Sunday, January 3, 2016

" गायतोंडे पेंटिंग " आणखी एक नवा वाद…


गायतोंडे त्यांच्या हयातीतच अनेक आख्यायिका आणि दंतकथांचे नायक झाले होते.असं भाग्य कुणाच भारतीय चित्रकाराला अद्यापि लाभलेलं नाही.तोच सिलसिला गायतोंडेच्या पश्चातदेखील तसाच चालू राहिला आहे.त्यांचं प्रत्येक पेंटिंग हे नव्या नव्या आख्यायिकांना,दंतकथांना आणि वादांनादेखील जन्मला घालू लागलं आहे.आता आजच्याच मुंबई मिररमधली स्टोरी पाहा ना.http://www.mumbaimirror.com/…/The-…/articleshow/50114565.cms
दुर्गादेखील आमच्या जेजेचीच.मला काही वर्ष ज्युनिअर होती.ती मुळची ठाण्याचीच.लग्न झाल्यावर दिल्लीला गेली.चित्र काढण्याखेरीज चित्रकलेसंबंधीचे अनेक चांगले उपद्याप ती करीत असते.तिचं स्वतःचं छानसं कलेक्शन आहे.मुख्य म्हणजे त्यात गायतोंडे यांची चित्रं आहेत.यावरून तिच्या संग्रहाचा दर्जा लक्षात यावा.
मुंबई मिररच्या स्टोरीमध्ये दुर्गाच्या संग्रहात असलेल्या गायतोंडे यांच्या पेंटिंगवरची जी स्टोरी प्रसिद्ध झाली आहे.तिचा पूर्वार्ध तिनं मला दीड दोन वर्षापूर्वी सांगितला होता.आणि तेव्हा तिनं त्या चित्रांविषयी काही भीती माझ्यासमोर व्यक्त केली होती.ती बहुदा खरी ठरली असावी असे मुंबई मिररची स्टोरी वाचून वाटते.आता नक्की काय होणार,ख्रिस्तीजवाले काय करणार,दुर्गाचं पुढलं पाऊल काय असेल,याविषयी मला निश्चितपणे कुतूहल वाटतं.
मी " गायतोंडे " यांच्यावरचं पुस्तक करतोय हे ऐकून ती दिल्लीहून खास मला भेटायला आली होती.ती गायतोंडे यांना प्रत्यक्ष भेटलेली.त्यामुळे तिला भेटायलादेखील मी खूप उत्सुक होतो.चांगले तीन चार तास आम्ही गप्पा मारीत होतो.त्या गप्पांमधून तिने सांगितलेल्या अनेक गोष्टी अचंबित करून गेल्या होत्या.दुर्गा अस्सल पंजाबन आहे.त्यात दिल्लीत राहिलेली त्यामुळे सगळा हिशेब रोखठोक.तिनं जे काही सांगितलं ते मी आता इतक्यात उघड करू इच्छित नाही.प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते.पण तिच्या संग्रहातलं गायतोंडे यांचं पेंटिंग मात्र गायतोंडे ग्रंथात मी आवर्जून घेतलंय.आणि तिने सांगितलेल्या काही भन्नाट गोष्टीसुद्धा " गायतोंडे : न संपणाऱ्या शोधाच्या कहाणी…" मध्ये मी घेतल्या आहेत.हवं तर ' चिन्ह ' च्या वेबसाईटवर ठेवलेल्या PDF फाईलमधून तुम्ही त्या वाचू शकता.
आठ पंधरा दिवसापूर्वीच दुर्गाचा मला फोन आला होता.प्रकाशनाची तारीख नक्की झाली की कळवायला विसरू नकोस म्हणून.आता तारीख नक्की झाली आहे ३० जानेवारी २०१६.बहुदा उद्या किंवा परवा मी तिला फोन करेन आणि या बातमीवर तिनं जर काही भाष्य केलं तर पुन्हा नक्की लिहेनच.


