Tuesday, May 5, 2015


न संपणाऱ्या शोधाची कहाणी 
'गायतोंडे' : फेक चित्रांच्या कहाण्या...
‘गायतोंडे‘ ग्रंथाची घोषणा कर्णोपकर्णी होताच सर्वात जास्त त्रास दिला असेल तर तो गायतोंडे यांच्या तथाकथित संग्राहकांनी. वेळीअवेळी येणार्‍या त्यांच्या दूरध्वनांनी काही काळ मी त्रस्तच झालो होतो. सार्‍यांचं म्हणणं काय तर ’आम्हाला तुम्हाला भेटायचंय.’ ते ऐकून ‘अरे, आपण एवढे लोकप्रिय झालो की काय?‘ असं काही तरी वाटून उगीचच मला विचित्र वगैरे वाटू लागलं होतं. ‘का भेटायचंय?‘ विचारलं तर सांगायचे, ‘गायतोंडे यांची काही चित्रं आमच्या संग्रहात आहेत ती तुम्हाला दाखवायची आहेत.’ पण ‘मलाच का दाखवायची आहेत?’ विचारलं तर ‘पुस्तकात छापायची आहेत‘ हे एवढं एक खरं खरं उत्तर सोडून जी काही नानाविध गमतीदार उत्तरं यायची ती प्रचंड मनोरंजक असायची. पण मग त्यांना उगीचच मी भिवंडीजवळ राहतो, तुम्हाला ते खूप लांब पडेल, वगैरे सांगून घाबरवायचो. खरं तर मी राहतो त्या ठिकाणाहून भिवंडी 11 किलोमीटर दूर आहे, पण ही मात्रा चांगलीच लागू पडायची. तरी काही जण मात्र तिथपर्यंत पोहोचायचेदेखील.

असेच एक गृहस्थ भिवंडी वगैरेला भीक न घालता पुढं आले. त्यांना अधिक पुढं न येऊ देणं आवश्यक होतं, म्हणून मग मीच पुढं सरसावलो. ‘किती चित्रं आहेत तुमच्यापाशी गायतोंडे यांची?’ तर म्हणाले, ‘मोजली नाहीत... खूप आहेत. ऑईल, ड्रॉइंग, स्केचेस, ग्राफिक्स, सारं काही आहे आपल्याकडे. आणि हो, तुमच्या त्या बॉम्बे स्कूलचे खूप आर्टिस्ट आहेत आपल्याकडे.‘ ‘पण मलाच का दाखवायची आहेत तुम्हाला ती चित्रं?’ तर म्हणाले, ‘तुमचं खूप नाव ऐकलं आहे, तुमचं कामदेखील खूप मोठं आहे. आणि आता तुम्ही गायतोंडे यांच्यावर पुस्तकदेखील काढताय असं वर्तमानपत्रात वाचलं, म्हणून तुम्हाला सारी चित्रं दाखवावीशी वाटली. त्यासाठीच मी तुमच्याकडे येऊ इच्छितो.‘ आता इतकं ऐकून घेतल्यावर मला गुगली टाकणं भाग होतं, आणि मी तो टाकला. ‘अहो, एवढी मोठी चित्रं तुम्ही कशी आणाल? शिवाय टोल नाका, जकात या भानगडीत फार वेळ वाया जाईल हो तुमचा.’ तर म्हणाले, ‘फार मोठी नाहीत हो चित्रं, गाडीत सहज मावतील, काळजी करू नका, मी मॅनेज करतो सारं.’ त्यांच्या तोंडून हे ऐकलं आणि माझी खात्री झाली, की नक्कीच ही सारी चित्रं ‘फेक’च असणार.

