Sunday, April 27, 2014

आणि गायतोंडे यांनी लक्ष्मण श्रेष्ठ यांचे पाय धरले….


चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या पत्नी सुनिता परळकर श्रेष्ठ यांचं सहजीवनासंदर्भातलं आत्मकथन चिन्हच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. ते यंदा खूपच गाजलं. त्यातला गायतोंडे यांच्या संदर्भातला भाग 'गायतोंडे' यांच्या चाहत्यांना विशेष आवडून गेला. लक्ष्मण हे गायतोंडे यांना गुरु मानत. गायतोंडे यांचाही लक्ष्मण यांच्यावर विशेष जीव होता. मुंबईच्या कलावर्तुळातील बहुसंख्य चित्रकारांसोबत काहीसे फटकूनच वागणारे गायतोंडे लक्ष्मण यांना मात्र मनापासून जवळ करत तेही लक्ष्मण हे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेत होते तेव्हापासूनच. लक्ष्मण यांनी हा सारा अनुभव विलक्षण प्रभावी रीतीने शब्दातून मांडलाय. गायतोंडे ग्रंथातला लक्ष्मण यांचा हा प्रदीर्घ लेख विशेष आकर्षणच ठरावा.

गायतोंडे यांनी लक्ष्मण यांना निसर्गदत्त महाराजांकडे जाण्याविषयी सूचना केली. आणि एके दिवशी तर चक्क निसर्गदत्त महाराजांनीच लक्ष्मण यांना अधिकृत शिष्यत्व बहाल केलं. लक्ष्मण यांनी गायतोंडे यांना ते सांगितल्यावर गायतोंडे यांनी काय करावं ? तर ते चक्क उठले आणि त्यांनी लक्ष्मण यांचे थेट पायच धरले. लक्ष्मण या घटनेने अक्षरशः हडबडून गेले. अतिशय मोजक्या शब्दात लक्ष्मण यांनी रेखाटलेले गायतोंडे यांच व्यक्तिचित्र वाचणारयाला मुळापासून हलवून टाकतं.

गायतोंडे यांच्या विषयीची अनेक रहस्य लक्षमण यांनी या त्यांच्या प्रदीर्घ लेखात उलगडून सांगितली आहेत. गायतोंडे यांना झालेल्या त्या दुर्देवी अपघाताबाबत कुणाकडूनच काही काळत नव्हत. तो भाग या ग्रंथात असायलाच हवा अस मला मनापासून वाटत होतं. शर्मिला फडके यांनी शब्दांकित केलेलं लक्ष्मण यांच हे आत्मकथन हाती आलं आणि मग झालेला आनंद अवर्णनीय होता. कारण त्यात गायतोंडे यांचा शेवटचा प्रवासही अधोरेखित झाला होता. या आत्मकथनासोबत लक्ष्मण यांनी जी कृष्णधवल प्रकाशचित्र आणि गायतोंडे यांनी रेखाटलेलं त्यांचं व्यक्तिचित्र दिलं आहे. त्यामुळे या ग्रंथाला एक वेगळाच परिमाण लाभल आहे.

No comments:

Post a Comment