अत्यंत अत्यंत दुर्मिळ गायतोंडे…


गायतोंडें यांच्या व्हेनिसमधल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पेरिसहून सुनील काळदातेंचा फोन जेव्हा आला तेव्हा तो बोलता बोलता मला म्हणाला " गायतोंडें यांच्या ग्युगेंनहेम शोविषयी वृत्तपत्रात वाचून एक नव्वदीचा म्हातारा एके दिवशी म्युझियममध्ये आला आणि काही निगेटिव्ह दाखवून म्हणाला " १९६५ साली रॉकफेलर शिष्यवृत्ती घेऊन गायतोंडे नावाचा एक तरुण चित्रकार न्यूयॉर्कमध्ये आला होता.त्यावेळी त्याचे फोटो काढायची संधी मला मिळाली होती.फोटो अर्थातच ब्लक अण्ड वाईट होते.पण का कुणास ठाऊक त्या निगेटिव्ह मी जपून ठेवल्या होत्या.तुमच्या शोविषयी वृत्तपत्रात वाचलं आणि त्या निगेटिव्ह मी शोधून काढल्या.६५ साली

ज्याचं शूट मी केलं होतं तोच हा चित्रकार तर नव्हे ? असेल तर त्या निगेटिव्हज आता तुम्ही घेऊन ठेवा कदाचित त्या तुमच्या उपयोगात येतील,असं म्हणून ५० वर्षापूर्वीच्या निगेटिव्हस त्यांच्या हाती सोपवून तो नव्वदीचा म्हातारा निघून गेला.
या साऱ्या प्रकारानं या शोची क्युरेटर सांधिनी पोतदारला किती आनंद झाला असेल हे मी समजू शकतो.कारण या शोच्या निमित्तानं सांधिनी मलासुद्धा भेटून गेली होती.तेव्हा माझ्याकडचा गायतोंडेंचा खजिना पाहून तिला किती आनंद झाला होता हे मी स्वतः अनुभवलं आहे.त्यामुळेच गायतोंडे यांचे अत्यंत दुर्मिळ फोटोग्राफ अचानक हे असे हाती आल्यावर त्यांचं काय झालं असेल याची मी चांगलीच कल्पना करू शकतो.
गायतोंडे ग्रंथासाठी त्यांचे एक एक फोटोग्राफ मिळवताना मी किती खस्ता खाल्ल्या आहेत,किती कष्ट उपसले,किती मानहानीचे प्रसंग अनुभवले ते माझं मलाच ठाऊक.माझ्या संग्रहात असलेल्या गायतोंडे यांच्याविषयीच्या शे सव्वाशे कात्रणातून ज्या ज्या फोटोग्राफरचे संदर्भ मला मिळाले त्या त्या साऱ्यांशीच मी संपर्क साधला.पण प्रत्येक ठिकाणाहून नकारघंटाच ऐकावयास मिळाल्या.कुणी कामाच्या नाहीत म्हणून निगेटिव्ह नष्ट केल्याचं सांगितलं,तर कुणी सापडत नाहीत म्हणून कांगावे केले.तर अनेकांनी त्या नोकरी सोडताना ऑफिसमधेच टाकून दिल्याचं सांगितलं.आणि इथे तर एक नव्वदीतला म्हातारा चालवत नसताना थरथरत येतो आणि स्वतःच्या हातानी निगेटिव्हस देऊन टाकतो.दोन संस्कृतींमधला केवढा हा फरक.यावर काही बोलणं किंवा लिहिणं हा आपणच आपल्याला त्रास करून घेणं आहे म्हणूनच ते टाळतो.
सुनीलनं काढलेल्या गायतोंडेंच्या फोटो संदर्भातला किस्साही असाच भयंकर आहे.पण त्याविषयी मी इतक्यात काही सांगू इच्छित नाही.सुनील सांगत होता ग्युगेंनहेमने एका दालनामध्ये या सर्व फोटोंच्या प्रिंट्स मारून त्या प्रदर्शित केल्या आहेत.त्यातलेच दोन फोटो परवा सुनीलनं माझ्यासाठी पाठवले.बहुदा गायतोंडे यांच्या शोच्या प्रसिद्धीसाठी ग्युगेनहेमने ते प्रसारित केले असावेत.फोटो खरोखरच अप्रतिम आहेत.गायतोंडे त्या काळातदेखील किती आधुनिक विचारांचे होते.त्याचंच दर्शन त्या फोटोतून घडतं.काळ्या रंगाविषयीची त्यांना असोशी पाहून मला गायतोंडे ग्रंथातला आणखीन एक दुर्मिळ फोटो मला आठवतो.१९४८ साली जेजेची टूर उदयपूरला गेली होती.त्या टूरमध्ये कोणीतरी गायतोंडेना पोझ द्यायला सांगितलं.काळा गोल गळ्याचा मॉड टी शर्ट घातलेले गायतोंडे आजच्या काळातदेखील फिट वाटतील असे दिसतात.सुनीलने पाठवलेले ब्रूस फ़्रिश यांचे ते दोन्ही फोटोग्राफ मी इथं शेअर करतोय.आणि त्याच फोटोसोबत रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवून गायतोंडे अमेरिकेत गेले तेव्हा झालेल्या सत्कार समारंभाचे फोटोदेखील सोबत देतोय.कसे वाटले जरूर कळवा.

' गायतोंडे ' आणि काळदाते व्हेनिसमध्ये…


सुनीलला फोन केला तेव्हा तो नुकताच व्हेनिसहून परतला होता.पण तरीही त्यानं माझा फोन घेतलाच.म्हणाला ' तुलाच आता फोन करणार होतो.पण तुझाच फोन आला.बोल ! ' म्हटलं ' तूच बोल,मी काय बोलणार ? ' कार्यक्रम कसा झाला ते सांग आधी ! तर तो म्हणाला ' मस्त ' एकदम छान.खूप चांगली व्यवस्था केली होती त्यांनी.आणि आयोजनदेखील सुरेख केलं होतं.म्हटलं किती लोकं होती शोला ? तर म्हणाला थिएटर भरलंच होतं.फिल्म साऱ्यांना आवडली ? तर म्हणाला ' असावी '. शो संपल्यावर खूप लोकं भेटायला आली होती.अनेकांनी माझ्या नव्या प्रोजेक्टविषयी चौकशी केली.मी काय करतोय किंवा काय करणार आहे ? याविषयीदेखील आडून आडून विचारणा होत होती.अनेकांनी भेटीचं निमंत्रण दिलं.तर काहीजण मला भेटायला पेरिसला येणार आहेत.आणखीन बरंच काही सुनील सांगत होता.पण ते सारं इथे कोट करणं योग्य नव्हे.



सुनीलला मी जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये असल्यापासून ओळखतो.त्या काळात तो गाडी घेऊन जेजेला यायचा.पण जेजेतल्या शिक्षणाविषयी तो फारसा समाधानी नव्हता.त्यामुळे त्याने जेजेचं शिक्षण अर्ध्यावरच सोडलं.आणि थेट पेरीसला गेला.तो कालखंड १९७८-१९८० चा असावा.यावरून त्याची धाडसी वृत्ती लक्षात यावी.पेरिसमध्ये तो हेटरच्या स्टुडियोत ग्राफिक शिकायला गेला.तिथं त्याला पिकासोची (बहुदा शेवटची) बायको जेकलीन भेटली.तिने त्याचं काम पाहून त्याला अमेरिकेत येऊन तिच्या स्टुडियोमध्ये काम करण्याची ऑफर दिली.पण अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने त्याला तिथे जाता आले नाही.नंतर त्याने पेरिसच्या फिल्म इन्स्टीटयूटमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स केला.तिथं तो काय शिकला असेल ते त्याची ' गायतोंडे ' यांच्यावरची २७ मिनिटांची फिल्म पाहिल्यावरच कळतं.
