सुनील काळदाते हा जेजेत शिकताना माझ्या नंतरच्या वर्षी शिकायला होता. कधी तरी याच्या मनात आलं की हे काही खरं नाही, म्हणून तडक उठला आणि पेरिसलाच गेला आणि तिथलाच झाला . चार दशकं तरी झाली त्याला. तिथं त्यानं जे काही केलं ते सारच्या सारं आम्ही चिन्हच्या एका अंकात जसंच्या तसं त्याच्या आत्मकथनात छापलं . त्यानं कला विश्वात मोठी धमाल उडवून दिली. परदेशात एखादा इतकी वर्षे राहतोय म्हणजे खूप पैसा कमावला असणार, लाइफ स्टाइल भन्नाट असणार या पारंपारिक समजना पूर्णपणे छेद देणारेच ते आत्मकथन होतं. सुनीलच्या घरातही त्या आत्मकथनानं हलकल्लोळ उडवून दिला. त्याला मला किती तरी फोन आले. पेरिसला गेल्यावर त्याला भेटणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. त्यात स्त्रियांचं प्रमाण हे अर्थातच लक्षणीय होतं.

याच सुनीलनं केलेली ' गायतोंडे 'यांच्या वरची फिल्म प्रचंड गाजली. आताही गाजतेय आणि भविष्यातही गाजणार आहे. कारण ही फिल्म खरोखरच अफाट आहे. ती पहिल्या नंतर आपण गायतोंडे यांच्या प्रतिभेनं थक्क होऊन जातो, संपल्यावर काही काळ आपण बोलू शकत देखील नाही हा अनेकांचा अनुभव आहे. ' शूटिंगच्या वेळी माझा रोजचा दिनक्रम डिस्टर्ब करशील तर मी तुला हाकलून देईल , मी मुलाखत देणार नाही, मी तुला रंगवून दाखवण्याचा शॉट देणार नाही, मी नट नाही चित्रकार आहे, करायची फिल्म तर कर …' अस अगदी स्पष्टपणे सांगणाऱ्या गायतोंडे याचं आव्हान सुनीलनं स्वीकारलं, आणि मग जी फिल्म केली ती पाहून भल्या भल्या अंतरराष्टीय फिल्म फेस्टिवल्स मध्ये त्याला स्टेंन्डींग ओव्हेशन पटकावण्याचा मान मिळाला.
जागतिक चित्रकलेच्या वर्तुळात 'गायतोंडे' यांचं कर्तृत्व आता गणलं जातं. त्यांच्या वरची एकमेव फिल्मही त्याच तोडीची झाली आहे. भविष्यात आता सुनीलकडूनही आपल्याला खूप मोठ्या बातम्यांची अपेक्षा करावयास हरकत नाही. आणि लवकरच आपल्याला त्या मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. तो पर्यंत आपण "गायतोंडे" यांच्या वरची ती फिल्म त्यानं कशी साकारली या संदर्भातलं त्याच "गायतोंडे" ग्रंथातलं आत्मकथन वाचू या . हो आणखी एक "गायतोंडे" ग्रंथाच्या मुख आणि मलपृष्ठा वरील दोन्ही प्रकाशचित्र ही त्याचीच आहेत.