आणि तसंच झालं. पाहता क्षणीच ती चित्रं ‘फेक’च आहेत हे माझ्या लक्षात आलं. ते गृहस्थ मात्र त्या चित्रांचं गुणगान गाण्यातच मग्न होते. गायतोंडे यांच्या प्रत्येक चित्रामधून सतत भावत राहणार्‍याझिरपत राहणार्‍या एका विलक्षण निर्लेप शांततेचा त्या चित्रांत कुठं मागमूसदेखील नव्हता. तिसर्‍या दर्जाच्या कला शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या चौथ्या किंवा पाचव्या दर्जाच्या चित्रकारानं केलेलं ते काम होतं. ती चित्रं गायतोंडे यांची आहेत असं सांगणं हा गायतोंडे यांचा ढळढळीत अपमान होता. गायतोंडे यांनी चित्रासाठी किंवा चित्रकार होण्यासाठी काय त्याग केलाकाय काय सोसलंकाय काय भोगलंहे जरादेखील ठाऊक नसलेल्याकिंबहुना त्याची पुसटशीदेखील कल्पना नसलेल्या अत्यंत निरक्षर आणि निर्बुद्धांनी (त्यांना दोन पाय आहेत म्हणून माणसं म्हणायचंनाही तर ती जनावरंच.) केलेला चित्रं काढण्याचाविकण्याचा आणि विकत घेण्याचा शुद्ध बेशरम व्यवहार म्हणजे ती चित्रं होतीएवढंच फार तर त्यांविषयी म्हणता येईल. मला जे म्हणायचं आहे ते शक्य तितक्या सौम्य आणि सभ्य भाषेत मांडायचा मी प्रयत्न करतोययाची कृपया दखल घ्यावी. 

समोर आणा,
चाळीसच्या दशकातले जेजेत प्रवेश घ्यायला विरोध करणारेशिक्षणाला कपर्दिकही न देणारे आणि कुडाळदेशकर वाडीतल्या जिन्याच्या खांबाला बांधून पोराला पट्ट्यानं बडव बडव बडवणारे जमदग्नी वडील.
समोर आणा,
पन्नासाच्या दशकात समोर दिसणार्‍या मॉडेलचंच सारखं चित्र काढावं लागेल म्हणून जेजे स्कूलमधली सरकारी नोकरी नाकारणार्‍या तरुण गायतोंडे यांचा आत्मविश्वास.

समोर आणा,
वयाच्या चाळिसाव्या वर्षी घरादाराचे पाश तोडून मुंबई सोडून दिल्लीसारख्या परमुलखात जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेणारे गायतोंडे.

समोर आणा,
आधी प्रेमाच्या आणाभाका घेऊन विवाहाला तयार झालेली आणि नंतर रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवून गायतोंडे अमेरिकेत जाताच दुसर्‍याशी विवाह करून मोकळी झालेली प्रेयसी.

समोर आणा,
दिल्लीत राहूनदेखील उदरनिर्वाहासाठी कुठलीही व्यावसायिक कामं न करता अखेरपर्यंत आपल्या पेंटिंगशीच एकनिष्ठ राहिलेले गायतोंडे.
समोर आणा
कॅनव्हास-रंगाला पैसे नसताना कागद आणि शाई खरेदी करून त्यावर नंतर अजरामर झालेली शेकडो कॅलीग्राफिक
ड्रॉइंग्ज रेखाटणारे गायतोंडे. 
समोर आणा,
साठीच्या उंबरठयावर असताना जीवघेण्या अपघातात सापडून कायमच्या शारीरिक व्यंगांचा सामना करत तब्बल आठ-नऊ वर्षं कोर्‍या कॅनव्हाससमोरच्या खुर्चीत बसून पेंटिंग सुरू होण्याची वाट पाहत बसणारे गायतोंडे.


हे सारं सारं समोर आणाम्हणजे मग आजवर ‘चिन्ह’नं का पोटतिडकीनं हे सगळं समोर आणलंमांडलंते समजून घेता येईलआणि सारं आयुष्य केवळ चित्र आणि चित्रकलेसाठी संन्यस्त वृत्तीनं जगलेल्या अशा चित्रकाराच्या चित्रांची आपण केवळ आपल्या पोटाची वीतभर खळगी भरण्यासाठी ‘फेक’ चित्रं तयार करून केवढं मोठं गुन्हेगारी कृत्य करतो आहोत याची जाणीव होऊन किंचितशी तरी लाज वाटेलशरम वाटेल.