ती फिल्म बनवल्यालाही झाली आता तब्बल २० वर्षे.मधल्या काळात त्याने जगण्यासाठी काय काय केलं ते सारंच्या सारं मला ठाऊक आहे.या फिल्म नंतरच खरंतर त्याची माझी दोस्ती झाली.मुलुंडमध्ये जिथं मी वीस वर्ष राहिलो.तिथून अगदी जवळच,पण ठाण्यात त्याचं घर होतं.सहाजिकच पेरिसवरून आल्यावर पहिला यायचा तो माझ्याकडेच.आणि मग नंतर गप्पा टप्पा,खाणं पिणं,हास्यविनोद वगैरे वगैरे.हा क्रम मी आता ठाण्यात त्याच्या घरापासून अगदी दूर राहायला आल्यावरदेखील बदललेला नाही.
सुनीलची नजर तीक्ष्ण आहे.अत्यंत बारकाईने तो आजूबाजूचं सारं टिपत असतो.तो घरी आला असताना टीव्हीवर एखादा चित्रपट चालू असेल,तर त्यावर तो जे काही बोलतो,केमेरा कसा मुर्खासारखा लावलाय,लाईटींग कशी गाढवासारखी केलीय वगैरेवर आपली जी अभ्यासपूर्ण मतं व्यक्त करतो ती खरोखरंच ऐकत राहावी अशीच असतात.त्यावरून त्याची या माध्यमावरची ताकद कळते.जागतिक राजकारणावर विशेषतः अर्थकारणावर त्यानं केलेलं भाष्य विलक्षण अर्थपूर्ण असतं.गेल्या १५ वर्षात आर्थिक जगात ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या त्याविषयी त्यानं मला आधीच सांगितलं होतं.आणि तसंच नंतरच्या काळात घडलं होतं.सहाजिकच आमच्या गप्पा प्रचंड रंगतात.
कालही तो भारतात लवकरच येणार आहे असं म्हणाला.मी खरोखरंच त्याची वाट पाहतो आहे.कारण,त्याच्या ' गायतोंडे ' फिल्मचं न्यूयॉर्क आणि व्हेनिसमध्ये कसं स्वागत झालं ते मला त्याच्याच तोंडून ऐकायचंय.अर्थात स्कायपीमुळे मला ते इथं भारतात बसूनही ऐकण्याची सोय झाली आहे.पण प्रत्यक्ष ऐसपैस बसून,खातपित(विशेषतः पित) सुनीलच्या जगण्याचे भन्नाट किस्से ऐकणे हा आनंद काही औरच आहे.आणि मुख्य म्हणजे ज्या ' गायतोंडे ' यांच्यामुळे आम्हा दोघांची विशेष मैत्री जमली त्या गायतोंडे यांच्यावरच्या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात त्याला मला सहभागी करून घ्यायचंय.जमलंच तर त्या फिल्मचं स्क्रीनिंगदेखील करायचं आहे.(पण आता ते कितपत शक्य आहे याविषयी मात्र मी साशंक आहे,पण एवढं मात्र नक्की की तो प्रकाशन समारंभाला निश्चितपणे हजर राहणार आहे.परवा फोन ठेवताना त्यानं मला तसं आश्वासनही दिलं आहे.

