Tuesday, March 18, 2014

तलत मेहेमूद , बाळ छाबडा आणि गायतोंडे






तलत मेहेमूद हा माझा आवडता गायक .समजायला लागल्या पासून मला तो आवडतोय . सूरांशी दोस्ती झाल्यापासून मला तो आवडतोय . केसेट्चे दिवस असताना त्याची मिळतील ती गाणी टेप करून ठेवली होती . ती जेव्हा ऐकावीशी वाटत तेव्हा मी ती ऐकत असे आजही ऐकतो . आता केसेट्स बिसेट्स आउटडेटेड झाल्यात. पण अजूनही वेळ काढून मी त्या ऐकतो. खरं तर माझा २०-२५ किंवा त्या पेक्षाही जुना टेप आता कालबाह्य झालाय पण तो सुमारे ७००- ८०० चा ठेवा आता टाकवतही नाही आणि ठेववतही नाही ,अशी काहीशी माझी मनस्थिती झाली आहे. कारण आता यु ट्यूब वर हवी ती गाणी हवी ती गाणी हवी तेव्हा एकता येतात.


काही महिन्यापूर्वी तलतचं असंच एक अनवट गाणं यु ट्यूबवरच ऐकावयास मिळालं , आणि जरासा चमकलोच, अरे हे गाणं आपल्या संग्रहात कसं नाही या विच्राराने अस्वस्थ झालो . गाण्याचे शब्द कधी तरी कानावरून गेले होते , ती चालही ओळखीची वाटत होती ,पण मग असे का झाले ? या विचाराने आलेली ती अस्वस्थता नंतर खूपच दिवस टिकून होती . कारण त्या गाण्याचे शब्द मी लिहून ठेवले नव्हते , त्यातच त्याची चालही आठवेना . बापरे , काही म्हणता काही सुचेचना , शेवटी ठरवलं कि आता यु ट्यूब वरची तलतची सारी गाणी एकावयाची , ते मिळेलच, झालं एके दिवशी जेठा मारून बसलोच . शेवटी ते मी शोधलेच , ते मिळाले तेव्हाचा आनंद अवर्णनियच होता . पण त्या गाण्याने जे प्रश्न उभे केले ते आजही माझी पाठ सोडत नाहीयेत.

त्या गाण्याचे शब्द आहेत ' मोहब्बत तर्क की मैने …. ' हे शब्द आहेत साहिरचे , तर त्याला संगीत दिलं आहे ग्रेट अनिलदानी म्हणजे अनिल विश्वास यांनी . आणि हे गाणं आहे ' दो राह ' किंवा 'दो राहा ' या चित्रपटातील . १९५२ साली हा चित्रपट प्रकाशित झाला . त्याचे निर्माते होते बाळ छाबडा . हुसेन यांनी केलेली ती छत्री घरंगळत जाणारी फिल्म आठवतेय त्याचे निर्माते हेच बाळ छाबडा होते. आज २०१४ साल, म्हणजे तब्बल ६२ वर्षे उलटून गेलीत , पण आजही या गाण्याची मोहिनी जनमानसावर टिकून आहे . कितीतरी चाहत्यांनी हे गाणं यु ट्युबवर अपलोड केलं आहे . आणि सतत ते कुणीनकुणी एकत असते . मूळ चित्रपट सुद्धा कुणी तरी अपलोड केला आहे , पण याच गाण्याने मला इतकं अस्वस्थ करून सोडलंय कि तो पाहायचं धाडस माझ्याकडून अद्याप झालेलं नाही , न जाणो आणखी काय काय संधी आपण गमावल्या याची जाणीव तो मला कारण देईल या भीतीने मी अद्याप तो पाहूच शकलेलो नाही . अशाच एका गमावलेल्या मोठ्या संधीची ही कहाणी.

