Monday, March 17, 2014





आजच्या दै सकाळ मध्ये 'चिन्ह'च्या "गायतोंडेग्रंथाची एक भली थोरली बातमी आलीये
"गायतोंडेपहिली आवृत्ती संपली म्हणून , मला सुतराम कल्पनाही नव्हती की अशी काहीतरी बातमी येईल याची.चार सहा दिवसापूर्वी एक फोन आला होता सकाळमधूनबोलतेय म्हणूनत्यांनी " गायतोंडे " ग्रंथाविषयी विचारणा केलीमी सारी माहिती दिली.फोन ठेवताना मीविचारले देखील की तुम्ही बातमी देणार आहात कातर असंकाही ठरवलेलं नाही,पण या ग्रंथाविषयी खूप उत्सुकता होतीम्हणून फोन केला होताअसं उत्तर आलंआता त्यावेळी  त्यांनी हे सारे छापणार असे सांगितले असते तर मी त्या ग्रंथाचं नवंबदललेलं मुखपृष्ठ दिलं असतंतेही   बातमीत आलं असतं तर अधिक बरं झालं असतं

आधीच्या मुखपृष्टामध्ये आणि नव्यात बदल हा की त्यात गायतोंडे या शीर्षकाला महत्वाचे स्थान दिले आहे,आधी कळत नकळत 'निवडक चिन्ह'ला विशेष महत्व दिले गेल्या सारखे वाटत होते.कोलतेसरांनी हे लक्षात आणून दिल्यावर आम्ही तो बदल करायचा निर्णय घेतला.आता अंतिम मुखपृष्ठ हेअसे असणार आहेमलपृष्ठ देखील बदलले आहेआता त्यावर गायतोंडे यांचा स्टुडियोच्या गल्लीत काढलेला फोटो नसणार आहे त्या ऐवजी गायतोंडे पेंटिग वापरलं जाणार आहे.

अंक किंवा ग्रंथ छपाईला जात असताना हे असे बदल होतंच असतातते त्या अंकाच्या किंवा ग्रंथाच्या गुणवत्तेत वाढच करीत जातातम्हणूनच चिन्हच्या प्रत्येक निर्मितीला प्रत्येक वेळी जास्तीत जास्त वेळ लागत असतो.पण चिन्हचे वाचक मोठ्या प्रेमानं हे सारे सहन करतात म्हणून हे सारे जमतेजमू शकतेजमवता येतेत्या मुळेच "निवडकआगामी तिन्ही प्रकाशनांच्या निर्मितीत कोणतीहीकसूर ठेवायची नाही आणि वाचकांनी विश्वासाने जे भरभरून दिले आहे त्याची अगदी सढळ हातानं सव्याज परतफेड करायची असा चंगच बांधलायकसे कायते मात्र आता सांगणार नाहीलवकरच जाहीर करतोयआता फक्त थोडीशीच वाट पहा……

Saturday, March 8, 2014

आत्याबाईला मिशा असत्या तर ………………

'जर -तर'च्या हिंदकळण्यातच आपण आपल्या आयुष्यातला बराचसा कालावधी वाया दवडत असतों, नाही का ?
'गायतोंडे' ग्रंथ छपाईला जाण्याआधी 'काही चूक तर राहिली नाही ना ' हे पाहण्यासाठी, पुन्हा एकदा कितव्यांदा वाचतोय कुणास ठाऊक, पण एक मूलभूत प्रश्न उभा राहिलाच, आतापर्यत संपादन करण्याच्या प्रक्रियेत हा ग्रंथ अक्षरशः २५ -३० वेळा तरी मी वाचला असेल , पण प्रत्येक वेळी तो काही तरी नवे असे मला देत गेलाय, किंवा न उलगडणाऱ्या नव्या प्रश्नांना जन्माला घालत मला अस्वस्थ करत राहिलाय.