जे गृहस्थ गायतोंडे यांची तथाकथित चित्रं घेऊन माझ्यापाशी आले होते. त्यांना या सार्‍याची किंचितदेखील जाणीव नसावीआणि ती करून घेण्याची गरजदेखील त्यांना भासली नसावी. त्यांना फक्त स्वारस्य होतं ते ‘ही मी विकली तर मला याचे किती लाख किंवा कोटी जास्त मिळतील’ यातबस फक्त यात. आणि यातच. त्यांना मी गायतोंडे यांच्यावर किती काम केलं आहेकाय काम केलं आहेत्यासाठी किती काळ वेचलावगैरे गोष्टींत काही एक रस नव्हता. ‘चिन्ह’चे अंक नुसते वरवर पाहण्यातदेखील त्यांना स्वारस्य नव्हतं. त्यांना जमली तर ती सारीच्या सारी चित्रं या ग्रंथात छापून आणायची होती. त्यांच्या संग्रहात असलेली ती सारी चित्रं कशी आणि किती मौल्यवान आहेतआणि ती सारी कशी खरी खरी आहेतहे पटवून देण्यासाठी ते ज्या काही कहाण्या मला सांगत होतेत्या केवळ चित्तचक्षुचमत्कारिक होत्या यात शंकाच नाही.

या सार्‍या कहाण्या मी आधी कितीदा तरी वेगवेगळ्या चित्रकारांच्या संदर्भात ऐकल्या असल्यानं माझा त्यांवर विश्वास बसणं केवळ अशक्य होतं. पण त्या ऐकल्या मात्र आणि या चित्रांचं उगमस्थान कोठं असावं याची किंचितशी कल्पना मला आली... आणि ती नंतर खरीही ठरली. गायतोंडे यांना सतत पैशाची गरज असायची. मग ते आपल्या मित्रांना कशी भेट म्हणून पेंटिंग्ज द्यायचे आणि त्यांच्याकडून कसे पैसे घ्यायचेयाचे उल्लेख वारंवार त्यांच्या बोलण्यात येऊ लागल्यावर मात्र माझा संयम सुटला. आणि त्यांना मी स्पष्टपणे सांगून टाकलं की ‘तुमच्या संग्रहातली ही सारीच्या सारी चित्रं तद्दन ‘फेक’ आहेतफालतू पोटार्थी चित्रकारांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नीच आणि नालायक दलालांनी काढवून घेतलेली ती सारी चित्रं आहेत. तुम्हाला कुणी तरी फसवलं आहे.’ तर त्यावर मग ते गृहस्थ मला जागतिक लिलाव कंपन्या आणि त्यांची माणसं या चित्रांसाठी कशी आपल्या पाठीशी लागली आहेत हे सांगू लागले. ही चित्रं विकणं आपल्या दृष्टीनं काहीच अवघड काम नाही असं ते मला भासवत होते. म्हणजे एवढं सांगितल्यावरदेखील ती ‘फेक’ चित्रं ज्यांनी कुणी त्यांच्या गळ्यात बांधली होतीत्यांना ती ते परत करणार नव्हतेतर आणखी कुणाच्या तरी गळ्यात ते ती घालणार होते. हे तर आणखीनच भयंकर होतं. यावर ‘जे कोणी ती घेत असतील त्यांना ती जरूर देऊन टाका आणि मोकळे व्हा,’ असा सल्ला (?) देऊन संभाषण आटोपतं घेण्यापलीकडे मला दुसरं काही करता येत नव्हतं. त्यावर पुन्हा ‘ग्रंथाला काही मदत लागली तर जरूर सांगाकाही प्रायोजक वगैरे आहेत आपल्याकडे,‘ हेही अर्थात ऐकून घ्यावं लागलं. गायतोंडे यांची (फेक) चित्रं विकत घेऊन झाली होती. आता ती सारी चित्रं कशी खरी आहेत हे सांगण्यासाठी वापर करावा म्हणून ती व्यक्ती चक्क मलाच विकत घेऊ पाहत होती. या प्रसंगानंतर मात्र मी कानाला खडा लावला.

++++++++
वि. सू. ३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे.त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.

No comments:

Post a Comment