिक प्रसिद्ध होत असे. हें दैनिक या विश्वास यंदे यांच्या आजोबांनी सुरु केलं होतं. ' काळ ' कर्ते शि परांजपे, आणि ' नवाकाळ ' कर्ते खाडिलकर या सारख्या दिग्गजांनी याच इंदुप्रकाश मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तरअसे हे यंदे जे जे स्कूल मध्ये लागले ते क्लार्क म्हणून. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी जेजेमध्ये पार्ट टाइम शिक्षण घेतलं क़्लर्कचे ते नंतर जेजे चे लायब्ररीयन झाले. आणि मग थेट जेजेत कलाशिक्षक. सध्या कला शिक्षक पदावरून निवृत्त होता होता फाईन आर्ट विभागाच्या विभाग प्रमुखपदापर्यंत त्यांनी मजल मारली. मी जेव्हा जेजेत शिकायला होतो तेव्हा ते विभाग प्रमुख होते. हे सारे विस्ताराने अशासाठी दिले कारण याच यंदे यांच्या विषयी टाइम्स ऑफ इंडियाने एक अतिशय खोडसाळ बातमी दिली होती, की ते जेजेत प्यून म्हणून होते वगॆरे. ती बातमी देखील सोबत दिली आहे. जरूर वाचा, आणि पत्रकारिता कुठल्या थराला किंवा स्तराला जाऊन पोहोचली आहे हे तुमचे तुम्हीच ठरावा. 



तर या आमच्या यंदे सरांनी " गायतोंडे " ग्रंथात सांगितलेला किस्सा असा आहे. " जेजेत मी लायाब्रियन म्हणून काम करीत असताना एके दिवशी गायतोंडे ३० -४० चित्रांच्या गुंडाळ्या घेवून जाताना मला दिसला. मी विचारलं, ' काय रे कुठे नेतोयस ही चित्र ? ' तो म्हणाला ' प्रदर्शन संपलं आता फेकून देतोय. कुठं ठेवणार हे एव्हडं सारं ? ' मी म्हटलं ' फेकून कशाला देतोस , त्या पेक्षा मी शिकतोय. मला तरी दे, अभ्यासायला होईल'. त्यानं पुढचा मगच काहीही विचार करता ते सारं बाड माझ्या हातात दिलं आणि काही बोलता निघूनही गेला. " 



याच चित्रांनी पुढे भारतीय चित्रकलेच्या इतिहासात भलं मोठं रामायण घडवून आणलं. हे सारं प्रकरण मग पोलिसांच्या पर्यंत गेलं. अनेक लब्ध प्रतीष्टीताना पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, एक दोघांना तर म्हणे तुरुंगाची वारी करण्याची देखील वेळ आली . मग ते सारं प्रकरण कोर्टात गेलं. भारतीय कलेच्या इतिहासात कधी घडले नव्हते असे बरेच काही घडले. खूप खूप काही घडले. पण आता ही पोस्ट खूप लांबली आहे म्हणून आवरतं घेतो. नंतर कधी तरी लिहेनच. पण नंतर म्हणजे नंतर कारण हे सारे प्रकरण अद्यापि न्याय प्रविष्ट आहे. जेव्हा केव्हा याचा निकाल लागेल तेव्हा चिन्ह मधूनच सारे वाचावयास मिळेल याची खात्री बाळगा.

No comments:

Post a Comment