आता इतक्या वेळा वाचूनही पुन्हा वाचताना त्याचा कंटाळा येत नाही , कुठलंही पान उघडा आणि वाचायला सुरवात करा आपण तो पुढे पुढे वाचतच राहतो किंवा वाचतच जातो . आणि वाचता वाचता अक्षरशः झपाटून जातो . कधी डोळे अलगद पाणावतात , कधी ओठांवर हसू पसरतं . तर कधी आपण त्यातल्या घटना क्रमानं विस्मयचकीत होऊन जातो ,तर कधी खो खो हसत सुटतो , तर कधी ' बापरे , हे असं घडू शकतं आयुष्यात' या विचारानं हादरुनही जातो , याचं सारच्या सारं श्रेय हे गायतोंडे यांचच आहे. ते त्यांना हवं होतं तसे जगले, कशाचीच, कुणाचीचआणि कसलीच पर्वा न करता जगले म म्हणूनच त्यांचं जगणं हे लोकविलक्षण ठरलं, ते सारंच अत्यंत प्रामाणिकपणानं मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला, इतकंच आमचं त्यातलं कर्तृत्व आहे. पण त्याचं श्रेय जर आम्हाला कुणी देणार असेल तर ते घ्यावयास आम्हाला निश्चितपणे आवडेल.

खरं तर मला वेगळंच काही लिहावयाचं होतं, पण हे काही तरी भलतंच लिहून बसलो.



गायतोंडे यांना त्यांच्या प्रेयसीनं नाकारणं हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईट ठरला, त्या तिरमिरीत त्यांनी चक्क मुंबईच सोडली, आणि संपूर्णपणे एकांतवास पत्करून , आपली कलासाधना करीत राहिले, त्या नंतर काय घडले तो सारा आता इतिहासच झाला आहे , मला आता त्याविषयी काहीच म्हणावयाचं नाहीये . मला भलताच प्रश्न आता सतावतोय, तो हा की 'गायतोंडे' यांच्या त्या प्रेयसीला आता काय वाटत असेल . म्हणजे उदाहरणार्थ जागतिक चित्रकलेच्या इतिहासात गायतोंडे यांची गणना होऊ लागल्यावर तिच्या आता काय भावना असतील ? प्रश्न मोठा अवघड होता, पण पत्रकारितेत दिवस काढल्यामुळे , हे असे प्रश्न देखील लीलया विचारण्याचा आगाऊपणा माझ्यापाशी असल्यानं एके दिवशी त्यांची भेट झाल्या वर मी त्यांना जरासं टोकलंच, म्हणाल्या "गायला मी आवडत होते , त्याला माझ्यात इंटरेस्ट होता , पण मला मात्र तो मित्रच वाटायचा , प्रियकर वगॆरे दृष्टीनं मी त्याच्या कडे कधी पाहिलंच नाही रे , छान मैत्री होती आमची. " पण मग आता काय वाटतं ? म्हणजे गायतोंडे यांना चित्रकार म्हणून जागतिक मान्यता …… माझा प्रश्न अर्धवटच राहिला , त्यांनी आपल्या ड्रायव्हरला हाक मारली होती, म्हणाल्या भेटू पुन्हारे …. आणि त्या गेल्यासुद्धा ….

खरतर अशा जरतरच्या प्रश्नांना तसं पाहिलं तर काहीच अर्थ नसतो, आयुष्यात वेगळंच काही तरी आणि भलतंच काही तरी घडत असतं आणि आपण आपले वेड्यासारखे ' जर असं झालं असत तर ……. छापाचे फालतू प्रश्न पाडून घेवून स्वतःला त्रास करून घेत असतो . आता उदाहरणार्थ हेच पहाना हा मजकूर लिहिताना मला आणखी प्रश्न सतावू लागला आहे कि समजा जर तिनं गायतोंडे यांना होकार दिला असता आणि त्याचं लग्न वगॆरे झालं असतं तर वासुदेव सन्तु गायतोंडे " चित्रकार गायतोंडे " झाले असते का ? ……
तुम्हाला काय वाटतं ?