 


'गायतोंडेंच्या शोधात' अंकाच्या वेळची गोष्ट. गायतोंडे यांच्या सहवासात आलेल्या लोकांची आम्ही आधी एक यादी आधी केली होती . प्रत्यक्ष कामाला सुरवात केली तेव्हा असं लक्षात आलं की अरे यातली बरीचशी माणसं आता हयात नाहीत, बरीचशी विखुरलीही गेलीत. त्यांना शोधून काढणं आता केवळ जिकिरीचंच नाही तर अशक्यच आहे . पण तरीही आम्ही जी प्राधान्य यादी केली होती त्यात बाळ छाबडा हे एक नाव होतं. त्यांच्या विषयीची माहिती काय तर त्यांनी हुसेन यांची ती फ़ेमस छत्री घरंगळत जाणारी फिल्म प्रोड्यूस केली होती, आणि ते प्रोग्रेसिव्हच्या अन्य कलावंताप्रमाणे गायतोंडे यांचे मित्र होते . आणि त्यांच्या कडे म्हणे गायतोंडे यांची पेंटिग्ज देखील होती . पण खूप प्रयत्न करूनही आम्ही त्यांचा संपर्क मिळवू शकलो नाही. आणि तो मिळाला तेव्हा अंकाची डेड लाईन संपत आली होती. गायतोंडे यांची मैत्रीण ममता, गायतोंडे यांचे दिल्लीतले डॉक्टर, गायतोंडे यांचे स्नेही रामकुमार पती -पत्नी, ज़तिन दास यांचे लेख जसे वेळेअभावी आपण करू शकलो नाही ते सारे गायतोंडे यांच्यावर काम करायची संधी पुन्हा मिळालीच तर ते आपण नक्की करावयाचे असे मनाशी पक्के करून मी त्या अंकाचं काम आवरतं घेतलं . पण तो योग काही आलाच नाही, त्याच्याही वेगवेगळ्या कहाण्या आहेत, काहीशा कडवट आहेत म्हणून आता त्यावर काही बोलू इच्छित नाही . 'गायतोंडे' यांच्या वरचं हे पुस्तक इतक्या उशिरा प्रसिद्ध होतंय त्याची अनेक कारणं त्यातच खरी तर दडलेली आहेत . त्यामुळे योग्य वेळ येताच त्यावरही मी लिहेनच, कारण मानवी मनाचे अनेक कंगोरे त्यात दडलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे या साऱ्यात आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या माणसाची कशी घुसमट होते आणि त्यात भयंकर कालापव्यय होऊन भावी इतिहासासाठी अत्यंत महत्वाच्या नोंदी करून ठेवण्याची हातची संधी कशी निसटून जाते, निघून जाते याचंही प्रच्छन्न दर्शन त्यातून पुढच्या पिढीला, समाजाला होऊ शकतं म्हणून या साऱ्या अनुभवांची नोंद कुठेतरी होणे गरजेचं आहे. निदान माझ्या गरजेचं तर नक्कीच.

मला वाटतं मी बाळ छाबडा यांच्या विषयी सांगत होतो. बाळ छाबडा यांचा लेख गायतोंडे यांच्या वरच्या या येणाऱ्या पुस्तकात नक्की घ्यायचाच असं मनाशी निश्चित करून कामाला देखील लागलो , पण आमचं दुर्दॆव असं की तो पर्यंत ते आपल्या परतीच्या प्रवासाला लागले होते . आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते काही समजून घेण्याच्या स्थितीत नव्हते इतकंच नाही तर ते बोलण्याच्या अवस्थेत देखील नव्हते . वार्धक्यानं त्यांच्यावर विजय मिळवला होता . जमा केलेली त्यांच्या विषयीची कात्रणं, काढलेले प्रश्न, जमवलेले दुर्मिळ फोटो हेच फक्त आता माझ्यापाशी उरलं आहे . आणखीही माझ्यापाशी बरंच काही याच विषयावर लिहिण्यासारखं आहे , पण मी ते उद्याच्या (बहुदा शेवटच्या) भागात लिहिणार आहे , जरूर वाचा , ती पर्यंत बाळ छाबडा निर्मित दो राहा मधलं साहीर, अनिलदा आणि तलतचं हे तब्बल ६२ वर्ष टिकून राहिलेलं गाणं अगदी जरूर जरूर एका.

