Saturday, August 3, 2013

चरित्रांची साधनसामग्री



 वासुदेव गायतोंडे 
दुसर्‍या पर्वात ‘चिन्ह’चं प्रकाशन पुन्हा सुरू करताना तीन गोष्टी मनाशी अगदी निश्चित केल्या होत्या.त्या म्हणजे चित्रकार भास्कर कुलकर्णी, वासुदेव गायतोंडे आणि प्रभाकर बरवे यांच्यावर‘चिन्ह’चे विशेषांक काही केल्या प्रसिद्ध करायचेच.

‘गायतोंडे’ यांचं निधन हेच मुळी ‘चिन्ह’च्या पुनरागमनाला कारणीभूत ठरल्यानं २००१ सालच्या पहिल्या अंकात ‘गायतोंडे’ यांच्यावरची सुमारे २५-३० पानांची एक पुरवणी प्रसिद्ध करण्यात यश आलं, ते अर्थातच अपुरं होतं, त्यामुळे मग पुन्हा २००६ साली
१०० पेक्षा जास्त पानांची विशेष पुरवणी असलेला ‘गायतोंडे विशेषांक’ प्रसिद्ध करता आला. मग २००७ साली आणखी एक छोटी पुरवणी काढली.

भास्कर कुलकर्णी यांच्यावर काम करताना मात्र पूर्ण स्वातंत्र्य घेता आलं आणि एक अख्खाच्या अख्खा भलाथोरला अंक काढता आला, पण प्रभाकर बरवे यांच्या बाबतीत मात्र गेल्या दहा वर्षात दोन-तीन लेख प्रसिद्ध करण्यापलीकडे काहीच शक्य झालं नाही. त्यांच्यावर एक संपूर्ण अंक करता यावा यासाठी प्रयत्न करण्यात कोणतीच कसूर ठेवली नव्हती.
भास्कर कुलकर्णी
पण बरवे यांच्या विषयीची प्रकाशीत सामग्री मोठ्या प्रमाणावर हाती असून, त्यांनी लिहिलेल्या डायर्‍या उपलब्ध असून, संबंधित सारीच मंडळी हयात असतानाही सार्‍या प्रयत्नांना यश मात्र काही कधी लाभलं नाही.
हे काम अर्ध्यावर राहून गेल्याची रुखरुख मात्र आयुष्यभर बाळगावी लागेल यात शंकाच नाही.

‘गायतोंडे’ यांच्यावरील ग्रंथ काढ्ण्याचं निश्चित केल्यावर आधीच्या ‘चिन्ह’मधल्या सर्वच मजकूरांचं वाचन, संकलन आणि संपादन करत असताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली की एवढं जरी आपण आतापर्यंत केलं असलं तर खूप काही करायचं बाकी राहून गेलंय...
आणि आता पुढं यात काही करणं आपल्याला तरी शक्य नाही, आता नव्या पिढीतल्या कुणीतरी हे पुढं न्यायला हवं इत्यादी...
ही माणसंचं मुळात इतकी थोर होती की त्यांचा, त्यांच्या कलेचा, आयुष्याचा कुणीतरी शोध घ्यायलाच हवा.आपण जे काही थोडंफार करून ठेवलंय त्याच्या पुढं कुणी तरी जायला हवं.आणि त्यांनी ते पुढं न्यायला हवं असेल तर त्या विषयाची सर्वच संदर्भ साधनं आपणंच उपलब्ध करून द्यायला हवीत.

प्रभाकर बर्वे
या निर्णयाला कारणीभूत झाला तो कॅलिफोर्नियातून आलेला एक अमेरिकन नागरिकाचा मेल. आपण भास्कर कुलकर्णी यांच्यावर संशोधन करीत असून या संदर्भातली सर्व सामग्री आपल्याकडे उपलब्ध असल्याचे कळले, ती अमेरिकेला पाठवता येईल का? वगैरे वगैरे. आणि मग त्या विचारमंथनातून ही ब्लॉगची संकल्पना जन्माला आली.
हा पहिला ब्लॉग आहे चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरचा.
नंतरचा असेल भास्कर कुलकर्णींवरचा आणि शेवटचा असेल
तो प्रभाकर बरवे यांच्यावरचा.

या ब्लॉगवर आम्ही या तिन्ही मनस्वी कलावंताच्या संदर्भात आमच्यापाशी जे जे उपलब्ध आहे ते सारंच्या सारं प्रसिद्ध करणार आहोत. त्यात त्यांच्यावरचे लेख असतील. त्यांच्यावरची चित्रं असतील, प्रकाशचित्रं असतील किंवा पत्रसुद्धा असू शकतील. आमच्याकडे नसलेलं जे इतरांकडे असेल त्यांनाही ते या ब्लॉगवर प्रसिद्ध करता येईल. फक्त त्यांनी इतकंच करायचं त्यांना जे प्रसिद्ध करावसं वाटतंय ते आमच्याकडं पाठवायचं. आम्ही ते सारं इथंच प्रसिद्ध करू.

ही एक अगदी वेगळ्या प्रकारची चळवळ आहे, यात कुणीही सहभागी होऊ शकेल.
सहभागी होण्यासाठी सार्‍यांनाच हे जाहीर निमंत्रण.

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’

No comments:

Post a Comment