आता हे वाचल्यावर तुमच्या मनातही सुनीलविषयी कुतूहल जागृत झालं असेल तर पुढे दिलेली दिलेली लिंक जरूर वाचा.सुनीलचं आत्मकथनच त्यात आहे.
http://www.chinha.co.in/images/archives/…/Artical%2021th.pdf

' गायतोंडे ', ' सुनील काळदाते ' आणि बरेच काही…


गेल्याच आठवड्यात सुनीलशी माझं बोलणं झालं.सुनील म्हणजे सुनील काळदाते.ज्यानं गायतोंडे यांच्यावरची एकमेव बहुचर्चीत फिल्म दिग्दर्शित केली तोच हा महाभाग.तो पेरीसला असतो.जेजेत तो मला एक वर्ष ज्युनियर होता.जेजेत शिकत असतानाच त्याची एक दिवस काय सटकली कुणास ठाऊक ! तो उठला आणि जेजेचा अभ्यासक्रम सोडून थेट पेरीसला गेला.तेव्हापासून तो पेरीसलाच आहे.या गोष्टीलाही आता तब्बल ३५ वर्षे झाली आहेत.या ३५ वर्षात पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं आहे.
या ३५ वर्षात पेरीसमध्ये त्यानं नेमकं काय केलं ते सारंच्या सारं अगदी त्यानं सांगितलं तसं आत्मकथनाच्या स्वरुपात आम्ही ' चिन्ह ' च्याच खूप गाजलेल्या ' गायतोंडेच्या शोधात…' विशेषांकात प्रसिद्ध केलं.' गायतोंडेच्या शोधात…' विशेषांकाचं ते एक आणखी विशेष आकर्षण ठरलं.जे तो जगला,जसा तो घडला ते ते सारंच्या सारं त्यानं अतिशय प्रांजळ शब्दात मांडलं होतं.साहजिकच कलाक्षेत्रात (आणि त्यांचा घरातही) एकच खळबळ उडाली.ते वाचून त्याला भेटायची उत्सुकता भारतातल्या अनेक जणांच्या मनात निर्माण झाली.कितीतरी जण (आणि जणीसुद्धा) त्याला थेट पेरीसमध्ये जाऊन भेटले.हे सारं मला कसं ठाऊक,तर त्यातला अनेक जणांनी माझ्याकडूनच त्याचे फोन आणि ईमेल आयडी घेतले होते.
हे इतकं सारं वाचल्यानंतर साहजिकच आहे तुमच्याही मनात सुनीलविषयी प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं असणार.पण ज्या अंकात सुनीलचं आत्मकथन प्रसिद्ध झालं होतं,त्या अंकाची एकही प्रत आता माझ्यापाशी शिल्लक नाही.एकमेव ऑफिस कॉपी होती तीसुद्धा कुणीतरी झेरॉक्स मारून आणून देतो असे सांगून लांबवली.त्यामुळे कृपा करून कुणीही त्या अंकाची मागणी करणारे फोन मला करू नयेत ही नम्र विनंती.
सुनीलचं ते गाजलेलं आत्मकथन ' निवडक चिन्ह ' च्या पाचव्या खंडात,म्हणजे 
'
चिन्ह' मधून गाजलेल्या आत्मकथनाच्या खंडात नक्की प्रसिद्ध होणार आहे.हा खंड दुसऱ्या टप्प्यात पुढीलवर्षी म्हणजे २०१६ च्या पूर्वार्धात प्रसिद्ध होईल.(जाता जाता): या आत्मकथनाच्या खंडानंतर ' निवडक चिन्ह ' मालिकेतला शेवटचा ' भास्कर कुलकर्णी' यांच्यावरचा खंड प्रकाशित होईल.आणि हे सगळे उरस्फोड करणारे जीवघेणे ग्रंथ प्रकाशित करून मी जिवंत राहिलोच तर माझ्या सर्वात आवडीचा विषयावर म्हणजेच ' राजा रवि वर्मा ' वर ' निवडक खंड ' चा शेवटचा खंड प्रकाशित करून मी माझी प्रकाशकीय कारकीर्द थांबवेन.असो
आणखी एक सांगायचं राहून गेलं ज्या कुणाला हे सारं वाचून सुनीलवरचा तो गाजलेला लेख वाचायची अतीव इच्छा झालीच तर ' चिन्ह ' च्या संकेतस्थळावरhttp://www.chinha.co.in/images/archives/…/Artical%2021th.pdf या लिंकवर क्लिक करा आणि आधी सुनीलवर लिहिलेला नितीन दादरावालाचा लेख वाचा आणि नंतर सुनीलचं आत्मकथन अवश्य वाचा.
खरंतर सुनीलवर आणखी खूप लिहायचं होतं पण हे लिहित असतानाच स्काईपवर सुनीलचा फोन वाजतोय.आज बहुदा लवकर उठलेला दिसतोय.त्याचा फोन आलाय म्हणजे माझा अर्धा एक तास गेलाच म्हणून समजायचं त्यामुळे आता मी थांबतो आणि उद्या बाकीचं सारं लिहितो.त्याने केलेल्या ' गायतोंडे 'च्या वरच्या फिल्मनं अक्षरशः युरोपात धमालच उडवून दिली आहे.ते सारं उद्या सांगतो.तोपर्यंत वरच्या लिंकवरचा त्याचा लेख वाचायला विसरू नका.
' गायतोंडे ' ग्रंथाचा प्रोमो-ट्रेलर पाहण्यासाठी आणि ग्रंथाच्या निर्मितीची चित्तचक्षु चमत्कारिक कथा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.http://www.chinha.co.in/marathi/index.html 

'गायतोंडे' : आणखी एक विक्रमी लिलाव...




