

आता यावर मी काय बोलणार ? बोलायचं खूप होत, सांगायचंही खूप होत, पण नाडकर्णी काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. खर तर चूक माझीही नव्हती. आजारपणामुळे, वार्धक्यामुळे नाडकर्णी खरंतर थकले होते. खूपसे चिडचिडेही झाले होते. काही बोललं की वसकन अंगावर यायचे. "काय नाडकर्णी ! तब्येत कशी आहे ?" असं जरी नुसतं औपचारीकपणे विचारलं, तरी चिडून फाडकन उत्तर द्यायचे, मला काय धाड भरली आहे ? त्यामुळे मग संवादच तुटायचा. कालांतराने तर मग तो पूर्णतः तुटत तुटत गेला. रोज फोनवरचं गप्पा मारणारे नाडकर्णी नंतर नंतर तर फोनवरसुद्धा अत्यंत तुसडेपणाने वागायला लागले. त्यांच्या या अशा स्थितीत त्यांच्याकडून लेखाची मागणी करणं योग्य वाटेना. तो मागून आपण त्यांना त्रास देतोय की काय असं वाटून मी त्यांना लेखासंबंधी विचारलं नव्हतं . बाकी त्यात दुसरं कुठलंही कारण असण्याची शक्यता नव्हती. कलाविश्वात ज्यांना माझा शत्रू पक्ष मानल जात अशांकडूनही मी लेखन करून घेतलं आहे. इतकंच नाही अशा व्यक्तींवर लेखन प्रसिद्धसुद्धा केलं आहे. इथं तर काय नाडकर्णी हे माझे मित्रच होते. १९८२ ते १९९२ इतका मोठा कालखंड आम्ही जवळ जवळ रोजच सकाळ संध्याकाळ भेटत असू सामोअर मध्ये बसत असू. चहापान करत असू. त्यानंतर नाडकर्णी मला माझ्या ऑफिस मध्ये टयाक्सीने सोडून केनेडी ब्रिजकडे जात असत, नाडकर्णी आता संपर्कासाठी दुरापास्त झाले होते हेच एक कारण गायतोंडे यांच्यावरचा लेख त्यांच्याकडून न घेण्यामागं होत अन्य काही नाही.
आता गायतोंडे यांच्या या ग्रंथाचं संपादन पूर्ण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या ग्रंथात नाडकर्णी यांचा लेख नाही ही एक मोठी उणीव राहून गेलेली आहे. पण आता तर नाडकर्णी निघून गेलेले आहेत. शेवटी त्यांनी प्रसंगपरत्वे गायतोंडे यांच्यावर लिहिलेलं लिखाण वाचून काढलं आणि त्यांच्याच 'अश्वत्थाची सळसळ' या पुस्तकातील त्यांचा लेख पुनर्मुद्रित करण्याचा निर्णय घेतला. नाडकर्णी यांचे प्रकाशक रामदास भटकळ यांनीही टाकोटाक परवानगी दिली त्यामुळे ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा लेख अशा पद्धतीनी का होईना गायतोंडे ग्रंथात समाविष्ट झाला आहे.