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह'

' ग्रेssट ! ' 

तोंडाने सकsssss असा अस्फुट असा आवाज करून दीर्घ श्वास घेत सुनील कर्णिक मला म्हणाले " ग्रेट". 
'गायतोंडे' ग्रंथाची मुद्रितं वाचल्यावर त्यांची माझी भेट झाली
तेव्हा त्यांनी काढलेले हे उदगार आहेत. पुढे म्हणाले ' ग्रेssट ! ' एव्हडा एकच शब्द पुरेसा या पुस्तकाविषयी सांगावयास . बाकी काही बोलायलाच नको,'फार फार मोठं काम केलंय तुम्ही. आणि माझं नाव या ग्रंथाशी जोडलं गेलंय हे माझं मी भाग्य समजतो.'
इति सुनील कर्णिक.

' निवडक 'मालिकेच्या पहिल्या खंडाला प्रस्तावना कुणाची घ्यायची असा प्रश्न उभा राहिला तेव्हा पाहिलं नाव समोर आलं तेच मुळी सुनील कर्णिक याचं , त्याला अनेक कारणं होती , त्यातलं पाहिलं कारण हे कि त्यांचा मराठी साहित्याचा गाढा व्यासंग होता. दुसरं म्हणजे त्यांना जे वाटतं असतं ते कुणाचा मुलाहिजा न बाळगता सांगतात किंवा लिहित जातात. महानगर मधल्या त्यांच्या ' न छापलेल्या गोष्ठी ' या सदरानं एकेकाळी मराठी साहित्यविश्वात कोण धमाल उडवून दिली होती . ( त्याचं नंतर पुस्तकही निघालं होतं . ) मराठी साहित्य विश्वातील बड्या बड्या लोकांवर त्यांनी अत्यंत मोकळेपणानं केलेली टीका टिप्पणी त्या काळी प्रचंड गाजली होती. जी मला प्रचंड आवडून गेली होती.


त्यातच ते' चिन्ह 'चे चाहते निघाले . २००२ साला नंतर निघालेल्या 'चिन्ह'च्या अंकावर त्यांनी प्रचंडच लिहिलं. विशेषतः भास्कर कुलकर्णी अंक, सांगोपांग विशेषांक, गायतोंडे विशेषांक यांच्या वर त्यांनी फारच कौतुकाचं लिहिलं, तेव्हा तर आमचा साधा परिचय देखील नव्हता .त्यामुळे साहजिकच त्यांचंच नाव प्रस्तावनेसाठी पाहिलं समोर आलं. त्यांनीही ती अत्यंत मनापासून लिहून दिली , आणि ती पुढे गाजलीही. त्याच वेळी त्यांना ' निवडक ' ची मुद्रितं तपासून देण्याची विनंती केली, त्यांनीही ती मोठ्या आनंदानं मान्य केली . त्यामुळे त्या खंडात एकही चूक राहिली नाही. पुढे 'नग्नता ' अंकाच्या वेळीही त्यांची मदत घेतली , तोही अत्यंत निर्दोष झाला.

खरं तर " निवडक " च्या या आगामी तिन्ही खंडाचं संपादन त्यांनी करावं अशी मूळ आयडीयेची कल्पना होती पण ' चिन्ह ' एकूण प्रवासच मुळी वळणावळणाचा आणि अत्यंत अवघड असल्यानं ते जमलं नाही हे खरं . म्हणूनच मग " गायतोंडे ' खंड त्यांनी त्यांच्या जाणकार नजरेखालून घालावा अशी विनती त्यांना केली आणि त्यांनीही ती मान्य केली, त्याच संदर्भात मजकुराच्या आरंभी लिहिलेली आमची भेट झाली होती. त्या भेटीत " गायतोंडे " ग्रंथाविषयी ते प्रचंड बोलले, खूप मोलाच्या सूचनाही त्यांनी केल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या आम्ही अंमलात आणल्या , त्या मुळे या ग्रंथाच्या गुणवत्तेत मोलाची भर पडली आहे हे निश्चित . ते जे बोलले ते सारेच इथे देणे शक्य नव्हते, म्हणून त्यांना वेगळे लिहावयाची विनंती केली तीही त्यांनी मान्य केली आहे.