गेल्या आठवडयात कुरियरने एक जाडजूड पाकीट घरी आलं. पाकिटाच्या कागद आणि छपाईवरून ते भारतातून आलेलं नाही हे लक्षात आलं. उत्सुकतेनं मागे पाहिलं तर ते चक्क Gloucestershire इथून आलं होतं. वर नाव होतं जगप्रसिद्ध लिलाव कंपनी "Bonhams"चं. उत्सुकतेनं उघडून पाहिलं तर आत एक सुंदर कॅटलॉग होता. आणि त्या कॅटलॉगच्या मुख आणि मलपृष्ठावर चित्रं होती गायतोंडे यांची कधीही न पाहिलेली. क्षणभर काही कळेचना. मग लक्षात आलं काही दिवसापूर्वी फेसबुकवर गायतोंडेंच्याचं पेजवर एक मेसेज आला होता Edward Wilkinson यांचा. आणि त्यांनी माझा पत्ता मागितला होता. लागलीच त्यांना तो मी पाठवलादेखील. आणि आता तो कॅटलॉग त्यांनी मला पाठवला होता. गायतोंडे पेजवर लिहू लागल्यापासून जगभरातून अनेक म्युझियम्स, नियतकालिकं, गेलऱ्या आणि लिलाव कंपन्या सातत्याने 'चिन्ह'च्या संपर्कात आल्या आहेत.
हा कॅटलॉग अप्रतिम आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि आतसुद्धा गायतोंडे यांची कधी न पाहिलेली असंख्य ड्रोईंग्स आणि दोन कॅनव्हास असा भरगच्च ऐवज त्यात आहे. गायतोंडे यांचं १९६१ सालातलं हे सारं वर्क आहे. ते पाहून गायतोंडे यांच्या प्रतिभेनं अक्षरशः थक्क व्हायला होतं. Morris Graves यांच्या संग्रहातली ही सर्व चित्रं होती. १९६३ साली ते इंदिरा गांधी यांच्या निमंत्रणावरून भारतात आले होते. तेव्हा ते पंतप्रधान नेहरूंनादेखील भेटले आणि नंतर पुप्पूल जयकर यांच्यासोबत त्यांनी मुंबईत येऊन गायतोंडे यांच्या स्टुडिओला भेट दिली होती. त्याच भेटीत त्यांनी ही सर्व चित्रं दस्तुरखुद्द गायतोंडे यांच्याकडूनच खरेदी केली होती. त्यावेळी न्यूयॉर्कच्या Willard Gallery च्या Dan & Mariam Jhonson यांना एक Aerogram लिहिला होता. त्यात ते म्हणतात, 
"The second thing is this, today Mrs. Jayakar took me to the studio of a Bombay painter GAITONDE - age-39 & one of the finest painters I have ever seen. He is very little known. He's as fine - or superb - as Mark Rothko at his best. He paints in oil - average size 34" x 26" - 38" x 48" - 5ft. x 4ft. a fine person and will be a world - known painter one of these days. You should be the ones to show him first. I told Mrs. Jayakar so. She agreed. Said she'd help. He is 100 percent 1 superb oil & six super - super ink drawings. He is an abstract painter with something unspeakably beautiful & clean added. They are the most beautiful landscapes of the mind plus light and composed with great simplicity. You too will be very awed by him...
आणि आता तब्बल ५१ वर्षानंतर Morris Graves यांचे ते शब्द जसेच्या तसे खरे झालेले दिसतायत. ५१ वर्षानंतर "Bonhams"च्या परवाच्या लिलावात आलेल्या गायतोंडे यांच्या या साऱ्या चित्रांनां ७ लाख २७ हजार पाऊंड इतकी भरभक्कम किंमत आली आहे.
या कॅटलॉगचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे यातली सर्वच्या सर्व चित्रं अतिशय सुरेख पद्धतीने या कॅटलॉगमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या सोबत जो मजकूर लिहिला गेला आहे तो देखील अतिशय वाचनीय आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे गायतोंडे यांना प्रचंड मानत आणि गायतोंडे यांनादेखील ज्यांची चित्रं आवडत त्या चित्रकार प्रभाकर कोलते यांचे गायतोंडे यांच्याविषयीचे अवतरण या कॅटलॉगमध्ये अगदी ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आलं आहे. गायतोंडे यांच्या चाहत्यांनी हा कॅटलॉग पाहायलाच हवा एवढा तो अप्रतिम आहे. आता ७ लाख २७ हजार पाऊंड म्हणजे किती रुपये याचा हिशोब मात्र ज्याचा त्यानेच करायचा.
यातली निदान दोन चित्रं तरी गायतोंडे ग्रंथात जायला हवीत असं मनापासून वाटत होतं, पण आता ते शक्य नाही कारण मराठी ग्रंथाचं काम आता पूर्ण झालं आहे. इंग्रजी आवृत्ती प्रसिध्द झाली तर त्यात ती चित्रं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जर मराठी ग्रंथाची दुसरी आवृत्ती निघाली तर मात्र त्यात ही चित्रं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.