http://youtu.be/fFfHIzQE06s


९८१- ८२ ते १९९५ -९६ या काळात रविवार सोडल्यास जवळजवळ रोजच मी जहांगीर आर्ट गेंलरीवर जात असे. केवळ सायंकाळीच नाहीतर बरयाच वेळा सकाळी सुद्धा. त्यातली १० -११ वर्षे तर मी बॉम्बे आर्ट सोसायटी आणि आर्टिस्ट सेंटर या दोन कला संस्थांचा पदाधिकारी असल्यानं कामा निमित्तानं जाये करावी लागत असे . मी ज्या वृत्तपत्रात नोकरी करीत होतो ते तिथून नजीक असल्यानं मला हे सारे जमत असे. त्या काळात रोजच चित्रकार मंडळी जहांगीरवर येत असत . अकबर पदमसी, हरकिशन लाल, आरा, तय्यब मेहेता, प्रभाकर बरवे, होमी पटेल किती म्हणून नावं घ्यावीत, कधी कधी हुसेनही तिथं येत. सारे आधी तिथं येत, प्रदर्शनं पाहत आणि मग आपापला ग्रुप करून तिथून निघून जात. आम्ही तरुण चित्रकार हे सारे पाहत असू, मोठ्या चित्रकारांशी बोलायला जराशी भीतीच वाटायची. पण त्यांना आणि आम्हाला जोडणारा दुवा म्हणजे चित्रकार मनोहर म्हात्रे. ते दोघातही जाऊन येवून असत.

असंच एके दिवशी म्हात्रेनी एकाची तोंड ओळख करून दिली, हा बाळ छाबडा, हा फिल्म प्रोड्युसर आहे, हुसेन, अकबर, तय्यब या साऱ्यांचाच मित्र आहे. वगॆरे. कधी कधी हि मंडळी आमच्या ग्रुपकडे येत, हा आलाय, का तो आलाय का वगॆरे विचारण्यासाठी, ते तेव्हडेच जुजबी बोलणे होत असे. पण आम्हाला मात्र त्यांच्याशी बोलायला जराशी भीतीच वाटायची किंवा संकोच म्हणा हवं तर, त्यामुळे आम्ही पुढे कधी गेलोच नाही . पण १० १५ वर्षाच्या काळात हाती आलेलं काय काय आपण गमावलं याची जाणीव ही आता आता कुठे जराशी होऊ लागली आहे.

बाळ छाबडा हे गायतोंडे यांचे खूप जवळचे मित्र होते, इतकंच नाही तर त्यानी आपलं घर सोडल्यावर दिल्लीला जाण्याआधी ते काही काळ बाल छाबडा यांच्या घरीच काही काळ राहत होते हा शोध मला २००१ नंतर गायतोंडे यांच्या वर काम केल्या नंतर लागला, तेव्हा मात्र मी भयंकर हळहळलो, कारण तो पर्यंत बाल छाबडा वार्धक्याकडे झुकले होते, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा तर ते काहीही सांगण्याच्या पलीकडे गेले होते. याच माणसाला १०- १२ आपण जवळ जवळ रोज जहांगीरवर पाहत होतो, तेव्हाच जर आपण हे सारे टिपून ठेवले असते तर या विचाराने आताही प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं.

बाळ छाबडा यांनी 'प्रोग्रेसिव पिक्चर्स' या आपल्या कंपनी तर्फे काढलेल्या " दो राहा " या चित्रपटाची माहिती मला अशीच तलतच्या त्या विलक्षण गाण्यामुळे मिळाली आणि आपण काय काय गमावलं आहे याची जाणीव मला तीव्रतेनं झाली, आज ते गाणं दिवसातून एकदा तरी ऐकतोच ऐकतो, पण तो संपूर्ण चित्रपट पहावयाचं मात्र धाडस काही मी करू शकलेलो नाही कारण न जाणो त्यातून आणखी काही नवे नवे विषय मला त्यातून सुचावयाचे आणि ते आता कधीच करता येणार नाहीत या जाणीवेनं भयंकर अस्वस्थता उर्वरित आयुष्यभर व्यापून राहावयाची.

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह'

1 comment: