Saturday, March 8, 2014


' ग्रेssट ! ' 

तोंडाने सकsssss असा अस्फुट असा आवाज करून दीर्घ श्वास घेत सुनील कर्णिक मला म्हणाले " ग्रेट". 
'गायतोंडे' ग्रंथाची मुद्रितं वाचल्यावर त्यांची माझी भेट झाली
तेव्हा त्यांनी काढलेले हे उदगार आहेत. पुढे म्हणाले ' ग्रेssट ! ' एव्हडा एकच शब्द पुरेसा या पुस्तकाविषयी सांगावयास . बाकी काही बोलायलाच नको,'फार फार मोठं काम केलंय तुम्ही. आणि माझं नाव या ग्रंथाशी जोडलं गेलंय हे माझं मी भाग्य समजतो.'
इति सुनील कर्णिक.

' निवडक 'मालिकेच्या पहिल्या खंडाला प्रस्तावना कुणाची घ्यायची असा प्रश्न उभा राहिला तेव्हा पाहिलं नाव समोर आलं तेच मुळी सुनील कर्णिक याचं , त्याला अनेक कारणं होती , त्यातलं पाहिलं कारण हे कि त्यांचा मराठी साहित्याचा गाढा व्यासंग होता. दुसरं म्हणजे त्यांना जे वाटतं असतं ते कुणाचा मुलाहिजा न बाळगता सांगतात किंवा लिहित जातात. महानगर मधल्या त्यांच्या ' न छापलेल्या गोष्ठी ' या सदरानं एकेकाळी मराठी साहित्यविश्वात कोण धमाल उडवून दिली होती . ( त्याचं नंतर पुस्तकही निघालं होतं . ) मराठी साहित्य विश्वातील बड्या बड्या लोकांवर त्यांनी अत्यंत मोकळेपणानं केलेली टीका टिप्पणी त्या काळी प्रचंड गाजली होती. जी मला प्रचंड आवडून गेली होती.


त्यातच ते' चिन्ह 'चे चाहते निघाले . २००२ साला नंतर निघालेल्या 'चिन्ह'च्या अंकावर त्यांनी प्रचंडच लिहिलं. विशेषतः भास्कर कुलकर्णी अंक, सांगोपांग विशेषांक, गायतोंडे विशेषांक यांच्या वर त्यांनी फारच कौतुकाचं लिहिलं, तेव्हा तर आमचा साधा परिचय देखील नव्हता .त्यामुळे साहजिकच त्यांचंच नाव प्रस्तावनेसाठी पाहिलं समोर आलं. त्यांनीही ती अत्यंत मनापासून लिहून दिली , आणि ती पुढे गाजलीही. त्याच वेळी त्यांना ' निवडक ' ची मुद्रितं तपासून देण्याची विनंती केली, त्यांनीही ती मोठ्या आनंदानं मान्य केली . त्यामुळे त्या खंडात एकही चूक राहिली नाही. पुढे 'नग्नता ' अंकाच्या वेळीही त्यांची मदत घेतली , तोही अत्यंत निर्दोष झाला.

खरं तर " निवडक " च्या या आगामी तिन्ही खंडाचं संपादन त्यांनी करावं अशी मूळ आयडीयेची कल्पना होती पण ' चिन्ह ' एकूण प्रवासच मुळी वळणावळणाचा आणि अत्यंत अवघड असल्यानं ते जमलं नाही हे खरं . म्हणूनच मग " गायतोंडे ' खंड त्यांनी त्यांच्या जाणकार नजरेखालून घालावा अशी विनती त्यांना केली आणि त्यांनीही ती मान्य केली, त्याच संदर्भात मजकुराच्या आरंभी लिहिलेली आमची भेट झाली होती. त्या भेटीत " गायतोंडे " ग्रंथाविषयी ते प्रचंड बोलले, खूप मोलाच्या सूचनाही त्यांनी केल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या आम्ही अंमलात आणल्या , त्या मुळे या ग्रंथाच्या गुणवत्तेत मोलाची भर पडली आहे हे निश्चित . ते जे बोलले ते सारेच इथे देणे शक्य नव्हते, म्हणून त्यांना वेगळे लिहावयाची विनंती केली तीही त्यांनी मान्य केली आहे.

जाताजाता ; आणखी एक गमतीदार तपशील द्यावासा वाटतो, सुनील कर्णिक आणि त्यांचे बंधू डॉ प्रदीप कर्णिक यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे तसेच त्यांच्या मराठी साहित्यासंदर्भात वेळोवेळी केलेल्या स्फोटक आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आणि कुठलीही भीडभाड न ठेवता केलेल्या अत्यंत सडेतोड लेखनामुळे संपूर्ण मराठी साहित्य वर्तुळात उभयतांचा उल्लेख थट्टेनं मराठी साहित्यातले " मेमन बंधू असा उल्लेख केला जातो , यावरून त्यांनी " गायतोंडे " ग्रंथाविषयी दिलेल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेचं महत्व लक्षात यावं.

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह '

No comments:

Post a Comment