'गायतोंडे' ग्रंथाच्या संपादकीयाची गोष्ट… भाग १


'गायतोंडे' ग्रंथाचं काम आवरत आलं होतं. सुमारे ७-८ महिन्यापूर्वीची ही गोष्ट. संपादकीय सर्वात शेवटी लिहायचं असं मनाशी आधीच निश्चित केलं होतं. साहजिकच गायतोंडे यांची दुर्मिळ प्रकाशचित्रं आणि त्यांच्या त्याहूनही दुर्मिळ पेंटिंग्जची प्रकाशचित्रं मिळवतांना निर्माण झालेल्या ताणतणावातून सुटका झाल्यावरच मी संगणकाच्या कि-बोर्डला हात लावला. आधी पाच पानं संपादकीय लिहायचं असं ठरलं होतं. मग पाचाची सहा, सहाची सात पाने झाली आणि सरतेशेवटी ग्रंथाची आठ पानं संपादकीयासाठी सोडली.
लिहून झालेलं संपादकीय आमचे मित्र पद्माकर कुलकर्णी यांना दाखवलं. या ग्रंथाच्या स्वरूपाविषयी सुरुवातीपासूनच त्यांच्याशी वरचेवर चर्चा होत होत्या. साहजिकच लिहिलेलं त्यांना दाखवणं क्रमप्राप्तचं होतं. त्यांनी ते वाचलं आणि काही सूचना केल्या. हे हवं ते नको, असं हवं तसं नको वगैरे. त्या मलाही पटल्या आणि मग पुन्हा नव्याने लिखाण सुरु केलं जे कसं वाढत गेलं ते माझं मला नेमकं कधी कळलंच नाही. त्यांनी आणखीन एक सूचना केली म्हणाले हे सारं सुनील कर्णिकांना दाखवा.
अशा रितीने सुनील कर्णिक या सगळ्या प्रक्रियेत आले. खरं तर त्या आधी ग्रंथाच्या भाषेसंदर्भात मुद्रितांसंदर्भात त्यांचा सल्ला मी घेतच होतो. पण संपादकीयासंदर्भात त्यांचा सल्ला घेण्याची कल्पना मला आवडून गेली. लिहिलेलं संपादकीय वाचलं आणि त्यांनी भली थोरली यादीच माझ्या हातात ठेवली आणि म्हणाले या यादीत सुचवलेल्या गोष्टी जर संपादकीयात आल्या तर आणखीन मझा
येईल.
आणि मग मी लिहीतच सुटलो. ते वाचणाऱ्याला वाचतांना मझा येईल की नाही याची मला कल्पना नाही. पण लिहितांना मात्र मी तो मझा लुटत गेलो. कर्णिकांनी इतक्या वर्षाच्या त्यांच्या अनुभवातून केलेल्या त्या सूचना अत्यंत महत्वाच्याच ठरल्या. तोपर्यंत गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीच्या ताण्याबाण्यातून मी पुरेसा तावून सुलाखून निघालो होतो. साहजिकच घडलेलं सारं आठवून लिहितांना मी एक प्रकारे पुनःप्रत्ययाचा आनंदच घेतला.
हे सारं लिहितांना कर्णिकांसोबत सात आठ वेळा तरी बैठका झाल्या. त्या प्रत्येक बैठकीमधून काहीना काही चांगलं उलगडत गेलं आणि माझं लिखाण पुढं पुढं सरकत गेलं. आता काही लिहिण्यासारखं उरलं नाही असं जेव्हा मला वाटल तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं की संपादकीय लिखाणाचं हे सारं प्रकरण सुमारे २० हजार शब्दांच्याही बाहेर गेलंय. बापरे ! आता हे सारं ग्रंथात घालायचं तरी कसं या विचारानं मला अक्षरशः दरदरून घाम फुटला. पण त्याविषयी अधिक वाचा पुढील भागात.
'गायतोंडे' ग्रंथाच्या निर्मितीची कथा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.http://www.chinha.co.in/p…/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf

'गायतोंडे' ग्रंथाचा प्रोमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.http://www.chinha.co.in/promo/Webdesign.pdf

Thursday, June 18, 2015


"गायतोंडे" : Recap 1
'प्रत्यक्षात असा असेल ग्रंथ…'

