Tuesday, May 26, 2015

न संपणाऱ्या शोधाची कहाणी… 
गायतोंडे’ चित्रांचाही काळाबाजार...


दुसरा किस्सा आहे तो मूळ चित्र ‘फेक’ ठरवलं जाण्याचा. जेजे— मधली आमच्या किती तरी नंतरच्या बॅचला असलेली एक मुलगी लग्नानंतर दिल्लीला गेली. मुंबईत असताना ती एका मोठ्या गॅलरीत काही काळ नोकरी करत होती, साहजिकच चित्रांचे सारे व्यवहार तिला ठाऊक. मूळची ती श्रीमंत. लग्नही अशाच घरी झालेलं. दिल्लीत गेल्यावर तिला कधी तरी गायतोंडे यांच्या स्टुडिओत जायची संधी मिळाली. स्टुडिओत असलेलं एक पेंटिंग तिला आवडलं, म्हणून तिनं गायतोंडे यांना ते मला विकत देता का विचारलं, तर त्यांनी सरळ नकार दिला. म्हणाले, ‘माझं सर्वात आवडतं पेंटिंग आहे ते, मी मरताना मला ते समोर हवं आहे मला नाही विकायचं ते,‘ वगैरे. पण मग नंतर तिनं ते त्यांच्याकडून मिळवलंच.
त्याला आता 17-18 वर्षं झाली. अलीकडे गायतोंडे यांच्या चित्रांचे भाव गगनाला भिडू लागले, तेव्हा कुणी तरी लिलाव कंपनीचा माणूस तिच्याकडे आला आणि आणि तिच्या पश्चात तिच्या नवर्‍याकडून लिलावात चित्र टाकतो म्हणून चित्र घेऊन गेला. हिनं खूप आकांडतांडव केलं, पण उपयोग झाला नाही. मग एके दिवशी हिला कळलं की लिलाव कंपनीनं ते चित्र मूळ आहे का ते पाहण्यासाठी ज्या व्यक्तीला दाखवलं तिनं ते चित्र फेकअसल्याचं लिहून दिलंय. हिनं ते ऐकलं आणि भडकलीच. ज्या व्यक्तीनं ते लिहून दिलं होतं तिला जाऊन तो सारा पत्रव्यवहार दाखवला, फोटो दाखवले आणि पैसे कसे दिले ते सांगू म्हणून विचारलं, तेव्हा ते चित्र फेकआहे सांगणार्‍या व्यक्तीनं तिची माफी मागितली.

ती सांगत होती की या क्षेत्रातही आता माफिया उतरले आहेत - आर्ट माफिया. ते ठरवतात की कुठलं चित्र कुठ कसं उचलायचं, कधी त्याची किंमत वाढवत न्यायची वगैरे. लिलावात त्यांच्याशिवाय तुम्ही चित्र टाकूच शकत नाही, आणि टाकलंच समजा तर त्याला फार बोली लावली जाणार नाही ना याची सारी काळजी ते घेतात. त्यासाठी कुठल्याही टोकाला जायची त्यांची तयारी असते. गायतोंडे यांची सार्‍या आयुष्यभराची कलानिर्मिती इतर चित्रकारांच्या निर्मितीच्या मानानं तुलनेनं कमी असल्यानं, या लोकांमध्ये गायतोंडे यांना प्रचंड मागणी आहे. ती जे काही सांगत होती ते ऐकून अंगावर अक्षरशः काटा आला. कुठं आयुष्यभर कलानिर्मितीचा ध्यास घेऊन जगलेलं तडजोडविरहित लोकविलक्षण आयुष्य, तर कुठं हे पै-पैशासाठी हपापलेलं आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायची तयारी असलेलं लाजिरवाणं जिणं. या सार्‍याची सांगडच मुळी कशी घालायची हेच कधी कधी कळेनासं होतं.

तिसरा किस्सा आहे तो फेकचित्रं कशी होतात त्याचा. मुंबईच्या कलावर्तुळात विख्यात (खरं तर कुख्यात असाच शब्द इथं योग्य आहे) असलेल्या एका अतिविशाल महिलेनं आपल्या संग्रहातलं एक चित्र विकायला काढलं. ते गायतोंडे यांचं आहे असा तिचा दावा होता. माझ्या पत्नीला तिनं ते दाखवलं. तिनं मी गायतोंडे यांची चित्रं जमवत असल्यानं त्या चित्राचा फोटो काढला आणि मला दाखवला. मी ते चित्र पाहून अवाक झालो. हे असलं काम गायतोंडे यांनी कुठल्या काळात केलं असेल याचा विचार करकरून माझी मती गुंग झाली. बरं, त्या चित्राचा आकार गायतोंडे यांच्या अन्य चित्रांच्या आकारांना सूट व्हावा तर तेही नाही. रंग लावण्याची पद्धत तर अत्यंत तिसर्‍या दर्जाची. आणि मुख्य म्हणजे हे असले चित्रविषय घेऊन आयुष्यात कधी गायतोंडे यांनी अशी चित्रं रंगवली असतील यावर माझा विश्वासच बसेना. त्यावर गायतोंडे यांची सहीदेखील नव्हती. ना मागे, ना पुढे. म्हटलं, कशावरून हे गायतोंडे यांचं चित्र ? तर त्यावर त्या बाईचं म्हणणं असं होतं की ती सही जो आकार चित्रात रंगवला होता त्यातच होती, आणि तिनं ती माझ्या पत्नीला त्यातून काढून दाखवली. पण तिला जी सही त्या चित्रात दिसत होती ती काही माझ्या पत्नीला प्रयत्न करकरूनदेखील दिसत नव्हती. मी माझ्या पत्नीला तो फोटोदेखील फाडून टाकायला सांगितला आणि विषय बंद करून टाकला.

