Monday, May 5, 2014

गायतोंडे आणि देशपांडे....

एके दिवशी सकाळी फोन वाजला. 
मी डॉ. सुधीर देशपांडे बोलतोय '. पलीकडून आवाज येतो.
बोल सुधीरकाय काम काढलंस ? '- मी 

तू मला ओळखलंस ? ' - सुधीर 

नाशिकहून बोलतोयस आणखीन कुठून ? ' - मी

अरे, हे पण तुझ्या लक्षात आहे, ग्रेट. मी लंडनमध्ये असतो. चित्रकार, शिल्पकार म्हणून काम करतो. ८६-८७ साली आपण मुंबईत भेटलो होतो. नंतर मी तिकडेच गेलो. आता आलोय, पुण्यातून बोलतोय. fb वर तुझं गायतोंडे यांचं पेज पाहिलं. मला ती फिल्म बघायचीय, मी येतो मुंबईला. '

मग तो गायतोंडे यांच्यावरची ती फिल्म बघायला खास मुंबईला आला. २६ मिनिटांची फिल्म बघून आला तसाच पुण्याला परत गेला. तीन चार स्क्रिनिंग लागोपाठ असल्याने त्याच्याशी फारसं बोलताही आलं नाही, मग फोनवर सविस्तर बोललो तेव्हा कळलं, सुमारे २० वर्षापूर्वी तो दिल्लीला गेला होता. तीन चार महिने दिल्लीत होता. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या सूचनेवरून तो गायतोंडे यांना भेटला. गायतोंडे यांच्या चित्रांनी आणि व्यक्तिमत्वाने तो अगदी भारावून गेला होता. परवा भारतात आल्यावर फेसबुकवर त्याने गायतोंडे यांच पेज पाहिलं आणि त्याच्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. त्याने टाकोटाक मला फोन केला. आणि मग ती फिल्म पाहायला तो येऊनसुद्धा गेला. खरंतर गायतोंडे यांच्या संदर्भात त्याला बोलतं करायचं होतं. पण आम्ही दोघंही आपआपल्या कामात व्यस्त होतो. मग त्यानं गायतोंडे यांच्या संदर्भात काही मजकूर मेल केला. त्यातला किस्सा सांगितल्यावाचून राहावत नाही. 

"१९९४-९५ च्या आसपास मी गायतोंडे सरांकडे गेलो होतो. त्यांच एकूणचं सारं राहणीमान पाहून मी तर अगदी भारावून गेलो. आणि दिल्लीत असेपर्यंत त्यांच्याकडे जातच राहिलो. त्यांना जो भयंकर अपघात झाला त्या नंतरचा तो काळ होतास्टुडियोभर धुळीचंच साम्राज्य पसरलं होत. जमिनीवर गादी, आजूबाजूला पेंटिंग, कागदांचे ढीग असा एकूण पसारा होता. एके दिवशी अचानक एक गृहस्थ स्टुडियोत आले. स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाले पेंटिंग न्यायला आलो. सर काही बोललेच नाहीत. त्यांनी हाताने खूण करून बाजूला ठेवलेलं पेंटिंग दाखवलं. त्या व्यक्तीने सरांच्या उशाशी २५ ते ३० हजारच्या नोटा ठेवल्या आणि पेंटिंग घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे पाहिलं. मी ते पेंटिंग स्वच्छ करून कागदात बांधलं. त्या माणसाला वाटलं की, मी सरांकडे काम करणाराच मुलगा आहे. त्यानं मला ते चित्र खाली नेण्यास फर्मावलं. ते चित्र घेऊन मी खाली उभ्या असलेल्या अलिशान कारपाशी गेलो, तेव्हा त्या माणसानं ते चित्र माझ्याकडून घेतलं आणि त्या अलिशान कारमधल्या माणसाच्या हाती सुपूर्द केलं. म्हणाला मोठ्या मुश्किलीनं हे चित्र मी गायतोंडे यांच्याकडून २५ लाखात मिळवलंय. ते ऐकताच गाडीतल्या माणसानं आभार मानून, हे घ्या उरलेले २२ लाख असे म्हणून एक बेग त्याच्या हवाली केली. आणि पेंटिंग गाडीत घेऊन, ती गाडी निघून गेली. मग तो २२ लाख घेणारा माणूसही आपल्या वाटेनं आला तसा निघून गेला. झाला प्रकार पाहून मी अक्षरशः सुन्न झालो होतो. वर जाऊन सरांना काय सांगायचं हा प्रश्नही मला सतावत होता. पण वर गेल्यावर मी मुद्दामहून सरांना उशाशी ठेवलेल्या रक्कमेचा आकडा सांगितला तर सरांनी मला ते पैसे बाजूच्या कोपऱ्यात सरकविण्यास सांगितले. सरकवतांना पाहिलं तर तिथं अनेक नोटा अशाच पडलेल्या होत्या. सर म्हणाले, " आता मला या पैशाचा तरी काय उपयोग ? उरलेल्या आयुष्यासाठीही या पैशाचा उपयोग नाही." असहाय्य अवस्थेत माणसाला पैशाचा मोह होतो असं म्हणतात. पण इथं तर सरांना पैशाचाच काय कशाचाच मोह नव्हता. होती ती फक्त विरक्ती आणि विरक्ती." 



सुधीरनं पाठवलेला मेल वाचून तर मी सुन्न झालो होतो. त्याच्यासोबत खूप बोलायचं होतं. गप्पा मारायच्या होत्या. पण ते सारं राहून गेलं. नंतर तो लंडनला गेला. पुन्हा एकदा भारतातही आला पण आमची गाठ अद्यापि पडलेली नाही. गायतोंडे यांच्या या ग्रंथानं माझा सारा वेळ व्यापून राहिला आहे. त्यामुळे अद्याप तरी ते जमलेलं नाही. हा ग्रंथ प्रसिध्द झाल्यावर मात्र ते निश्चितपणे जमेल. आणि तसं जर झालं तर त्याची आणि तुमची गाठ मी नक्कीच घालून देऊ शकेन. सुधीरकडं सांगण्यासारखं प्रचंड आहे हे मला पुरतं ठावूक आहे.

गायतोंडे आणि फिरोज रानडे

एके दिवशी प्रख्यात लेखिका प्रतिभा रानडे यांचा फोन आला. गायतोंडे यांच्यावरचा ग्रंथ लवकरच प्रसिद्ध होतो आहे ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्या संदर्भात त्यांनी फोन केला होता. नेमका मी तेव्हा घरी नव्हतो. पणपत्नीजवळ त्यांनी सविस्तर निरोप ठेवला होता. त्यांना त्या ग्रंथाची एक प्रत हवी होती. मग बोलता बोलता त्यांनी त्यांचे पती मुकुंद अर्थात फिरोझ रानडे यांनी दै. लोकसत्तासाठी लिहिलेल्या गायतोंडे यांच्यावरच्या लेखाचं स्मरण करून दिलं. म्हणाल्या तो तुम्ही वाचला असणारचं, शक्य झालं तर तर तो लेख या ग्रंथात समाविष्ट करा. . मग त्यांच्याकडे गायतोंडे आणि रानडे यांचे काही जुने फोटो आहेत का अशी विचारणा केली असता त्या म्हणाल्या की एक फोटो कोणीतरी मला पाठवलाय. तो बहुधा १५ ऑगस्ट १९४७ रोजी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये काढलेला आहे ज्यात गायतोंडे, यंदे यांच्यासोबत फिरोझ रानडे सुद्धा आहेत. तो फोटो तुम्हाला पाठवू का अशी विचारणा त्यांनी केली. पण तो 'चिन्ह'नंच प्रकाशित केलाय असं त्यांना सांगितल्यावर त्यांना त्याचं नवल वाटलं. घरी आल्यावर हा सगळा वृत्तांत पत्नीनं मला कथनं केला. पण हा निवडक 'चिन्ह'चाच दुसरा खंड असल्यानं इतरत्र प्रसिद्ध झालेल्या मजकुराचा यात समावेश करता येणार नाही. म्हणून मी त्या सूचनेचा विचार करण्याचंच टाळलं. 


काही दिवसानं मुखपृष्ठात खूप मोठा बदल झाला. मुखपृष्ठाच्या शिरोभागी असलेला निवडक चिन्हचा लोगो मुखपृष्ठाच्या पायथ्याशी गेला आणि 'गायतोंडे' हे शीर्षक मुखपृष्ठाच्या शिरोभागी आले. आता सारे परिमाण बदलले होते. ग्रंथाचं संपादन चालू असतांना त्यातील मजकुराचं असंख्य वेळा वाचन होत असतं. अशाच एका वाचनाच्या वेळी ग्रंथात गायतोंडे यांचे (माझेही) मित्र ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा लेख समाविष्ट करणं जरुरीचं भासू लागलं. आणि 'अश्वथाची सळसळ' मधला नाडकर्णी यांचा लेख 'गायतोंडे' ग्रंथात समाविष्ट झाला. असंच पुन्हा एकदा वाचन करतांना मनात विचार आला "फिरोझ रानडे यांचा लेख का नको ?" असा मग तो ही लेख या ग्रंथात समविष्ट झाला. हा झालेला निर्णय प्रतिभा रानडे यांना कळवला. तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला म्हणाल्या "थोडं आधी आपण भेटलो असतो, तर बरं झालं असतं, रानड्यांनी खूप आठवणी तुम्हाला सांगितल्या असत्या. रानडे
गायतोंडे विषयी खूप भरभरून बोलायचे. जेजेतल्या त्या दिवसंविषयी त्यांच्याकडे सांगण्यासारखंही भरपूर काही होतं. खरं सांगायचं तर लोकसत्तेमध्ये रानडेंचा लेख प्रसिद्ध झाला तेव्हाच रानडे यांना भेटायचं मी ठरवलं होत पण मुंबईतल्याच एका व्यक्तींनं गायतोंडे ग्रंथाच्या बाबतीत अशी काही पाचंर मारून ठेवली की तो ग्रंथ काढण्याविषयीचा माझा उत्साहच मावळला गेला.म्हणूनच रानडे यांच्याशी त्यावेळी इच्छा असूनही संपर्क होऊ शकला नाही. प्रतिभा रानडे यांच्याशी बोलता बोलता १५ ऑगस्टमधल्या त्या गाजलेल्या फोटोमधली ती चौथी व्यक्ती कोणं असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, नाही, तो आता आठवत नाही. पण यांच्या बोलण्यात सतत प्रभावळकर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख येत असे. या चौघांचा ग्रुप होता. हे प्रभावळकर आर्किटेक्ट झाले आणि नंतर लंडनला गेले. बहुधा तेच असावेत. हे सारं मोकळेपणानं लिहितो आहे खरं पण रानडे यांच्याशी संपर्क साधल्यानं एक चांगली संधी गमावल्याचे दुखः मला आजही होत असतं.