सर्वात आधी या तयार झालेल्या ग्रंथाविषयी सांगतो, कारण त्याविषयी सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि ही जी उत्सुकता निर्माण झाली आहे, तीत फेसबुकचा वाटा मोठा प्रचंड आहे. म्हणूनच गायतोंडे यांच्यावरच्या ग्रंथाचं प्रकाशन होण्यापूर्वी जे काही लिहायचं ते फेसबुकवरच असं मनाशी निश्चित केलं होतं. इथून पुढं ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत गेल्या तीन चार वर्षातल्या साऱ्याच महत्वाच्या पोस्टचा धांडोळा तर आपण घेणारच आहोत पण मधल्या काळात मिळालेली खूप नवी माहितीदेखील शेअर करणार आहोत.
गायतोंडे यांच्या सहीचा वापर करून खास डिझाईन केलेल्या कोरोगेटेड बॉक्समधूनच हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येणार आहे. हा ग्रंथ पुस्तक विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याने आणि स्पीड पोस्ट किंवा कुरियर मार्फतच पाठवला जाणार असल्याने तो वाचकांच्या हाती अत्यंत सुरक्षितपणे पडावा यासाठी विशेष जाडीचा कोरोगेटेड पेपर निवडण्यात आला आहे. हेतू हा की पोस्टाच्या किंवा कुरियरच्या हजार एक किलोमीटरच्या प्रवासातदेखील त्याला ओरखडा देखील न पडता तो वाचकांच्या हातात अत्यंत सुरक्षितपणे पडावा. हा निर्णय ग्रंथाचा आकार आणि वजन पाहूनच घेण्यात आला आहे. कारण गायतोंडे मूळ ग्रंथ आणि त्यासोबत दिली जाणारी गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीची कथा सांगणारी २८ पानी पुस्तिका यांचे वजन तब्बल २ किलो भरले हेच होय. छपाईच्या पाश्चात्य जगात लोकप्रिय असलेला "इमोटे +" नामक जो कोरियन कागद या ग्रंथाला आम्ही वापरला आहे त्याच वजनचं मुळी १३० gsm आहे. आसपासचा कागददेखील १६० gsmचा वापरलाय. केस बाईंडिंगसाठी वापरलेला बोर्डदेखील विशेष जाडीचा आणि बनावटीचा वापरला आहे. जेणेकरून ग्रंथ कसाही आणि कोठेही ठेवला तरी तो उभा राहावा. मूळ ग्रंथ आणि पुस्तिका पावसातदेखील वाचकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहचावी यासाठी खास Shrink Wrapping पद्धत वापरण्यात आली आहे. डिझायनर बॉक्समध्येही तो आतल्या आत हलून त्याचे कोपरे दुमडले जाऊ नयेत म्हणून बबल्स पेपर्सचा देखील वापर करण्यात येणार आहे.

डिझाईनप्रमाणेच कागद, छपाई, बांधणी, मांडणी इत्यादी ग्रंथाशी संबंधित साऱ्याच विभागात आम्ही काहीच करायचे शिल्लक ठेवलेले नाही. गायतोंडे यांच्या चरित्राचा समग्र आढावा घेणारा एकही ग्रंथ अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. तो मराठी भाषेतच पहिल्या प्रथम प्रसिद्ध होत आहे. म्हणूनच जो प्रसिद्ध होणार आहे तो ग्रंथ चित्रकलाविषयक जागतिक दर्जाच्याच ग्रंथांच्या तोडीचा व्हावा असे जे स्वप्न सुरुवातीपासून पहिले होते ते आता इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर का होईना पूर्ण होतांना दिसते आहे याचा आनंद विशेष आहे.

'गायतोंडे' ग्रंथाचा प्रोमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
http://www.chinha.co.in/promo/Webdesign.pdf
'गायतोंडे' ग्रंथाच्या निर्मितीची कथा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
http://www.chinha.co.in/p…/Gaitonde%20Sampadakiya%20Book.pdf

आणि रु. ३००० चा 'गायतोंडे' ग्रंथ रु. २००० मध्ये मिळवण्यासाठी 90040 34903 इथे YES GAI एवढाच मेसेज पाठवा.


गायतोंडे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकताना केलेलं क्लासवर्क. या चित्रांमागेदेखील एक अफलातून कहाणी दडलीय. पोलिसातच नाहीतर कोर्टातदेखील केस गेली आहे, पण तिच्याविषयी पुढे कधीतरी.