काही दिवसांनी एक ज्येष्ठ चित्रकार स्नेही भेटले. बोलता बोलता गायतोंडे यांच्या चित्रांचा कसा काळाबाजार चालला आहे म्हणून सांगू लागले. काय झालं म्हणून विचारलं, तर असं असं एक चित्र आपल्याकडे ते गायतोंडे यांचं आहे का म्हणून विचारायला कुणी तरी आलं होतं म्हणून सांगू लागले. ते जे चित्र सांगत होते ते तेच चित्र असावं याची माझी खात्री पटली. म्हणून मग पण मी त्यावर गायतोंडे यांची सही कुठं होती असं विचारलं, तर त्यांनी चित्रात जो आकार रेखाटला होता त्याचं वर्णन करून ती सही नेमकी कुठल्या अवयवावर होती त्याचं वर्णन केलं. तर ते तेच चित्र निघालं. त्यांनी ते चित्र गायतोंडे यांचं नाही म्हणून ठामपणे सांगितलं आणि परत पाठवलं. पण म्हणाले, ती गोष्ट तिथं संपली नाही.

काही दिवसांनी मुंबईच्या कलावर्तुळात प्रसिद्ध असलेली आणखी एक अतिविशाल महिला त्यांच्याकडे तणतणत आली आणि म्हणाली, ‘तुम्हाला गायतोंडे यांची चित्रं सर्टिफाय करायचा अधिकार कोणी दिला? पुन्हा जर असं काही केलं तर तुम्हाला तुरुंगात टाकेन. तुरुंगात खितपत बसावं लागेल, लक्षात ठेवा. ते चित्र मी सर्टिफाय केलंय. मला ते करण्याचा अधिकार आहे,’ इत्यादी आरडाओरडा करून, प्रचंड शिव्याशाप घालून ती महिला निघून गेली. या गृहस्थांच्या पत्नीला त्या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. तिनं ते सारं दुसर्‍या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी मुंबईच्या पोलिस कमिशनरांच्या पत्नीच्या कानांवर घातलं. नंतर नक्की काय झालं कुणास ठाऊक. ती अतिविशाल महिला त्यांच्याकडे रडत रडत आली आणि माफी मागून निघून गेली. पण त्या दोन्ही अतिविशाल महिलांचा उच्च वर्तुळात असलेला एकूण वावर पाहता ते चित्र नंतर विकलं गेलं नसेल यावर मी तरी कधीच विश्वास ठेवणार नाही.

मी निरीश्वरवादी आहे, मी नशीब वगैरेदेखील मानत नाही, पण आयुष्यात आपण जी काही वाईट कृत्यं करतो त्याची फळं मात्र आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात यावर मात्र माझी श्रद्धा आहे. त्या अतिविशाल महिलांना पुढं प्रचंड कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. भयंकर आरिष्टांना सामोरं जावं लागलं. आता मुंबई सोडून दूर गेल्याला मला जवळ जवळ चार एक वर्षं झाली आहेत. मुंबईच्या कलावर्तुळाशी असलेला माझा संपर्क 1998 नंतर मी क्रमशः कमी कमी करून आता तर पूर्णतः संपवून टाकला आहे. त्या महिला अद्याप हयात आहेत किंवा नाहीत हेही मला आता ठाऊक नाही, ज्या गावाला आपल्याला जायचं नाही तिथला पत्ता तरी कशाला विचारायचा, म्हणून मीही त्याविषयी कधी चौकशीदेखील केलेली नाही. कधी तरी हे लिहिणं गरजेचं होतं, सतत मनात खदखदत होतं म्हणून मी ते इतकी वर्षं साठवून डोक्यात ठेवलं होतं. हे लिहिल्यानंतर आता मी त्यातून मोकळा झालोय, सारं काही विसरूनदेखील गेलोय. इत:पर याविषयी मी आता जास्त काहीही बोलू इच्छित नाही, आणि कुणी ते मला विचारूही नये.

++++++++

वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे.त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.

No comments:

Post a Comment