Saturday, August 3, 2013

स्वगत


आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मी पॉल क्लीच्या चित्रांनी फार प्रभावित झालो होतो. माझ्या घरात मला एक छोटासा कोपरा मिळायचा काम करण्यासाठी आणि मोठी चित्रं रंगवण्यासाठी घरात जागा नव्हती, म्हणूनच क्लीच्या छोट्या कॅनव्हास आणि जलरंगातल्या चित्रांनी मला प्रोत्साहन मिळालं.

माझ्या कुटुंबाला मी कारकून किंवा इंजिनियर झालेलं आवडलं असतं. पण मला मात्र चित्रांशिवाय दुसरं काहीच करायचं नव्हतं. १९४३ मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मी शिकायला आलो. या कला महाविद्यालयानं मला काय दिलं असेल तर ते म्हणजे ‘वातावरण’. चित्रकार कधीही उत्साहित करणार्‍या वातावरणातच रंगवायला शिकण्याचा  प्रयत्न करीत असतो. आणि जेजे म्हणजे तर रंगांची दुनियाच होती. देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक इथं शिकायला यायचे. जे. अहिवासी आम्हाला शिक्षक होते. ते मथुरेचे आणि त्यांना विशेषकरून भारतीय लघुचित्रं शिकवण्यासाठी नेमलं गेलं होतं. खरं म्हणजे त्यांनी आम्हाला मथुरेच्या ‘व्रजभाषी’ काव्याची ओळख करून दिली.

कलावंतांना कवितेचा आनंद घेता यायला हवा आणि तिचं रसग्रहणही करता यायला हवं ही जाणीव अहिवासींनी आम्हाला करून दिली. आणि ती मी कधीच सोडली नाही. आजही या वयातही मी चित्रं रंगवीत असतो, किंवा संगीत ऐकत असतो.

त्या काळी आजच्यासारखं कलेचं वातावरण मुंबईत नसायचं. वर्षातून एकदाच बॉम्बे आर्ट सोसायटीचं प्रदर्शन असायचं. त्याकाळी मुंबईत कलादालनं अशी नव्हतीच मुळी- एकही नाही. केमोल्ड गॅलरी १९४० च्या सुमारास सुरू झाली आणि खरं म्हणजे ते एक ‘फ्रेमिंग शॉप’च होतं. कधी तरी ते चित्रप्रदर्शन करायचं एवढंच.
 दरम्यान भारत स्वतंत्र झाला. त्याच वर्षी सूझा, रझा, आरा या चित्रकारांनी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रुप स्थापन केला होता. नंतर आणखी काही चित्रकार त्यांच्यात सामील झाले. मला कुणीतरी त्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याविषयी विचारलं आणि मीही त्याचा सभासद झालो. याचं कारण एकच माझ्या समकालीन चित्रकारांकडून काही शिकायची चांगली संधी मला त्यामुळे मिळाली होती. ते सर्व विचारी लोक होते. तोपर्यंत मी जेजे सोडलं होतं. ते १९४८ साल होतं. मी तिथं काही थोड्या काळासाठी मी शिक्षकही होतो.

मात्र प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रुपच्या विघटनानंतर आम्ही बॉम्बे ग्रुप स्थापन केला. हा प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रुपच्याच काही माजी सभासदांनी तयार केला होता. एकत्र येऊन एकमेकांच्या कल्पनांची देवाण-घेवाण करण्यासाठीच तो स्थापन केला होता. मात्र आम्हापुढे विशिष्ट असं तत्त्वज्ञान नव्हतं. आम्ही आमची चित्रं एक ग्रुप म्हणून प्रदर्शनात प्रदर्शित केली होती. पण त्याचं खरं कारण होतं, ते म्हणजे त्याकाळी एखाद्या चित्रकाराचं. ‘एकल प्रदर्शन’ भरवणं हे अतिशय खर्चिक होतं. बॉम्बे ग्रुपनं एक किंवा दोन प्रदर्शनं भरवली आणि त्यानंतर आम्ही ग्रुप बंद केला.

त्यानंतर खरं म्हणजे मला काम करायला अशी कुठं जागाच नव्हती. त्या काळात भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूटनं मला स्टुडिओसाठी जागा दिली आणि मग माझं काम पुन्हा सुरू झालं. विविध प्रकारचे कलावंत तिथं काम करायला यायचे A फक्त चित्रकारच नव्हेत तर त्यात नर्तक, संगीतकार रंगकर्मी हेही होते. स्वतंत्रपणे आपली अस्मिता जपणारे विविध क्षेत्रातले कलावंत तिथं आपापल्या स्टुडिओत काम करीत. तिथं काम करायला एवढा उत्साह वाटायचा की एकटेपण दूर पळायचं. याशिवाय तिथं विविध विषय सामोरे यायचे. १९६६ मध्ये जेव्हा ती इन्स्टिट्यूट बंद पडली, तेव्हा एका काळाचा अस्त झाला.

