Saturday, March 8, 2014

आत्याबाईला मिशा असत्या तर ………………

'जर -तर'च्या हिंदकळण्यातच आपण आपल्या आयुष्यातला बराचसा कालावधी वाया दवडत असतों, नाही का ?
'गायतोंडे' ग्रंथ छपाईला जाण्याआधी 'काही चूक तर राहिली नाही ना ' हे पाहण्यासाठी, पुन्हा एकदा कितव्यांदा वाचतोय कुणास ठाऊक, पण एक मूलभूत प्रश्न उभा राहिलाच, आतापर्यत संपादन करण्याच्या प्रक्रियेत हा ग्रंथ अक्षरशः २५ -३० वेळा तरी मी वाचला असेल , पण प्रत्येक वेळी तो काही तरी नवे असे मला देत गेलाय, किंवा न उलगडणाऱ्या नव्या प्रश्नांना जन्माला घालत मला अस्वस्थ करत राहिलाय.

आता इतक्या वेळा वाचूनही पुन्हा वाचताना त्याचा कंटाळा येत नाही , कुठलंही पान उघडा आणि वाचायला सुरवात करा आपण तो पुढे पुढे वाचतच राहतो किंवा वाचतच जातो . आणि वाचता वाचता अक्षरशः झपाटून जातो . कधी डोळे अलगद पाणावतात , कधी ओठांवर हसू पसरतं . तर कधी आपण त्यातल्या घटना क्रमानं विस्मयचकीत होऊन जातो ,तर कधी खो खो हसत सुटतो , तर कधी ' बापरे , हे असं घडू शकतं आयुष्यात' या विचारानं हादरुनही जातो , याचं सारच्या सारं श्रेय हे गायतोंडे यांचच आहे. ते त्यांना हवं होतं तसे जगले, कशाचीच, कुणाचीचआणि कसलीच पर्वा न करता जगले म म्हणूनच त्यांचं जगणं हे लोकविलक्षण ठरलं, ते सारंच अत्यंत प्रामाणिकपणानं मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला, इतकंच आमचं त्यातलं कर्तृत्व आहे. पण त्याचं श्रेय जर आम्हाला कुणी देणार असेल तर ते घ्यावयास आम्हाला निश्चितपणे आवडेल.

खरं तर मला वेगळंच काही लिहावयाचं होतं, पण हे काही तरी भलतंच लिहून बसलो.



गायतोंडे यांना त्यांच्या प्रेयसीनं नाकारणं हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईट ठरला, त्या तिरमिरीत त्यांनी चक्क मुंबईच सोडली, आणि संपूर्णपणे एकांतवास पत्करून , आपली कलासाधना करीत राहिले, त्या नंतर काय घडले तो सारा आता इतिहासच झाला आहे , मला आता त्याविषयी काहीच म्हणावयाचं नाहीये . मला भलताच प्रश्न आता सतावतोय, तो हा की 'गायतोंडे' यांच्या त्या प्रेयसीला आता काय वाटत असेल . म्हणजे उदाहरणार्थ जागतिक चित्रकलेच्या इतिहासात गायतोंडे यांची गणना होऊ लागल्यावर तिच्या आता काय भावना असतील ? प्रश्न मोठा अवघड होता, पण पत्रकारितेत दिवस काढल्यामुळे , हे असे प्रश्न देखील लीलया विचारण्याचा आगाऊपणा माझ्यापाशी असल्यानं एके दिवशी त्यांची भेट झाल्या वर मी त्यांना जरासं टोकलंच, म्हणाल्या "गायला मी आवडत होते , त्याला माझ्यात इंटरेस्ट होता , पण मला मात्र तो मित्रच वाटायचा , प्रियकर वगॆरे दृष्टीनं मी त्याच्या कडे कधी पाहिलंच नाही रे , छान मैत्री होती आमची. " पण मग आता काय वाटतं ? म्हणजे गायतोंडे यांना चित्रकार म्हणून जागतिक मान्यता …… माझा प्रश्न अर्धवटच राहिला , त्यांनी आपल्या ड्रायव्हरला हाक मारली होती, म्हणाल्या भेटू पुन्हारे …. आणि त्या गेल्यासुद्धा ….

खरतर अशा जरतरच्या प्रश्नांना तसं पाहिलं तर काहीच अर्थ नसतो, आयुष्यात वेगळंच काही तरी आणि भलतंच काही तरी घडत असतं आणि आपण आपले वेड्यासारखे ' जर असं झालं असत तर ……. छापाचे फालतू प्रश्न पाडून घेवून स्वतःला त्रास करून घेत असतो . आता उदाहरणार्थ हेच पहाना हा मजकूर लिहिताना मला आणखी प्रश्न सतावू लागला आहे कि समजा जर तिनं गायतोंडे यांना होकार दिला असता आणि त्याचं लग्न वगॆरे झालं असतं तर वासुदेव सन्तु गायतोंडे " चित्रकार गायतोंडे " झाले असते का ? ……
तुम्हाला काय वाटतं ?

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह'

No comments:

Post a Comment