Tuesday, December 16, 2014

म्हणून मी लग्न केलं नाही…


गायतोंडे उवाच
भाग २


गायतोंडे मुळातच कमी बोलत. दिवसन दिवस ते काहीही न बोलता राहू शकत असतं. पण जेव्हा केव्हा बोलत तेव्हा मात्र असं बोलत की ते टिपून घ्यावं. त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्या त्यापूर्वीच्या मौनातील चिंतनामधून उतरलेला असायचा, अर्थगर्भ-अर्थपूर्ण-कमीतकमी शब्दात खूप काही सांगून जाणारा. अनेकदा मिश्किलतेचं आवरण त्यांनी घेतलेलं असायचं पण त्यातूनही ते बरंच काही सांगून जायचे. अशाच एक मुलाखतीतून आलेली ही प्रश्नोत्तर पहा.

: तुम्ही लग्न नाही केलं ? लग्नसंस्थेवर विश्वास नव्हता म्हणून ?
: तसं नाही. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे; पण मी संसारी माणूस नाही. लग्न म्हणजे सहजीवन. आणि मी कुणाही बरोबर सहजीवन व्यतीत करू शकत नाही. मी माझ्या मार्गानं जगू इच्छितो. जसं आहे तसं. आणि ते मी एकाकी राहूनच साध्य करू शकतो. म्हणून मी लग्न केलं नाही.

: लग्नाचा विचार तरी कधी केला होता ?
: जवळ जवळ लग्न झालंच होतं, पण सुदैवानं ते फिसकटलं. 
 
: ते कसं ?
: ते सर्व मी इथं उघड करू शकत नाही. शिवाय त्याच वेळी मला जाणवलं की मी कोणाहीबरोबर सहजीवन व्यतीत करू शकत नाही. जर आम्ही विवाहबद्ध झालो असतो तर कदाचित आम्ही उभयतांनीही एकमेकाप्रतीचा तो आदर गमावला असता. सहजीवन जगण्यासाठी तुमच्याजवळ एक प्रकारचा समजूतदारपणा हवा. पण तो समजूतदारपणा तिच्याजवळ नव्हता आणि माझ्याकडेही !

: त्यानंतर पुन्हा कधी लग्नाचा विचार मनात आला ?
: नाही. पण प्रेम खूप केलं. अनेक स्त्रिया आयुष्यात आल्या आणि गेल्या. पण लग्नाचा विचार मग कधीच केला नाही. मला जाणवलं की लग्न, संसार या गोष्टी माझ्यासाठी नाहीत.

गायतोंडे यांच्या दुर्मिळ मुलाखतीमधून घेतलेली ही काही प्रश्नोत्तरं. गायतोंडे यांनी ज्या मोजक्याच मुलाखती दिल्या त्यातल्या सहा मोजक्याच मुलाखती आम्ही गायतोंडे ग्रंथात प्रसिध्द केल्या आहेत. गायतोंडे यांच्या विलक्षण व्यक्तिमत्वाचं दर्शनच या प्रश्नोत्तरातून घडतं.

या ग्रंथाचा प्रोमो पहायचा असेल किंवा निर्मितीची कथा सांगणारा २८ पानी विशेष लेख वाचायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.chinha.co.in/promo/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf आणि ग्रंथ हवा असेल तर ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचे नावं, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा.

No comments:

Post a Comment