मुंबईत जेव्हा गर्दी वाढली तेव्हा मी मुंबई सोडली आणि नवी दिल्लीला रहायला गेलो. नवी दिल्लीही तेव्हा आजच्यासारखी नव्हती. १९७२ मी जेव्हा मध्ये नवी दिल्लीला आलो, तेव्हा ती अगदी शांत होती. त्यावेळी तिथं कलाक्षेत्र असं नव्हतं. फक्त किरकोळ समूह प्रदर्शनं व्हायची. त्यावेळी आम्ही थोडेच तर होतो A हुसेन, क्रिशन खन्ना, मी... आता इथं खूप कलावंत आहेत. पण मी त्यांच्या संपर्कात नाहीय. माझा संपर्क फक्त स्वत:शीच आहे. माझा संवाद स्वत:शीच, माझा शोध स्वत:शीच.

मी चित्र प्रदर्शनांना जाणं बंद केलं. नव्या पिढीचे चित्रकार चित्रप्रदर्शन करून पैसे मिळवण्यास फार उत्सुक आहेत. त्यांनी शिकणं बंद केलंय. मी अजूनही चित्रांविषयी शिकतोय, कारण, मला वाटतं की ही प्रक्रिया सतत चालू असते. पेंटिंग हा संघर्ष आहे. तुम्हाला सतत शोध घेत रहायला हवं. तुमचं मन विचारांनी समृद्ध असलं पाहिजे. चित्रकारांनी तर संगीत, नाट्य, पुस्तकं / लेखन इत्यादींच्या संपर्कात रहाणं गरजेचं आहे. तरुण पिढीकडे पेशन्स नाही. मला तरुण चित्रकारांच्या चित्रप्रदर्शनांची खूप निमंत्रण येतात, पण मी कधीच त्यांना जात नाही. मी आता म्हातारा झालो आहे आणि चित्रप्रदर्शन पाहून, निराश होऊन घरी परतण्यासाठी मी माझी शक्ती फुकट घालवू इच्छित नाही.

आठ वर्ष मी चित्रं रंगवली नाहीत. त्यामुळे लोकांना वाटलं की मी एकूण पेंटिंगच थांबवलं आहे. मला अपघात झाला होता. माझी तब्येत चांगली नव्हती. आणि माझ्याकडे चित्रं रंगवण्याची शक्ती नव्हती. माझ्याकडे सर्व काही तयार होतं A स्ट्रेचर्स, कॅनव्हास, रंग A सर्व काही. फक्त मी तयार नव्हतो. मी गोव्याचा आहे. आणि ‘गोंयचे’ लोक आळशी असतात. पण त्या निष्फळ आठ वर्षात मला काही अप्रतिम अनुभव लाभले. मी खूप विचार करायचो आणि एकदा अकस्मात मी पेंटिंग पुन्हा सुरू केलं.

मला ‘अमूर्त’ अशी चित्राची व्याख्या करणं, वर्गीकरण करणं आवडत नाही. पेंटिंग म्हणजे पेंटिंग. जसं प्रत्येक जण माणूस आहे. मग तो हिंदू असो वा ख्रिश्चन. तसंच पेंटिंगला जात नसते, धर्म नसतो. पेंटिंग हे केवळ पेंटिंग आहे A प्रकाशाचा नि रंगाचा एक खेळ. तरीही माझी चित्रं रंगवण्याची शैली सतत बदलत रहाते. बदल हा असाच घडत असतो. तो कधीही जाणीवपूर्वक नसतो.

प्रत्येक चित्रात एक बीज असतं. ते दुसर्‍या चित्रांत उगवतं नि उलगडत जातं. चित्र हे एकाच कॅनव्हासपुरतं मर्यादित नसतं. मी माझ्या चित्रात माझ्या मूलतत्वाचा विस्तार करीत जातो. त्यामुळेच माझ्या चित्रात बदल होत राहतो. खरं म्हणजे पेंटिंग  ही एकच गोष्ट नसते, तर ती अनेक गोष्टींची संरचना असते. प्रत्येक चित्रात एक प्रकारचं रूपांतर असतं आणि या रूपांतराला कधी शेवट नसतो. दोन चित्रे कधीही एकच नसतात. मात्र तिथं बीज तेच असतं.
तुम्ही चित्र काढायला सुरुवात करायच्या अगोदर तुमच्यातच सतत चित्राचं अस्तित्व असतं. तुम्ही स्वत:लाच जणू एक परिपूर्ण असं यंत्र बनवायला हवं की ज्यामुळे तुमच्यात जे आहे त्याची पूर्ण अभिव्यक्ती व्हावी. मी माझ्यात जे काही आहे ते आणि त्याच्यापेक्षा जास्त असं व्यक्त करतो. पण तरीही माझी स्वत:ची चित्रं मला आश्चर्यचकित करतात आणि मी स्वत:बद्दल विचारतो : खरंच का हे मी केलं ?

मी कधीही चित्रं रंगवणं थांबवणार नाही. पण तरीही जर मी ते थांबवलं, तरीही मी त्याच्याबद्दल सतत बोलत राहीन. पेंटिंग  आणि गायतोंडे हे समानार्थक आहे.

मी गेली ५० वर्ष पेंटिंग करतो आहे. मी माझ्या कामावर संतुष्ट आहे. पण मला त्यातून अजून आनंद मिळवायचाच आणि अधिकाधिक काही शोधायचयं.

‘द आर्ट इंडिया’, जुलै १९९८, वरून साभार
 स्वैर अनुवाद : प्रदीप नेरूरकर

No comments:

Post a Comment