Tuesday, March 4, 2014

प्रफुल्लाबाई आणि " गायतोंडे "


( "गायतोंडे" ग्रंथातला एक दुर्मिळ फोटो - गायतोंडे यांच्या आई, प्रफुल्लाबाई, गायतोंडे यांची बहिण किशोरी आणि रेखा नाडकर्णी, शेवटची व्यक्ती आम्हाला ठाऊक नाही. )


या महिनाअखेरीस " गायतोंडे " प्रकाशित होतंय. 
प्रकाशनाचा मोठा घाट घातला आहे. 
या कार्यक्रमात प्रफुल्लाबाईंची अनुपस्थिती साऱ्यांनाच जाणवणार आहे. 
२००६ सालच्या 'गायतोंडे ' विशेषांकातला त्यांचा लेख विलक्षण गाजला होता.
कला वर्तुळात त्याची प्रचंड चर्चाही झाली होती,
आगामी 'गायतोंडे ' ग्रंथात त्या लेखाचा समावेश आम्ही केलाच आहे,
काही महिन्यापूर्वी या लेखाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली होती . 
म्हटलं प्रफुल्लाबाई, गायतोंडे यांच्या वरच्या पुस्तकात तुमच्या लेखाचा 
समावेश करायचाय, करू ना?
अरे करू ना म्हणजे काय? कर कर. 
आणि मेल्या, अंक तुझा, लेख लिहून घेतलास तूच , आणि आता 
परवानगी कसली मागतोस? काय बरा आहेस ना? 
उलट मीच तुझ्याकडे परवानगी मागणार आहे, 
तो लेख मला माझ्या आत्मचरित्रात घ्यायचा आहे, 
तर संपादक महाराज मला तो त्यात वापरण्याची परवानगी द्यावी 
आता यावर आपण काय बोलणार? 
प्रफुल्लाबाईंचा दांडपट्टा एकदा सुरु झाला का मग फक्त ऐकवायचे 
काम उरावयाचे . मग त्यांचं सारं संपल्यावर मी त्यांना चाचरत 
विचारलं 'त्यातला काही मजकूर काढून टाकायचा आहे का, किवा बदलायचा ?
तर म्हणल्या 'हट , काहीही बदल करायचा नाही, जसाच्या तसा छाप, 
मी काय कुणाला घाबरतेय कि काय?
आता माझ्यातला पत्रकार जागा झाला, मी त्यांना म्हटलं 
'अहो तसं नाही, विचारलेलं बर असतं ना, म्हणजे समजा तुम्हाला त्यात काही

काही जर लिहायचं असलं तर, आणखी काही आठवणी सांगायच्या असल्या तर 
मी गुगली टाकला, त्यावर त्या जराशा चकल्याच, पण मग सावरून म्हणाल्या 
'मेल्या मला चकवतोस, आणखी काहीही लिहायचं नाही मला,
तेव्हाच सारं सांगितलं होतं मी, आणि जे काही सांगितलं त्या विषयी मी ठाम होते, ठाम असेन आणि ठाम राहीन. पण मेल्या यावेळी मात्र माझा फोटो वापरलास तर जरा चांगला छाप हं. आणखी बरंच काही त्या बोलल्या पण मी हे सारं त्यांच्या वरच्या आगामी चिन्ह मधल्या लेखासाठी राखून ठेवतोय. परवा चंदनवाडी मधून परतताना सारखा तो लेख मला दिसत होता. 
मला वाटतंय कि या वेळी तरी माझा आळशीपणा सोडून मी तो लिहेन …. 
कारण माझ्यापाशी लिहिण्यासारखं प्रचंड आहे ….

1 comment: