Monday, April 28, 2014

"सामोअर"चा नाडकर्णी….

काय अंक काढला आहे हो तुम्ही सतीश नाईक, ग्रेट ग्रेट, असा अंक काढायला धाडस लागतं. खूप खूप मोठं काम केलं आहे हे तुम्ही ! गायतोंडे असते तर नक्की खूष झाले असते. " गायतोंडेंच्या शोधात … " अंक प्रसिद्ध झाला आणि एके दिवशी सकाळी सकाळी नाडकर्णीचा फोन आला. नाडकर्णी म्हणजे ज्ञानेश्वर नाडकर्णी. बऱ्याच दिवसानं नाडकर्णी यांचा फोन आलेला. मी ठरवलं काहीही बोलायचं नाही, फक्त ऐकावयाचं. त्याची पार्श्वभूमी अशी होती की. नाडकर्णी यांनी तोवर कला वर्तुळातला आपला वावर पूर्णतः थांबवला होता. कारण तब्येत हे तर होतेच पण कला वर्तुळात घडलेल्या काहीं अप्रिय घटना हेही असावे, त्याविषयी कधी तरी विस्तारानं लिहावयाचे असल्यानं आणि तो विषयही विस्तारानं मांडावा लागणार असल्यानं आज मी इथं उल्लेख करू इच्छित नाही. पण एवढच सांगतो कि मुंबईच्या कला विश्वाकडून मिळालेल्या काही कडवट अनुभवांमुळ नाडकर्णी खूप दुखावले गेले होते. आणि आता ते या कला विश्वाशी कुठलाही संबंध ठेऊ इच्छित नव्हते. 

बोलता बोलता नाडकर्णी अचानक चिडले आणि म्हणाले, "पण तुम्ही माझ्याकडून लेख का घेतला नाहीत. मी दिला नसता का ? गायतोंडे माझा मित्र होता, जानी दोस्त. त्याच्यावरचा एकमेव मोनोग्राम मी लिहिलाय. चिन्ह्साठी त्याच्यावर लिहायला मला आवडलं असतं. तुम्ही का नाही माझ्याकडून लेख घेतलात ? मी काय तुमच्याकडून पैसे मागणार होतो. होय आतापर्यंत मी लिहीलं ते पैशासाठीच लिहीलं. पण चिन्ह काय तुम्ही काय किंवा गायतोंडे काय इथे पैशाचे हिशोब नसतात. का नाही तुम्ही मला फोन केलात ? इतकं बोलून नाडकर्णी किंचित थांबले. तीच संधी मी साधायचं ठरवलं म्हटलं नाडकर्णी…... "काही बोलू नका माझाशी मला काही एक तुमचं ऐकायचं नाही. मुंबईतल्या कुठल्याही कलावंताशी मी संबंध ठेऊ इच्छित नाही. मुंबईच्या कलाविश्वाशी मला काही घेणं देणं नाही. मी तुमच्याशी काही बोलू इच्छित नाही किंवा तुमचंही काही ऐकू इच्छित नाही. एवढं बोलून नाडकर्णीनी दाणदिशी फोन आपटला. 

आता यावर मी काय बोलणार ? बोलायचं खूप होत, सांगायचंही खूप होत, पण नाडकर्णी काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. खर तर चूक माझीही नव्हती. आजारपणामुळे, वार्धक्यामुळे नाडकर्णी खरंतर थकले होते. खूपसे चिडचिडेही झाले होते. काही बोललं की वसकन अंगावर यायचे. "काय नाडकर्णी ! तब्येत कशी आहे ?" असं जरी नुसतं औपचारीकपणे विचारलं, तरी चिडून फाडकन उत्तर द्यायचे, मला काय धाड भरली आहे ? त्यामुळे मग संवादच तुटायचा. कालांतराने तर मग तो पूर्णतः तुटत तुटत गेला. रोज फोनवरचं गप्पा मारणारे नाडकर्णी नंतर नंतर तर फोनवरसुद्धा अत्यंत तुसडेपणाने वागायला लागले. त्यांच्या या अशा स्थितीत त्यांच्याकडून लेखाची मागणी करणं योग्य वाटेना. तो मागून आपण त्यांना त्रास देतोय की काय असं वाटून मी त्यांना लेखासंबंधी विचारलं नव्हतं . बाकी त्यात दुसरं कुठलंही कारण असण्याची शक्यता नव्हती. कलाविश्वात ज्यांना माझा शत्रू पक्ष मानल जात अशांकडूनही मी लेखन करून घेतलं आहे. इतकंच नाही अशा व्यक्तींवर लेखन प्रसिद्धसुद्धा केलं आहे. इथं तर काय नाडकर्णी हे माझे मित्रच होते. १९८२ ते १९९२ इतका मोठा कालखंड आम्ही जवळ जवळ रोजच सकाळ संध्याकाळ भेटत असू सामोअर मध्ये बसत असू. चहापान करत असू. त्यानंतर नाडकर्णी मला माझ्या ऑफिस मध्ये टयाक्सीने सोडून केनेडी ब्रिजकडे जात असत, नाडकर्णी आता संपर्कासाठी दुरापास्त झाले होते हेच एक कारण गायतोंडे यांच्यावरचा लेख त्यांच्याकडून घेण्यामागं होत अन्य काही नाही. 



आता गायतोंडे यांच्या या ग्रंथाचं संपादन पूर्ण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या ग्रंथात नाडकर्णी यांचा लेख नाही ही एक मोठी उणीव राहून गेलेली आहे. पण आता तर नाडकर्णी निघून गेलेले आहेत. शेवटी त्यांनी प्रसंगपरत्वे गायतोंडे यांच्यावर लिहिलेलं लिखाण वाचून काढलं आणि त्यांच्याच 'अश्वत्थाची सळसळ' या पुस्तकातील त्यांचा लेख पुनर्मुद्रित करण्याचा निर्णय घेतला. नाडकर्णी यांचे प्रकाशक रामदास भटकळ यांनीही टाकोटाक परवानगी दिली त्यामुळे ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा लेख अशा पद्धतीनी का होईना गायतोंडे ग्रंथात समाविष्ट झाला आहे.

Sunday, April 27, 2014

आणि गायतोंडे यांनी लक्ष्मण श्रेष्ठ यांचे पाय धरले….


चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या पत्नी सुनिता परळकर श्रेष्ठ यांचं सहजीवनासंदर्भातलं आत्मकथन चिन्हच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालं आहे. ते यंदा खूपच गाजलं. त्यातला गायतोंडे यांच्या संदर्भातला भाग 'गायतोंडे' यांच्या चाहत्यांना विशेष आवडून गेला. लक्ष्मण हे गायतोंडे यांना गुरु मानत. गायतोंडे यांचाही लक्ष्मण यांच्यावर विशेष जीव होता. मुंबईच्या कलावर्तुळातील बहुसंख्य चित्रकारांसोबत काहीसे फटकूनच वागणारे गायतोंडे लक्ष्मण यांना मात्र मनापासून जवळ करत तेही लक्ष्मण हे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेत होते तेव्हापासूनच. लक्ष्मण यांनी हा सारा अनुभव विलक्षण प्रभावी रीतीने शब्दातून मांडलाय. गायतोंडे ग्रंथातला लक्ष्मण यांचा हा प्रदीर्घ लेख विशेष आकर्षणच ठरावा.

गायतोंडे यांनी लक्ष्मण यांना निसर्गदत्त महाराजांकडे जाण्याविषयी सूचना केली. आणि एके दिवशी तर चक्क निसर्गदत्त महाराजांनीच लक्ष्मण यांना अधिकृत शिष्यत्व बहाल केलं. लक्ष्मण यांनी गायतोंडे यांना ते सांगितल्यावर गायतोंडे यांनी काय करावं ? तर ते चक्क उठले आणि त्यांनी लक्ष्मण यांचे थेट पायच धरले. लक्ष्मण या घटनेने अक्षरशः हडबडून गेले. अतिशय मोजक्या शब्दात लक्ष्मण यांनी रेखाटलेले गायतोंडे यांच व्यक्तिचित्र वाचणारयाला मुळापासून हलवून टाकतं.

गायतोंडे यांच्या विषयीची अनेक रहस्य लक्षमण यांनी या त्यांच्या प्रदीर्घ लेखात उलगडून सांगितली आहेत. गायतोंडे यांना झालेल्या त्या दुर्देवी अपघाताबाबत कुणाकडूनच काही काळत नव्हत. तो भाग या ग्रंथात असायलाच हवा अस मला मनापासून वाटत होतं. शर्मिला फडके यांनी शब्दांकित केलेलं लक्ष्मण यांच हे आत्मकथन हाती आलं आणि मग झालेला आनंद अवर्णनीय होता. कारण त्यात गायतोंडे यांचा शेवटचा प्रवासही अधोरेखित झाला होता. या आत्मकथनासोबत लक्ष्मण यांनी जी कृष्णधवल प्रकाशचित्र आणि गायतोंडे यांनी रेखाटलेलं त्यांचं व्यक्तिचित्र दिलं आहे. त्यामुळे या ग्रंथाला एक वेगळाच परिमाण लाभल आहे.