जाताजाता ; आणखी एक गमतीदार तपशील द्यावासा वाटतो, सुनील कर्णिक आणि त्यांचे बंधू डॉ प्रदीप कर्णिक यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे तसेच त्यांच्या मराठी साहित्यासंदर्भात वेळोवेळी केलेल्या स्फोटक आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आणि कुठलीही भीडभाड न ठेवता केलेल्या अत्यंत सडेतोड लेखनामुळे संपूर्ण मराठी साहित्य वर्तुळात उभयतांचा उल्लेख थट्टेनं मराठी साहित्यातले " मेमन बंधू असा उल्लेख केला जातो , यावरून त्यांनी " गायतोंडे " ग्रंथाविषयी दिलेल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेचं महत्व लक्षात यावं.

सतीश नाईक
संपादक 'चिन्ह '

Tuesday, March 4, 2014


घडत मात्र भलतंच असतं...


कसं असतं नाही ?
आपण एक ठरवत असतो, आणि घडत मात्र भलतंच काही तरी असतं, 
आता उदाहरणार्थ हेच पहाना 
'गायतोंडे ' यांच्या वरच्या ग्रंथाचं प्रकाशन दणक्यात करायचं म्हंणून ठरवलं 
आणि कामाला लागलो, भेट प्रती कुणाला द्यायच्या , प्रकाशनाच्या वेळी कुणाकुणाला बोलवायचं, त्यावेळी भेट प्रती कुणाकुणाच्या हाती सोपवायाच्या, कुणाला पोस्टाने पाठवायच्या याची यादी करीत होतो, त्यात प्रफुल्लाबाईंचं नाव अर्थातच पहिल्या यादीत होतं, आता प्रफुल्लाबाई तर गेल्यात, वर्ष दीड वर्ष आधी शरद पाळंदे गेले, त्याच दरम्यान फिरोज रानडे गेले, त्या आधी ज्ञानेश्वर नाडकर्णी गेले, या साऱ्यांचेच गायतोंडे यांच्या वरचे लेख या ग्रंथात प्रसिद्ध होणार आहेत. 

'गायतोंडे ' यांच्यावरच्या ग्रंथाचं प्रकाशन होत असताना ही सारी मंडळी तिथं 

उपस्थित असावयास हवी होती असं खूप मनापासून वाटत होतं . 
पण आपल्याला हव्या असलेल्या साऱ्या गोष्टी अशा आयुष्यात सरळपणे 
का कधी मिळतात ?

काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. तो आपला दाणदाण चालतच राहतो, गायतोंडे यांच्या सारखा एखादाच प्रतिभावान त्याला पुरून उरतो, त्यावर आपलं नाव कोरून ठेवतो. २००१ साली आपल्यातून गेलेल्या 'गायतोंडे 'याचं एक पेंटिंग २०१४ साली तब्बल २३कोटी आणि ७० लाखाला विकलं जातं ते केवळ अपघाताने नव्हे, तो त्याच काळानं त्यांच्या कर्तृत्वाला ठोकलेला सलाम आहे, तर केवळ सुरवात आहे , तुम्ही आम्ही असू नसू, अशा बातम्या तर आता भविष्यात तर वरचेवर येतच राहणार आहेत. सांगायचे इतकेच होते की हे सारे 'चिन्ह " ने आधीच जाणले होते, म्हणूनच तर " चिन्ह " ने ते गेल्या बरोबर २००१ साली, मग २००६ आणि नंतर २००७ साली असे तीन विशेष अंक प्रकाशित केले होते. आता म्हणे गायतोंडे यांच्या वर एकदम - ग्रंथ येताहेत म्हणे. येवू द्यात , आपण नक्कीच त्याचं स्वागतच करू, पण आज आम्ही इतकंच सांगतो ' चिन्ह ' चं " गायतोंडे " मात्र या साऱ्यांच्याच आधी येतंयआणिक एक सांगतो, आम्ही या ग्रंथासाठी काहीही करावयाचं बाकी ठेवलेलं नाही, हा ग्रंथ एकाच शब्दात सांगायचं तर " अदभूत " झालाय …… इति लेखन सीमा .

