Wednesday, April 9, 2014

निर्मितीच्या नाना कळा ….



लेखन आणि पेंटिग काय किंवा ' चिन्ह 'चे अंक अथवा ' निवडक चिन्ह ' सारख्या ग्रंथाची निर्मिती काय दोन्ही गोष्टी मी सारख्याच सृजनशील मानतो . त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत प्रचंड कस लागतो आणि भयंकर वेळही. आता हेच पहाना'गायतोंडे " ग्रंथाची निर्मिती प्रक्रिया संपवत आणली तरी मलपृष्टावरील ब्लर्बचा पत्ताच नव्हता. तो मजकूर दिसत होता पण शब्दात मांडता येत नव्हता. खूप आटापिटा केला, पण व्यर्थ. गेले सहा सात महिने सारं काम संगणकावरच करीत असल्यानं. कागदावर लिहायची सवय जवळ जवळ सुटलीच , त्यामुळे सुचले , दिसले की टाईप करायला सुरवात करायची अशी सवय लावून घेतल्यानं, जवळ जवळ १० -१५ दिवस असेच अस्वस्थतेत गेले. विचारणा खूप होत होती, पण मी शांत होतो. मला ठावूक होतं की कधी तरी ते सारे अलगद कागदावर उतरेल

आणि तसेच घडले, एके दिवशी सायंकाळी गावात फेर फटका मारायला गेलो असताना. अचानक एक वाक्य झटदिशी डोळ्यासमोरून नाचत गेलं. खांद्यावर काहीच नव्हतं त्या मुळे वही पेन जवळ असण्याची काहीच शक्यता नव्हती. जर ते टिपून ठेवलं नसतं तर ते मी हमखास विसरणार होतो हे नक्की होतं, काय करावे काही कळेना. पण अशा आणीबाणीच्या वेळी नव्या कल्पना सुचल्याच नाही तर आपल्या डोक्याचा काय उपयोग ? मी अत्यंत शांतपणे खिशातून मोबाईल काढला आणि व्हाईस रेकॉर्डर ऑन केला आणि प्रचंड रहदारीच्या त्या रस्त्यावर पाहिलं वाक्य टेप केलं. "चित्रकार गायतोंडे यांची या ग्रंथाच्या पानापानावर उलगडणारी ही लोकविलक्षण कहाणी ही फक्त एका चित्रकाराची कहाणी राहत नाही, तुमची आमची कुणाचीही कहाणी होऊ शकते. "ट्रक, रिक्षांच्या त्या प्रचंड कोलाहलात मी ते एकच वाक्य टेप केलं, कारण मला जे हवं होतं ते सारं सार या एका वाक्यात एकवटलं आहे याची माझी खात्री झाली होती . घरी कसा तरंगत आलो ते माझं मलाच कळलं नाही

पहाटे उठून पाहिलं तर, रात्री कधीतरी झोपेत असतानाच मी उशी जवळ ठेवलेल्या वहीत तो संपूर्ण ब्लर्ब एकटाकी लिहून ठेवला होता. त्या सकाळी झालेला आनंद अवर्णनिय होता. तोच मजकूर मग मी संगणकावर टाकलाआणि तिथून मग तो सरळ मलपृष्ठावर विराजमान झाला. जरूर जरूर जरूर वाचा. 'गायतोंडे 'ग्रंथाच्या बुक जेकेटला एक वेगळं परिमाण मिळवून देण्यात मी बहुदा यशस्वी झालोय

कसा वाटला ? जरूर कळवा

गायतोंडे ग्रंथासंदर्भात अधिक जाणून घ्यायचं असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/pages/Gaitondeगायतोंडे/164757170298118

No comments:

Post a Comment