प्रफुल्लाबाई आणि " गायतोंडे "


( "गायतोंडे" ग्रंथातला एक दुर्मिळ फोटो - गायतोंडे यांच्या आई, प्रफुल्लाबाई, गायतोंडे यांची बहिण किशोरी आणि रेखा नाडकर्णी, शेवटची व्यक्ती आम्हाला ठाऊक नाही. )


या महिनाअखेरीस " गायतोंडे " प्रकाशित होतंय. 
प्रकाशनाचा मोठा घाट घातला आहे. 
या कार्यक्रमात प्रफुल्लाबाईंची अनुपस्थिती साऱ्यांनाच जाणवणार आहे. 
२००६ सालच्या 'गायतोंडे ' विशेषांकातला त्यांचा लेख विलक्षण गाजला होता.
कला वर्तुळात त्याची प्रचंड चर्चाही झाली होती,
आगामी 'गायतोंडे ' ग्रंथात त्या लेखाचा समावेश आम्ही केलाच आहे,
काही महिन्यापूर्वी या लेखाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली होती . 
म्हटलं प्रफुल्लाबाई, गायतोंडे यांच्या वरच्या पुस्तकात तुमच्या लेखाचा 
समावेश करायचाय, करू ना?
अरे करू ना म्हणजे काय? कर कर. 
आणि मेल्या, अंक तुझा, लेख लिहून घेतलास तूच , आणि आता 
परवानगी कसली मागतोस? काय बरा आहेस ना? 
उलट मीच तुझ्याकडे परवानगी मागणार आहे, 
तो लेख मला माझ्या आत्मचरित्रात घ्यायचा आहे, 
तर संपादक महाराज मला तो त्यात वापरण्याची परवानगी द्यावी 
आता यावर आपण काय बोलणार? 
प्रफुल्लाबाईंचा दांडपट्टा एकदा सुरु झाला का मग फक्त ऐकवायचे 
काम उरावयाचे . मग त्यांचं सारं संपल्यावर मी त्यांना चाचरत 
विचारलं 'त्यातला काही मजकूर काढून टाकायचा आहे का, किवा बदलायचा ?
तर म्हणल्या 'हट , काहीही बदल करायचा नाही, जसाच्या तसा छाप, 
मी काय कुणाला घाबरतेय कि काय?
आता माझ्यातला पत्रकार जागा झाला, मी त्यांना म्हटलं 
'अहो तसं नाही, विचारलेलं बर असतं ना, म्हणजे समजा तुम्हाला त्यात काही

काही जर लिहायचं असलं तर, आणखी काही आठवणी सांगायच्या असल्या तर 
मी गुगली टाकला, त्यावर त्या जराशा चकल्याच, पण मग सावरून म्हणाल्या 
'मेल्या मला चकवतोस, आणखी काहीही लिहायचं नाही मला,
तेव्हाच सारं सांगितलं होतं मी, आणि जे काही सांगितलं त्या विषयी मी ठाम होते, ठाम असेन आणि ठाम राहीन. पण मेल्या यावेळी मात्र माझा फोटो वापरलास तर जरा चांगला छाप हं. आणखी बरंच काही त्या बोलल्या पण मी हे सारं त्यांच्या वरच्या आगामी चिन्ह मधल्या लेखासाठी राखून ठेवतोय. परवा चंदनवाडी मधून परतताना सारखा तो लेख मला दिसत होता. 
मला वाटतंय कि या वेळी तरी माझा आळशीपणा सोडून मी तो लिहेन …. 
कारण माझ्यापाशी लिहिण्यासारखं प्रचंड आहे ….